सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

गोडसे

महेश मांजरेकरच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा शिळ्या कढीला उत आलेला आहे. ज्यांना प्रामाणिकपणे विषय माहिती नसेल त्यांच्यासाठी - नथुराम गोडसे. चित्रपट २०२२ मध्ये सुरू होणार आहे म्हणजे २०२३ उजाडेल. तोवर तरी कढी उकळत राहील. सहज एक मनात आलं - गोडसेने माउंटबॅटनला का नाही मारलं? असे प्रश्न निरर्थक आहेत हे मला नीट कळतं. कारण अस्थिर मनाला अशी चिकित्सा लागू होत नाही. शिवाय आपला राग काय होता हे स्वतः गोडसेने सांगितलं असल्यामुळे त्यावर वाद घालण्यातही अर्थ नाही. एवढंच वाटतं की, गोडसेने फाळणी टाळण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. ते अधिक चांगलं झालं असतं. असो.

- यानिमित्ताने होणाऱ्या चर्चेत संघ गांधींचा विरोधक होता आणि मजबुरीने संघाला एकात्मता स्तोत्रात गांधींना स्थान द्यावे लागले, अशीही चर्चा होते. अशी चर्चा करणारे हिंदुत्वाचे समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंचे असतात. पण हे चुकीचे आहे हे सगळ्यांनी मोकळ्या मनाने नीट समजून घेतले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०२१

आजच्या तीन लक्षणीय गोष्टी.

१) उत्तर प्रदेशातील हत्येच्या प्रकरणात मृतकाच्या परिवाराला अखिलेश सरकार ४५ लाख रुपये देणार.

(देशात रोज शेकडो खून होतात. सगळ्या सरकारांचे बजेट वाढतील आता. गुंडांनी गुंडगिरी करायची अन आपण भोगायचे. मदत करण्यासाठी काही निकषबिकश असण्याची काय गरज? राजा उदार असला म्हणजे झाले.)

२) आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तमाशा. कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी चक्क दिवाळीतील रॉकेटसारखे रॉकेट तयार करून त्यात कबुतर भरले. अन त्याची वाट पेटवून वर आकाशात पाठवले. आकाशात रॉकेटचा स्फोट झाला. कबुतरांचे काय झाले असेल आपण समजू शकतो. काय म्हणावे याला? बिनडोकपणा. राक्षसीपणा. उन्मत्तता. उन्माद. रानटीपणा. लोक तयार आहेत वा नाहीत हे न पाहता जी लोकशाही बोडक्यावर लादण्यात आली त्याचे तर हे परिणाम नाहीत?

३) एका गरबा मंडळाने (बहुतेक मध्य प्रदेशात) सहभागी होण्यासाठी अंगावर गोमूत्र शिंपडून व टिळा लावून येण्याचे बंधन घातले आहे. लगेच सार्वत्रिक राष्ट्रीय कावकाव सुरु झाली आहे. त्या मंडळाने लोकांनी त्यांच्या गरबा महोत्सवात आलेच पाहिजे असे तर फर्मान नाही ना काढले? ज्यांना त्यांची बंधने पटतात ते जातील. नाही ते जाणार नाहीत. कदाचित त्यांचा गरबा दुथडी भरून वाहील किंवा ओस पडेल. लोक अन मंडळ पाहून घेतील. त्यात बाकीचे विषय घुसवण्यात काय अर्थ. आम्ही खरंच स्वातंत्र्य मानतो?

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०१५

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

दिनकर मनवर वाद

दिनकर मनवर यांच्या कुठल्याशा कवितेवरून गदारोळ चालला आहे. त्याला अनुसरून-

१) लिंगभावाचे शब्द, भाषा वापरल्याशिवाय दु:ख, वेदना, अभाव मांडता येत नाहीत का?

२) अशा प्रकारे अंगात आल्यासारखे न करता लिहिणारे आणि आव न आणता समाजासाठी खूप काही भरीव करणारे नाहीत का?

३) अशी भाषा वापरणे हा हक्क असू शकतो का?

४) बोलण्याच्या, लिहिण्याच्या ओघात, संतापाच्या ओघात, तिरीमिरीत अथवा भावनांच्या आत्यंतिक आवेगात अशी भाषा वापरणे समजून घेण्यासारखे असले तरीही; रोज रतीब घातल्यासारखे असंबद्ध, दर्जाहीन लिहिणे, बोलणे बरळत राहणे आणि शेकडो लोकांनी झुंडीने त्यावर टिवल्याबावल्या करणे; ही कोणत्या अर्थाने सृजनशीलता असू शकते?

५) अत्यंत दर्जाहीन, सवय म्हणून मुर्खपणा करणारे, सवय म्हणूनच नव्हे तर जाणूनबुजून अर्वाच्य लिहिणारे, बोलणारे, ठरवून हे करणारे आणि त्यांचे झेंडे नाचवणारे; हे समाजरूपी आंब्याच्या आढीतील सडलेले आंबेच आहेत.

६) मानवी जीवनात सगळ्या गोष्टींना स्थान आहे. अपरिहार्यता म्हणून किंवा तसेही. अगदी घाण, अश्लीलता, नग्नता, क्रूरता, पांचटपणा आदींनाही. पण त्यांचे त्यांचे स्थान आहे. आम्हाला स्थान आणि स्थितीची मर्यादा मान्य नसून आम्हाला वाटेल तिथे, वाटेल तेवढे, वाटेल तसे, वाटेल तेव्हा करीत राहू; हे म्हणणे, त्यासाठी आग्रही असणे आणि त्या म्हणण्याला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून उचलून धरणे ही बदमाशी आहे.

७) विधिनिषेधशून्यता म्हणजे सृजनशीलता असूच शकत नाही.

८) कोणालाही कुठेही घाण/ कचरा टाकण्याची, ओकण्याची परवानगी असू शकत नाही. तो हक्क तर असूच शकत नाही. घाण, कचरा, ओकाऱ्या; या शारीरिक असोत, मानसिक, बौद्धिक वा भावनिक असोत.

९) असे सडके आंबे कालप्रवाहात नेहमीच राहतात, पुढेही राहतीलच. पण ते असतात म्हणजे त्यांना राहूच दिले पाहिजे असे नाही.

१०) घाण होणे प्रकृतीचा स्वभाव असला तरीही घाण स्वच्छ करणे मानवी आणि दैवी आहे. मानवी आणि दैवी वृत्ती वाढल्याच पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०१८

कोणीही कोणाचं नसतं

कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात एक वाक्य आहे - 'कोणीही कोणाचं नसतं.' खलील जिब्रानच्या प्रॉफेटच्या तोंडीही अशाच आशयाचं एक वाक्य आहे - 'तुमची मुलं तुमची नाहीत. तुमच्यातून आलेली आहेत.' आदि शंकराचार्य त्यांच्या निर्वाण षटकम स्तोत्रात हाच भाव व्यक्त करतात. परंतु तिघांच्याही प्रतिपादनात खूप मूलभूत फरक आहे. कुसुमाग्रज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं असलं पाहिजे. मानवी भावनांना अनुसरून व्यक्त केली गेलेली नटसम्राटाची निराशा ही अपेक्षा सुचवते. खलील जिब्रानचा प्रॉफेट जीवनाचं नागडं सत्य तत्वचिंतकाच्या अधिकाराने मानवाला समजावून सांगतो. आदि शंकराचार्य मानवी भावांच्या वर उठून, तत्वचिंतनाच्या सोपानावरून 'मी शिव आहे' हे अंतिम सत्य सांगतात. 'कोणीही कोणाचं नसतं' ही एकच गोष्ट कशी विविध रुपात असू शकते, तिचे अर्थ कसे वेगळाले असू शकतात हे यावरून समजून घेता येतं.

(आगामी लेखनातून)

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०२०

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

श्रद्धा अंधश्रद्धा

एका वाहिनीवर श्याम मानव विरुद्ध वर्तक सुरु होतं. अन त्याच वेळी दुसऱ्या एका वाहिनीवर फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने पंतप्रधान मोदींशी झालेल्या गप्पांमध्ये उल्लेख केलेल्या `कैची' गावच्या `निमकरोली' बाबांची माहिती सुरु होती. झुकरबर्गला apple च्या स्टीव्ह जॉब्सने या बाबांकडे पाठवले होते.

विज्ञान तंत्रज्ञानाची चिकित्सक बुद्धी नसलेले किंवा पैसा हवा आहे पण तो मिळवण्याची अक्कल नसलेले लोक बाबांच्या नादी लागतात. अन बाबा वगैरे ढोंग असतं, असं प्रा, मानवांच्या प्रबोधनामुळे आम्ही समजतो. पण मार्क झुकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे चिकित्सक बुद्धी किंवा पैसा कमावण्याचे तंत्र अन कौशल्य नसेल असे काही वाटत नाही. मग कधीही न पाहिल्या देखलेल्या, भारतात सुद्धा ज्याच्या बद्दल माहिती नाही अशा बाबांकडे ते का आकर्षित झाले असतील? अन सगळ्या जगाला नाचवणारा हा झुक्या त्या पहाडातल्या आश्रमात काही दिवस का राहिला असेल? त्याला काय मिळालं असेल? हा काय चमत्कार असावा? की झुक्या पण लेकाचा आमच्यासारखा दुबळाच आहे म्हणायचा? काही कळत नाही.

फक्त एक निरीक्षण नोंदवलंय मित्रांनो.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१५

वैभवाची कल्पना

परवा विजयादशमीला सरसंघचालकांचे भाषण झाले. ते भाषण सुरु होते तेव्हापासूनच चर्चेला आणि प्रसार माध्यमांच्या मतप्रदर्शनाला सुरुवात झाली. ही चर्चा काही काळ चालेल. अनेक विषय होतेच. सुरक्षा, आजची परिस्थिती, रोहिंग्या, काश्मीर इत्यादी. हे सगळेच विषय महत्वाचे आहेतच. पण ते सगळे तातडीचे अन अल्पकाळाचे आहेत. एक विषय मात्र दीर्घ काळाचा, अधिक मुलभूत असा होता आणि स्वयंसेवकांच्या दृष्टीने मला तो जास्त महत्वाचा वाटतो. कारण अन्य विषय स्वरूप या दृष्टीनेही गुंतागुंतीचे आहेत. त्यात सामान्य व्यक्तीने प्रत्यक्षात करण्यासारखे खूप काही नाही. परंतु जो दीर्घकालीन विषय त्यांनी मांडला तो मात्र सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना त्यात काही ना काही करण्यासारखे आहे. तो विषय होता- `विश्वविभव की व्याख्या नयी करेंगे'. त्या कार्यक्रमात झालेल्या सांघिक गीतातील ही एक ओळ. ही उद्धृत करून सरसंघचालक त्यावर बोलले. याची मस्करी होऊ शकेल, यावर टीकाटिप्पणी होऊ शकेल, यावर कुचाळकी होऊ शकेल. परंतु वैभवाची नवीन व्याख्या जगात स्थापित करण्याची गरज आणि संकेत या भाषणात त्यांनी दिले. त्या दिशेने प्रयत्नशील होणे हा स्वयंसेवक आणि अन्य समाजासाठीही खरा संदेश आहे.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१७

आपण इंग्रज होऊ नये

- इंग्रजांपासून मुक्ती मिळवल्यावर आपण इंग्रज होऊ नये. (महात्मा गांधी)

हे केवळ भाषा, रीतिरिवाज, वागणंबोलणं, खाणंपिणं, व्यवस्था यापुरतं नाही; तर दृष्टी, वृत्ती, विचार आणि तत्वज्ञान याला अनुलक्षून आहे.

*****

- माझ्या अशिक्षित परंतु समजूतदार आईने शिकवलं आहे की, माणसाला कर्तव्य असतात अधिकार नाही. (महात्मा गांधी - मानवी हक्काचा जाहीरनामा तयार करताना संयुक्त राष्ट्रसंघाने मत मागवले तेव्हा)

साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, भांडवलशाही, आधुनिकता इत्यादी अधिकारावर भर देणारे विचार गांधींशी मेळ कसे खातील?

*****

'ताशकंद फाईल्स' पाहिला अन पुन्हा गांधी आठवले - 'आपण जी सभ्यता स्वीकारण्याच्या तयारीत आहोत ती राक्षसी सभ्यता आहे. ती एक दिवस जगाला खाऊन टाकील.' आज तीच सभ्यता स्वीकारून माणूस न्याय, शांति, सुख, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात गांधींना पाण्यात पाहणारे आणि गांधींना डोक्यावर घेऊन नाचणारे दोघेही आहेत. केवळ सद्भाव आणि करुणा यांनी भागत नाही. जी समस्या आहे ती त्याहून खूप मूलभूत आहे. गांधींचं नाव घेण्याचा आग्रह असो की ते टाकून देण्याचा निर्धार असो. दोन्ही निरर्थक. मुळाचा, गाभ्याचा, तत्वाचा विचार करण्याची सुरुवात जेव्हा होईल ते खरं. मुळात विचार आणि अभ्यास यातही खूप फरक आहे. माणूस तर हा फरक समजून घेण्यापर्यंतही पोहोचलेला नाही. अजून खूप मोठा पल्ला आहे.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१९