मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

वरवरचे

खोटे, दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या celebrity लोकांना जबर दंड आणि कारावास अशी तरतूद असणारा एक कायदा येऊ घातला आहे. ढोबळ मानाने हे चांगलेच आहे. त्याचा नेमका तपशील आणि अंमलबजावणी, त्यातील अडचणी इत्यादी हळूहळू स्पष्ट होईलच. पण प्रथमदर्शनी जाणवणाऱ्या काही गोष्टी-

१) चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या इत्यादीसारख्या कारणांसाठीही celebrity ना सजा होईल का? ते चुकीचे ठरेल.

२) जाहिराती असा दावा कंपनीसाठी, कंपनीच्या वतीने करतात. मग कंपनीला सजा होईल की नाही? दिशाभूल करणाऱ्या कंपनीला कारभार, व्यवसाय करण्याचा अधिकार राहावा का?

३) खोटे दावे करणाऱ्या फक्त celebrity नाच सजा का? अन्य मॉडेल्सना का नको?

४) आश्वासने आणि दावे या वेगळ्या गोष्टी मानायच्या का? देशाच्या, समाजाच्या कल्याणाचे दावे करणारे राजकीय पक्ष, राजकीय नेते, सरकारे यांना सजा का नको?

या अनुषंगाने सहज परवा टेलिफोनचं बिल भरायला आलेले एक काका आठवले. बिल भरायला थोडी रांग होती. बोलताना हेल्मेट विषय आला. काका संतापलेच. म्हणाले- `हेल्मेट घातल्यावर मरणार नाही असं आश्वासन कोणी देतं का? मंत्र्याने, आरटीओने, पोलिसांनी stamp paper वर लिहून द्यावं तसं. उगाच आपले तमाशे करतात. मी ३०-४० वर्ष गाडी चालवतो. काहीही झालं नाही. आता या वयात त्याची सवय व्हायलाही अवघड आहे हो. एकदा घालून पाहिलं- चार चार वेळा मान वळवून पहावी लागत होतं. कदाचित हेल्मेट घातल्यावरच अपघात होऊ शकेल. दीड शहाणे आहेत सगळे. हे म्हणजे कसं आहे माहीत आहे का? काशी बिशीला गेलं की पंडे सांगतात- अमुक ग्रहाची शांती करा, नाहीतर अरिष्ट येईल वगैरे. मग शे पाचशे, हजार रुपये उकळतात. तसंच आहे. तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर मराल असा धाक घालायचा अन खिसा कापायचा. अमुक काही तरी होईल वगैरे करून घाबरवणे अन डल्ला मारणे म्हणजे अगदी `सभ्य डाकूगिरी' आहे हो.'

आश्वासने अन दावे असेही असतात. त्यांचं काय? प्रश्नांच्या मुळाशी जाऊन प्रश्न सोडवण्यापेक्षा काहीही थातूरमातुर, निरर्थक गोष्टी करण्यातच आम्ही व्यक्ती म्हणून अन समाज म्हणूनही धन्यता मानू लागलो आहोत. नाही का?

- श्रीपाद कोठे

31 ऑगस्ट  2016

ऐक्य, प्रेम इत्यादी...

सकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला त्यावर बातमी होती- मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांचा आज संप. युनियन वगैरे असल्याने संप यशस्वी झालाच असेल. बाकी त्रास वगैरे आनुषंगिक बाबी राहतीलच.

पंतप्रधानांनी काश्मीरबाबत दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानावरील एक लेख वृत्तपत्रात पाहिला. एकतेची गरज असा त्याचा आशय होता.

त्यानंतर मित्राने what's app वर पाठवलेला `दस कहानियां' चित्रपटाचा सुमारे दहा मिनिटांचा एक तुकडा पाहिला. २००७ सालच्या या चित्रपटात रोहित राय, नाना पाटेकर, अनिता हस्सानंदानी यांच्या भूमिका आहेत. पती-पत्नी प्रेम, काळजी करणे हा विषय आहे. एक जण नाराज झाल्यावर दुसऱ्याने समजूत काढण्यासाठी काय करायचं याचे ठरलेले संकेत. नाराज होण्याची कारणं- कमोडचा रंग कोणता असावा इत्यादीही.

`तारक मेहता का उल्टा चष्मा' यात सध्या सुरु असलेलं प्रकरण पाहिलं. गोकुलधाम सोसायटीतल्या महिला हिऱ्यांचं प्रदर्शन पाहायला जातात आणि तेथील १० कोटी रुपयांच्या साडीच्या प्रेमात पडतात. संबंधित हिरा व्यापारी जेठालालचा मित्र असल्याने दया त्याला गळ घालते की, एक दिवसासाठी तरी ती साडी घेऊन या. आम्ही ती घालून त्याचा अनुभव घेऊ, आनंद घेऊ अन जशीच्या तशी परत करू. वरून `ही साडी आणणे ही तुमच्या प्रेमाची कसोटी' असेही दया जेठालालला सुनावते. आता जेठालालची धावपळ सुरु आहे.

नवीनच सुरु झालेल्या `झी युवा' वाहिनीची तीन चार दिवसांपूर्वी पाहिलेली जाहिरात आठवून गेली- बाईकवर मागे बसलेली मुलगी आपल्या प्रियकराला दोनचा पाढा म्हणायला लावते. तो म्हणतो आणि विचारतो, कशाला म्हणायला सांगितला? ती उत्तर देते- मी पाहत होते, लग्नानंतर तू माझ्या तालावर किती नाचशील ते.

@@@@@@@@@@@@@

हे सगळे तुकडे मनात घोळत होते. त्यांची एक गोधडी तयार झाली. अन रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी प्रख्यात विचारवंत कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी यांना विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली. गुरुजींनी विचारले होते- what is the difference between collective bargaining and highway robbery? (सामूहिक सौदेबाजी आणि महामार्गावरील वाटमारी यात काय फरक आहे?) स्व. दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केल्याचा संदर्भ त्या प्रश्नाला होता. त्याच चर्चेत गुरुजी दत्तोपंतांना म्हणाले होते- तुझ्या भारतीय मजदूर संघातील प्रत्येक सदस्यासाठी तुझं आतडं आईसारखं तुटतं का, हे महत्वाचं.

@@@@@@@@@@@@@

मनातल्या घटना- प्रसंगांच्या गोधडीला विचारांचा हा तुकडाही जोडला गेला. या गोधडीच्या उबेत वाटलं, ऐक्य म्हणजे काय? स्वार्थासाठी एकत्र येणं? स्वार्थासाठी संघटीत होणं? गरजा पूर्ण करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, संरक्षणासाठी एकत्र येणं, संघटीत होणं म्हणजे ऐक्य? एक होण्यासाठी एकमेकांच्या गरजा पूर्ण करायच्या, एकमेकांना सांभाळून घ्यायचं की, एक आहोत म्हणून गरजा पूर्ण करायच्या, सांभाळून घ्यायचं? हृदय पायांना रक्तपुरवठा करतं आणि पायही हृदयाला वाहून नेतात. का? एक होण्यासाठी की, एक आहेत म्हणून? एक होण्यासाठी काश्मिरी लोकांच्या मागण्या मान्य करत करत गेलं तर, अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक पैसा ओतूनही समाधान होत नाही. मागण्याही संपत नाहीत. पाय आणि हृदय मात्र मागण्याही करत नाही अन रुसवे फुगवेही होत नाहीत. एक आहोत म्हणून वंचितांची काळजी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांची काळजी करणं यात फरक आहे ना? एक आहोत म्हणून वंचितांनी मागणी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांनी मागणी करणं यात फरक आहे ना?


ऐक्यासाठी प्रेमही हवं. पण प्रेम म्हणजे काय? एकमेकांना न दुखावणे? एकमेकांच्या सगळ्या गोष्टी मान्य करणे, चालवून घेणे? मनाच्या लहरी सांभाळत राहणे? अवास्तव, अयोग्य गोष्टीही मान्य करवून घेणे? अवास्तव, अयोग्य, निरर्थक गोष्टी स्पष्टपणे समजून न घेणे? तालावर नाचवणे? प्रेम असलं की, मांजरीचे दात तिच्या पिलांना बोचत नाहीत. सौदा असला की मात्र १० कोटींच्या साडीची गरज पडते. पदार्थ बिघडला तरीही न सांगणे म्हणजे प्रेम? अमुक वस्तू तुझ्या उपयोगाची नाही, आपल्या बजेटमध्ये नाही किंवा अमुक विषय समजायला तू अजून लहान आहेस इत्यादी न सांगणे म्हणजे प्रेम? प्रेमाच्या कसोट्या असतात?


प्रेम असणं आणि प्रेम उत्पन्न करणं, ऐक्य असणं आणि ऐक्य निर्माण करणं... प्रेमापोटी काही करणं अन प्रेमासाठी काही करणं, ऐक्यापोटी काही करणं आणि ऐक्यासाठी काही करणं... खूप फरक आहे. अगदी जमीन आस्मानाचा. `साठी' कसं सोडून देता येतं? अन `पोटी' कसं येतं? माणसाला सगळंच कळलं आहे असा निदान माझा तरी भ्रम नाही...

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ ऑगस्ट २०१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

हिंदुत्व- भारतातले अन अमेरिकेतले

सध्या अण्णा हजारे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे एका `हिंदू विश्वकोशा'च्या प्रकाशन कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून उपस्थित होते. नशीब त्यावरून गदारोळ झाला नाही. पण सहज एक आठवून गेले. दिल्लीतील त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी मंचावर स्वामी विवेकानंद, भारतमाता यांची छायाचित्रे होती. त्यावरून केवढा गदारोळ झाला होता. त्यामुळे नंतरच्या उपोषणामध्ये त्या चित्रांची सुट्टी झाली होती. आपल्या देशातील सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्वशक्तीमान प्रसार माध्यमे, अण्णांचे विरोधक आणि पाठीराखे या सगळ्यांनाच अमेरिकेतील हिंदुत्व चालते, पण भारतातील नको असे म्हणायचे का? बाकी असो काहीही, जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात.

- श्रीपाद कोठे

२९ ऑगस्ट २०१३

कशातच काही अर्थ नसतो...

`कशातच काही अर्थ नसतो मित्रा. मस्त बिनधास्त जगायचं. मटणमच्छी खायची. दारूबिरू प्यायची. बाई, बाटली सगळं करायचं. मनसोक्त शिव्याबिव्या द्यायच्या. कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही. आपल्याला वाटेल ते, आपल्याला वाटेल तसं, आपल्याला वाटेल तेव्हा वागायचं बोलायचं. मस्त रहने का... क्या??'

एक मित्र दुसऱ्या शामळू मित्राला शहाणं करत होता. शामळूच तो. त्याने सहज विचारलं- `कशातच काही अर्थ नसतो म्हणतो. मग मित्रा, तू आत्ता म्हणालास त्या सगळ्या गोष्टीत अर्थ असतो का? म्हणजे असेलच म्हणा. त्याशिवाय का तू करणार?'

`शहाणे करून सोडावे सकळ जन' असं व्रत घेतलेला, सल्ला देणारा मित्र, हातातला वेफर्सचा पुडा फेकून देऊन, गाडीला किक मारून हातवारे करत निघून गेला.

- श्रीपाद कोठे

२९ ऑगस्ट २०१६

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

रामरहीम बाबा

रामरहीम बाबाचा निकाल लागला एकदाचा. बरे झाले. खऱ्या भक्तांना, धार्मिक व आध्यात्मिक लोकांना यात काहीही वावगेही वाटणार नाही अन दु:खही होणार नाही. समर्थांनी म्हटलेच आहे ना- असे गुरु पायलीचे पन्नास मिळतात. रामकृष्ण परमहंस देखील म्हणत- गुरु दिवसा पहावा, रात्री पहावा, नीट पारखून गुरु करावा. त्यामुळे जे झाले त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. तरीही...

अन हा तरीही महत्वाचा आहे अन त्यावर वारंवार बोलायलाही हवे. एका वाहिनीवर या विषयावरच्या चर्चेत दोन मुद्दे आले- १) अन्य धार्मिक लोक अशा लोकांचा आधीच विरोध का करीत नाहीत? २) बाबा कोण याचे निकष असावेत.

या दोन्ही गोष्टींचा समाचार घेतला गेला पाहिजे. मुळात आधीपासून विरोध कसा करायचा? का करायचा? दोषी सिद्ध होईपर्यंत जर गुन्हेगार हा गुन्हेगार नसतो तर त्याला विरोध कसा करणार? असा युक्तिवाद करणाऱ्या वृत्त वाहिनीने तरी अशा लोकांचा आधीच विरोध केला का? किंवा करतील का? आणखीन एक मुद्दा- समाजात कोणी कशा पद्धतीने काम करायचे हे कोण सांगणार? वृत्तवाहिन्या? वाईट गोष्टींवर प्रहार ही जशी एक गोष्ट, तशीच चांगल्या सकारात्मक गोष्टींची सवय लावणे, सकारात्मक जाणीवा तयार करणे ही दुसरी गोष्ट. असंख्य धार्मिक व्यक्ती, संस्था अशी सकारात्मक कार्ये करीत आहेतच. मात्र, नाही नाही... त्यांनीही आमच्यासारखेच आकांडतांडव केले पाहिजे, ही भूमिका निखालस चुकीची ठरेल. हा साधा पोच नसलेल्या वृत्तवाहिन्यांचीच खरे तर झाडाझडती घेतली जायला हवी. हा देश आता बाबा बुवा चालवणार का, असा कंठशोष करणाऱ्या वाहिन्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे- हा देश कोण चालवणार यावर जरूर चर्चा करू, पण हा देश वृत्तवाहिन्या चालवणार का? या प्रश्नाचे अगोदर उत्तर द्या.

दुसरा मुद्दा- बाबा कोण याचे निकष ठरवण्याचा. हा खूप मोठा विषय आहे. तूर्त एवढीच नोंद पुरेशी ठरेल की, असे निकष ठरवणे ही भारतीय परंपरा तर नाहीच शिवाय धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही ते चुकीचे ठरेल. भारतेतर विचार पद्धतीच्या परिणामी असे युक्तिवाद होतात. त्यावर विस्तृत मंथन गरजेचे आहे. ज्यांना धर्म आध्यात्म यांच्याशी काहीही देणेघेणे नसते असे लोकच यात आघाडीवर असतात. शिवाय यातून सत्ता विरुद्ध संत असा भारताला आजवर अपरिचित असा वर्गसंघर्ष लादला जाऊ शकतो. वास्तविक असे संघर्ष लादणे हाच अजेंडा घेऊन काम करणाऱ्या लोकांची ही कारस्थाने आहेत का, अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आज सुरु असलेला discourse बारकाईने अभ्यासला तर या संशयाला पुष्टी मिळते. रामरहीम सारख्या घटना घेऊन, बुद्धीचा फारसा वापर न करणाऱ्या समाजाच्या मोठ्या भागाला, चुकीच्या विचारांकडे घेऊन जाणे आणि या देशाचे, समाजाचे सशक्त आधार मोडून काढण्याचा प्रयत्न करणे हे या निमित्तांनी घडते; हे लक्षात घेतले पाहिजे. रामरहीमच्या निमित्ताने झालेला हिंसाचार highlight केला जातो आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पूज्य शंकरचार्यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्यावरही हा समाज त्याचा धैर्याने सामना करतो हे हेतूपुरस्सर विसरले जाते. अन एकूणच धर्म इत्यादींना ठोकून काढले जाते. सुविद्य लोकांनी विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ ऑगस्ट २०१७

कठोर व्हायला हवे

काल नागपुरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलाव दुथडी भरून वाहू लागला. तरुणाई आनंद साजरा करायला गेली. (कॉलेज या तलावाला लागूनच असल्याने ३७-३८ वर्षांपूर्वी आम्हीही जात असू.) त्याचे फोटो छापून आले. अन त्यासोबत छोटीशी बातमी होती. त्यात म्हटले होते की, तिथे सुरक्षेचा कोणताही बंदोबस्त नव्हता. वृत्तपत्राला बातम्या कराव्याच लागतात. पण सवाल हा की, कशाला हवी सुरक्षा व्यवस्था? त्याचे उत्तर आहे- दुर्घटना होऊ नये म्हणून. overflow पाहायला गेले असताना दुर्घटना का होईल? झालीच तर पोरांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच होईल. `बेजबाबदारपणे वागणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही वापरणारच.' अशा थाटात वागायचे अन त्या बेजबाबदारपणाच्या परिणामांची जबाबदारी समाजाची, सरकारची, प्रशासनाची असे म्हणायचे; हा तमाशा खूप झाला. अशा overflow, धबधबे, समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी अशी पोलीस यंत्रणा किंवा सुरक्षेची व्यवस्था वगैरे मुळीच असू नये. स्वत:च्या बेजबाबदार वागण्याने मेले १०-२० जण तर मेले. सरकार किंवा प्रशासन अशी रोखठोक भूमिका घेऊ शकत नाही. पण समाजाचे असे मानस तयार होणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांनीही असे मानस घडवण्यात भूमिका पार पाडावी. excuses मागण्याची हाडीमासी खिळलेली सवय मोडून काढलीच पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१७

कर आणि वर्गणी

एक खूप छान नाही, पण मार्मिक विडंबन काल परवा छोट्या पडद्यावर पाहिलं. विषय गणेशोत्सव. स्थानीय गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता एका काकांकडून वर्गणी आणि जाहिरात मिळून सहा हजार रुपये उकळतो. संबंधित काकूंना हे कळल्यानंतर त्या हुशार काकू त्या कार्यकर्त्याकडे जातात आणि घरच्या गणपतीसाठी म्हणून वर्गणी काढतात. सहा हजार रुपये परत मिळवतात. नंतर १५१ रुपये वर्गणी देतात आणि एक वाक्य बोलतात-

`अरे बाळा, लोक स्वखुशीने देतील ना तेवढी वर्गणी घ्यावी. त्या पैशात जेवढा आणि जसा जमेल तसा; जास्तीत जास्त चांगला आणि भक्तिभावाने गणेशोत्सव करावा. त्यालाच गणपती पावेल.'

आजच्या जमान्यात बहुतेक जण कानाआड करतील असे हे मार्मिक वाक्य. `उपदेश' या शब्दाने सारं काही मोडीत काढण्याची सध्याची रीत. मला उगीचच चाणक्य आठवून गेले. कर किती असावा यावर चाणक्याचं प्रसिद्ध उत्तर आहे- `मधमाशी फुलातून मध गोळा करते तेवढा. फुलाला जाणवणार सुद्धा नाही असा.' या कररुपी मधातूनच राज्य चालवायचं. विडंबनातल्या काकू आणि चाणक्य यांच्यात एक विलक्षण साम्य जाणवून गेलं. अन मनात आलं- सहा हजार रुपये उकळणाऱ्या कार्यकर्त्याला आपण बदमाश म्हणतो. ते बरोबरच आहे. कर, सेस आणि अन्य वसुली करणाऱ्या मंडळींना...

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१६