मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

ऐक्य, प्रेम इत्यादी...

सकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला त्यावर बातमी होती- मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांचा आज संप. युनियन वगैरे असल्याने संप यशस्वी झालाच असेल. बाकी त्रास वगैरे आनुषंगिक बाबी राहतीलच.

पंतप्रधानांनी काश्मीरबाबत दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानावरील एक लेख वृत्तपत्रात पाहिला. एकतेची गरज असा त्याचा आशय होता.

त्यानंतर मित्राने what's app वर पाठवलेला `दस कहानियां' चित्रपटाचा सुमारे दहा मिनिटांचा एक तुकडा पाहिला. २००७ सालच्या या चित्रपटात रोहित राय, नाना पाटेकर, अनिता हस्सानंदानी यांच्या भूमिका आहेत. पती-पत्नी प्रेम, काळजी करणे हा विषय आहे. एक जण नाराज झाल्यावर दुसऱ्याने समजूत काढण्यासाठी काय करायचं याचे ठरलेले संकेत. नाराज होण्याची कारणं- कमोडचा रंग कोणता असावा इत्यादीही.

`तारक मेहता का उल्टा चष्मा' यात सध्या सुरु असलेलं प्रकरण पाहिलं. गोकुलधाम सोसायटीतल्या महिला हिऱ्यांचं प्रदर्शन पाहायला जातात आणि तेथील १० कोटी रुपयांच्या साडीच्या प्रेमात पडतात. संबंधित हिरा व्यापारी जेठालालचा मित्र असल्याने दया त्याला गळ घालते की, एक दिवसासाठी तरी ती साडी घेऊन या. आम्ही ती घालून त्याचा अनुभव घेऊ, आनंद घेऊ अन जशीच्या तशी परत करू. वरून `ही साडी आणणे ही तुमच्या प्रेमाची कसोटी' असेही दया जेठालालला सुनावते. आता जेठालालची धावपळ सुरु आहे.

नवीनच सुरु झालेल्या `झी युवा' वाहिनीची तीन चार दिवसांपूर्वी पाहिलेली जाहिरात आठवून गेली- बाईकवर मागे बसलेली मुलगी आपल्या प्रियकराला दोनचा पाढा म्हणायला लावते. तो म्हणतो आणि विचारतो, कशाला म्हणायला सांगितला? ती उत्तर देते- मी पाहत होते, लग्नानंतर तू माझ्या तालावर किती नाचशील ते.

@@@@@@@@@@@@@

हे सगळे तुकडे मनात घोळत होते. त्यांची एक गोधडी तयार झाली. अन रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी प्रख्यात विचारवंत कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी यांना विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली. गुरुजींनी विचारले होते- what is the difference between collective bargaining and highway robbery? (सामूहिक सौदेबाजी आणि महामार्गावरील वाटमारी यात काय फरक आहे?) स्व. दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केल्याचा संदर्भ त्या प्रश्नाला होता. त्याच चर्चेत गुरुजी दत्तोपंतांना म्हणाले होते- तुझ्या भारतीय मजदूर संघातील प्रत्येक सदस्यासाठी तुझं आतडं आईसारखं तुटतं का, हे महत्वाचं.

@@@@@@@@@@@@@

मनातल्या घटना- प्रसंगांच्या गोधडीला विचारांचा हा तुकडाही जोडला गेला. या गोधडीच्या उबेत वाटलं, ऐक्य म्हणजे काय? स्वार्थासाठी एकत्र येणं? स्वार्थासाठी संघटीत होणं? गरजा पूर्ण करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, संरक्षणासाठी एकत्र येणं, संघटीत होणं म्हणजे ऐक्य? एक होण्यासाठी एकमेकांच्या गरजा पूर्ण करायच्या, एकमेकांना सांभाळून घ्यायचं की, एक आहोत म्हणून गरजा पूर्ण करायच्या, सांभाळून घ्यायचं? हृदय पायांना रक्तपुरवठा करतं आणि पायही हृदयाला वाहून नेतात. का? एक होण्यासाठी की, एक आहेत म्हणून? एक होण्यासाठी काश्मिरी लोकांच्या मागण्या मान्य करत करत गेलं तर, अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक पैसा ओतूनही समाधान होत नाही. मागण्याही संपत नाहीत. पाय आणि हृदय मात्र मागण्याही करत नाही अन रुसवे फुगवेही होत नाहीत. एक आहोत म्हणून वंचितांची काळजी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांची काळजी करणं यात फरक आहे ना? एक आहोत म्हणून वंचितांनी मागणी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांनी मागणी करणं यात फरक आहे ना?


ऐक्यासाठी प्रेमही हवं. पण प्रेम म्हणजे काय? एकमेकांना न दुखावणे? एकमेकांच्या सगळ्या गोष्टी मान्य करणे, चालवून घेणे? मनाच्या लहरी सांभाळत राहणे? अवास्तव, अयोग्य गोष्टीही मान्य करवून घेणे? अवास्तव, अयोग्य, निरर्थक गोष्टी स्पष्टपणे समजून न घेणे? तालावर नाचवणे? प्रेम असलं की, मांजरीचे दात तिच्या पिलांना बोचत नाहीत. सौदा असला की मात्र १० कोटींच्या साडीची गरज पडते. पदार्थ बिघडला तरीही न सांगणे म्हणजे प्रेम? अमुक वस्तू तुझ्या उपयोगाची नाही, आपल्या बजेटमध्ये नाही किंवा अमुक विषय समजायला तू अजून लहान आहेस इत्यादी न सांगणे म्हणजे प्रेम? प्रेमाच्या कसोट्या असतात?


प्रेम असणं आणि प्रेम उत्पन्न करणं, ऐक्य असणं आणि ऐक्य निर्माण करणं... प्रेमापोटी काही करणं अन प्रेमासाठी काही करणं, ऐक्यापोटी काही करणं आणि ऐक्यासाठी काही करणं... खूप फरक आहे. अगदी जमीन आस्मानाचा. `साठी' कसं सोडून देता येतं? अन `पोटी' कसं येतं? माणसाला सगळंच कळलं आहे असा निदान माझा तरी भ्रम नाही...

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा