शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

उपनिषदे

पोलंडची राजधानी वॉर्सा येथील ग्रंथालयात उपनिषदांचे वेचे भिंतींवर लावले आहेत, असं एक ट्विट तेथील भारतीय राजदूतांनी केले आहे. समाज माध्यमातून ते सगळीकडे प्रसारितही होत आहे. हा भारताच्या, हिंदूंच्या स्वाभिमानाचा आणि आनंदाचा विषय असल्याचीही सार्वत्रिक भावना आहे. हा सगळा समाधानाचाच भाग आहे. मात्र त्याचवेळी हेही जाणवते की, समाधान म्हणजे जीवन नाही. स्वाभिमान, आनंद अन त्यातून मिळणारं समाधान ही एक लहान, अन स्पष्ट बोलायचं तर वरवरची गोष्ट आहे. वरवरची याचा अर्थ अनावश्यक, दुय्यम, टाकाऊ असा नाही. तर याच्या पलीकडे, गाभ्यात जायला हवे हाच त्याचा अर्थ. तसे तर संसदेत आणि राज्यघटनेत वगैरेही प्राचीन भारतीय शास्त्रांची चित्रे, वेचे आहेतच. त्याचा अभिमान, आनंदही आहेच. पण... म्हणूनच गाभ्याशी भिडणे हवे अन गाभ्याशी भिडण्याची वारंवार आठवण हवी.

एक गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून पक्की बांधून घ्यायला हवी की, भारतीय दृष्टी आणि भारतेतर दृष्टी यात खूप फरक आहे. समर्थकांची संख्या, पाठीराख्यांचे बळ, प्रचाराचा झंझावात, मान्यतेची प्रमाणपत्रे, कौतुकाची प्रशंसापत्रे, संपत्तीचा लखलखाट, सत्तेच्या गर्जना; यांच्याशी सत्य जोडलेले नसते; ही भारतीय दृष्टी आहे. 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' हा भारताचा सत्यान्वेषी शंखनाद आहे. अन जीवनाने सत्यानुसरण करावे हाच भारताचा ध्यास आहे. हा ध्यास समग्र मानवी समाजाच्या गळी उतरविणे हाच भारताचा जीवनाशय आहे. हा ध्यास आणि हा जीवनाशय बाजूस सारणे आणि तो बाजूस सारताना पण परंतुची सारवासारव करणे म्हणजे भारत नाकारणे. इतिहास, शास्त्रे, पुस्तके, तत्त्वज्ञान यांचा उदोउदो म्हणजे उपनिषदे नाहीत. मर्यादित जगाला मर्यादितच ठेवून, अमर्याद व्यक्तित्वाची उपलब्धी करण्याचा पुरुषार्थ म्हणजे उपनिषदे. या सत्वामुळेच जगाला उपनिषदे हा शब्दही ठाऊक नसतानाही ती टिकून राहिलीत. ती सिद्ध करण्याचा खटाटोप करून ती चिरस्थायी होतीलच असे नाही. किंबहुना होणार नाहीत. तर - सत्ता, संपत्ती, स्पर्धा यावर आधारित कथित जीवनमूल्ये झुगारून देऊन; त्यांचा आपल्या मन बुद्धीवरील प्रभाव आणि पगडा निर्मूल करून; सत्यानुसरण करणारे जीवन जगण्याच्या प्रयत्नातून सत्व प्रकट होईल अन तीच उपनिषदांची सार्थकता ठरेल. निर्भीडपणा हे उपनिषदांचे सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. आपण किमान स्वतःला निर्भीडपणे काही सांगू शकलो पाहिजे. वर्तमान तकलादू जीवनमूल्यांच्या जागी उपनिषदांची जीवनमूल्ये स्थापित करण्याची प्रेरणा जागी होवो एवढेच.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा