मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

गणेशोत्सवाबाबत हितगुज

गुरुपौर्णिमा आटोपली. अजून दीड महिन्याने गणेशोत्सवाची धूम राहील. त्याची तयारी मात्र एव्हाना सुरूही झाली असेल. जोश, उत्साह, आनंद वगैरे राहीलच. ते राहायला हवेही. गेल्या काही दिवसात `मराठी' आणि `हिंदू' अशा दोन मितीही गणेशोत्सवाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातून `आमचा' अशी एक भावनाही तयार झाली आहे. यात वावगे काहीही नाही. पण या दोन मिती आणि ही भावना, यात अडकून पडणे वा त्याचे वर्तुळ तयार होणे; याऐवजी त्यांचा विस्तार कसा होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे. त्यादृष्टीने काही सूचना कराव्याशा वाटतात.

१) पैशाचे प्रदर्शन टाळणे.

२) पर्यावरण रक्षण.

३) वाहतूक, स्वच्छता यासारख्या सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये.

४) `आपल्या' कलेचे प्रदर्शन, प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न.

५) कुठल्याही प्रकारे सिनेगीते किंवा गणपतीसाठी म्हणून तयार केलेली आधुनिक गीते न वाजवता; सनई, बासरी, सतार यासारखे वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय कंठसंगीतच वाजवले जाईल याचा आग्रह धरणे.

६) आरत्या, भक्तिगीते मर्यादित प्रमाणात वाजवणे.

७) संगीताचा वा भक्तिगीतांचा आवाज कानठळ्या बसवणारा राहणार नाही यावर कटाक्षाने लक्ष देणे. दूरवर आवाज पोहोचावा हे आवश्यक मानू नये. गणपती बाप्पांजवळ येणाऱ्यांना आल्हादक, प्रसन्न वाटावे असा आवाज ठेवावा.

८) आवाज दूरवर पोहोचवायचाच असेल तर जास्त स्पीकर लावावे. पण आवाज मात्र हळूच असावा. (थोडे कठोर वाटेल, पण बहुसंख्य लोक बहिरे नसतात. आपल्या आवाजाच्या माऱ्यामुळे मात्र तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकते.)

९) कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा पूर्णपणे बंद कराव्या. त्याऐवजी सादरीकरण करावे. सादरीकरणात सुद्धा `आपले, शालीन, मर्यादशील, सहज करण्याजोगे, कोणत्याही प्रकारच्या (केवळ वैषयिक नव्हे) भावना भडकवणारे काहीही असू नये. त्याऐवजी भावनांचे विरेचन करणारे, भावनांचे उन्नयन करणारे असे सादरीकरण असावे. विनोदी कार्यक्रम सुद्धा उखाळ्यापाखाळ्या, टर उडवणे, पांचटपणा टाळून असावे.

१०) गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे पुस्तके, कविता, विचार, सगळ्या प्रकारचे ज्ञान यांना प्रोत्साहन देणारे, उचलून धरणारे, त्यांचा प्रचार प्रसार करणारे, कार्यक्रम, उपक्रम यांना प्राधान्य द्यावे.

११) आपली वेशभूषा, केशभूषा, भाषा, वावरणे; सभ्य, धार्मिक, शालीन असावे. भडक, उत्तान असू नये. महिला वर्गालाही याबाबत विशेष विनंती.

१२) गणेशाच्या आगमनाच्या वा विसर्जनाच्या मिरवणुका शक्ती प्रदर्शन वा गोंधळ वा ओंगळवाण्या होऊ नयेत.

१३) ढोल, ताशांच्या पथकांचे दहा दिवसात विविध ठिकाणी प्रदर्शनीय कार्यक्रम करावेत. त्यासाठी लोकांना निमंत्रण द्यावे. मिरवणुकांमधील त्याचे प्रस्थ कमी करावे. त्यापेक्षा विसर्जन स्थळी एकेक, दोनदोन तास विविध पथकांना वाजवण्याची संधी द्यावी.

१४) केवळ मोठी संख्या, मोठा आवाज, दिसायला मोठ्या गोष्टी म्हणजे सारे काही हा समज दूर करण्याचा प्रयत्न व्हावा.

१५) कला, साहित्य, ज्ञानविज्ञान, धार्मिकता, आध्यात्मिकता; यांची वाढ होईल, रसिकता वाढेल, समज वाढेल, बाह्य एकतेला आंतरिक एकतेचे बळ लाभेल, अशा विचारांनी, अशा भावनांनी लहानमोठ्या सगळ्या गोष्टींचे आयोजन, नियोजन करावे.

१६) वीज, पाणी, खाद्यपदार्थ, अन्न कणभर सुद्धा वाया जाणार नाही याकडे लक्ष पुरवावे.

१७) निमंत्रण पत्रिकांवर नावे छापून जाहिरात करण्याच्या वृत्तीला आळा घालता येईल का याचा प्रयत्न करावा. दानदात्यांशी त्यासाठी हिमतीने, पण योग्य शब्दात कसे बोलता येईल; त्यांचेही मन जाहिरातबाजी पासून वळवून खऱ्या धार्मिकतेकडे कसे वळवता येईल याचा विचार करावा.

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा