उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे. नजीकच्या भूतकाळापर्यंत 'कहाण्या' ही श्रावणाची विशेषता होती. कहाण्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठा आशय मनामनात रुजवला जात असे. समाजाचं, जीवनाचं चित्रही त्यातून उभं राहतं. त्या सगळ्या गोष्टींशी आज आपल्याला स्वतःला जोडता येत नसेल तरीही त्यात काही कालातीत विचार, तत्त्व आहेत; त्यांच्याशी मात्र नाळ जोडता येऊ शकते. भारतीय प्रयत्नवादाचं एक रमणीय रूप या कहाण्यांमध्ये पाहायला मिळतं. मानवी प्रयत्न (धार्मिक व्रते इत्यादी मानवी प्रयत्नच होत) आणि त्याच्या फलप्राप्तीसाठी त्याला दिलेली दैवी कृपेची जोड, मानवी मनाला जगाच्या प्रखर वास्तवाची जाणीव करून देण्यासोबतच त्याचा धीर बांधून ठेवण्याचं काम करीत असत. भारतबाह्य प्रयत्नवाद वास्तवाचं भान देतो आणि प्रयत्नांना उचलून धरतो. परंतु प्रयत्नांच्या विफलतेची शक्यता फेटाळून लावतो. याच ठिकाणी तो प्रयत्नवाद अवास्तव होतो. एवढेच नाही तर मानवी प्रयत्न हीच यशाची गॅरंटी असल्याचे सांगून, येणाऱ्या अपयशाची जबाबदारी मानवावर ढकलून त्याला अस्वस्थ आणि दांभिक मन बहाल करतो. भारतीय प्रयत्नवाद प्रयत्नांना उचलून धरतो आणि यश अपयश या गोष्टी अनेक गोष्टींचा परिपाक असतो हे मनावर ठसवतो. त्यामुळे अपयश स्वीकारण्याचीही मनाची तयारी होते. या कहाण्यांमधून यश अपयश यातील अगम्य घटकांचे महत्व अधोरेखित होते.
जीवनाच्या उदात्त कल्पनाही या कहाण्यातून मनांवर ठसवल्या जातात. राजा कसा असावा हेही यातून मांडले आहे. राज्यात कोणी उपाशी आहे का असे राजा स्वतःच्या भोजनापूर्वी विचारतो. मगच स्वतः जेवतो. राजाची (राज्य प्रमुखाची) ही कालातीत आदर्श कल्पना आहे. आजही ती का अंगिकारु नये? राजा याचा अर्थ पालन करणारा. अगदी घरच्या कर्त्या व्यक्तीपासून सर्वोच्च राजपदापर्यंत सगळ्या राजांनी ही संवेदनशीलता आणि हा पुढाकार यांचा स्वीकार का करू नये? ग्राम पंचायत सदस्य असोत, सरपंच असोत, नगरसेवक असोत, नगराध्यक्ष असोत, महापौर असोत, राज्य वा केंद्रातील प्रतिनिधी मंत्री असोत, शासनाप्रमाणेच प्रशासनातील सगळे लोक असोत; आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात कोणाला काही त्रास आहे का, कोणाला कशाची गरज आहे का; हे स्वतःहून जाणून घेण्याची सवय आणि त्रास वा गरज दूर करण्याचे स्वतःहून प्रयत्न करण्याची सवय; या बाबी स्पृहणीय नाहीत का? हा चर्वणाचा आणि थट्टेचा विषय होऊ शकेल. तसे कोणत्या विषयाचे होत नाही? पण आदर्श बोलत राहायला काय हरकत आहे? समोर दिसणाऱ्या समस्येसाठीही, 'आधी तुम्ही अमुक ठिकाणी अर्ज करा मग पाहू', इत्यादी अनुभवांचा काथ्याकूट करण्यापेक्षा 'असे व्हावे/ होऊ शकते' हे सुचवत राहणे चांगले. नाही का?
- श्रीपाद कोठे
रविवार, ८ ऑगस्ट २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा