लाला लजपतराय सारिणी असं अधिकृत नाव असलेल्या, पण एल्गिन रोड याच नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील `नेताजी भवन’ला भेट देणे हा एक अनुभव आहे. अर्थात असा अनुभव घेण्याची गरज वाटणारे थोडे आहेत हे दिलेल्या भेटीच्या वेळी अनुभवास आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या या पैतृक घरी जाण्यासाठी नजीकचे मेट्रो स्थानक आहे त्याचे नावही `नेताजी भवन’ असेच. नव्हे नेताजींच्या घरामुळेच ते नाव मिळाले. अर्थात मेट्रो स्थानकावर उतरल्यावर १०-१२ मिनिटे चालावं लागतं. अतिशय गजबजलेल्या एल्गिन रस्त्यावर `नेताजी भवन’ मात्र शांतपणे अविचल उभे आहे. लाल हिरव्या रंगातील या तीन मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पदपथावर नेताजींचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला एका खोलीत साहित्य विक्री आणि त्यासोबतच घर पाहण्यासाठीच्या तिकीट विक्रीची व्यवस्था आहे. तिकीट घेऊन पुढे जाताच नजरेस पडते ती नेताजींची ऐतिहासिक मोटार. जर्मन बनावटीच्या Wanderer W24 या BLA 7169 क्रमांकाच्या मोटारने नेताजींनी आपल्या निवासाचा अखेरचा निरोप घेतला होता. १९३७ पासून ही मोटार त्यांच्याजवळ होती आणि १९४१ साली भारतातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा सुभाषबाबू निघाले तेव्हा त्यांचा पुतण्या शिशिर बोस याने याच मोटारीतून त्यांना कोलकात्यावरून तेव्हाच्या बिहारमधल्या आणि आताच्या झारखंडमधल्या गोमोह पर्यंत पोहोचवले होते. तेथून रेल्वेगाडीने सुभाषबाबू पुढे गेले होते. ही गाडी आता आहे तेथे पूर्वी नव्हती. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ती येथे समारंभपूर्वक एका काचेच्या घरात ठेवण्यात आली आहे.
मोटार पाहून चार पावले पुढे गेल्यावर उजव्या हाताला वर जाण्यासाठी जिना आहे. पूर्वीच्या घरांचे छप्पर उंच राहत असे. त्यामुळेच जिने पण उंच राहत असत. नेताजी भवनातील जिनेही असेच उंच. साधारण २०-२२ पायऱ्यांचे. जिना चढून वर गेल्यावर प्रथम आपण पोहोचतो नेताजींच्या शयन कक्षात. १९४६ साली गांधीजींनी या घराला भेट दिली तेव्हा ते या शयनकक्षात आले होते. त्याचे छायाचित्र येथे आहे. या दालनात दारातून आत पाऊल टाकताच डाव्या हाताला मां कालीची तसबीर असून त्याखाली तंत्रोक्त कालिका श्लोक लिहिलेला आहे. नेताजींचे मूळ कुठे होते ते येथे स्पष्ट होते. या साधारण १५ बाय १५ फुटाच्या खोलीत त्यांचे वडील जानकीनाथ यांचा मोठा पलंग, नेताजींचा लहान पलंग, धोतर, छत्री, खडावा, घड्याळ, आरसा, खुर्ची, बूट असे सगळे सामान आहे. १६-१७ जानेवारी १९४१ च्या रात्री याच खोलीतून ते बाहेर पडले होते. ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग पावलांनी दाखवला आहे. शेजारीच त्यांचे भाऊ सरत बोस यांची खोली आहे. या खोलीत त्यांची आई प्रभावती यांचे छायाचित्र पाहायला मिळते. या खोलीत एक महत्वाची तसबीर पाहायला मिळते. सरत बोस हे THE NATION या वृत्तपत्राचे संपादक होते. २० फेब्रुवारी १९५० रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी तासभर आधी म्हणजे रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्यांनी आपल्या वृत्तपत्रासाठी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगला देशातील स्थितीचा आढावा घेऊन सूचना केली होती की, पूर्व बंगालचे वेगळे राज्य करण्यात यावे. त्यावेळची पूर्व बंगालची एकूण स्थिती आणि भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालमधील विचारप्रवाह, दोन्हीमधील भावनिक बंध हे त्या अग्रलेखातून स्पष्ट होतात. त्यांची सूचना नंतर २१ वर्षांनी, १९७१ साली प्रत्यक्षात आली.
ही दालने पाहून जिन्याने वरच्या मजल्यावर जाताना जिन्याच्या बाजूला एक दालन आहे. ते आहे सुभाषबाबूंचे कार्यालय. याच दालनातून त्यांनी कॉंग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून काम केले. आजच्या एखाद्या आमदाराचे कार्यालय सुद्धा त्यांच्या कार्यालयापेक्षा मोठे आणि भपकेदार ठरेल. तो काळ आणि आताचा काळ यातील अंतर हे दालन पाहताना ठळकपणे मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी दालन लहान व साधे, पण कर्तृत्व अफाट. अन आज दालने मोठी, भपकेबाज; अन कर्तृत्व खुरटे, खुजे. एक टेबल, चार खुर्च्या, एक सोफासेट, टेबलवर तिरंगा झेंडा, कपाटे... संपले.
जिन्याने वर आल्यावर डाव्या हाताच्या मोठ्या आणि उजव्या हाताच्या लहान दालनात संग्रहालय आहे. डाव्या हाताच्या मोठ्या दालनात प्रवेश केल्यावर पहिलीच तसबीर आहे स्वामी विवेकानंद यांची. त्याखाली लिहिले आहे- AN INSPIRATION. या दालनात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. नेताजींच्या वस्तू, त्यांनी परिधान केलेला आझाद हिंद सेनेचा गणवेश, त्यांचे हस्ताक्षर, त्यांची कौटुंबिक छायाचित्रे, त्यांची देश विदेशातील छायाचित्रे, कोलकाता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोलकाता महापालिकेचे महापौर, कॉंग्रेसचे नेते, कॉंग्रेसचे अध्यक्ष, विविध देशी विदेशी असामींसह छायाचित्रे इथे पाहायला मिळतात. सतत त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित सुरु राहते. हिटलर सोबतचे त्यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. क्रूरकर्मा हिटलरला भगवान बुद्धाची मूर्ती भेट देणारे नेताजी आगळेवेगळे ठरतात. शांतिनिकेतनात आंब्याच्या झाडाखाली रवींद्रनाथांसह झोपाळ्यावर बसलेले नेताजी एक वेगळे दर्शन देतात, तर कोलकात्यातील महाजाती सदनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्यासह बसलेले रवींद्रनाथ टोपी घातलेले पाहायला मिळतात. कोलकाता काँग्रेसच्या वेळी घोड्यावर बसलेले आणि एमिलीसोबतचे नेताजीही इथे आहेत. १६ जानेवारी १९४१ रोजी रात्री त्यांनी या घरात अखेरचे जेवण घेतले. ते ज्या मार्बलच्या ताटवाटीत जेवले ती ताटवाटी आणि त्यावेळी त्यांनी परिधान केलेले रेशमी धोतर इथे पाहायला मिळते. नेताजींचे रसिकत्वही या दालनात अनुभवता येते. त्यांचे notebook of favourite songs 1924-1927 या दालनात फिरताना लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाही. या संग्रहात त्यांनी स्वहस्ताक्षरात रवींद्रनाथांची `आमार शोनार बांगला’ ही कविता लिहिलेली आहे. जपानमधील NIPPON TIMES चे अंक, त्यांनी विदेशी रेडीओवरून केलेली संबोधने इत्यादीही पाहायला मिळते. या दालनातील एक तसबीर मात्र सुभाषबाबूंच्या ज्ञात प्रतिमेपेक्षा एकदम वेगळी आहे. ती आहे, सुभाषबाबू आपल्या वडिलांचे श्राद्ध करतानाची. १९३७ सालच्या या छायाचित्रात कौटुंबिक आणि धार्मिक, पारंपरिक सुभाषचंद्रांचे हृद्य दर्शन होते.
सुभाषबाबूंचे घर पाहून, अनुभवून खाली उतरलो. पुस्तकविक्रीच्या दालनात गेलो. आल्यासारखी दोन पुस्तके घेतली. एक, सुगत बोस यांचं – the nation as mother and other visions of nationhood आणि दुसरं, कृष्णा बोसचं – a true love story : emilie and subhash. विक्रेता बोलका होता. त्याला म्हटलं- पुस्तके महाग वाटतात. तो म्हणाला- हो. महाग आहेत. पण आम्हाला कोणतीही सरकारी मदत नाही. शिवाय समाजाचे हवे तसे आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे नाईलाज आहे. त्याने थंड पाणी पाजले. तिथून जायचे होते, `अरविंद भवन’ला. तेथून ते जवळ आहे. त्याला सहज विचारले `अरविंद भवन’ला कसे जाता येईल? त्याने प्रतिप्रश्न केला- ऋषी अरविंद? त्याच्या त्या प्रश्नाने सामान्य बंगाली माणसाच्या मनातही श्री अरविंद यांच्याबद्दल काय भावना आहेत ते स्पष्ट झाले. तेही सुभाषबाबूंच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात. सर्वसाधारण समाजात असणारे समज अशा छोट्या छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या घटनातून निर्मूल होतात. मी म्हटले- हो, ऋषी अरविंद. त्याने पत्ता अन रस्ता सांगितला अन म्हणाला- पण तुम्ही ओला किंवा उबेर करूनच जा. ते सोयीचे. १० मिनिटे प्रयत्न केला पण दोन्ही कंपन्यांना भर वाहत्या लाला लजपतराय सारिणीवर उभ्या असलेल्या माझे लोकेशन काही सापडले नाही.
असो म्हणत रस्त्यावरील taxi ला विचारले. तो तयार झाला. आमची स्वारी शेक्सपिअर सारिणीवरील `श्री अरविंद भवन’कडे निघाली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा