`यानंतर मी एका थोड्या नाजूक विषयाकडे वळतो. माझ्या म्हणण्याकडे तुम्ही थोडे नीट लक्ष द्या. त्यावरून घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. आपण जगाचे फारसे भले करू शकत नाही. जगाचे भले करणे हे फारच चांगले आहे. पण जगाचे विशेष भले आपण करू शकतो काय? गेली शेकडो वर्षे प्रयत्न करूनही आपण जगाचे काही विशेष भले केले आहे काय? जगाच्या एकूण सुखात आपण भर घातली आहे का? जगाला अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपण दररोज हजारो नवी नवी साधने निर्माण करीत आहोत व हे गेली शेकडो वर्षे चालू आहे. मी तुम्हाला असे विचारतो की, आजची जगातल्या सुखांची गोळाबेरीज एका शतकापूर्वीच्या गोळाबेरजेहून जास्त आहे काय? नाही. तसे असणे शक्य नाही. समुद्रात उसळणारी प्रत्येक लाट समुद्रात कुठे ना कुठे खळगा निर्माण झाल्याशिवाय उत्पन्न होत नाही. एखादे राष्ट्र श्रीमंत व शक्तिशाली झाले की दुसरे कोणते तरी राष्ट्र नाडले जाणे अपरिहार्य आहे. प्रत्येक यंत्राच्या आविष्काराबरोबर वीस माणसे गबर होतात, तर वीस हजार माणसे दारिद्र्यात लोटली जातात. स्पर्धेचा हा नियम विश्वव्यापी आहे. जगात दिसून पडणाऱ्या शक्तीची एकूण गोळाबेरीज नेहमी सारखीच असते. तिच्यात भर घालण्याचा प्रयत्न करणे हा मुर्खपणा आहे. दु:खाशिवाय सुख मिळू शकते असे म्हणणे तर्कसंगत नाही. सुखसाधनांची वाढ करीत असताना जगातील गरजांचीही वाढ तुम्ही करीत असता. वाढलेल्या गरजांमुळे कधी न शमणारी तृष्णाही वाढीस लागते. या गरजा कशाने पूर्ण होणार व ही तृष्णा कशाने शमणार? आणि जोपर्यंत ही तृष्णा कायम आहे तोपर्यंत दु:ख हे अटळ आहे. आलटूनपालटून सुखी व दु:खी होणे हे मुळी जीवनाचे स्वरूपच आहे. तसेच, भले करण्यासाठी म्हणून हे जग तुमच्याकडे सोपविण्यात आले आहे काय? जगात दुसरी कोणतीही शक्ती कार्य करीत नाही का? तुमच्या माझ्याकडे हे विश्व सोपवून ईश्वर काय मरून गेला आहे? जो ईश्वर शाश्वत, सर्वशक्तिमान, दयासागर व नित्य जागृत आहे आणि सर्व विश्व झोपी गेले असतानाही जो नेहमी जागा असतो, ज्याचे डोळे कधीही मिटत नाहीत, तो ईश्वर काय मरून गेला आहे? हे अनंत आकाश म्हणजे जणूकाही सतत उघडा असलेला त्याचा डोळाच आहे. तो ईश्वर काय नाहीसा होऊन गेला आहे? तो काय या जगात कार्य करीत नाही? जग हे चालूच आहे. तुम्ही त्यासाठी घाई करण्याचे कारण नाही. तुम्ही स्वत:ला वाईट वाटू देण्याची गरज नाही. आपण गेली हजारो वर्षे कुत्र्याचे वाकडे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जगातील दु:ख हे संधीवातासारखे आहे. पायातून हे दु:ख नाहीसे केले की ते डोक्यात जाऊन बसते. डोक्यातून ते घालवून दिले की ते शरीरात दुसरीकडे कुठे तरी जाऊन बसते.'
`हा विचार आपणापैकी बऱ्याच जणांना भयंकर निराशावादी वाटेल. पण तो तसा नाही. निराशावाद व आशावाद दोन्ही चूक आहेत. दोन्ही अतिरेकी विचार आहेत. हे जग चांगले नाही की वाईटही नाही. हे शुभाशुभातीत व स्वयंपूर्ण असे आहे. हे जग म्हणजे मोठी व्यायामशाळा असून तिच्यात तुम्ही, मी व इतर कोट्यवधी जीव येत असतात व तऱ्हेतऱ्हेचे व्यायाम करून सामर्थ्यवान व पूर्ण बनत असतात. हे विश्व यासाठीच आहे. आपण ज्या पातळीवर असतो त्याच पातळीनुसार जग आपल्याला दिसत असते. स्वैपाकघरातला अग्नी चांगला नाही किंवा वाईटही नाही. त्या अग्नीवर तुमचे अन्न शिजले की तुम्ही त्याची स्तुती करता व म्हणता, अग्नी किती चांगला आहे. त्यानेच तुमचे बोट भाजले की तुम्ही म्हणता, हा अग्नी किती त्रासदायक आहे. तसेच हे जग चांगले नाही की वाईट नाही असे म्हणणे तर्कसंगत व बरोबर आहे. जग हे जगच आहे आणि ते सर्वदा तसेच राहणार. आपल्यावरील प्रतिक्रिया अनुकूल घडली तर आपण जगाला चांगले म्हणतो, आपल्यावरील प्रतिक्रिया दु:खकारक घडली तर आपण जगाला वाईट म्हणतो. तुम्हाला आढळून येईल की निष्पाप, आनंदी व कुणालाही दु:ख न देणारी मुले नेहमी अत्यंत आशावादी असतात, तर जगात पुष्कळ टक्केटोणपे खाल्लेले लोक निराशावादी असतात. धर्माला सत्य जाणून घ्यायचे असते. धर्माने शोधून काढलेली पहिली गोष्ट ही आहे की, या सत्याच्या ज्ञानाशिवाय जीवन व्यर्थ होय.'
- स्वामी विवेकानंद
(रविवार ५ जानेवारी १८९६ रोजी धर्माच्या अपेक्षा यावर बोलताना)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा