गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

भावनातिरेक म्हणजे सत्य?????

होय, कालपासून देशाच्या काही भागात जे घडते आहे त्यावरील प्रतिक्रियांसाठी मी हा प्रश्न विचारतो आहे? मला भावनाशून्य ठरवले तरी हरकत नाही. पण हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. हरयाणात जे झाले ते वाईटच. त्याच्या समर्थनाचा प्रश्नच नाही. पण त्यावरच्या प्रतिक्रियांचे स्वरूप काय आहे? देश, धर्म, समाज यांच्यावर नुसते प्रहार करीत सुटणे. ठीक आहे. तसेच करायचे असेल तर ही यादी देश, धर्म, समाज एवढीच मर्यादित का? त्या यादीत माणूस का नाही? धर्म संपवून टाका किंवा देश बुडणार किंवा हाच का समाज; असा आक्रोश करताना, हे करणारी माणसे आहेत आणि हा माणसाचा पराभव असल्याने सगळ्या माणसांनी समुद्रात जीव देणे; हे एकच प्रायश्चित्त त्यासाठी असू शकते; असा आवाज का ऐकू येत नाही? कारण एकच की, आम्हाला आमची जबाबदारी नको असते. आम्ही याच समाजात, याच देशात राहतो. घर, गाडी, पैसा अडका, संसार, चंगळ, रोज रात्रीची सुखाची झोप याच समाजात घेतो. अन तरीही एखादी घटना घडली की लाजाबिजा विकून समाजाला वेठीस धरायला तयार !!! धर्माच्या नावाने तर केवढा शिमगा? केवढे उसासे? याच धर्माचे पालन नाना पाटेकर करीत होता. तेही ही घटना घडली त्याच दिवशी. अन तो शेतकऱ्यांसाठी काम करतो हेही ठाऊक असते. पण धर्माची ही अभिव्यक्ती आम्ही विसरून जातो. शेगावच्या गजानन महाराज संस्थानला आम्ही विसरून जातो. ज्या हरयाणा, पंजाबमध्ये हे घडले; त्या हरयाणा, पंजाबमध्ये शीख धर्माने समाजाची जी धारणा केली, जी घडण केली ती आम्ही विसरून जातो. ज्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले लपून बसला होता त्याच सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा मानवतेची आणि आध्यात्माची पूजा होते आहे, हे आम्ही विसरून जातो. रामाचा वेश घालून वावरणारा नट राम नसतो, याचं भान सोडून रामाला शिव्या घालणे आम्हाला भूषणावह का वाटते, याचीही चर्चा व्हायला हवी की नाही?

कारण एकच आहे- आम्हाला आमची जबाबदारी नको असते. मुळात जबाबदारी म्हणजे काय हे तरी आपल्याला किती समजते? तथाकथित संवेदनशील लोक लगेच विचारतील- आम्हाला काय जबाबदारी सांगताय? आम्ही जबाबदार आहोत का यासाठी? की तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची आमची जबाबदारी होती? अशांसाठीच म्हणतोय- आपल्याला जबाबदारी म्हणजे काय ते तरी समजते का? बावळटसारखे काहीतरी बोलायचे टाळणे, अशा घटना घडतात तेव्हा त्यांचे तात्कालिक संदर्भ आणि त्यातील जीवनाला स्पर्श करणारे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणे, व्यक्ती आणि समाज यांची वैचारिक आणि भावनिक प्रगल्भता वाढेल असे लिखाण- भाषण- करणे, इत्यादी गोष्टीही `जबाबदारी' या सदरात मोडतात. पण आम्ही मात्र जबाबदार म्हणजे- हा, तो, ते, सत्ता, समाज, धर्म वगैरे वगैरे वगैरे करून मोकळे. कारण आम्हाला आमची जबाबदारी झटकायची असते. समाजाचा स्तर ही प्रत्येक individual व्यक्तीचीही जबाबदारी असते. आपण प्रत्येक जण त्यात कमीअधिक contribute करतो. अगदी आमची भीती आणि आनंद, ते व्यक्त करण्याची पद्धत इत्यादी सुद्धा यात contribute करतात; पण आम्हाला त्याकडे जायचेच नाही कारण; आपली जबाबदारी कोणावर तरी ढकलून देण्याच्या टोळी मानसिकतेतून आम्हीच बाहेर पडलेलो नाही. माझा थेट प्रश्न आहे- दोन वेळच्या जेवणाची, अन जीवन कसं जाईल याची भ्रांत नसणाऱ्या ४०-५० कोटी भारतीयांपैकी किती भारतीय खऱ्या अर्थाने विचारी आहेत? कोणाला अपमान वगैरे वाटत असेल त्यांना वाटो. कोणाला खुश वा नाखूष करणे यासाठी मी लिहित नाही. मुळात विचार म्हणजे काय याचा विचार यातील किती लोक करतात? धर्म म्हणजे काय, समाज म्हणजे काय, देश म्हणजे काय, सभ्यता कशी घडते, माणूस म्हणजे काय; इत्यादी गोष्टी नंतर. कारण मुळात विचार म्हणजे काय हेच ठाऊक नसेल, त्यातच शिरण्याची तयारी नसेल तर या गोष्टींवर कसली चर्चा करायची? या ४०-५० कोटीमधील ४ कोटी जरी विचारी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील होतील, त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी ठेवतील तर आपोआपच सगळं चित्र बदलून जाईल. कारण त्यांच्या त्या प्रयत्नातूनच एकूण समाजाची मानसिकता, वैचारिकता, प्रगल्भता, स्तर घडत जाईल. असे होत नाही तोवर उथळपणाचा भावनिक खळखळाट सुरूच राहील. निरर्थकपणे.

आमच्या बाबाला दोषी ठरवल्याने तोडफोड करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असा समज असणारे; आणि आमच्या ओबी van जाळल्याने आम्ही आज कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही असे म्हणणारे; किंवा तिकडे ३० लोक हकनाक मेल्याने तुमचे विचारांवरील प्रवचन ऐकण्याची आमची इच्छा नाही असे म्हणणारे; यातील फरक काय? शारीरिक हिंसाचार, बौद्धिक हिंसाचार किंवा भावनिक हिंसाचार; यात फरक काय? वेळ आली तर बौद्धिक वा भावनिक हिंसाचार हा शारीरिक हिंसाचारात बदलणार नाही कशावरून? एकदा विचारांशी फारकत घेतली की तारतम्य राहत नाही. ते रामरहीमच्या भक्तांमध्ये राहिलेले नाही हे तर सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. पण आमच्यात ते शिल्लक आहे का? तसे नसते तर एक `तरुण तेजपाल' नावाचा माणूसही अशाच प्रकरणात जेलची हवा खातो आहे, अन तरीही पत्रकारिता, आधुनिकता, ऐहिकता, मानवता; इत्यादी कुचकामाचे असल्याचे गळे आम्ही काढत नाही आणि हे सगळे भस्मसात करावे असेही म्हणत नाही; याचा आम्हाला विसर पडला नसता आणि आमची पंगु वैचारिकता चव्हाट्यावर मांडण्याची आम्हाला घाई झाली नसती.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, २६ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा