रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

आनंदाची ढेकर

कोणतीही गोष्ट पचली की, ढेकर येते. अन पचली नाही की उलटी होते. खाण्यापिण्याच्या पदार्थांचा हा नियम भावभावना, विचार, व्यवहार यांनाही लागू होतो. यश, स्तुती पचली की व्यक्ती उगाच ताठ होत नाही; नाही पचली की काय होते ते आपण रोजच पाहतो. कोणी एखादा शब्द म्हटला की राग येणे, गाल फुगणे, अबोला अशा गोष्टी झाल्या की समजावं बोलणं पचलेलं नाही. तेच विद्वत्ता, पैसा, रूप, दु:ख, आनंद अशा बहुतेक सगळ्या गोष्टींचं. हे फक्त स्वत:च्या संदर्भात होतं असंही नाही. दुसऱ्याला मिळालेलं यश, मोठेपण, सुख हे सुद्धा अनेकदा पचत नाही. मग कधी मुद्दाम दुर्लक्ष करणे, टिंगलटवाळी करणे, हिणकस शेरेबाजी किंवा छिद्रान्वेषीपणा अशा गोष्टी घडतात. असे प्रकार पाहताना कधी कधी वाटतं, टीकाटिप्पणीपेक्षा टिंगलटवाळी घातक असू शकते. अन्नाचे अपचन शरीराची निर्मळता घालवते, तर मनाचे अपचन मनाची निर्मळता घालवते.

हे सगळे सुचण्याचे कारण, ऑलिम्पिकमध्ये रजतपदक पटकावणाऱ्या पी.व्ही. सिंधूचा हैदराबादेत झालेला सत्कारसोहळा. मोठे यश मिळवून सिंधू आज हैदराबादला परतली. विमानतळावर तिचे आगमन, तिचा सत्कार, तिचे वाहनावर चढणे, वाहनावरील वावर, अभिवादनाच्या स्वीकाराची पद्धत, चेहऱ्यावरील हास्य, लोकांचा उत्साह, लोकांचे अभिवादन करणे, मिरवणूक, स्टेडियममधील कार्यक्रम, सादरीकरण, सादप्रतिसाद अशा सगळ्याच गोष्टी वारंवार सांगत होत्या; सिंधूला अन तिच्या चाहत्यांनाही तिचे ऑलिम्पिकमधील यश आणि त्याचा आनंद पचलेला आहे. कुठेही यशाच्या अन आनंदाच्या उलट्या नव्हत्या. होती ती तृप्तीची ढेकर.

आनंदाचा कुठेही उन्माद नव्हता. कानठळ्या बसवणारा आवाज, डोळे मिटून घ्यावेसे वाटावेत असे अंगविक्षेप, ही माणसे आहेत का असा प्रश्न पडावा असा चालण्या- बोलण्या- वागण्या- चा आविर्भाव, उर्मट उंडारणे, शाम्पेनच्या बाटल्या, चाहत्यांचे अंगाला खेटणे, महाप्रचंड सुरक्षा रक्षकांची गरज, सगळं जग टाचेखाली चिरडून टाकण्याचा अन टाकल्याचा आविर्भाव; असे काहीही नव्हते. होती फक्त आत्मविश्वासाच्या कोंदणात हसणारी एक निर्मळ शालीनता. या शालीनतेला साधेपणा, मर्यादा, भारतीयता टाकून देण्याची गरज वाटली नाही. ज्या सिंधू संस्कृतीवरून हिंदू नाव धारण करणाऱ्या समाजाने, सगळ्याच गोष्टी पचवण्याची ही शिकवण हजारो वर्षे रुजवली; तेच सिंधू नाव धारण करणाऱ्या एका विजयी, यशस्वी कन्येने आनंद आणि यश कसे पचवायचे असते हे दाखवले.

क्रिकेट, राजकारण, चित्रपट या क्षेत्रात साजरे होणारे आजचे आनंदोत्सव आणि यशोत्सव आपण प्रत्यही पाहतो. किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने होणारी ज्ञानाची, कलेची, प्रतिभेची अन प्रज्ञेची उधळण पाहतो. या सगळ्याच उलट्यांच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि यश पचवून सिंधूने आणि तिच्या चाहत्यांनी दिलेली तृप्तीची ढेकर दखल घेण्यासारखी ठरते हे निर्विवाद.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार २२ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा