महालक्ष्मी व्रत कसे करावे, काय करावे; याचा एक मेसेज आला. अनेकांना तो आला असेल. त्यात बऱ्याच गोष्टींची चर्चा केलेली आहे. त्यातला एक मुद्दा आहे - समजा ऐन वेळेवर मुखवटे भंगले तर काय करावे? त्यावर उपाय सांगितला आहे की, नवीन मुखवटे आणून महालक्ष्मी स्थापना करावी आणि अनिष्ट वगैरेचे विचार मनात आणू नये.
सहजच श्री रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातील एक प्रसंग आठवला. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर येथे राणी रासमणीच्या काली मंदिरात ते पुजारी म्हणून काम करत होते. अन त्यांची साधना सुरू होती. एक दिवस परिसरातील राधाकृष्ण मंदिरातल्या कृष्णाच्या मूर्तीचा पाय भंगला. सगळीकडे चर्चा सुरू झाली. स्वाभाविकच श्री रामकृष्णांचे मत घेण्यावर एकमत झाले. जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांनी विचारले - 'समजा राणीच्या जावयाचा पाय मोडला तर काय कराल?' अन पुढे समजावणीच्या भाषेत म्हणाले - 'पाय पुन्हा जोडून घ्याल ना. जावयाला टाकून तर देणार नाही ना?' झाले. उत्तर मिळाले. कृष्णमूर्तीचा पाय पुन्हा जोडून ती गाभाऱ्यात ठेवली गेली.
संत, महापुरुष, अवतार यांचे हेच वैशिष्ट्य असते. ते कोणत्याही सुधारणेच्या घोषणा देत नाहीत, अंधश्रद्धा निर्मूलनाचे फलक लावत नाहीत. ते फक्त जीवनाचं सत्य, जीवनाची व्यापकता, जीवनाची खोली आणि जीवनाची उत्तुंगता दाखवतात, समजावतात. बाकी साऱ्या गोष्टी आपोआप होत राहतात. दुसरीकडे - अतिशय चांगल्या भावनेने, मनापासून; पण जीवनाचे सत्य, व्यापकता, खोली, उत्तुंगता याकडे दुर्लक्ष करून आपण प्रयत्न करत राहतो. अन अपेक्षित फळ मात्र मिळत नाही.
समाज सुधारणा आणि मूलभूत सुधारणा यात हाच फरक आहे.
- श्रीपाद कोठे
२६ ऑगस्ट २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा