लाज वाटते मला. खरंच लाज वाटते. कोणाची? कशाची? तुमची-माझी, या समाजाची !!! नाही, गोरखपूरच्या दवाखान्यात ६३ बालके मरण पावल्याची नाही वाटत लाज. त्याचं दु:ख होतं. वाईट वाटतं. अन- लाल, निळ्या, हिरव्या, दुरंगी, तिरंगी, भगव्या राजकारणाचीही लाज नाही वाटत. राजकारणच ते. ते तसेच असायचे. तुमच्या माझ्या वाटण्याने त्यात कालत्रयी बदल होऊ शकत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडंच राहणार. त्यात लाज काय वाटायची? म्हणूनच लाज वाटते त्यांची- जे अक्कल बाजारात विकून कुत्र्याचं शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करतात किंवा तशी इच्छा धरतात त्यांची. कुत्र्याला अक्कल नाही दिली त्या विश्व निर्मात्याने किंवा अक्कल दिली असेल तरीही नाईलाज आहे बिचाऱ्याचा. पण ते शेपूट सरळ करण्याचा उपद्व्याप करणाऱ्या `माणूस' नावाच्या दोन पायांच्या प्राण्यांची लाज वाटते मला. कोणीही कधीही मरू नये. वाटतं आपल्याला. तरीही मृत्यू आपण टाळू शकत नाही. अन दुर्दैवी, अकाली, अपघाती मृत्यूही असतातच. ते टाळता येऊ शकतात. हो. नक्की टाळता येऊ शकतात. १०० टक्के नाही टाळता आले तरीही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. पण जेव्हा ते पुढ्यात येतात तेव्हा त्यांचा संबंध काय सत्तेशी असतो? राजकारणाशी असतो? अगदी मूर्खातला मूर्ख राजकारणी देखील अशी घटना नक्कीच होऊ देणार नाही. कारण यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे राजकारणाशी संबंधच जोडायचा असेल तर अशा घटनांसाठी सत्ता भोगणाऱ्यापेक्षा सत्तावंचितच जबाबदार असू शकतो. कारण हा असो की तो; राजकारणी व्यक्तीला, पक्षाला सत्तेवर पोहोचायचे असते. त्यासाठी आपली प्रतिमा उजळ आणि दुसऱ्याची मलीन करायची असते. पण राजकारण घाला चुलीत. मुळात अशा घटनांचा या वा त्या राजकारणी, पक्ष वा सत्तेशी संबंध असतो का? आम्हाला हा प्रश्नच पडत नाही. किंवा पडूनही आम्हाला तो टाळायचा असतो अथवा दुसरीकडे वळवायचा असतो. सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण तर सत्ता. आमच्या रक्तातून वाहणारा हा विकृत विचार आम्ही कधी काढून टाकणार? ६३ बालकांचा हकनाक जीव जातो तेव्हा त्यांच्याकडे लक्ष ठेवणाऱ्या ड्युटीवरच्या नर्सपासून तर एक पूर्ण साखळी जबाबदार असते. ती साखळी तुमची माझी असते. बेजबाबदार, बेमुर्वत, लाचार, भित्र्या, आळशी, उथळ, स्वार्थी, राक्षसी, पाशवी, विचारशून्य, संवेदनाहीन अशा तुमची माझी असते ती साखळी. हजारो वर्षे झाली. लक्षावधी सत्ता आल्या आणि गेल्या. ही साखळी अशीच आहे. कालपर्यंत ठीक होते. माहितीचे युग नव्हते. क्षणातील communication नव्हते. आज सगळे तुमच्या माझ्या दारी उभे आहे. पण तुम्हाला मला समजून घ्यायचेच नाही. तुम्हाला मला पोटातील पाणी हलू द्यायचे नाही. आपले gadgets अन आपली नाचगाणी क्षणभर बाजूला ठेवायची नाही. `हवा येऊ द्या' चुकवायचे नाही. `कपिल शो' हुकवायचे नाही. किलोभर मांस वाढू द्यायचे नाही अन एक रुपया balance कमी होऊ द्यायचा नाही. याच्या त्याच्या नावे दात विचकणे बंद करायचे नाही. तरीही संवेदना जाग्या असल्याचे नाटक मात्र करायचे आहेच. कसे करणार? द्या शिव्या. वाहा लाखोळी. कोणाला? सत्तेला. त्याच्याएवढं निरुपद्रवी काहीच नसतं. सत्ता कोणाचीही असो- काळी, पिवळी, लाल, निळी, भगवी, दुरंगी, तिरंगी. जन्माला येताना सत्तेला विचारून येत नाही, पण नंतर मरेपर्यंत साऱ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण? सत्ता. दोन शिव्या हासडा की आम्ही मोकळे पुन्हा उंडारायला. सत्ता किंवा सत्तेविना; मी `मी' राहीन; आम्ही `आम्ही' राहू; हे समजायची, म्हणण्याची अन त्यासाठी सोसण्याची धमक नसलेल्या तुमच्या माझ्या बुझदिल षंढ स्त्री पुरुषांच्या समाज नावाच्या झुंडीची लाज वाटते मला. एकीकडे जात- धर्म- पंथ- पैसा- लिंग- भाषा- भूषा- देश- यांचे भेद गाडून टाकण्याची भाषा करीत करीत राजकीय पक्षांच्या नावाने मनात असंख्य भेद जपणाऱ्या ढोंगी, खोटारड्या समाजाची लाज वाटते मला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १४ ऑगस्ट २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा