चॅनेल फिरवता फिरवता `मी मराठी' लागलं. त्यावर चर्चा सुरु होती म्हणून ऐकली अन खरंच हसावं की रडावं कळत नव्हतं. ती चर्चा घेणाऱ्या प्रतिनिधीचा युक्तिवाद होता- `लाखो लोक या साईटस पाहतात. त्यांच्या भावनांचा विचार करायचा की नाही?' म्हणजे विचार- अविचार- कुविचार यातला भेद त्याच्या गावीही नाही. कुविचारसुद्धा खपवून घ्यायचा? अन असे लोक समाजाची वकिली करणार? समाजाला बुद्धी अन अक्कल शिकवणार?
खरे तर हे एकच उदाहरण पुरेसे आहे बंदीचे समर्थन करायला. कसे? त्यासाठी थोडे विश्लेषण आवश्यक आहे. या प्रतिनिधीने हा असा प्रश्न का विचारला? कारण त्याची एकूण बौद्धिक क्षमता कमी आहे. अन जी आहे तीसुद्धा नीट पोसली गेलेली नाही. का झाले असे? कारण त्याच्या घरी, त्याच्या शिक्षणात, त्याच्या अवतीभवती तसे वातावरण नाही, विचार-विवेक यांची जोपासना, त्यांचा आग्रह नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे, हीच त्याच्या अवतीभवतीची मान्यता. अन प्रत्येक जण परिपूर्ण आहे किंवा योग्य अयोग्य त्याचं तो ठरवेल असे वातावरण. त्यामुळे दुसरी बाजू, दुसरा विचार, आपल्या मताचे विविध पैलू, आपल्या विचारांचे परिणाम याचा विचार करायचा असतो, विचार हे घडवायचे असतात, सुधारून घ्यायचे असतात, अन ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे याचा पडलेला विसर.
मग निर्भयावर बलात्कार करणाऱ्याच्या भावनांचे, स्वातंत्र्याचे काय? का नाही समजून घ्यायचे त्यांना? एखाद्याच्या मनात येणारे विचार वा भावना, मनावर उठणारे तरंग हेच अंतिम मानायचे असेल; तर मानवी मनात येणारे खुनाचे, बलात्काराचे, भ्रष्टाचाराचे, फसवणुकीचे असे कित्येक मनोभाव का मान्य करायचे नाहीत? असे होत नाही, होऊ शकत नाही, होऊ नये. मनोभावांचे समर्थन वा त्याज्यता अन्य पुष्कळ घटक विचारात घेऊनच ठरवावी लागते. विचारी म्हणवणाऱ्यान्ना हे ध्यानी येऊ नये?
गेली अनेक दशके स्वातंत्र्य, समता आदींचे निर्बुद्ध विवेकशून्य नारे देत जी एक विधीनिषेधशून्य जीवनशैली विकसित झाली त्याचाच परिणाम आहे, त्या प्रतिनिधीचा हास्यास्पद प्रश्न. आज त्याच विधीनिषेधशून्य जीवनशैलीला पुढे घेऊन जाणारी, या वेबसाईटसना मुक्त करण्याची जी मागणी होत आहे, ती मान्य झाल्यास पुढील काळ कसा राहील? किती निर्बुद्धांचा राहील? कारण आपले वागणे, विचार करणे केवळ त्या त्या क्षणापुरते नसते. ते आपल्या व्यक्तित्वाला अंतर्बाह्य प्रभावित करीत असते. अन हा प्रभाव जाणता वा अजाणता समाजाला प्रभावित करीत असतो. त्यामुळेच व्यक्तीला अमर्यादित स्वातंत्र्य असूच शकत नाही. ते त्याच्यासाठी अन समाजासाठी, दोघांसाठीही घातकच असते. माणसाचे मन पाण्यासारखे आहे. त्याला खाली जायला काहीही लागत नाही. पण वर खेचून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. ते आपोआप वर येत नाही. हे मनाला वर आणण्याचे प्रयत्न म्हणजेच संस्कार.
संस्कार या गोष्टीत विधी (काय करायचे) अन निषेध (काय करायचे नाही) या दोन्हीचा समावेश असतो. आजचे जीवन, त्यापाठी असणारे तत्वज्ञान संस्कारशून्य आहे याचा अर्थ हाच आहे की त्यात विधी आहेत पण निषेध नाहीत. भारताने हजारो वर्षे संस्कारांची, विधिनिषेधपूर्ण जीवनशैली अंगिकारल्यामुळेच हा समाज अन येथील राष्ट्र सगळ्या वादळवाऱ्यात टिकून राहिले. अन आज जगभरातील मानवता टिकायची असेल तर हीच विधिनिषेधपूर्ण जीवनशैली योग्य आहे यावर सुजन लोक येऊ लागले आहेत. चुकीची दिशा बदलायलाच हवी. त्या दिशेने जाणाऱ्याला कळेल तेव्हा कळेल हे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे.
गेल्या दोन-अडीच हजार वर्षातील भारतेतर विचारपद्धती मनाला एक दगड मानते. त्यामुळे त्यावर कशाचा काही परिणाम होतो वगैरे त्यांच्या गावीही नसते. हा दगड अश्लील चित्रपटासमोर ठेवला काय, हिंसक चित्रपटासमोर ठेवला काय, त्याग बलिदानाची शिकवण देणाऱ्या चित्रपटासमोर ठेवला काय त्यांच्या दृष्टीला, बुद्धीला त्यात काहीच फरक वाटत नाही. व्यवहारात प्रत्ययाला येणाऱ्या विसंगतीही मग ते दृष्टीआड करू लागतात. त्याच आधारे ते भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये यांनाही प्रश्न करतात? तुमची संस्कृती काय एवढी तकलादू आहे काय? वगैरे. मुळात संस्कृती, मन, संस्कार हे काही दगड नाहीत. हे सारे प्रवहमान घटक आहेत, असतात. त्यांचे संगोपन, संरक्षण, संवर्धन सतत करत राहावे लागते. तरच त्यांचे अपेक्षित परिणाम प्रत्ययाला येतात. सुग्रास अन्न ज्याप्रमाणे देखभाल केली नाही तर नासते, तसेच हे आहे. जीवमान अशा या बाबी आहेत. मुळात माणसाला तरी ही भारतेतर संस्कृती जीवमान मानते का? अन मानत असेल त्याचा योग्य तो अर्थबोध तिला होतो का?
हे सगळे ठीक आहे हो, पण बंदी हा काही त्यावरचा उपाय आहे का? असा खूप मानभावी प्रश्न विचारणारे आहेतच. त्यांना केव्हातरी उत्तर देईन. तूर्त फक्त त्यांच्यासाठी एक प्रश्न- तुमच्याकडे काय उपाय आहे? अन प्रबोधन वगैरे जे उपाय तुम्ही सांगता त्याने तरी उपाय होतो का? त्यांचा विस्ताराने परामर्श पुन्हा केव्हा.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा