गेल्या वर्षी आजच्याच दिवशी बाबांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. आज त्यांच्या नातीने, म्हणजे माझ्या लहान बहिणीच्या मुलीने त्यांच्याबद्दल लिहिले आहे. पण या दोन्हीमध्ये न आलेल्या दोन आठवणी आपणा सगळ्यांसोबत वाटून घेत आहे.
बाबांचे दिवस वगैरे आटोपून मी नागपूरला परतलो आणि दुसर्या दिवशी सकाळी शेजारचे पांडे काका भेटायला आले. पांडे काका हे आमचे शेजारी जसे होते तसेच बँकेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते बाबांच्या सोबत होते. त्यांनी सांगितलेल्या या दोन आठवणी. एक बँकेतील आणि एक खाजगी वैयक्तिक आयुष्यातील.
आणीबाणीचा काळ होता. काही महिने झाले होते आणीबाणी लागून. एक दिवस महालच्या टिळक पुतळा चौकातील बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात, काका आणि बाबा दोघेही जिन्यावरून उतरत होते आणि खालून महाव्यवस्थापक मराठे आणि बँकेचे अध्यक्ष सांगलीचे राजारामबापू पाटील हे वर चढत होते.
काका आणि बाबा सरकून बाजूला उभे राहिले आणि महाव्यवस्थापक आणि अध्यक्ष यांना त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. महाव्यवस्थापक या दोघांच्या जवळ आल्यानंतर मुद्दाम बाबांकडे वळून म्हणाले, 'काय आता जिरली की नाही तुमची?' त्यांचा अर्थ स्पष्ट होता की, आणीबाणी लागल्याने आता तुमचे संघवाले थंड झाले की नाही? त्यांना अद्दल घडली की नाही? महाव्यवस्थापकांचा प्रश्न आटोपला आणि दुसर्याच क्षणी बाबांनी त्यांना उत्तर दिलं - 'जिरली वगैरे काही नाही. आतापर्यंत तुम्ही फक्त घर गृहस्थीवाले, ज्यांच्यावर कर्ज आहे असे लोकच पकडले आहेत. आमच्या एकाही प्रचारकाला तुम्ही हातही लावू शकलेले नाही.'
महाव्यवस्थापक आणि अध्यक्ष चेहरा वळवून पुढे निघून गेले. ज्यावेळी मी मी म्हणणाऱ्यांची बोलती बंद झाली होती त्यावेळी असे बाणेदार उत्तर कोण सहन करू शकणार?
दुसरी आठवण कौटुंबिक स्वरूपाची आहे. एक दिवस दुपारची गोष्ट. काका बँकेत गेले होते आणि बाबा काही कारणाने सुट्टीवर होते. दुपारी चहा वगैरे झाल्यानंतर सहज अंगणात फेऱ्या मारत असताना त्यांनी पाहिले की, शेजारच्या पांडे काकांकडे कोणीतरी आलेलं आहे. जवळ जाऊन पाहिलं तर; विदर्भातील एक जिल्हा संघचालक आणि नागपूरच्या संघ कार्यालयातील काही मंडळी तिथे आलेली होती. का आणि कशासाठी आले हे कळलं आणि बाबांची धावपळ सुरू झाली. त्यांनी लगेच घरची सतरंजी नेऊन टाकली. त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली. जे काही चहा, साखर, दूध, कपबशा वगैरे लागत असतील; ते घरून घेऊन गेले. पांडे काकांकडे त्यावेळी त्यांचे आई-वडील होते. ते आजी-आजोबा हे जुने खेड्यातले होते. त्यांना फार शहराची सवय नव्हती आणि सोबत कोणी नव्हतं. हाताशी कोणी नव्हतं आणि चार पाहुणे घरात आलेले. त्यामुळे बाबांनी धावपळ करून हे सगळं सामान त्यांच्याजवळ नेऊन दिलं आणि आजीने चहा वगैरे केला. सगळ्यांनी चहा घेतला. गप्पा झाल्या. विषय होता त्या जिल्हा संघचालकांच्या मुलीचं स्थळ काकांसाठी आलं होतं. सगळं बोलणं झालं. लग्न ठरलं आणि काका संध्याकाळी बँकेतून आल्यानंतर त्यांना कळलं की असं असं झालेलं आहे आणि आपलं लग्न ठरलेलं आहे. दोन्ही आठवणी सांगताना काका भावूक झाले होते.
आपल्याच माणसांच्याही पुष्कळ गोष्टी आपल्याला माहीत नसतात हेच खरं.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा