शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

शक्तीत्रिवेणी

एकल किंवा सामूहिक मानवी व्यवहाराच्या मुळाशी तीन शक्ती काम करतात. एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे. प्रेरक शक्ती, सहायक शक्ती आणि नियंत्रक शक्ती. याव्यतिरिक्त संहारक आणि अगम्य अशा दोन शक्तीही कार्य करत असतात. त्यातील संहारक शक्ती सरळसरळ गुन्हेगारी स्वरुपाची म्हणता येईल. अगम्य शक्ती वेडेपणा, संतत्व, योगी अशा गटात मोडेल. परंतु सामान्य मानवी व्यवहाराच्या मुळाशी मात्र प्रेरक शक्ती, सहायक शक्ती आणि नियंत्रक शक्ती; या तीन कार्य करीत असतात. माणूस साधारणपणे व्यवस्थांच्या माध्यमातून कार्य/ काम/ कृती करतो. त्या त्या व्यवस्थांचा कारभार या तिन्ही शक्तींचा कमीजास्त उपयोग करून होतो. तरीही प्रत्येक व्यवस्थेचं स्वत:चं असं स्वरूप असतं. जसे धार्मिक वा शैक्षणिक व्यवस्था या मुख्यत: प्रेरक शक्तीने काम करतात. कुटुंबव्यवस्था सहायक शक्तीने काम करते. राज्यव्यवस्था नियंत्रक शक्तीने काम करते. मात्र हे स्वरूप म्हणजे त्यातील प्रधान अंग होय. अन्य दोन शक्तीही कमी अधिक स्वरुपात कार्य करीत असतातच. प्रत्येक व्यवस्थेची प्रधान शक्ती सुद्धा एका मर्यादेतच असावी लागते. तिचे प्रमाण वाढले तर ती भरकटते. जसे कुटुंब व्यवस्थेत सहायक शक्ती फार जास्त झाली तर ती संतुलन गमावून बसते. किंवा राज्यव्यवस्था नियंत्रक शक्ती मर्यादेबाहेर वापरू लागली तर ती हुकूमशाही, एकाधिकारशाही याकडे वाटचाल करते. त्यामुळेच प्रधान वा गौण शक्तींचा वापर तारतम्याने, विवेकाने करावा लागतो. त्यांचे डोळे मिटून समर्थन करता येत नाही. जीवनाविषयीची योग्य धारणा, जीवनाविषयीचे साधकबाधक चिंतन; हे व्यक्तिगत स्तरावर आणि सामूहिक स्तरावर जेवढे अधिक राहील तेवढा विवेक आणि तारतम्य अधिक राहील आणि वाटचाल अधिक सुकर राहील.

आज मात्र हे संतुलन सगळ्याच व्यवस्थांचे बिघडले असल्याचा अनुभव सगळेच घेत आहेत. याची दोन कारणे आहेत. भारतीय समाज हजारो वर्षांचा परिपक्व समाज असला तरीही त्याचे विचार करणे आणि तिन्ही शक्तींचा वेळोवेळी आढावा घेणे दीर्घ काळापासून बंद झाल्यासारखे आहे. तो चांगली वा वाईट कृती ठोकळेबाजपणे करतो आहे. दुसरे कारण म्हणजे आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व्यवस्था अभारतीय आहेत. गुलामीत रूढ झालेल्या व्यवस्था चालत आहेत. भारतावर सत्ता गाजवणाऱ्या समाजांना नियंत्रक आणि सहायक या दोनच शक्ती ठाऊक होत्या आणि आहेत. त्यातही सहायक शक्ती बरीच अलीकडची. त्यांची मूळ वृत्ती नियंत्रक शक्तीने व्यवहार करण्याची. त्यामुळे आजच्या घडीला कुटुंबापासून तर राज्यव्यवस्थेपर्यंत नियंत्रक व सहायक शक्तींचाच प्रभाव आहे. त्यातही नियंत्रक शक्तींचा फार जास्त.

सगळीकडेच या तीन शक्तींचे संतुलन कसे निर्माण करता येईल, आज असलेली स्थिती कशी बदलता येईल; हा चिंतनाचा विषय होणे गरजेचे आहे. अर्थात हे आपोआप होणार नाही. मात्र कोणाला ना कोणाला ते काम करावेच लागेल. ते नाही झाले तर व्यवस्था स्वत:च स्वत:च्या नाशाला जन्म देतात. तो नाश दीर्घ आणि कमी गोंधळाचा राहतो किंवा अल्पावधीत अधिक गोंधळाचा असा बंडखोरीचा राहतो. नाश अटळ. एवढेच नाही तर त्यांची जागा घेणाऱ्या व्यवस्था सुद्धा त्याच दोषांनी बाधित राहतात. भारताची विशेषता ही राहिली आहे की, त्याने प्रेरक शक्तीचा खूप व्यापक आणि सखोल विचार केलेला आहे. अर्थात भूतकाळात. त्याची आजची उपयोगिता अत्यल्प आहे. भारताला पुन्हा त्या प्रेरक शक्तीचा खूप अधिक ध्यास घ्यावा लागेल. तिची निर्मिती, तिची जोपासना, ती रुजवणे हे सगळे करावे लागेल. हे करताना मोठी किंमत देखील मोजावी लागेल. वेगवेगळ्या प्रकाराने ही किंमत मोजावी लागेल. परंतु त्याला इलाज नाही. आज तरी या दृष्टीने सारे काही शांत शांत आहे. याची जाणीवही फारशी नाही. मोठ्या प्रमाणावर नियंत्रक आणि थोडेफार सहायक शक्तींचा वापर आणि त्यांचीच घटपटांची खटपट सुरु आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २७ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा