मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

शिवत्व जागो

शक्ती पचावी लागते. आर्थिक असो, राजकीय असो, ज्ञानाची असो, गुणांची असो, शारीरिक असो, शस्त्रअस्त्रांची असो, बुद्धीचातुर्याची असो... कोणतीही शक्ती असो. अन शिवाशिवाय शक्ती पचत नाही. भारत वगळता उरलेल्या जगाजवळ शिव फारच कमी आहे. त्यामुळे ते स्वतःसाठी अन बाकीच्यांसाठी सतत प्रश्न आणि समस्या निर्माण करत असतात. दुर्दैवाने आपल्याजवळचा शिवत्वाचा गौरव भारत किती काळ सांगू शकेल असाही प्रश्न उपस्थित होतोच. कारण उर्वरित जगाच्या शक्तीच्या आविष्काराने दीपून जाऊन भारतही शक्तीलाच खूप जास्त महत्व देऊ लागलेला आहे. सगळंच हातून गेलं आहे असं नाही, पण हे प्रमाण restore करण्याचा मोठा प्रयत्न मात्र हवा. आज 'महाशिवरात्री' आहे. मात्र निष्ठेने साग्रसंगीत 'महाशिवरात्री' व्रत करणे हा शिवत्वाचा फारच छोटा आणि प्राथमिक भाग आहे. उलट या 'महाशिवरात्री' व्रतातून निर्माण होणारी शक्तीही अन्य शक्तींप्रमाणेच शिवहीन असू शकते, होऊ शकते. रावण हे त्याचं कालातीत उदाहरण आहे. आजची 'महाशिवरात्री' सगळ्यांना, विशेषतः भारताला शिवयुक्त करो.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १ मार्च २०२२

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

कवीकल्पना

कवीकल्पना ही कवीकल्पना असते अन वास्तव ते वास्तव. आता बघा नं - ऋतुसंहारमध्ये कालिदास ग्रीष्माबद्दल काय म्हणतो? ग्रीष्माच्या दाहकतेचा (उन्हाचा) ताप इतका असतो की कट्टर वैरी आपले वैर विसरून जातात. तो उदाहरण देतो - उन्हाने पोळलेला साप मोराच्या पिसाऱ्याच्या सावलीत जाऊन बसतो. सापालाही भीती वाटत नाही अन मोरालाही दुर्लक्ष करावसं वाटतं. कारण दोघेही पोळलेले असतात. पण आज... निसर्ग, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळंच तापलेलं असून अन सगळ्यांनाच झळा बसत असूनही वैर काही संपत नाही. असो. कालिदास असो की ज्ञानेश्वर, कवी लोक आपले मार्ग दाखवतात आपल्या प्रतिभेच्या बळावर. कवीचं ऐकावंच असा नियम तर नाही ना?

- श्रीपाद कोठे

२८ फेब्रुवारी २०२२

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

अभिजात भाषा

उद्या मराठी भाषा गौरव दिवस आहे. तो जोरदार साजरा वगैरेही होईल. त्याला काहीच हरकत नाही. मातृभाषेचा गौरव, तिचा उत्कर्ष, तिच्यापुढील समस्या सोडवणे, मराठीची आजची अवस्था (मुख्य म्हणजे तिच्याबद्दलची ओशाळलेपणाची, हीनतेची भावना, मराठी बोलण्याची लाज वाटणे, रोजच्या व्यवहारात छोटे छोटे शब्द सुद्धा मराठी न वापरण्याचा अट्टाहास, मराठीत न बोलणे, मराठी शब्द न वापरणे म्हणजे प्रतिष्ठा असं समजणे इत्यादी) बदलण्याचा प्रयत्न हे चांगलेच आहे. या दिवसानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय स्तरावर निवेदन देण्याची चळवळही सुरू आहे. अगदी टीव्हीवरील मराठी मालिकांमधूनही यासाठी प्रचार सुरू असल्याचे एकाने सांगितले. हे मात्र फारसे पटत नाही. मराठी भाषा हा गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा विषय व्हावा हे खरेच, पण अभिजात भाषेसाठीचा प्रयत्न मनास येत नाही. कारण अभिजात भाषा ही कल्पनाच छोटी आणि उथळ वाटते. त्याचे जे काही फायदे तोटे असतील ते असोत पण अमुक भाषा अभिजात आणि अमुक नाही म्हणजे काय? अन असे वर्गीकरण कशासाठी? काही तरी सिद्ध करणे आणि वर्चस्व प्राप्त करणे, विशेषाधिकार प्राप्त करणे; हा विचारच जीवन खालच्या पायरीवर उतरवणारा आहे. हजारो वर्षे जुनी भाषा आणि अगदी कालपरवाची भाषा यात तुलना करण्याची काय गरज? प्रत्येकच भाषा मानवी जीवनाची अपूर्व अभिव्यक्ती आहे. प्रत्येकच भाषा सौष्ठवपूर्ण व्हावी, सुंदर व्हावी, अर्थवाही व्हावी, गौरवशाली व्हावी, आनंददायी व्हावी. उद्यानात फुलणाऱ्या विविध फुलांप्रमाणे या सगळ्या भाषा आहेत/ असाव्यात. त्यांच्यात परस्पर आदानप्रदान व्हावे. सगळ्या भाषांनी सगळ्या भाषांना विकसित करावे. फुलवावे. त्यात ही अभिजात अन ही अभिजात नाही असं कशाला हवं?

- श्रीपाद कोठे

२६ फेब्रुवारी २०२२

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

दुबळेपणा व करुणा

एक पोस्ट पाहण्यात आली की, युक्रेनवर आजची परिस्थिती का आली? कारण तो दुबळा आहे. हे अगदीच खरं आहे. पण या अंगाने विवेचन करताना करुणा, संवेदना, मानवीयता; याबद्दल बोलायचे नाही का? शक्ती आणि शौर्य यांचा गौरव इतका असावा का की; करुणा, संवेदना, मानवीयता या गोष्टी हद्दपार व्हाव्यात? एखादी व्यक्ती, एखादा देश शक्तीने कमी आहे म्हणून त्याला भोग भोगावे लागतात हे वास्तव आहे. पण हे चुकीचे आहे आणि ज्याच्यामुळे त्या दुबळ्यावर अशी परिस्थिती येते तो अयोग्य आहे, गुन्हेगार आहे, अमानुष आहे; हे ठामपणे बोलले, लिहिले जायला हवेच.

By the way -

हिंसा, अहिंसा, युद्ध, आत्मरक्षा या शब्दांचा नीटसा अर्थबोध बहुसंख्यांना नसतो. शस्त्राशिवाय हिंसा असू शकते आणि शस्त्र म्हणजे हिंसाच असते असे नाही, हे समजून घ्यायला माणसाला अजून खूप चालायचे आहे.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०२२

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

आवाहन

नमस्कार,

सध्या विखुरलेल्या सगळ्या कविता एकत्र करतो आहे. साधारण ५०० च्या घरात आहेत. मधूनमधून सुहृदांचा आग्रह असतो, अपेक्षा असते, सूचना असते; की संग्रह काढा. फार हौस आहे असं नाही. पण काढायला हरकत पण नाही. कोणी कविता संग्रह प्रकाशित करायला तयार असतील तर सांगावे.

टीप - मी पैसे देणार नाही. आपणच पैसे द्यायचे अन आपले संग्रह काढायचे असं अजिबातच करणार नाही. प्रकाशनाने संग्रह काढावे. चार पैसे कमवावे. चार पैसे मलाही द्यावे.

- या निमित्ताने प्रकाशन व्यवसाय, कविता संग्रह, पुस्तकांचे ग्राहक, कविता संग्रह विकत घेणे इत्यादी मुद्यांची चर्चा करायलाही हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०२२

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

लपंडाव

 किती सांगू मी सांगू कुणाला

आज आनंदी आनंद झाला...

आज आनंदी आनंद झाला...

असं फार म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फारच क्वचित होतं. नाही का? पण आज झालं आहे. २९ ऑक्टोबर २०१८ म्हणजे सुमारे साडेतीन वर्षांपूर्वीची एक कविता अचानक सापडली. 'कविता' याच विषयावरची ४०० ओळींची ही कविता. कशी अन कुठे लपली कुणास ठाऊक. पहिले हुरहूर, दु:ख, संताप, चिडचिड; अन मग स्वीकार, विसर; असं सगळं झालं. ही कविता माहिती असलेल्या एका मित्राने एका दिवाळी अंकासाठी मागितली होती. तेव्हाही शोध शोध शोधली. पण नव्हती सापडली. मधूनच आठवण येई. थोडा वेळ त्रास होई. पुन्हा सामान्य. अन आज अकल्पितपणे पुढ्यात ठाकली. छान वाटतं आहे.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०२२

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

Secular

बहुतेक सगळ्या समस्यांचं कारण secular विचार हेच आहे. अगदी सध्याच्या युक्रेन समस्येचं कारण सुद्धा. युद्ध होईल वा न होईल ते लवकरच स्पष्ट होईल. पण युद्ध झाले तरी वा न झाले तरी; भारतासहित जगभरातील सामान्य माणसाच्या समस्या, सामान्य माणसाचे त्रास वाढतीलच. हा तणाव निवळावा किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी ज्या उपायांची चर्चा करण्यात येते; त्यांचा पायासुद्धा secular विचार हाच आहे. कारण, राजकारण यांची खूप चर्चा होते आहे अन होईल. Diplomacy आणि strategy, लष्करी तयारी आणि डावपेच; यांची सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणारी चर्चा होईल. ही किंवा ती बाजू घेऊन अभिनिवेशपूर्ण वाद होतील. शौर्याच्याही गोष्टी होतील. या सगळ्या गदारोळात मूळ गोष्टीवर लक्ष देणारे, बोलणारे कोणाच्या खिजगणातीत सुद्धा राहणार नाहीत. आजवर येऊन गेलेल्या लाखो वादळांप्रमाणे वादळ येईल, नुकसान करेल, अन निघून जाईल. माणूस रडेल वा पाठ थोपटून घेईल. मानवी सभ्यतेचं पाऊल जिथल्या तिथेच राहील. कारण secular विचारांवर उभं असलेलं मानवी जीवन तसंच राहील. मी Secular विचार म्हणतो त्याचा अर्थ शब्दकोशात असलेला त्याचा अर्थ. (सेक्युलर, फेक्युलर इत्यादी बोलणारे सुद्धा बहुतांश secular विचारच करतात.) अपवाद वगळता आजचं ज्ञान, आजचं शिक्षण, आजचे विचार आणि विचारपद्धती, आजच्या व्यवस्था, या सगळ्यांच्या मुळाशी असलेल्या धारणा, समज, मान्यता इत्यादी; सगळ्यांचा आधार secular विचार आहे. Secularism ला विरोध करणाऱ्यांचेही विचार secular च आहेत. या secular mindset मधून बाहेर पडणं हाच उपाय आहे. हे कसं होईल हा मात्र यक्षप्रश्न आहे.

- युक्रेनने NATO मध्ये सहभागी व्हावं हा किंवा रशिया व जर्मनी यांना जोडणारी समुद्रतळाची तेलाची पाईपलाईन हा; यातील कोणताही विषय जगाला वेठीला धरावं एवढा मोठा नक्कीच नाही. यातील काहीही झालं वा नाही झालं तरी काय होणार आहे? मानवातील पशुत्व संपेपर्यंत असे प्रश्न सुटणार नाहीत.

- श्रीपाद कोठे

१५ फेब्रुवारी २०२२

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

बाबासाहेब आंबेडकर आणि मनुस्मृती

 

===================================

बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे.पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.

दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-

"ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.

दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.

[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-

स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:

अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]

बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे.नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला.आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही."[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]

११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा,घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा,स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे.दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]

समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.

[जनता,१०-२-१९५१]

दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-"माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली.पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.

एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-

अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-

[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-

स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:

अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.

श्लोक १२९-यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//

अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?

श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.

श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.

श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.

स्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.

श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.

श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.

श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.नवर्याने भेट म्हणून दिलेले.४.वडिलांनी दिलेली.५.आईने दिलेले.६.भावाने दिलेले.

श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.

आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्म्रुतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.

राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.

या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे.ते म्हणतात:-"बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले."[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती,बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन].

By :- Madhusudan Cherekar

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्य

कोण आपलं वाटावं, कोण परकं वाटावं; कोण योग्य वाटावं, कोण अयोग्य वाटावं; कोण महान वाटावं, कोण लहान वाटावं; हे प्रत्येकाचं मतस्वातंत्र्य आहे. त्याचे निकष वा आधार ठरवण्याचं प्रत्येकाचं व्यक्तीस्वातंत्र्य पण आहे. पण आपल्या निकषात न बसणाऱ्याबद्दल वाईटसाईट बोलणे, अपमानास्पद बोलणे, चारित्र्यहनन करणे, शेलकी भाषा वापरणे; हे मात्र कुठल्याच स्वातंत्र्यात बसत नाही. कारण ते आपल्याला माणूस म्हणून खाली उतरवते.

(संदर्भ समजून घेण्याएवढे हुशार सगळे असतातच.)

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

लोकमत कार्यक्रमात सरसंघचालक

लोकमतच्या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे कवित्व बराच काळ सुरू राहणार आहेच. ते चांगलेही आहे. नाही तरी 'हिंदू विचार का हो, सम्यक समूह मंथन' हीच संघाची भूमिका आहे. त्यामुळे तसे होणे वावगे नाहीच. अन मंथन म्हटल्यावर वेगवेगळी मते आलीच. प्रश्न उत्तरे आलीच. असेच काही प्रश्न लोकमतचे मालक श्री. विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित केले होते. त्यातला एक प्रश्न होता - 'हिंदुत्वाची कोणती व्याख्या योग्य? सावरकरांची? संघाची? बाळासाहेब ठाकरे यांची? की राहुल गांधी यांची?'

याबाबत दोन गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे, संघाने हिंदुत्वाची व्याख्याच केलेली नाही. अन दुसरे म्हणजे, व्याख्येचं काही एक महत्व असलं तरीही व्याख्या म्हणजे काही फार मोठी किंवा अत्यावश्यक गोष्ट नाही. 'कविता' या गोष्टीच्या अनेक व्याख्या आहेत. त्याने कवितेला काहीही फरक पडत नाही. एकाच 'कविता' या सत्याचं प्रत्येक जण आपापलं वर्णन करतो. अन कविता करणारे तर त्या व्याख्या वगैरेंच्या फंदात पण पडत नाहीत. 'जीवन' या सत्याचंही असंच आहे. व्याख्या ही गोष्ट त्यासाठी irrelevant आहे. निरर्थक आहे. सध्या वातावरणात प्रेमाचा माहोल आहे. त्याचंही तसंच. अनेक गोष्टी एक तर व्याख्येपलीकडच्या असतात किंवा व्याख्या या गोष्टीला काही महत्व नसतं. हिंदुत्व तसं आहे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

दार्जीलिंग

Bagdogra Airport to Roy Villa: 90 km (3 hours)

New Jalpaiguri Railway Station to Roy Villa : 80 km by road

New Jalpaiguri Railway Station to Darjeeling Railway Station by TOY train: 88 km.

Darjeeling Railway Station to Roy Villa: 4.5 km

Darjeeling Taxi Stand,Chawak Bazar to Roy Villa: 3 km

Darjeeling City Centre to Roy Villa: 3 km

Darjeeling Chowrasta to Roy Villa: 3 km


'Roy Villa', Lebong Cart Road,

Near Tenjing Rock,

Darjeeling - 734104

+91 354 225 1055, +91 354 227 0770 

+91 9830289328

+91 9433320004

darjeeling@rkmm.org

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

रेमेडोक्या

एक सज्जन माणूस होता. त्याच्या मनात आलं, आपण आंब्याचं झाड लावावं. लगेच त्याने तयारी केली. खड्डा केला. त्यात आंब्याची कोय ठेवली. त्यावर माती टाकली. वरून झारीने पाणी घातलं. अन म्हणाला, 'झालं. आता मस्त आंबे खाता येतील.' आठवडा झाला. त्याने पाहिलं, आंब्याच्या झाडाचं काहीच चिन्ह नाही. त्याने जागा उकरली. कोय बाहेर काढली. त्यावरही काहीच चिन्ह नव्हतं. पुन्हा धीर धरून खड्ड्यात ठेवली. वरून माती टाकली. पाणी घातलं. पुन्हा एक आठवडा झाला. पुन्हा सगळं तसंच. उकरणे, कोय तपासणे, पुन्हा पुरणे इत्यादी. काही महिने असंच सुरू राहिलं. शेवटी निराश झाला आणि ज्याला तो आपल्यापेक्षा थोडा अधिक शहाणा समजत होता अशा एका मित्राकडे गेला. त्याला सगळी कथा सांगितली. मित्र हसला अन म्हणाला, 'रेमेडोक्या.' मग समजूत घालून त्याने नीट समजावून दिलं की, कोय पेरल्यानंतर पुष्कळ दिवस जाऊ द्यावे लागतात. मध्येच अशी कोय बाहेर काढायची नसते. इत्यादी इत्यादी.

- तर, असे जे असतात जे त्या त्या गोष्टीला रुजायला काळ आणि अवकाश देत नाहीत त्यांना म्हणतात 'रेमेडोक्या.'

आज अशा रेमेडोक्यांची चलती आहे. त्यांचंच युग आहे म्हणा ना. सगळ्यांना एक छान जग हवं आहे. हे जग छान व्हावं म्हणून काही प्रयत्न करायला हवा हेही पुष्कळांना कळतं. मग काही जण टीव्हीसाठी बोधप्रद कार्यक्रम तयार करून दाखवतात. धार्मिक, सामाजिक इत्यादी संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. पण परिणाम काही फारसा दिसत नाही. का? कारण रेमेडोके. टीव्हीवर एखादा चांगला, मनावर परिणाम करणारा, विचार देणारा; असा कार्यक्रम झाला रे झाला की; समोर आदळतात विक्षिप्त, निरर्थक, अश्लील, वाह्यात जाहिराती. किंवा धार्मिक अथवा कलात्मक कार्यक्रम आटोपला की, पुढ्यात येते तू तू मी मी किंवा हिणकस काहीतरी. अन चांगल्या रोपट्याची कोय मनाच्या जमिनीतून बाहेर फेकली जाते. ती रुजतच नाही.

हे जग चांगलं करण्यासाठी कोणी कोणी, शिक्षणात काही प्रयत्न करतात. नैतिक शिक्षण, सामाजिक शिक्षण, नागरिकत्वाचं शिक्षण वगैरे वगैरे. पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही. का? कारण इथेही मुलांच्या मनात पेरलेली कोय जमिनीतून उखडली जाते. शाळेच्या वा कुठल्याही वर्गाच्या बाहेर पडलं की; रस्त्यावर आढळणाऱ्या जाहिराती, रस्त्यावर दिसणारी दृश्ये, रस्त्यावर ऐकू येणारी भाषा, कानावर पडणारे विषय, कानावर पडणारे शब्द, एकूणच वातावरण; असं सगळं मनात पेरलेली कोय काढून टाकतात. आजूबाजूचं वातावरण, घरचं वातावरण, शेजारपाजार, भवतालातल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना, आवडीनिवडी, प्रतिष्ठा पावलेल्या बाबी, आग्रह, दुराग्रह, अनाग्रह, casual attitude, चलता है वृत्ती; हे सगळेच मनात पेरलेल्या बिया निरर्थक करून टाकतात. जुन्या काळी एक बरं होतं, विद्यार्थी गुरुगृही शिकायला गेला की, त्याचं foundation नीट पक्कं होईपर्यंत, बाहेरचं वारं लागत नसे. बाहेरच्या वाऱ्याचे बरेवाईट परिणाम होतातच. ते नंतरही होतच असत. पण ते प्रमाण कमी राहत असे. आज एका हातात तमाशा अन दुसऱ्या हातात भगवद्गीता देऊन, जग चांगलं करण्याची धडपड सुरू आहे. गीता फक्त हाती धरून रुजत नाही, ना वाचून गीता रुजत. गीता रुजते, ते शब्द तपस्येतून आले तर. त्या शब्दांच्या पाठी तपस्येचं तारण उभं असेल तर शब्द अर्थवाही होतो, परिणाम करतो. पेरलेलं बी रुजायला तपश्चर्या हवी असते. तपश्चर्या म्हणजे शब्दांचा खेळ नसतो. त्यासाठी आतील आणि बाहेरील दोन्ही वातावरण maintain करावं लागतं. हे समजून घेण्याचा धीर नसलेले 'रेमेडोके' असतात.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १ फेब्रुवारी २०२२

(असो. जगात रेमेडोकेही असतातच. असणारच. हे जग रेमेडोकेही चालवत नाहीत, अन डोकेबाजही चालवत नाहीत. जो चालवतो तोच कोणाला डोकेबाज तर कोणाला रेमेडोके बनवतो. त्याचं तो पाहिल. आपल्याला काय? पांघरूण घेण्याची वेळ झाली की पांघरूण घ्यावं अन निवांत व्हावं.)