एक सज्जन माणूस होता. त्याच्या मनात आलं, आपण आंब्याचं झाड लावावं. लगेच त्याने तयारी केली. खड्डा केला. त्यात आंब्याची कोय ठेवली. त्यावर माती टाकली. वरून झारीने पाणी घातलं. अन म्हणाला, 'झालं. आता मस्त आंबे खाता येतील.' आठवडा झाला. त्याने पाहिलं, आंब्याच्या झाडाचं काहीच चिन्ह नाही. त्याने जागा उकरली. कोय बाहेर काढली. त्यावरही काहीच चिन्ह नव्हतं. पुन्हा धीर धरून खड्ड्यात ठेवली. वरून माती टाकली. पाणी घातलं. पुन्हा एक आठवडा झाला. पुन्हा सगळं तसंच. उकरणे, कोय तपासणे, पुन्हा पुरणे इत्यादी. काही महिने असंच सुरू राहिलं. शेवटी निराश झाला आणि ज्याला तो आपल्यापेक्षा थोडा अधिक शहाणा समजत होता अशा एका मित्राकडे गेला. त्याला सगळी कथा सांगितली. मित्र हसला अन म्हणाला, 'रेमेडोक्या.' मग समजूत घालून त्याने नीट समजावून दिलं की, कोय पेरल्यानंतर पुष्कळ दिवस जाऊ द्यावे लागतात. मध्येच अशी कोय बाहेर काढायची नसते. इत्यादी इत्यादी.
- तर, असे जे असतात जे त्या त्या गोष्टीला रुजायला काळ आणि अवकाश देत नाहीत त्यांना म्हणतात 'रेमेडोक्या.'
आज अशा रेमेडोक्यांची चलती आहे. त्यांचंच युग आहे म्हणा ना. सगळ्यांना एक छान जग हवं आहे. हे जग छान व्हावं म्हणून काही प्रयत्न करायला हवा हेही पुष्कळांना कळतं. मग काही जण टीव्हीसाठी बोधप्रद कार्यक्रम तयार करून दाखवतात. धार्मिक, सामाजिक इत्यादी संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. पण परिणाम काही फारसा दिसत नाही. का? कारण रेमेडोके. टीव्हीवर एखादा चांगला, मनावर परिणाम करणारा, विचार देणारा; असा कार्यक्रम झाला रे झाला की; समोर आदळतात विक्षिप्त, निरर्थक, अश्लील, वाह्यात जाहिराती. किंवा धार्मिक अथवा कलात्मक कार्यक्रम आटोपला की, पुढ्यात येते तू तू मी मी किंवा हिणकस काहीतरी. अन चांगल्या रोपट्याची कोय मनाच्या जमिनीतून बाहेर फेकली जाते. ती रुजतच नाही.
हे जग चांगलं करण्यासाठी कोणी कोणी, शिक्षणात काही प्रयत्न करतात. नैतिक शिक्षण, सामाजिक शिक्षण, नागरिकत्वाचं शिक्षण वगैरे वगैरे. पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही. का? कारण इथेही मुलांच्या मनात पेरलेली कोय जमिनीतून उखडली जाते. शाळेच्या वा कुठल्याही वर्गाच्या बाहेर पडलं की; रस्त्यावर आढळणाऱ्या जाहिराती, रस्त्यावर दिसणारी दृश्ये, रस्त्यावर ऐकू येणारी भाषा, कानावर पडणारे विषय, कानावर पडणारे शब्द, एकूणच वातावरण; असं सगळं मनात पेरलेली कोय काढून टाकतात. आजूबाजूचं वातावरण, घरचं वातावरण, शेजारपाजार, भवतालातल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना, आवडीनिवडी, प्रतिष्ठा पावलेल्या बाबी, आग्रह, दुराग्रह, अनाग्रह, casual attitude, चलता है वृत्ती; हे सगळेच मनात पेरलेल्या बिया निरर्थक करून टाकतात. जुन्या काळी एक बरं होतं, विद्यार्थी गुरुगृही शिकायला गेला की, त्याचं foundation नीट पक्कं होईपर्यंत, बाहेरचं वारं लागत नसे. बाहेरच्या वाऱ्याचे बरेवाईट परिणाम होतातच. ते नंतरही होतच असत. पण ते प्रमाण कमी राहत असे. आज एका हातात तमाशा अन दुसऱ्या हातात भगवद्गीता देऊन, जग चांगलं करण्याची धडपड सुरू आहे. गीता फक्त हाती धरून रुजत नाही, ना वाचून गीता रुजत. गीता रुजते, ते शब्द तपस्येतून आले तर. त्या शब्दांच्या पाठी तपस्येचं तारण उभं असेल तर शब्द अर्थवाही होतो, परिणाम करतो. पेरलेलं बी रुजायला तपश्चर्या हवी असते. तपश्चर्या म्हणजे शब्दांचा खेळ नसतो. त्यासाठी आतील आणि बाहेरील दोन्ही वातावरण maintain करावं लागतं. हे समजून घेण्याचा धीर नसलेले 'रेमेडोके' असतात.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, १ फेब्रुवारी २०२२
(असो. जगात रेमेडोकेही असतातच. असणारच. हे जग रेमेडोकेही चालवत नाहीत, अन डोकेबाजही चालवत नाहीत. जो चालवतो तोच कोणाला डोकेबाज तर कोणाला रेमेडोके बनवतो. त्याचं तो पाहिल. आपल्याला काय? पांघरूण घेण्याची वेळ झाली की पांघरूण घ्यावं अन निवांत व्हावं.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा