उद्या मराठी भाषा गौरव दिवस आहे. तो जोरदार साजरा वगैरेही होईल. त्याला काहीच हरकत नाही. मातृभाषेचा गौरव, तिचा उत्कर्ष, तिच्यापुढील समस्या सोडवणे, मराठीची आजची अवस्था (मुख्य म्हणजे तिच्याबद्दलची ओशाळलेपणाची, हीनतेची भावना, मराठी बोलण्याची लाज वाटणे, रोजच्या व्यवहारात छोटे छोटे शब्द सुद्धा मराठी न वापरण्याचा अट्टाहास, मराठीत न बोलणे, मराठी शब्द न वापरणे म्हणजे प्रतिष्ठा असं समजणे इत्यादी) बदलण्याचा प्रयत्न हे चांगलेच आहे. या दिवसानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय स्तरावर निवेदन देण्याची चळवळही सुरू आहे. अगदी टीव्हीवरील मराठी मालिकांमधूनही यासाठी प्रचार सुरू असल्याचे एकाने सांगितले. हे मात्र फारसे पटत नाही. मराठी भाषा हा गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा विषय व्हावा हे खरेच, पण अभिजात भाषेसाठीचा प्रयत्न मनास येत नाही. कारण अभिजात भाषा ही कल्पनाच छोटी आणि उथळ वाटते. त्याचे जे काही फायदे तोटे असतील ते असोत पण अमुक भाषा अभिजात आणि अमुक नाही म्हणजे काय? अन असे वर्गीकरण कशासाठी? काही तरी सिद्ध करणे आणि वर्चस्व प्राप्त करणे, विशेषाधिकार प्राप्त करणे; हा विचारच जीवन खालच्या पायरीवर उतरवणारा आहे. हजारो वर्षे जुनी भाषा आणि अगदी कालपरवाची भाषा यात तुलना करण्याची काय गरज? प्रत्येकच भाषा मानवी जीवनाची अपूर्व अभिव्यक्ती आहे. प्रत्येकच भाषा सौष्ठवपूर्ण व्हावी, सुंदर व्हावी, अर्थवाही व्हावी, गौरवशाली व्हावी, आनंददायी व्हावी. उद्यानात फुलणाऱ्या विविध फुलांप्रमाणे या सगळ्या भाषा आहेत/ असाव्यात. त्यांच्यात परस्पर आदानप्रदान व्हावे. सगळ्या भाषांनी सगळ्या भाषांना विकसित करावे. फुलवावे. त्यात ही अभिजात अन ही अभिजात नाही असं कशाला हवं?
- श्रीपाद कोठे
२६ फेब्रुवारी २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा