शक्ती पचावी लागते. आर्थिक असो, राजकीय असो, ज्ञानाची असो, गुणांची असो, शारीरिक असो, शस्त्रअस्त्रांची असो, बुद्धीचातुर्याची असो... कोणतीही शक्ती असो. अन शिवाशिवाय शक्ती पचत नाही. भारत वगळता उरलेल्या जगाजवळ शिव फारच कमी आहे. त्यामुळे ते स्वतःसाठी अन बाकीच्यांसाठी सतत प्रश्न आणि समस्या निर्माण करत असतात. दुर्दैवाने आपल्याजवळचा शिवत्वाचा गौरव भारत किती काळ सांगू शकेल असाही प्रश्न उपस्थित होतोच. कारण उर्वरित जगाच्या शक्तीच्या आविष्काराने दीपून जाऊन भारतही शक्तीलाच खूप जास्त महत्व देऊ लागलेला आहे. सगळंच हातून गेलं आहे असं नाही, पण हे प्रमाण restore करण्याचा मोठा प्रयत्न मात्र हवा. आज 'महाशिवरात्री' आहे. मात्र निष्ठेने साग्रसंगीत 'महाशिवरात्री' व्रत करणे हा शिवत्वाचा फारच छोटा आणि प्राथमिक भाग आहे. उलट या 'महाशिवरात्री' व्रतातून निर्माण होणारी शक्तीही अन्य शक्तींप्रमाणेच शिवहीन असू शकते, होऊ शकते. रावण हे त्याचं कालातीत उदाहरण आहे. आजची 'महाशिवरात्री' सगळ्यांना, विशेषतः भारताला शिवयुक्त करो.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, १ मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा