मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

पुस्तक दिनाच्या निमित्ताने

काल पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत एका अनोख्या उपक्रमात सुमारे ५० हजार पुस्तके रस्त्यावर मांडून ठेवली होती. कोणीही ती पुस्तके पाहू शकत होते आणि त्यातील एक पुस्तक काहीही पैसे न देता घेऊन जाण्याची प्रत्येकाला मुभा होती. ज्यांनी हा उपक्रम केला त्यांचे अभिवादन आणि अभिनंदन. एवढी पुस्तके जमा करणे, मांडून ठेवणे आणि पुन्हा आवरणे ही कामे सुद्धा अचाटच. त्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच. या उपक्रमाला हजारो लोकांनी भेटही दिली. त्यामुळे उपक्रम यशस्वी झाला असेच म्हटले पाहिजे. हेही छानच.

... पण, एक प्रश्न मनात येतोच की; पुस्तक फुकट मिळणार म्हटल्यावर हजारोंनी गर्दी करणारे आपण; पुस्तकं विक्रीच्या जागी त्याच्या किमान अर्धी गर्दी करतो का? करू का? व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही मला हे प्रश्न मोलाचे आणि महत्त्वाचे वाटतात. समाजाची गुणवत्ता फक्त वाचून वाढत नाही, वाचन आणि पुस्तके यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि attitude हेही तितकेच महत्त्वाचे असतात. असतातच.

- श्रीपाद कोठे

२४ एप्रिल २०२३

शनिवार, २० एप्रिल, २०२४

भांडवलशाही

आत्ताच एक बातमी वाचली की, क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या led stumps चा एक सेट २५ ते ३० लाख रुपयांचा असतो. गंमत वाटली. स्वच्छतेच्या संदर्भात तांत्रिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचा वापर कासव गतीने होतो आणि खेळाडू बाद आहे वा नाही हे ठरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास, वापर आणि त्याची किंमत ससा गतीने वाढतात. आपल्या प्राथमिकता आणि प्राधान्यक्रम यातून लक्षात येतात. यालाच म्हणतात भांडवलशाही.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२३

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

वैचारिक गोंधळ

सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहाच्या मुद्यावर सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीच्या वेळी मा. मुख्य न्यायाधीशांनी केलेली एक टिप्पणी मात्र गोंधळात टाकणारी आहे. याबाबतच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे - स्त्री आणि पुरुष या संकल्पना निरपेक्ष नाहीत. तुमची जननेंद्रिये कोणती आहेत त्यावरून ती व्याख्या ठरू शकत नाही. मा. मुख्य न्यायाधीशांनी असे मत मांडले याचा अर्थ त्यांना नक्कीच काही तरी अभिप्रेत असणार. पण सामान्य माणूस म्हणून किंवा अभ्यासक म्हणून किंवा विचारी व्यक्तींना सुद्धा हा प्रश्न पडू शकतो की मग, स्त्री आणि पुरुष हे नेमके ठरवायचे कसे? अगदी जन्म झाल्यानंतर घरच्यांना आनंदाची बातमी सांगणाऱ्या डॉक्टर वा परिचारिका यांच्यापासून, तर स्मशानात मृताचे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या कारकुनापर्यंत सगळ्यांना हा प्रश्न पडू शकेल. भाषातज्ञ तर नक्कीच गोंधळणार. माणूस ही लिंगनिरपेक्ष संकल्पना ठीक आहे, पण स्त्री आणि पुरुष या लिंगनिरपेक्ष संकल्पना कशा असू शकतील? स्त्री आणि पुरुष यांच्यात मग नेमका भेद कोणता? येणाऱ्या काळात ही एक मोठी चर्चा होऊ शकेल.

BTW विवाह म्हणजे काय यावरही खल होणे निश्चित आहे. दोन व्यक्तींनी एकत्र राहणे म्हणजे विवाह का? एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध म्हणजे विवाह का? की विवाह म्हणजे आणखीन काही? सरकारने तर विवाह हा स्त्री आणि पुरुष यांच्यातच होतो असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. पण विवाह म्हणजे नेमके काय? मानवी वाटचाल आणखीन कोणती स्थित्यंतरे दाखवील कोणास ठाऊक.

- श्रीपाद कोठे

१९ एप्रिल २०२३

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

नास्तिकता

काय योगायोग असतात. कालपासून देव, आध्यात्म वगैरे खूप चर्चा सुरू आहेत. सध्या टीव्हीवर 'देऊळबंद' सुरू आहे. त्यात कट्टर नास्तिक शास्त्रज्ञ राघव शास्त्रीला देवभक्त हॅकर प्रश्न विचारतो : काय शास्त्री, तुम्ही इतकी सुंदर फ्रिकवेंसी शोधून काढली पण आठ कॅरेक्टरचा एक पासवर्ड तुम्हाला लक्षात नाही ठेवता आला? अन् यानंतर स्वामी त्या नास्तिक राघवला सांगतात - 'तुझ्यासारखे देऊळ बंद करणारे, देवळं फोडणारे, देवळं लुटणारे अनेक अल्लाउद्दिन खिलजी या देशात आले आणि गेले. देव होते, देव आहेत, देव राहतील.'

योगायोग.

- श्रीपाद कोठे 

१८ एप्रिल २०२३

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

गांभीर्य हवे

आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का? काल महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात जी दुर्दैवी घटना घडली ती दुर्दैवी आणि वाईटच आहे. तुम्ही आध्यात्म मानता की मानत नाही हा भागच वेगळा. अगदी मृत्यूची अपरिहार्यता आणि त्याचा अभावितपणा शंभर टक्के मान्य करूनही, मानवी मर्यादेत त्याचे वाईट वाटणे आणि त्यावर गंभीर मंथन करणे हेच सयुक्तिक ठरते. त्यामुळे कार्यक्रम कसे आयोजित करावेत, कार्यक्रमांना वेळ - आकार - यासह कोणकोणत्या मर्यादा असाव्या, इत्यादी बाबींची गंभीर चर्चा होऊन यानंतर काळजी घेणे कर्तव्य ठरते. ते करायलाच हवे.

मात्र, त्याच वेळी मृत्यूसारख्या संवेदनशील मुद्याचा उपयोग आपल्या मनातील राग, द्वेष बाहेर काढण्यासाठी करणे तेवढेच निंदनीय म्हटले पाहिजे. आपल्याला सारे समजते आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे वागल्यास, विचार केल्यास जगाचे नंदनवन होईल; हा मानवी बुद्धीचा प्रचंड दर्पयुक्त दांभिकपणा; कशा ना कशावर दोषारोपण करण्यासाठी वळवळत असतो. मग कोणत्याही थराला जाऊन विश्लेषण आणि टीकाटिप्पणी होते. टवाळकी सुरू होते. बुद्धीच्या दांभिकतेची ही वळवळ सुद्धा आटोक्यात ठेवली पाहिजे. संवेदनशीलता म्हणजे कावकाव नाही. स्पष्ट भूमिका म्हणजे मूर्खपणा, असंबद्ध वटवट किंवा वाचाळपणा नाही ही जाण म्हणजेच सुजाणपणा म्हणजेच परिपक्वता म्हणजेच जीवनाचं गांभीर्य.

आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का?

- श्रीपाद कोठे 

१७ एप्रिल २०२३

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

गोंधळी समाज

- आपण खरंच गोंधळी समाजच आहोत का?

- समाजाच्या सवयी, चालीरीती overnight बदलत नसतात आणि घट्ट धरून ठेवल्या तरी कायम राहत नसतात; हे समजायला खूपच अवघड आहे का?

- जुने शब्द, प्रचलित शब्द, संकेत, रीती इत्यादी गोष्टीत मान अपमान करणे हा शहाणपणा म्हणावा का?

- बदल समाजाच्या वेगाने आणि समजूतदारपणाने का होऊ नयेत? प्रत्येक गोष्टीत वाद कशाला?

- इंग्रजीतील widow शब्द वगळला आहे का?

- रामायण, महाभारतात, भागवतात - कौसल्या, सुमित्रा, कैकयी, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, द्रौपदी, कुंती, गांधारी, रुक्मिणी - या नावांमागे काहीही लावलेले नाही.

- गार्गी, मैत्रेयी, भारती आदी नावेही कोणत्याही prefix शिवाय आहेत.

- समाजाची प्रवाहितता लक्षात न घेता संस्कृती, धर्म आदी गोष्टींवर तोंडसुख हे कशाचे लक्षण मानावे?

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०२३

भारतीयता वि. आधुनिकता

- सगळी बोटं सारखी नसतात.

- पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पय:, जातौ जातौ नवाचार:, नवावाणी मुखे मुखे (संस्कृत : चुकभूल देणेघेणे)

- तरीही त्यांच्यात भांडणं, वाद, योग्य, अयोग्य, श्रेष्ठ, कनिष्ठ, महान, लहान; असं काही नसतं.

- कोणत्याही गोष्टीला अनेक बाजू असू शकतात.

- फक्त मीच सत्य असे नाही.

ही भारतीयता... हे हिंदुत्व...

@@@@@@@@@@@@

- सगळी बोटं सारखी का नाहीत? उत्तर द्या. बोटं सारखीच असायला हवीत. बोटं सारखी नाहीत यात तुम्हाला काहीच चूक वाटतं नाही म्हणजे तुम्ही निरर्थक आहात.

- सगळी माणसं, त्यांचे विचार, व्यवहार, भाषा... सगळं सगळं साच्यातून काढलेलं हवं. तसं नसेल तर लढाई करावी आणि आपल्यापेक्षा वेगळा असणाऱ्याला संपवून टाकावं. कारण तो चूक आणि अयोग्य असतो.

- कोणत्याही गोष्टीला एकच बाजू असते. एकच बाजू असायला हवी.

- फक्त मीच सत्य. सत्याचे माझेच निकष सत्य.

ही आधुनिकता... हे पुरोगामित्त्व...

@@@@@@@@@@@@

Thank god I am not पुरोगामी and आधुनिक.

- श्रीपाद कोठे 

१३ एप्रिल २०२३

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

कायदा आणि मानवता

मानवतेला कायद्याच्या चौकटीत बसवू नये. कायद्याने मानवीयतेचे अनुगामी व्हावे.

संदर्भ : तामिळनाडू सरकारने ऑनलाईन रमीवर घातलेली बंदी. या बंदीला विरोध करणारे सरसावले आहेत हे दुर्दैव आहे. द्युतापायी महाभारत अनुभवलेल्या भारतात या विषयावर सहमती असू नये हेही दुसरे दुर्दैव. We are welfare state not capitalist state असं काल द्रमुकच्या प्रवक्त्याने ठामपणे आणि स्पष्टपणे सांगितलं. अशी भूमिका घेणारा पक्ष द्रमुक आहे म्हणून भूमिकेला विरोध करण्याचे कारण नाही. भाजप आणि भाजप सरकारे यांनीही अशी ठाम भूमिका घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०२३

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

मतप्रदर्शन

आपलं मत स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मांडता यायला हवं. आडून आडून, फिरवत फिरवत, खूपच सूचक वगैरे पद्धतीने जेव्हा मत मांडलं जातं तेव्हा त्याला हेतू चिकटतातच. आपल्याला आवडो वा न आवडो. दुसरं म्हणजे स्पष्टपणे बोलण्याची, सांगण्याची आपली हिंमत नाही आणि ठाम मत मांडण्याएवढं चिंतन नाही हेही त्यातून आपोआप स्पष्ट होतं. स्पष्ट मत न मांडणारे एक तर राजकारणी असतात (यात बनेल सुद्धा आले) किंवा सुमार.

- श्रीपाद कोठे

१० एप्रिल २०२३

ज्ञानासाठी दान

काल मुख्यमंत्री अयोध्येत गेले होते. कालच मुंबईत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री. अशोक चौगुले यांचा अमृत महोत्सवी सत्कारदेखील झाला. मुख्यमंत्री अयोध्येला गेल्याची बातमी पाहणारे, दाखवणारे आणि चर्चा करणारे खूप मोठ्या संख्येत आहेत. श्री. चौगुले यांच्या सत्काराची बातमी (किंवा तो सोहोळा) पाहणारे, दाखवणारे आणि त्याबद्दल बोलणारे अत्यल्प आहेत. हे प्रमाण उलट होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र वगैरे चर्चा म्हणून बरं राहील. बाकी काही नाही. ते असो...

त्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री. चौगुले यांचा परिचय करून देताना साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी एक महत्त्वाचा आणि लक्षणीय मुद्दा मांडला. प्रास्ताविकात उल्लेख केलेल्या संस्कृत सुभाषिताचा दाखला देऊन ते म्हणाले की, दाता व्यक्ती फारच दुर्मिळ असले तरी श्री. चौगुले त्याला अपवाद आहेत. पुढे त्यांच्या दातृत्वाची विशेषता सांगताना करंबेळकर म्हणाले - सेवेसाठी दान देणारे पुष्कळ असतात पण ज्ञानासाठी, विचारांसाठी दान देणारे नसतात. श्री. चौगुले मात्र ज्ञान आणि विचार यासाठी दान देणारे व्यक्ती आहेत.

श्री. करंबेळकर यांनी मांडलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून समाजाने तो पुढे नेण्याची गरज आहे. सेवेसाठी आज भरपूर मदत मिळते. कधी कधी तर वाटतं की, जरा अधिकच मदत मिळते. एखादी मानवी वा नैसर्गिक आपत्ती आल्यावर जो मदतीचा ओघ असतो त्याचा थोडा नीट अभ्यास केला तर हे लक्षात येईल. CSR च्या माध्यमातून तर सेवेसाठी फार मोठ्या निधीची सोय झालेली आहे. शिवाय दाखवण्यासाठी, अकाऊंट सेट करण्यासाठी किंवा मानवी करूणेतून सेवाकार्यांना पैसा मिळतो, मिळत राहतो. तरीही सेवाकार्यांची आर्थिक स्थिती बरेचदा समाधानकारक नसते. याची दोन कारणे आहेत. १) मिळणाऱ्या पैशाचा विनियोग, त्याचे व्यवस्थापन, पैसा पोहोचण्यातल्या त्रुटी आणि अडचणी. २) सेवाकार्याचे कल्पनाचित्र. विशिष्ट कार्य हे सेवाकार्य म्हणून करायचे आहे की ताजमहाल तयार करायचा आहे किंवा सेवा करणारे आणि त्याचा लाभ घेणारे यांचे जीवनमान पंचतारांकित करावयाचे आहे? या दोन बाबी सोडल्या तर सेवेसाठी पैशाची अजिबात कमतरता नाही.

ज्ञान आणि विचार यासाठी मात्र पैसा ही मोठी अडचण आहे. समाजाने आणि दात्यांनीही यावर गांभीर्याने मंथन करणे गरजेचे आहे. या विषयाला सुरुवात केल्याबद्दल श्री. करंबेळकर यांचे अभिनंदन.

- श्रीपाद कोठे

सोमवार, १० एप्रिल २०२३

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अभ्यास म्हणजे काय?

पत्रकारितेत एक संकेत असतो की, संवेदनशील घटना असेल तर, गरजेपेक्षा अधिक तपशील (उदा. जात, पंथ इत्यादी) द्यायचा नाही. हे आठवण्याचं कारण म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातून गोडसेच्या संबंधात 'पुण्याचा ब्राम्हण' हा उल्लेख वगळण्यावरून सुरू झालेला वाद. यासंबंधात दोन प्रश्न निर्माण होतात - १) तसा उल्लेख असण्याचे प्रयोजन काय होते? २) तसा उल्लेख नसेल तर काय बिघडणार आहे? उत्तरे देण्याची गरज नाही. सामान्य माणसाला सुद्धा हे समजते. एक तर्क दिला जाऊ शकतो की, या विषयाकडे अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे. अन् हा तर्क पुढे आला की एक प्रकारची स्मशानशांतता पसरते किंवा चर्चा भटकवली जाते. वास्तविक या तर्काची छाननी करण्याची गरज आहे. अभ्यास म्हणजे काय? बुद्धीचा न संपणारा चौकसपणा म्हणजे अभ्यास का? गुण, दोष, बुद्धी, कर्तृत्व, कौशल्य, सद्भाव, दुर्भाव, क्षमता इत्यादी गोष्टी कोणत्याही प्रकारच्या समूहाचे लक्षण असतात का? भाषा, प्रांत, जात, धर्म, देश, लिंग अशी गुणदोषांची वर्गवारी करता येते का? अशी वर्गवारी करता येत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असूनही अशी वर्गवारी का केली जाते? कारण अशी वर्गवारी केल्याने संघर्ष करता येतात. भांडणे करता येतात. संघर्ष का करायचा असतो? कारण आम्ही योग्य आणि आम्ही ज्यांना आपले मानत नाही ते अयोग्य अशी धारणा असते. ही धारणा ख्रिश्चन मतातील ईश्वर आणि सैतान या कल्पनातून निघाली आहे. याच कल्पनेचा पगडा मार्क्स, हेगेल, डार्विन यांच्यावर असल्याने त्यात संघर्ष अपरिहार्य आणि आवश्यक मानला गेला. एवढेच नाही तर लोकशाही म्हणून जो काही विशिष्ट व्यवस्थेचा विकास झाला त्यातही संघर्ष मूलभूत मानला आहे. अन् संघर्ष करायचा असेल तर दुसरी बाजू हवी. हा सगळाच मूलभूत झुंडशाहीचा विचार आहे. सगळे विषय आणि अध्ययनपद्धती यात ही मूलभूत त्रुटी आहे. भारताचा विचार हा संघर्षाऐवजी समन्वयाचा आहे. त्याचे कारण आहे भारताचा worldview. हे संपूर्ण विश्व एकाच मूळ शक्तीचा (त्याला चैतन्य शक्ती म्हणा की जड शक्ती म्हणा. ती आहे एकच.) विकास आणि विलास आहे. हा आहे भारताचा worldview. त्यामुळे प्रत्येक कणाची धडपड ही दुसऱ्याशी संघर्ष करून स्वतःला सिद्ध करण्याची नसून, प्रत्येक गोष्ट सामावून घेत पूर्णत्व पावण्याची आहे. या worldview चा विकास आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रात कसा असेल (किंवा भारतीय भूतकाळाच्या संदर्भात कसा होता) याची मांडणी केल्याशिवाय वर्तमान वाद आणि समस्या यातून मार्ग निघणार नाही. हिंदू वा भारतीय विचारप्रवाहापुढील हे आव्हान आहे. हे आव्हान पेलल्याशिवाय तू तू मी मी मधून सुटका नाही. प्रचंड fundamental काम हवं आहे.

(भगवद्गीतेत सुद्धा दैवी आणि आसुरी संपद सांगितले आहे हे पामराला ठाऊक आहे. तरीही ईश्वर आणि सैतान हे योग्य नाही असेच माझे मत आहे. दैवी, आसुरी हा स्वतंत्र विषय आहे. तूर्त एवढेच.)

- श्रीपाद कोठे

शनिवार, ८ एप्रिल २०२३

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

लेखाची चोरी

कालचा माझा स्मृती मंदिरावरील लेख एका आघाडीच्या, स्वनामधान्य दैनिकाने आठ कॉलम बातमी करून छापला आहे. मला न सांगता, न विचारता. त्यावर माझी प्रतिक्रिया -

😀😀😀

माझी तक्रार नाही. अन श्रेय वगैरेसाठी धडपडणाराही मी नाही. समाज माध्यमावर लेख असल्याने परस्पर वापरला त्यासही हरकत नाही. आजकाल हे सर्रास चालतं. असं करणाऱ्याची व्यक्तिगत विकृती वा दोष म्हणून आता सगळे त्याकडे पाहू लागले आहेत. मात्र एका जबाबदार वृत्तपत्राने असे करावे? या वृत्तपत्राकडे किमान कृतज्ञता नसावी याची गंमत वाटते. संपूर्ण लेखही नावासह घेता आला असता. किंवा बातमीत एक बाईट टाकता आला असता. असो. मी जर लेख म्हणून पाठवला असता किंवा त्याबाबत विचारलं असतं तर घेतला नसता किंवा मोठाच आहे वगैरे केलं असतं. (अनुभवावरून म्हणतो आहे.) तरीही असो. अशाच गोष्टींना दरोडा म्हणतात ना? इंग्रजांनी भारतात केलं ते काय वेगळं होतं?🙏

(या पोस्टमुळे काय होईल? फार तर माझ्यावरील बहिष्कार आणखीन वाढेल. Who cares? नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी... जिणे गंगौघाचे पाणी...)

- श्रीपाद कोठे

६ एप्रिल २०२२

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

अवमान

अवमान या मुद्यावर तीन वाद सध्या गाजतायत. एक राहुल गांधी आणि मोदी. दुसरा काँग्रेस आणि सावरकर. तिसरा धीरेंद्र शास्त्री आणि साईबाबा. हे तीन आत्ता या क्षणी चर्चेत असलेले. जुने वा याहून कमी चर्चेत असणारे, छोट्या परिघातले अनेक असतील. व्यक्तिगत जीवनात तर असंख्य असतात. एका वाहिनीवर ताज्या वादांच्या संदर्भात चर्चा सुरू होती. अॅंकरने प्रश्न उपस्थित केला - is defamation a legal issue or political or judicial? अवमान हा नेमका कोणता प्रॉब्लेम आहे? ती चर्चा नेमक्या प्रश्नापर्यंत पोहोचली पण पुढे सरकली नाही. वास्तविक या चर्चेची गरज आहे की, अवमानाचं बीज कुठे असतं? ते माणसाच्या मनात, माणसाच्या कोतेपणात, माणसाच्या द्वेषबुद्धीत, माणसाच्या स्वार्थादी भावनांमध्ये असतं, माणसांच्या अविश्वासात असतं. त्यावर राजकीय वा वैधानिक वा न्यायालयीन तोडगा कसा काढता येईल? तात्पुरता वाद शमवणे, दंड वा शिक्षा करून passive समाधान मिळवणे हे होईल. एखाद्याच्या मनातील अवमान भावना जाहीर व्यक्त होण्याला थोडा आळा कदाचित बसू शकेल. पण त्याच्या मनात ती भावना खदखदत राहीलच. उलट अधिक तीव्र होईल. अन् त्याच्या त्याच्या वर्तुळात तर खाजगीपणे व्यक्तही होत राहील. त्यामुळे अवमान या विषयाचा एकूणच वेगळा, स्वतंत्र, मूलभूत विचार करणे गरजेचे आहे. अर्थात... असो...

भ्रष्टाचार हाही विषय असाच म्हणता येईल.

दंगल कोण करतं?

दंगल कशी टाळायची?

दंगलीवर नियंत्रण कसे मिळवायचे?

जबाबदारी कोणाची?

जबाबदार व्यक्ती, संस्था, प्रशासन यांना शिक्षा काय द्यावी?

या सगळ्याची चर्चा करतो आपण, पण...

दंगल का होते?

यावर का बोलले जात नाही?

- श्रीपाद कोठे

५ एप्रिल २०२३