काल मुख्यमंत्री अयोध्येत गेले होते. कालच मुंबईत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री. अशोक चौगुले यांचा अमृत महोत्सवी सत्कारदेखील झाला. मुख्यमंत्री अयोध्येला गेल्याची बातमी पाहणारे, दाखवणारे आणि चर्चा करणारे खूप मोठ्या संख्येत आहेत. श्री. चौगुले यांच्या सत्काराची बातमी (किंवा तो सोहोळा) पाहणारे, दाखवणारे आणि त्याबद्दल बोलणारे अत्यल्प आहेत. हे प्रमाण उलट होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र वगैरे चर्चा म्हणून बरं राहील. बाकी काही नाही. ते असो...
त्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री. चौगुले यांचा परिचय करून देताना साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी एक महत्त्वाचा आणि लक्षणीय मुद्दा मांडला. प्रास्ताविकात उल्लेख केलेल्या संस्कृत सुभाषिताचा दाखला देऊन ते म्हणाले की, दाता व्यक्ती फारच दुर्मिळ असले तरी श्री. चौगुले त्याला अपवाद आहेत. पुढे त्यांच्या दातृत्वाची विशेषता सांगताना करंबेळकर म्हणाले - सेवेसाठी दान देणारे पुष्कळ असतात पण ज्ञानासाठी, विचारांसाठी दान देणारे नसतात. श्री. चौगुले मात्र ज्ञान आणि विचार यासाठी दान देणारे व्यक्ती आहेत.
श्री. करंबेळकर यांनी मांडलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून समाजाने तो पुढे नेण्याची गरज आहे. सेवेसाठी आज भरपूर मदत मिळते. कधी कधी तर वाटतं की, जरा अधिकच मदत मिळते. एखादी मानवी वा नैसर्गिक आपत्ती आल्यावर जो मदतीचा ओघ असतो त्याचा थोडा नीट अभ्यास केला तर हे लक्षात येईल. CSR च्या माध्यमातून तर सेवेसाठी फार मोठ्या निधीची सोय झालेली आहे. शिवाय दाखवण्यासाठी, अकाऊंट सेट करण्यासाठी किंवा मानवी करूणेतून सेवाकार्यांना पैसा मिळतो, मिळत राहतो. तरीही सेवाकार्यांची आर्थिक स्थिती बरेचदा समाधानकारक नसते. याची दोन कारणे आहेत. १) मिळणाऱ्या पैशाचा विनियोग, त्याचे व्यवस्थापन, पैसा पोहोचण्यातल्या त्रुटी आणि अडचणी. २) सेवाकार्याचे कल्पनाचित्र. विशिष्ट कार्य हे सेवाकार्य म्हणून करायचे आहे की ताजमहाल तयार करायचा आहे किंवा सेवा करणारे आणि त्याचा लाभ घेणारे यांचे जीवनमान पंचतारांकित करावयाचे आहे? या दोन बाबी सोडल्या तर सेवेसाठी पैशाची अजिबात कमतरता नाही.
ज्ञान आणि विचार यासाठी मात्र पैसा ही मोठी अडचण आहे. समाजाने आणि दात्यांनीही यावर गांभीर्याने मंथन करणे गरजेचे आहे. या विषयाला सुरुवात केल्याबद्दल श्री. करंबेळकर यांचे अभिनंदन.
- श्रीपाद कोठे
सोमवार, १० एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा