गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

समतेचे गुऱ्हाळ

'समता' हे तत्व स्वीकारल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं आहे. आज मोठ्या प्रमाणावर दिसून येणारी असहिष्णुता हा त्याचाच परिणाम आहे. कारण त्यामुळे चांगलं- वाईट, योग्य- अयोग्य, चूक- बरोबर यांचं विश्लेषण थांबलं, त्यामुळे काय स्वीकारायचं अन काय नाकारायचं याचा विवेक आपण गमवायला लागलो. परखड, स्पष्ट, तर्कपुर्ण विश्लेषण करणे; आणि ते समजून घेणे ही प्रक्रियाच बंद पडली. तशी तर रोजच नवीन उदाहरणे देता येतील अशी स्थिती आहे. ताजे उदाहरण म्हणजे- दिल्लीतील औरंगझेब रस्त्याला डॉ. कलाम यांचे नाव देण्याच्या निर्णयावरून होणारी चर्चा. सगळ्यांनाच समानता बहाल केल्याने राजे, धर्म, व्यवस्था, तत्वज्ञान, कल्पना, वैविध्य या सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे सुरु झाले. गुजराथेत नुकतेच झालेले आरक्षण आंदोलन हाही या समतेच्या बेगडीपणाचा परिणाम. यामुळे मागासलेले असो की पुढारलेले, शिक्षित असो की अशिक्षित, लहान असो की मोठे, अनुभवी असो की अननुभवी, श्रीमंत असो की गरीब, सगळ्यांना एकच फुटपट्टी लावणे, सगळ्यांकडून सारखीच अपेक्षा बाळगणे असे प्रकार होतात. नुसते घोषणा देणे, प्रवाह चुकीचा आहे की बरोबर हे न तपासून पाहता मोठ्या आवाजात आपलाही आवाज मिसळणे; या गोष्टींवर मुळातून विचार व्हायला हवा. समतेच्या तत्वालाही ही बाब लागू होते.

- श्रीपाद कोठे

१ सप्टेंबर २०१५

मनुवादी??

जातपात, ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद, आरक्षण हे विषय सतत चर्चेत असतात. त्यालाच जोडून मनुस्मृती असते. त्यातूनच `मनुवादी' असा शब्द आला. एक विचार आला- जगातील कोणताही हुकुमशाह धड एखादं तपसुद्धा टिकला नाही. मग मनुस्मृती कशी टिकली असावी? सम्राट अशोक, बौद्ध मताचा विस्तार, शीख पंथ, वारकरी संप्रदाय, शिवाजींची प्रशासन पद्धती इत्यादी किती मोठा अन किती विविधांगी काळ आहे भारताच्या इतिहासात. इंग्रजांची १५० वर्षे अन स्वातंत्र्याची ६८ वर्षे या उण्यापुऱ्या सव्वादोनशे वर्षांचा तर प्रश्नच नाही. त्या काळात मनुस्मृतीची मातब्बरी काय होती? काय असेल? मनुस्मृती लागू करावी वगैरे मला मुळीच म्हणायचे नाही. पण आम्ही किती भुसभुशीत विचार करतो असे वाटले. थोडी वैचारिक घुसळण केली तर अभिनिवेश थोडे कमी होतील का? मला तसे वाटते.

- श्रीपाद कोठे

१ सप्टेंबर २०१५

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

दर्जा आणि प्रमाणीकरण

डॉक्टरांनी generic औषधेच लिहून द्यावीत हा आदेश national medical commission ने मागे घेतला. यामागे औषध कंपन्यांची लॉबी नसेल का? या आदेशात केवळ जेनरिक औषधे लिहावी एवढेच नव्हते तर डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या कॉन्फरन्स आदींना जाऊ नये असेही आदेश होते. वैद्यकीय व्यवसायातील सध्याची व्यापारी वृत्ती लोकांना दिवसेंदिवस त्रासदायक होत असताना हा आदेश मागे घ्यावा लागणे हे दुर्दैवी आहे.

हा आदेश मागे घ्यावा यासाठी Indian Medical association आणि औषध निर्माण कंपन्या यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या चर्चेत औषधांचा दर्जा हा मुद्दा मांडण्यात आला आणि आदेश मागे घेण्यात आला. मी या विषयातला तज्ञ नाही. अभ्यासक देखील नाही. परंतु नेहमीच सतावणारा एक सामान्य प्रश्न याही निमित्ताने मनात आला की, दर्जा (quality), प्रमाणीकरण (standardization) या गोष्टी आपापली पोतडी भरण्यासाठी वापरल्या जातात का? हे केवळ औषधी या विषयापुरतेच नाही. अन्न, औषधी, शिक्षण, विभिन्न उद्योग, वस्तू, सेवा अशा अनेक बाबतीत दर्जा आणि प्रमाणीकरण हे लोकांना लुबाडण्याचे साधन झालेले नाही का? कालच बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी देशभरातून जी प्रचंड गर्दी उसळली आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाची जी चर्चा सुरू आहे; त्यालाही हा मुद्दा लागू होतो.

शिवाय प्रमाण वा दर्जा नेमका ठरवायचा कसा आणि कोणी? आणि हा दर्जा निश्चित केल्यावर सुद्धा अपेक्षित परिणामांची शंभर टक्के खात्री देता येईल का? अत्यंत चोख दर्जेदार औषधे घेतल्यावर माणूस मरण पावणार नाही किंवा नेमके डोज घेतल्यावर perfectly fit होईल याची खात्री देता येईल का? खाद्य पदार्थात मीठ, साखर, तिखट इत्यादी गोष्टी एकदम दर्जेदार आणि प्रमाणात असतील तर त्याची चव उत्कृष्टच राहील आणि सगळ्यांना आवडेल; तसेच त्याने काडीचाही अपाय होणार नाही याची खात्री देता येईल का? शिक्षक सगळ्या मापदंडावर तंतोतंत बसत असेल तर विद्यार्थी अगदी बृहस्पतिचा अवतार होतील असे सांगता येईल का? अचूक कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी याने समाजातील दुष्ट वृत्ती नाहीशा होतील अशी खात्री देता येईल का?

मूळ प्रश्न हा की, दर्जेदार (म्हणजे काय ते सोडून देऊ) input आणि तेवढाच दर्जेदार output यांचा संबंध किती आणि कसा असतो? याचा अर्थ दर्जा, प्रमाण नकोत असे नाही. परंतु त्याचाही विचार तारतम्याने करावा लागतो. Over stretching ही चांगली गोष्ट तर नाहीच पण तिचा वापर स्वार्थ, अनैतिकता, शोषण यासाठी केला जातो. परिणाम हा केवळ input वर अवलंबून नसतो. क्रिया सिद्धी: सत्वे भवती महतां नोपकरणे. एखाद्या क्रियेची सिद्धी उपकरणांवर नाही तर सत्वावर अवलंबून असते.

टीप : औषधांच्या पाकिटावर त्याचा net उत्पादन खर्च लिहिणे बंधनकारक करून नफा किती घ्यावा याला कायदेशीर बंधन घालावे. परिषदा आणि अभ्यास इत्यादींना उत्पादन खर्च आणि फायदा यात जागा देऊ नये. फक्त एवढं केलं तरी सगळा तमाशा बंद होईल.

- श्रीपाद कोठे

२६ ऑगस्ट २०२३

बेकायदा इमारती

दिल्लीजवळच्या नोएडा येथील दोन टोलेजंग इमारती उद्या पाडण्यात येणार आहेत. त्याही केवळ नऊ सेकंदात. आधुनिक तंत्रज्ञानाने हे शक्य होईल. वाहिन्यांवर सकाळी सहा-सात वाजेपासून त्याचे live प्रसारण देखील होणार आहे. आपण किती फसवं, ताळमेळ नसलेलं जीवन जगतो आहोत; त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. टोलेजंग इमारती नऊ सेकंदात पाडण्याचं कसलं कौतुक करायचं? एवढ्या मोठ्या इमारती उभ्या होईपर्यंत त्यातील नियमांचे उल्लंघन, भ्रष्टाचार होऊ द्यायचा. मग भ्रष्टाचाराविरुद्ध कळकळ असल्याने त्या इमारती पाडून टाकायच्या. काय पोरखेळ आहे? या सगळ्या सव्यापसव्यात वाया जाणाऱ्या वेळ, ऊर्जा, पैसा, मनुष्यतास, मनुष्यबळ, सामुग्री यांना काहीच किंमत वा अर्थ नाही का? शिवाय इमारती पाडताना पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी वाया जाणार त्याचे काय? काहीही गुन्हा नसताना आजूबाजूच्यांनी का suffer व्हायचं? पर्यावरणाचं काय? बरं तर बरं - झालेल्या भ्रष्टाचाराचे सगळेच्या सगळे पैसे वसूल होणार का? इमारती बांधून होईपर्यंतच्या काळात ज्यांनी ज्यांनी बक्कळ पैसा कमावला आणि त्याचा उपभोग घेतला, त्याची वसुली कशी होईल? म्हणजेच शून्य निर्मिती करूनही जे कोणी फायद्यात राहतील त्यांचे काय वाकडे करून घेणार? ज्यांनी तिथे पैसे गुंतवले असतील त्यांना परत मिळणार का? सगळाच सावळागोंधळ.

यासाठी कारणीभूत आहे आजची कार्यपद्धती. विचार करून काम करणे याऐवजी काही तरी करून दाखवण्याच्या नादात काहीबाही करत राहायचे अन मग आरडाओरडा करून जबाबदाऱ्या अन न्यायाची नाटके करायची. खरं तर ही कार्यपद्धती तरी का विकसित झाली याचा विचार करायला हवा. माणसाची हाव हे त्याचे एकमेव उत्तर आहे. कसलेही नियंत्रण आणि मर्यादा माणसाला आज मान्यच नाही. आपल्या परंपरेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची चर्चा आहे. अर्थ आणि काम धर्माने नियंत्रित असावे असे सांगणे आहे. दुर्दैवाने धर्म, परंपरा मान्य असणारेही ही पुरुषार्थ कल्पना किमान व्यवहारात तरी धुडकावून लावतात. अर्थ आणि काम अनिर्बंध असायला हवे असे मत काही जण खुलेआम मांडतात तर बहुसंख्य लोकांना मनाच्या आतल्या कप्प्यात तसे वाटते. अत्यंत ढोंगी आणि दुटप्पी जीवनाच्या कालखंडात आपण आहोत. विकासाच्याच नाही तर मानवी प्रयत्न आणि मानवी बुद्धिमत्तेच्या धुंदीत योग्य, अयोग्य, सारासार आणि सम्यक विचार करण्याची शक्तीही आम्ही गमावून बसतो आहोत.

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०२२

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

अर्थकारण आणि प्रतिष्ठा

भाववाढ, महागाई, चलनवाढ इत्यादी बाबी कशाने होतात या प्रश्नाला, मागणी-पुरवठ्याचे तत्व, दुष्काळ, अतिवृष्टी, साठेबाजी अशी काही उत्तरे मिळू शकतात. पण या बाबी केवळ तेवढ्यावरच अवलंबून नसतात. पैशाची प्रतिष्ठेशी घालण्यात आलेली सांगड हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्यावर कधीही, कुठेही बोलले, लिहिले जात नाही. थोडी नजर इकडेतिकडे फिरवली तरीही ही गोष्ट स्पष्ट होते. रेल्वे स्थानक आणि विमानतळ येथील वाहनतळाच्या दरात मोठी तफावत असते. रस्त्याच्या कडेचा चहा, साध्या हॉटेलातील चहा अन पंचतारांकित हॉटेलातील चहा (तेथील maintainance लक्षात घेऊनही) यांच्या भावातही मोठी तफावत असते. हीच बाब खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, अन्य सामान, गाड्या अशा बहुतेक सगळ्या गोष्टींना लागू होते. वाहनतळाच्या दरातील तफावतीला जसे काहीही कारण नाही, तसेच ५-१० लाखाची गाडी आणि काही कोटींची गाडी यातील किमतीच्या फरकाला काही कारण नाही. एखादा चांगल्या कापडाचा आपल्या शिंप्याकडून शिवलेला शर्ट आणि पीटर इंग्लंडचा शर्ट याच्या किमतीत मोठा फरक का असावा? या सगळ्याचे कारण एकच- प्रतिष्ठा. मिळणारा पगार किंवा पगारवाढ यांचे तरी कारण काय असते? मिळणारा पगार न पुरणे की प्रतिष्ठा? याचे उत्तर प्रतिष्ठा हेच आहे. नाही तर आमदारांची नुकतीच झालेली पगारवाढ का झाली असती? मोठमोठ्या कंपन्यांच्या संचालकांचे, अधिकाऱ्यांचे कोटीत जाणारे पगार वा भत्ते जगण्यासाठी असतात की प्रतिष्ठेसाठी? यातूनच एक साखळी तयार होते. ही साखळी जपण्याचे प्रयत्न सतत केले जातात, करावे लागतात. एक तर खालच्यांची प्रतिष्ठा वाढू न देणे किंवा ती वाढली तर वरच्यांची आणखीन वाढवणे, असे चक्र सुरु राहते. याच्या मध्ये अनेक पायऱ्या गरजेपोटी तयार होतात. शिवाय आजचे status उद्या खाली यायला नको. म्हणजेच चल, अचल संपत्ती, गाड्या, घरे इत्यादी वाढतच राहिले पाहिजे. कमी होता कामा नये. या साऱ्याचा जगण्याशी संबंध नसतो. संबंध असतो प्रतिष्ठेशी. या दुष्टचक्रातूनच आर्थिक विषमता, शोषण, भ्रष्टाचार जन्माला येतात, वाढतात, फोफावतात. जागतिक स्तरावर देखील हेच चालते. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या गोष्टीदेखील याच साखळीचा भाग होत्या. याला अंत नाही आणि अनेक आर्थिक प्रश्नांनाही अंत नाही. कारण आर्थिक प्रश्न केवळ अर्थशास्त्राने सुटत नाहीत. तसे करणे अप्रगल्भता आहे. सेवेची अनेक कामे, गरिबांसाठीच्या योजना, रोटरी वा लॉयन्सच्या असंख्य शाखा आदींनी हे प्रश्न सुटत नाहीत. अर्थकारण हे अर्थशास्त्रासोबतच समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, विचार, भावना इत्यादी गोष्टींनी घडत वा बिघडत असते. त्यामुळेच पैसा आणि प्रतिष्ठा यांचा संबंध तोडणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय चिंतन, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदींनी यावर मुलभूत चिंतन मांडलेले आहे. यातूनच भारताची ऋषी कल्पनाही विकसित झालेली आहे. ही गोष्ट मुळातून नीट समजून घेतल्याशिवाय हिंदू संस्कृती/ भारतीय संस्कृती इत्यादी कळू शकत नाही. हिंदू वा भारतीय ही फक्त लेबले नाहीत.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०१६

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

रूप मृत्यूचे

१९८४ साली आलेल्या हिमवादळात सियाचीन येथे १९ जवान बर्फाखाली दबले होते. त्यातील १४ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले होते. अन्य पाच जवान मात्र सापडले नव्हते. त्यातील एक चंद्रशेखर हरबोला यांचे अवशेष मात्र नुकतेच सापडले आणि ते त्यांच्या हलदानी या गावी पाठवून काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ३८ वर्षांपूर्वी त्यांचे शव सापडले नव्हते तेव्हा नियमाप्रमाणे लष्कराने त्यांच्या घरी सूचना दिली आणि त्यावेळी तेथील प्रथेप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी २७ वर्षांची, एक मुलगी आठ वर्षांची आणि दुसरी मुलगी चार वर्षांची होती. आज पत्नी ६५ वर्षांची, मुली ४६ आणि ४२ वर्षांच्या आहेत.

मृत्यूची किती विविध रूपे असतात नाही? कोणत्याही व्यक्तीचे मरण दु:खदायकच असते. अकाली मृत्यू त्याहून दु:खद. मृत्यूनंतर मृतदेह हाती सुद्धा न लागणे आणखीन वेदनादायी. हे सगळे आपल्याला कमीअधिक माहिती असते. पण ही सगळी दु:ख काळप्रवाहात मागे पडल्यावर पुन्हा एकदा समोर उभी ठाकणे कसे असेल? त्यातही संपूर्ण अभंग देह समोर न येता अवशेष समोर येणे. त्यावर पुन्हा अंत्यसंस्कार. या सगळ्यालाच मन कसा प्रतिसाद देत असेल? उमाळे आणि उसासे कसे असतील? दु:खाचे कढ न येणे हे असभ्य आणि अस्वाभाविक, पण कढ येणे हेही अस्वाभाविक. दु:खाचीही अशी कुचंबणा. ओल्या आणि सुकलेल्या जखमेप्रमाणे, ओले आणि सुकलेले दु:ख. ना औपचारिकता ना अनौपचारिकता. चेहरा मागे पडलेला. आठवणी पुसून गेलेल्या. अन तरीही भूतकाळ समोर उभा राहतो अन म्हणतो 'दाखवा ओळख.' हे मृत्यो - किती तुझे रंग? किती तुझी रूपे?

- श्रीपाद कोठे

१६ ऑगस्ट २०२२

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

स्वातंत्र्याचा मुशायरा

न्यूज-२४ वाहिनीवर आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक उर्दू मुशायरा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान असा हा मुशायरा होता. म्हणजे न्यूज-२४ च्या दिल्लीतील स्टुडीओत काही शायर (महिला, पुरुष) आले होते आणि लाहोरच्या स्टुडीओत पाकिस्तानचे शायर (महिला, पुरुष) आले होते. न्यूज-२४ च्या स्टुडीओतील संचालन एक पुरुष करीत होता आणि लाहोर स्टुडीओतील संचालन एक महिला करीत होती. एक कलाम दिल्लीतून आणि एक कलाम लाहोरहून सादर केला जात होता. भारत आणि पाकिस्तानातील दोन टीव्ही वाहिन्यांनी असा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेणे सुखद म्हटले पाहिजे. लाहोर स्टुडीओतील महिला बुरख्यात नव्हत्या. एकीकडे सीमेवर घुसखोरी, दहशतवादी कारवाया, शरीफ यांची सतत उलथून टाकण्यासाठी पाकिस्तानात त्याच्या स्वातंत्र्य दिनी निघालेले दोन मार्च, हे चित्र; तर दुसरीकडे संयुक्त मुशायरा.

गंमत म्हणजे, लाहोर स्टुडीओतील प्रत्येकाने भारताचा उल्लेख `हिंदुस्तान' असाच केला. प्रत्येक वेळी. `हिंदुस्तान' की आवाम, `हिंदुस्तान' की कलाम, `हिंदुस्तान' की शायरी, `हिंदुस्तान' के फनकार वगैरे. पाकिस्तान टीव्हीच्या बातम्यांची आठवण यावी असे. त्यातही असतेच ना- `हिंदुस्तान' के वजीरे आझम, `हिंदुस्तानी मुल्क' वगैरे. मनात आले, आपल्याला `हिंदुस्तान' चालत नाही, पण जगाच्या मनात, जाणीवेत; एवढेच नाही तर आपल्या कट्टर शत्रूच्या मनात आणि जाणीवेतही आपण `हिंदुस्तान'च आहोत. त्यांच्या मनात मुळीच संभ्रम नाही.

एक गोष्ट मात्र नोंद घ्यावी अशीच- दिल्ली स्टुडीओतील संचालनकर्त्याने लाहोरमधील शायरांना धन्यवाद देतानाच स्वातंत्र्यदिनाची `मुबारक बात' दिली; मात्र लाहोर स्टुडीओतील संचालन करणाऱ्या महिलेने दिल्लीतील शायरांना फक्त धन्यवाद दिले, स्वातंत्र्याची `मुबारक बात' नाही दिली.

- श्रीपाद कोठे

१५ ऑगस्ट २०१४

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने...

श्रीमती मृणालिनी बोस यांना २३ डिसेंबर १९०० रोजी देवघर येथून लिहिलेल्या दीर्घ पत्रात स्वामीजींनी व्यक्ती व समाजाच्या संबंधांवर सखोल विचार मांडले आहेत. स्वामीजी म्हणतात- `व्यक्तीला व्यक्तिगत स्वाधीनता म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य आहे किंवा नाही; असेल तर ते किती प्रमाणात असणे उचित; व्यष्टीने समष्टीसाठी स्वत:च्या इच्छाशक्तीचा, स्वत:च्या सुखाचा अगदी संपूर्णपणे त्याग करावा किंवा नाही; हे प्रश्न प्रत्येक समाजापुढे अगदी अनादि काळापासून उभे आहेत. सर्वच समाज या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. आधुनिक पाश्चिमात्य समाजात हेच प्रश्न प्रचंड लाटांसारखे उसळून धुमाकूळ घालत आहेत. जे मत, व्यक्तिगत स्वाधीनतेचा वा व्यक्तीस्वातंत्र्याचा समाजाच्या सत्तेपुढे बळी देऊ इच्छिते त्या मताचे इंग्रजी नाव आहे `सोशॅलिझम' आणि व्यक्तित्वाची तरफदारी नि समर्थन करणाऱ्या मताला म्हणतात `इंडिव्हिज्युअॅलिझम'. पुढे स्वामीजी म्हणतात- `नियम आणि शिस्त यांच्या जोरावर व्यक्तीला समाजाचे गुलाम बनविण्याचे व तिला जबरदस्तीने आत्मसमर्पण करावयास भाग पाडण्याचे काय फळ आणि काय परिणाम होत असतात याचे आपली मातृभूमी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या आपल्या देशात माणसे शास्त्रोक्त विधीनुसार जन्मतात, खाणेपिणे वगैरे गोष्टीही जन्मभर शास्त्रीय नियमांनुसारच करतात, विवाह वगैरे तद्वतच शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करतात. फार काय पण प्राणदेखील शास्त्रातल्या साऱ्या विधींच्या अनुसारच सोडतात. या कठोर शिस्तीमध्ये फक्त एकच मोठा गुण आहे, बाकी सारे दोषच दोष आहेत. गुण हाच की, एखाददुसरे काम पिढ्यानपिढ्या रोज करीत गेल्याने अंगवळणी पडून लोक ते अगदी थोड्या श्रमात अतिशय चांगल्या रीतीने करू शकतात. चिखलाचे तीन पेंड आणि चारदोन लाकडे यांच्या मदतीने या देशातला आचारी जी चवदार भात भाजी बनवतो तशी आणखी कुठेही बनावयाची नाही. कुठल्या की जुन्या जमान्यातला एक रुपया किमतीचा माग अन पाय ठेवायला एक खळगा एवढ्या सामग्रीवर वीस रुपये वाराचा किनखाप फक्त या देशातच होणे संभवनीय आहे. एक फाटकी चटई, एक मातीची पणती अन तिच्यात एरंडीचे तेल - एवढ्या साहित्यावर दिग्गज पंडित या देशातच होतात. वेड्याबिद्र्या बायकोवर सर्वसहिष्णू प्रीती आणि फक्त कुंकवाला आधार अशा कुचकामाच्या, बदमाश नवरोजीवर आमरण भक्ती फक्त या देशातच शक्य आहे. हे झाले गुणाविषयी.'

`परंतु या साऱ्या गोष्टी माणसे अगदी निष्प्राण यंत्रांप्रमाणे करीत असतात. त्या साऱ्यात मनाचे स्फुरण नसते. हृदयाचा आविष्कार नसतो. प्राणाचे स्पंदन नसते. आशेचा आवेग नसतो. इच्छाशक्तीचा प्रबल आवेश नसतो. सुखाची उत्कट अनुभूती नसते. दु:खाचाही दाहक स्पर्श नसतो. कल्पक बुद्धीची लखलख नसते. नवलाईची आस नसते. नवीन गोष्टींची कदर नसते. असल्या मनावरचे मळभ कधीच विखरत नाही. उगवत्या सूर्याचे उज्वल दृश्य असल्या चित्ताला कधीच मोहवीत नाही. या अवस्थेपेक्षा काही चांगले असेल काय असे या असल्या मनात कधीही यावयाचे नाही. आले तरी त्याचा त्यावर विश्वास बसावयाचा नाही. विश्वास बसला तरी त्याच्याकडून उद्योग व्हावयाचा नाही आणि उद्योग झाला तरी उत्साहाच्या अभावी तो तसाच जिरून जाईल.'

या पत्रात पुढे ते म्हणतात- `तर मग काय आत्मत्याग हा धर्म नाही? आत्मसमर्पण हा गुण नाही? अनेकांप्रीत्यर्थ एकाच्या सुखाचा, एकाच्या कल्याणाचा होम करणे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म नव्हे? अगदी बरोबर. पण आपल्याकडे म्हणतात ना की, घासल्यापुसल्यानं का रूप येतं? मारूनमुटकून का प्रेम उद्भवतं? जो कायमचाच भिकारी आहे तो त्याग तरी कसला करणार अन त्याच्या त्यागाचे गोडवे तरी कसले गायचे? ज्याची इंद्रिये कुचकामाची आहेत, त्याच्या इंद्रियसंयमात काय पुण्य? भावभावना नाहीत, हृदय नाही, महत्वाकांक्षा नाही, समाज कशाशी खातात हेही माहीत नाही अशा इसमाचा कसला आला आहे परत समाजाप्रीत्यर्थ आत्मत्याग अन आत्मसमर्पण? जुलुमाने सती जाणे भाग पाडण्यात कसला आला आहे पातिव्रत्याचा आविष्कार? खुळचट समजुती अन अंधविश्वास लोकांच्या डोक्यात कोंबून त्यांना पुण्य करावयास लावण्यात काय स्वारस्य? माझे म्हणणे आहे की बंधने मोकळी करा. लोकांची बंधने मोकळी करा. जितकी शक्य आहेत तितकी बंधने मोकळी करा. समाजासाठी जेव्हा स्वत:ची समस्त सुखेच्छा बळी देऊ शकाल तेव्हा तर तुम्ही बुद्ध होऊन जाल. तुम्ही मुक्त होऊन जाल. पण ती फार दूरची गोष्ट आहे. मात्र ते सारे जुलूम जबरदस्तीने साधता येणे शक्य आहे असे का तुम्हाला वाटते? जो वीर आहे तोच आत्मत्याग करू शकतो. तोच आत्मसमर्पण करू शकतो. जो भ्याड असतो तो चाबकाच्या भयाने एका हाताने डोळे पुसतो नि दुसऱ्या हाताने दान देतो. काय उपयोग त्याच्या त्या दानाचा?'

शिकागो येथून २४ जानेवारी १८९४ रोजी आपल्या मद्रासी भक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात- `जातीभेद राहील अथवा नष्ट होईल या प्रश्नाशी मला काहीच कर्तव्य नाही. भारतात किंवा भारताबाहेर मानवजातीने ज्या उदात्त विचारांना जन्म दिला त्या साऱ्यांचा प्रचार अगदी खालच्या वर्गापर्यंत, अगदी गरीब लोकांपर्यंत करणे हेच माझे उद्दिष्ट होय. मग त्यांना जे काय करावयाचे असेल त्याचा विचार तेच करतील. जातीभेद राहावा की नष्ट व्हावा, स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे की नसावे याविषयी डोके शिणविण्याचे मला काहीच कारण नाही. जीवन, विकास व सुखशांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट होय आणि ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर मानव म्हणा, मानववंश म्हणा, की राष्ट्र म्हणा, त्यांचे पतन अटळ होय. जातीभेद राहो की न राहो, एखादी विशिष्ट मतप्रणाली प्रचलित असो की नसो, ; जी व्यक्ती, जो वर्ग, जी जात, जे राष्ट्र वा जी संस्था मनुष्याच्या स्वतंत्र आचारविचार शक्तीला वाव देत नाही ती अन्यायी आहे असे समजावे व तिचे अध:पतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात या स्वतंत्रतेमुळे दुसऱ्याचे अनिष्ट होता कामा नये हे ध्यानात ठेवले पाहिजे.'

मेरी हेल यांना १ नोव्हेंबर १८९६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी खूप मुलभूत आणि आधारभूत असा विचार मांडला आहे. हिंदू जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी आणि आज माणसाच्या जगण्यापुढे उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याची शक्ती त्या विचारात आहे. स्वामीजी म्हणतात- `सुवर्णाचे सुवर्णत्व, रजताचे रजतत्व, मनुष्याचे मनुष्यत्व, स्त्रीचे स्त्रीत्व, प्रत्येक वस्तूचे यथार्थ स्वरूप ब्रम्हच होय. या ब्रम्हाची अनुभूती बाह्य जगतात करून घेण्याचा प्रयत्न आपण अनादि काळापासून करीत आहोत. या प्रयत्नात आपले मन पुरुष, स्त्री, बालक, शरीर, मन, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, जगत, प्रेम, द्वेष, मालमत्ता, संपत्ती इत्यादी, तसेच भुते, सैतान, देवदूत, देवदेवता, ईश्वर इत्यादी अद्भुत गोष्टी निर्माण करीत आहे. सत्य असे आहे की, ब्रम्ह आपल्या आतच आहे. आपणच ब्रम्ह आहोत. तो शाश्वत द्रष्टा, तो यथार्थ `अहं' आपणच आहोत. तो कधीही विषय होऊ शकत नाही. त्याला विषयीभूत करण्याचा सगळा प्रयत्न म्हणजे काळ आणि बुद्धी यांचा अपव्यय होय. जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते तेव्हा तो ब्रम्हाला `विषयीभूत' करण्याचा (समजून घेण्याचा) नाद सोडून देतो आणि अंतर्जगताकडे वळून अंतरात्म्यात अधिष्ठित होण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. यात क्रमश: शरीराकडे कमी लक्ष दिले जाते व मनाकडे जास्त लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील `मनस'पासून बनला आहे. मनस म्हणजे विचार. मनुष्य म्हणजे मननशील म्हणजेच विचार करणारा प्राणी होय. केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारा प्राणी नव्हे. यालाच धर्माच्या शास्त्रात त्याग असे म्हणतात. समाजरचना, विवाहसंस्था, अपत्यप्रेम, सत्कृत्ये, सदाचरण, नीतिशास्त्र ही सर्व त्यागाची विविध रूपे होत. आपले सर्व प्रकारचे सामाजिक जीवन म्हणजे इच्छाशक्ती, तृष्णा व वासना यांचा संयम होय. या जगात जेवढे समाज किंवा सामाजिक संस्था आहेत त्या सर्व म्हणजे या जगातील एकाच गोष्टीची निरनिराळी रूपे वा स्तर होत. ती गोष्ट म्हणजे, इच्छाशक्तीचा वा भासमान `अहं'चा त्याग होय. स्वत:तून जणूकाही बाहेर उडी मारण्याची जी इच्छा आहे तिचा त्याग. जो नित्यज्ञाता आहे त्याला ज्ञेय बनविण्याचा जो प्रयत्न चालू असतो त्याचा त्याग. सर्व सामाजिक संस्था म्हणजे याच त्यागाची विभिन्न रूपे होत. या आत्मत्यागाचा, अर्थात इच्छाशक्तीच्या निरोधाचा सर्वात सोपा अथवा सरळ असा मार्ग म्हणजे प्रेम होय; द्वेष हा अगदी त्याविरुद्ध मार्ग होय.'

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०२२

अखंड भारत : काही मुद्दे

समाज माध्यमांवर अखंड भारताच्या संदर्भात अनेक पोस्ट आज पाहायला मिळाल्या. माझ्याही तीन पोस्ट आहेत. (तिन्ही वेगवेगळ्या आहेत.) त्यातल्या काही पोस्ट, काही प्रतिक्रिया वाचल्या. काही चाळल्या, काही भाषणेही पाहिली/ ऐकली. काही गोष्टी जाणवल्या.

- एक म्हणजे, अखंड भारत म्हणून भारताच्या विभाजनाची चर्चाच केली जाते. अखंड भारत आणि भारताचे विभाजन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे.

- दुसरी लक्षात घेण्याची बाब म्हणजे, अखंड भारत म्हणजे फक्त दोन राज्यांचे एकीकरण नाही. ते मनांचे, भावनांचे अखंड होणे आहे. दोन राज्यांचे एकीकरण हा अखंड भारताचा परिणाम असेल.

- तिसरी बाब म्हणजे, अखंड भारत साकारला नाही तर, भारत अखंड राहणार नाही. त्यामुळे अखंड भारत ही optional गोष्ट नाही.

- वैश्विक मानवी सहअस्तित्वाची ती सुरुवात असेल. अखंड भारताएवढं सार्थ उदाहरण त्यासाठी कोणतंही नसेल. अखंड भारत नाकारणं हे वैश्विक सहअस्तित्व नाकारणं असेल. 

- अखंड भारत साकार होईल का? कसा होईल?टिकेल का? पेलवेल का? या प्रश्नांची उत्तरे आहेतच. ती परिपूर्ण असतीलच असेही नाही. परंतु कोणत्याही समस्येचे असेच असते. त्यावर एकच उत्तर असू शकते - we will cross the bridge when we reach it. त्यामुळेच का? कसे? या प्रश्नांपेक्षाही महत्वाची बाब आहे ती म्हणजे, अखंड भारत ही आवश्यक गोष्ट आहे. अन महत्वाचा प्रश्न आहे त्यामागील हेतू काय? स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू असेल, अन त्याची आवश्यकता ठसली असेल तर अखंड भारत साकार होण्यात अडचण असणारच नाही.

- अखंड भारताचा एक भाग असणारे पाकिस्तान पेलवेल का, हा प्रश्न ३७० रद्द केल्यानंतर पडायलाच नको. अखंड भारत झाल्याबरोबर इकडचे तिकडे अन तिकडचे इकडे येतील जातील असे नाही. सगळे काही सर्वसामान्य होईपर्यंत काही बंधने घालता येतातच. काश्मीर हे ताजे उदाहरण आहे. शिवाय दहशतवाद हा युद्धाचा प्रश्न न उरता, नक्षलवादासारखा एक प्रश्न राहील.

बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातल्या काही विचारार्थ.

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०२२

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

राजकीय वातावरण

विदर्भ साहित्य संघात काल सरसंघचालकांचे भाषण झाले. भाषणात त्यांनी केलेला एक उल्लेख फार छान आहे. ते नागपुरात प्रचारक म्हणून आले तेव्हा प्रांत प्रचारक म्हणून त्यांना एक व्हेस्पा स्कुटर मिळाली होती. जुनी भरपूर वापरलेली होती. संघाकडे अशा दोन व्हेस्पा स्कुटर होत्या. अर्थात विकत घेतलेल्या. पण त्यावेळी गाड्या आजच्यासारख्या मिळत नसत. नंबर लावून ठेवावा लागे. कोटा राहत असे. कोटा अलॉट होईल, नंबर लागेल तेव्हा स्कुटर मिळणार. तर तशा घेतलेल्या या दोन व्हेस्पा काँग्रेस नेत्याच्या कोट्यातून घेतलेल्या होत्या. संघ सोडून बाकीच्यांना आज हे अविश्वसनीय वाटेल. पण असेच होते. ती मानसिकता, ते सहकार्य, ते वातावरण पुन्हा येवो.

- श्रीपाद कोठे

१० ऑगस्ट २०२२

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

देव आणि भक्त

Victim या तमिळ चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. तथागत बुद्धाच्या मूर्तीवर एका शेतकऱ्याची मुलगी चढते. तो मुलीला तसे करू नये म्हणून सांगतो, तेव्हा ती प्रश्न करते - बुद्धाने तर देव नाही असे सांगितले आहे नं? मग तुम्ही त्याला देव का मानता? या विषयाची चर्चा रंगते आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओ एका राजकीय नेत्यानेही ट्विट केला आहे. त्यामुळे चर्चा आणखीन खमंग होते आहे. चित्रपटातील दृश्याचे आणि त्या मुलीच्या तोंडच्या मताचे समर्थक आणि विरोधक दोन्ही आहेत. खुद्द बौद्ध मतानुयायी लोकांमध्येही विरोध आणि समर्थन असे दोन पक्ष आहेत. मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

इथे प्रश्न हा आहे की एखाद्याला देव मानले तरच त्याचा आदर करायचा का? मोठी, मार्गदर्शक व्यक्ती म्हणून आदर करायला नको का? बुद्धाने देव नाकारला म्हणून त्याच्या मूर्तीवर चढणे कसे समर्थनीय होऊ शकेल? पण सध्या जमाना समानतेचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही की, पायथा आणि शिखर हे दोन्ही हिमालय म्हणून एक असले तरीही; पायथा आणि शिखर म्हणून ते वेगळेच असतात. माणूस म्हणून सगळे एकच असले तरी व्यक्ती म्हणून सगळे वेगळे असतात. ब्रम्ह म्हणून सगळं अस्तित्व एक असलं तरीही प्रत्येक आविष्कार वेगळा असतो. हाच विवेक. हा विवेक जागो.

अर्थात, संतांना अंगाखांद्यावर खेळवणारी विठुरायाची मूर्तीही आपल्या परिचयाची आहेच. पण भक्तीतील वात्सल्यभाव आणि समतेच्या नावाखालील अगोचरपणा यातला फरकही लक्षात घ्यायला हवाच. स्वतः विठू झाल्याशिवाय त्याच्या अंगाखांद्यावर बागडण्याचा अधिकार नाही प्राप्त होत.

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०२२

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

अराजकीय चर्चा

टीव्हीवरील चर्चा हा नेहमीच टीकेचा विषय असतो. मीही त्यावर बहुतेक टीकाच करतो. पण कधीकधी चांगलं काही पण ऐकायला मिळतं. आज CNBC वर झालेली चर्चा अशीच होती. एक तर ती चर्चा होती, भांडण नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा विषयही राजकीय नव्हता आणि चर्चा करणाऱ्यात एकही राजकीय व्यक्ती नव्हती. दोन विषयांवर अर्धा अर्धा तास चर्चा झाली. एक विषय शिक्षण आणि दुसरा आरोग्य. १९४७ पासून आजपर्यंत या दोन्ही क्षेत्रातील विकास आणि त्याचे आजचे स्वरूप अशी चर्चा होती. सगळ्यांना या दोन्ही गोष्टी चांगल्या, दर्जेदार, परवडणाऱ्या कशा मिळतील ही चर्चेची दिशा होती. या चर्चेवर आणि त्यातील बिंदूंवर पुष्कळ लिहिता येईल, पण चर्चा ऐकत असताना मनात आलेले दोनच बिंदू सगळ्यांच्या विचारार्थ.

१) राजकीय व्यक्ती कटाक्षाने पूर्णपणे बाजूला ठेवून चिंतन, चर्चा, विचार केल्यास खूप चांगलं काही घडू शकेल.

२) सगळा विचार करता - पाच लाख लोकवस्तीची तीन ते पाच हजार शहरे विकसित करणे हे पुढील पाच दशकांचं लक्ष्य ठेवायला हवं. त्यासाठी ज्या ज्या गोष्टींवर पाणी सोडावे लागेल ते सोडण्याची संकल्पशक्ती तयार करावी लागेल. त्यात प्रत्येकाला भरपूर काही मिळेल आणि पुष्कळ काही सोडावे लागेल.

पण चांगलं स्वप्न पाहायचं असेल अन ते प्रत्यक्षात यायचं असेल तर हे करावंच लागेल नं?

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०२२

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

IT returns

ज्यांचं उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी आहे त्यांनाही returns भरणं आवश्यक असण्याचं कारण काही कळत नाही. आज आधार, पॅन, बँक खातं सगळं एकमेकांशी जोडलं असताना; सगळी बारीकसारीक माहिती लगेच मिळत असताना; हा व्याप वाढवण्याचं कारण अनाकलनीय आहे. संबंधित विभागाचा भार वाढवण्यासोबतच, सामान्य माणसाला अकारण काही तरी मागे लावून देण्याची ही कल्पना ज्या कोणा विद्वानांच्या डोक्यातली असेल त्यांना भारतरत्नच द्यायला पाहिजे.

तसंच tds प्रकरणाचं. आपण मोहीम काढून बँक खाती काढली. करोडो लोकांची बँक खाती आहेत. ते आपापले किडुकमिडुक FD वगैरे करून ठेवतात. त्यावर करपात्र पाच लाखाचे उत्पन्न तर दूर, काही हजारात व्याज त्यांना मिळते. त्यातूनही पैसे परस्पर कापून घेतले जातात. हे खरं आहे की, त्यासाठीचा फॉर्म भरून दिला असेल तर पैसे कापले जात नाहीत. पण अनेकदा अनेक कारणांनी फॉर्म भरले जात नाहीत. कोव्हीड काळातही असे झाले होते. अन्यही कारणे, परिस्थिती असू शकते. अशा वेळी परस्पर पैसे कापले जातात. नियम करणाऱ्यांना दोन चार हजाराने फरक पडत नाही पण ज्यांचे पैसे असे कापले जातात त्यांच्यासाठी हजार रुपयेही मोठे असतात. (त्यांना returns फाईल करून पैसे परत घेता येतात हा फुकटचा सल्ला पुन्हा असतोच. म्हणजे पुन्हा एक अतिरिक्त भार.) Minimum government, Maximum governance याचा हाच अर्थ असेल तर तो फारसा चांगला नाही. माणसे आणि माणसांचा समाज हा रोबोचा जमाव नाही. विचार, व्यवहार, प्रशासन सगळ्याच गोष्टींचं असं; अंदाधुंद, अमानुष, एकांगी यांत्रिकीकरण चुकीचेच म्हटले पाहिजे.

बरं इतकं करूनही; लोकांच्या घरात घबाडच्या घबाड सापडतातच. देशात राहणारे सगळेच्या सगळे लोक बदमाश, अतिरेकी असतात वा असू शकतात असं समजून त्यांना अधिकाधिक बांधून ठेवणे, नजरेत ठेवणे; हे चांगले नाही. पण आपलेच सरकार आहे. त्यामुळे सगळेच बरोबर असू शकते. शेवटी राष्ट्रनिर्माण करायचे आहे नं?

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०२२

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

सुबोध भावे यांचे भाषण

सुबोध भावे या अभिनेत्याच्या एका भाषणाची सध्या चर्चा होते आहे. मी भाषणाची बातमी वाचली. भाषण ऐकलेले नाही. मला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. 'आपण देशाचं (पर्यायाने आपलंही) जीवन राजकारणी लोकांच्या हाती सोपवलं आहे.' हे त्यांचं म्हणणं. हे मत मांडताना त्यांनी राजकारणी लोकांना लावलेल्या विशेषणाचा राग येऊ शकतो. पण आजवरचा अनुभव मात्र त्या विशेषणांची पुष्टीच करतो. भावे जेव्हा देश अयोग्य राजकारण्यांच्या हाती सोपवला असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ, 'आजचे सत्ताधारी' असा होत नाही, हे भाषण नीट वाचलं समजून घेतलं तर लक्षात येतं. अर्थ काय कसेही काढता येतात. पण हिशेब मांडून बोलायला भावे हे काही (आज तरी) राजकारणी नाहीत. त्यामुळे सोयीस्कर अर्थ काढूही नये आणि पूर्ण भाषण लक्षात घेतलं तर तसा अर्थ निघतही नाही. स्वतःचं वा देशाचं जीवन पूर्णपणे राजकीय लोकांच्या हाती सोपवणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण त्याच्याशी सहमत होतील. मी शंभर टक्के सहमत आहे.

आणखीन दोन गोष्टी त्यांनी या भाषणात मांडल्या आहेत. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे चूक आहे. तसेच थोर लोकांची चरित्र आणि विचार सगळीकडे पोहोचायला हवेत. दोन्हीवर मतभेद होण्याचे कारण नाही. पण या दोन गोष्टींच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावे लागतील. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे फक्त विद्यार्थ्यांना भाषणात सांगण्यापुरतेच असावे का? ज्या मनोरंजन क्षेत्रात भावे काम करतात तिथे त्यांच्यासह सगळेच करियरमागे धावणे यापेक्षा वेगळं काय करतात? यासाठी महापुरुषांचा, ऐतिहासिक घटनांचा वापर केला म्हणजे ते करियर मागे धावणे नसते का? किंवा केवळ पैसा, नाव आणि प्रसिद्धी यांच्यासाठी काहीही करत राहणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नाही का? लोकांना खऱ्या खोट्या, गरजेच्या वा अवास्तव मनोरंजनात गुंतवून ठेवणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नसते का? राजकारण्यांनी देशाचे वाटोळे केले असेल पण कलाकारांनी देशाचे किती अन कसे भले केलेले आहे? किती कलाकार पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक यांना 'आता पुरे' असं म्हणतात? किती कलाकार विशिष्ट प्रमाणात पैसा, प्रसिद्धी मिळवली की, मुंबई सोडून एखाद्या जिल्हा वा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एखाद्या मूलभूत कामात स्वतःला गाडून घेतात? तुमची स्वतःची तशी काही योजना आहे का?

अन महापुरुषांचे विचार वा चरित्र लोकांमध्ये पोहोचवणे म्हणजे तरी काय? फक्त त्यांच्या नावाचा जयजयकार? की अस्खलितपणे त्यांचं जीवन कोणाला सांगू शकणे? की त्यांचे विचार कसे योग्य आहेत यावर तर्कशुद्ध वादविवाद? कशाला म्हणायचं महापुरुषांचे अनुकरण? खरं तर महापुरुषांचे ना अनुकरण करायचे असते ना त्यांच्याबद्दल खूप माहिती गरजेची असते ना जयजयकार करत मनमौजी पद्धतीने जगायचे असते. महापुरुष हे जीवनाची प्रेरणा असतात. या प्रेरणेनुसार जगणारे लोक आजूबाजूला पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा महापुरुष आणि त्यांचे विचार रुजत जातात. त्यातून समाज घडतो. राजकारणी लोक समाज घडवत नाहीत, घडवू शकत नाहीत. त्यांनी तो घडवू नये. या तुमच्या मताशी सहमत होतानाच; केवळ महापुरुषांचे विचार आणि चरित्र तांत्रिकतेने लोकांपर्यंत पोहोचवून सुद्धा समाज घडत नाही, हे नमूद करणे आवश्यक आहे. एका गीताची एक ओळ आठवते आहे - 'शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदी नैतिक आधार नहीं है'. हा नैतिक आधार देण्यासाठी आपण आणि आपण ज्याचा अविभाज्य भाग आहात ते मनोरंजन विश्व किती तयार आहे? किंवा तशी तयारी होण्यासाठी आपलं योगदान काय आहे?

- श्रीपाद कोठे

२ ऑगस्ट २०२२