दिल्लीजवळच्या नोएडा येथील दोन टोलेजंग इमारती उद्या पाडण्यात येणार आहेत. त्याही केवळ नऊ सेकंदात. आधुनिक तंत्रज्ञानाने हे शक्य होईल. वाहिन्यांवर सकाळी सहा-सात वाजेपासून त्याचे live प्रसारण देखील होणार आहे. आपण किती फसवं, ताळमेळ नसलेलं जीवन जगतो आहोत; त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. टोलेजंग इमारती नऊ सेकंदात पाडण्याचं कसलं कौतुक करायचं? एवढ्या मोठ्या इमारती उभ्या होईपर्यंत त्यातील नियमांचे उल्लंघन, भ्रष्टाचार होऊ द्यायचा. मग भ्रष्टाचाराविरुद्ध कळकळ असल्याने त्या इमारती पाडून टाकायच्या. काय पोरखेळ आहे? या सगळ्या सव्यापसव्यात वाया जाणाऱ्या वेळ, ऊर्जा, पैसा, मनुष्यतास, मनुष्यबळ, सामुग्री यांना काहीच किंमत वा अर्थ नाही का? शिवाय इमारती पाडताना पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी वाया जाणार त्याचे काय? काहीही गुन्हा नसताना आजूबाजूच्यांनी का suffer व्हायचं? पर्यावरणाचं काय? बरं तर बरं - झालेल्या भ्रष्टाचाराचे सगळेच्या सगळे पैसे वसूल होणार का? इमारती बांधून होईपर्यंतच्या काळात ज्यांनी ज्यांनी बक्कळ पैसा कमावला आणि त्याचा उपभोग घेतला, त्याची वसुली कशी होईल? म्हणजेच शून्य निर्मिती करूनही जे कोणी फायद्यात राहतील त्यांचे काय वाकडे करून घेणार? ज्यांनी तिथे पैसे गुंतवले असतील त्यांना परत मिळणार का? सगळाच सावळागोंधळ.
यासाठी कारणीभूत आहे आजची कार्यपद्धती. विचार करून काम करणे याऐवजी काही तरी करून दाखवण्याच्या नादात काहीबाही करत राहायचे अन मग आरडाओरडा करून जबाबदाऱ्या अन न्यायाची नाटके करायची. खरं तर ही कार्यपद्धती तरी का विकसित झाली याचा विचार करायला हवा. माणसाची हाव हे त्याचे एकमेव उत्तर आहे. कसलेही नियंत्रण आणि मर्यादा माणसाला आज मान्यच नाही. आपल्या परंपरेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची चर्चा आहे. अर्थ आणि काम धर्माने नियंत्रित असावे असे सांगणे आहे. दुर्दैवाने धर्म, परंपरा मान्य असणारेही ही पुरुषार्थ कल्पना किमान व्यवहारात तरी धुडकावून लावतात. अर्थ आणि काम अनिर्बंध असायला हवे असे मत काही जण खुलेआम मांडतात तर बहुसंख्य लोकांना मनाच्या आतल्या कप्प्यात तसे वाटते. अत्यंत ढोंगी आणि दुटप्पी जीवनाच्या कालखंडात आपण आहोत. विकासाच्याच नाही तर मानवी प्रयत्न आणि मानवी बुद्धिमत्तेच्या धुंदीत योग्य, अयोग्य, सारासार आणि सम्यक विचार करण्याची शक्तीही आम्ही गमावून बसतो आहोत.
- श्रीपाद कोठे
२७ ऑगस्ट २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा