सुबोध भावे या अभिनेत्याच्या एका भाषणाची सध्या चर्चा होते आहे. मी भाषणाची बातमी वाचली. भाषण ऐकलेले नाही. मला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. 'आपण देशाचं (पर्यायाने आपलंही) जीवन राजकारणी लोकांच्या हाती सोपवलं आहे.' हे त्यांचं म्हणणं. हे मत मांडताना त्यांनी राजकारणी लोकांना लावलेल्या विशेषणाचा राग येऊ शकतो. पण आजवरचा अनुभव मात्र त्या विशेषणांची पुष्टीच करतो. भावे जेव्हा देश अयोग्य राजकारण्यांच्या हाती सोपवला असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ, 'आजचे सत्ताधारी' असा होत नाही, हे भाषण नीट वाचलं समजून घेतलं तर लक्षात येतं. अर्थ काय कसेही काढता येतात. पण हिशेब मांडून बोलायला भावे हे काही (आज तरी) राजकारणी नाहीत. त्यामुळे सोयीस्कर अर्थ काढूही नये आणि पूर्ण भाषण लक्षात घेतलं तर तसा अर्थ निघतही नाही. स्वतःचं वा देशाचं जीवन पूर्णपणे राजकीय लोकांच्या हाती सोपवणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण त्याच्याशी सहमत होतील. मी शंभर टक्के सहमत आहे.
आणखीन दोन गोष्टी त्यांनी या भाषणात मांडल्या आहेत. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे चूक आहे. तसेच थोर लोकांची चरित्र आणि विचार सगळीकडे पोहोचायला हवेत. दोन्हीवर मतभेद होण्याचे कारण नाही. पण या दोन गोष्टींच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावे लागतील. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे फक्त विद्यार्थ्यांना भाषणात सांगण्यापुरतेच असावे का? ज्या मनोरंजन क्षेत्रात भावे काम करतात तिथे त्यांच्यासह सगळेच करियरमागे धावणे यापेक्षा वेगळं काय करतात? यासाठी महापुरुषांचा, ऐतिहासिक घटनांचा वापर केला म्हणजे ते करियर मागे धावणे नसते का? किंवा केवळ पैसा, नाव आणि प्रसिद्धी यांच्यासाठी काहीही करत राहणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नाही का? लोकांना खऱ्या खोट्या, गरजेच्या वा अवास्तव मनोरंजनात गुंतवून ठेवणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नसते का? राजकारण्यांनी देशाचे वाटोळे केले असेल पण कलाकारांनी देशाचे किती अन कसे भले केलेले आहे? किती कलाकार पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक यांना 'आता पुरे' असं म्हणतात? किती कलाकार विशिष्ट प्रमाणात पैसा, प्रसिद्धी मिळवली की, मुंबई सोडून एखाद्या जिल्हा वा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एखाद्या मूलभूत कामात स्वतःला गाडून घेतात? तुमची स्वतःची तशी काही योजना आहे का?
अन महापुरुषांचे विचार वा चरित्र लोकांमध्ये पोहोचवणे म्हणजे तरी काय? फक्त त्यांच्या नावाचा जयजयकार? की अस्खलितपणे त्यांचं जीवन कोणाला सांगू शकणे? की त्यांचे विचार कसे योग्य आहेत यावर तर्कशुद्ध वादविवाद? कशाला म्हणायचं महापुरुषांचे अनुकरण? खरं तर महापुरुषांचे ना अनुकरण करायचे असते ना त्यांच्याबद्दल खूप माहिती गरजेची असते ना जयजयकार करत मनमौजी पद्धतीने जगायचे असते. महापुरुष हे जीवनाची प्रेरणा असतात. या प्रेरणेनुसार जगणारे लोक आजूबाजूला पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा महापुरुष आणि त्यांचे विचार रुजत जातात. त्यातून समाज घडतो. राजकारणी लोक समाज घडवत नाहीत, घडवू शकत नाहीत. त्यांनी तो घडवू नये. या तुमच्या मताशी सहमत होतानाच; केवळ महापुरुषांचे विचार आणि चरित्र तांत्रिकतेने लोकांपर्यंत पोहोचवून सुद्धा समाज घडत नाही, हे नमूद करणे आवश्यक आहे. एका गीताची एक ओळ आठवते आहे - 'शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदी नैतिक आधार नहीं है'. हा नैतिक आधार देण्यासाठी आपण आणि आपण ज्याचा अविभाज्य भाग आहात ते मनोरंजन विश्व किती तयार आहे? किंवा तशी तयारी होण्यासाठी आपलं योगदान काय आहे?
- श्रीपाद कोठे
२ ऑगस्ट २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा