मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

रूप मृत्यूचे

१९८४ साली आलेल्या हिमवादळात सियाचीन येथे १९ जवान बर्फाखाली दबले होते. त्यातील १४ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले होते. अन्य पाच जवान मात्र सापडले नव्हते. त्यातील एक चंद्रशेखर हरबोला यांचे अवशेष मात्र नुकतेच सापडले आणि ते त्यांच्या हलदानी या गावी पाठवून काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ३८ वर्षांपूर्वी त्यांचे शव सापडले नव्हते तेव्हा नियमाप्रमाणे लष्कराने त्यांच्या घरी सूचना दिली आणि त्यावेळी तेथील प्रथेप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी २७ वर्षांची, एक मुलगी आठ वर्षांची आणि दुसरी मुलगी चार वर्षांची होती. आज पत्नी ६५ वर्षांची, मुली ४६ आणि ४२ वर्षांच्या आहेत.

मृत्यूची किती विविध रूपे असतात नाही? कोणत्याही व्यक्तीचे मरण दु:खदायकच असते. अकाली मृत्यू त्याहून दु:खद. मृत्यूनंतर मृतदेह हाती सुद्धा न लागणे आणखीन वेदनादायी. हे सगळे आपल्याला कमीअधिक माहिती असते. पण ही सगळी दु:ख काळप्रवाहात मागे पडल्यावर पुन्हा एकदा समोर उभी ठाकणे कसे असेल? त्यातही संपूर्ण अभंग देह समोर न येता अवशेष समोर येणे. त्यावर पुन्हा अंत्यसंस्कार. या सगळ्यालाच मन कसा प्रतिसाद देत असेल? उमाळे आणि उसासे कसे असतील? दु:खाचे कढ न येणे हे असभ्य आणि अस्वाभाविक, पण कढ येणे हेही अस्वाभाविक. दु:खाचीही अशी कुचंबणा. ओल्या आणि सुकलेल्या जखमेप्रमाणे, ओले आणि सुकलेले दु:ख. ना औपचारिकता ना अनौपचारिकता. चेहरा मागे पडलेला. आठवणी पुसून गेलेल्या. अन तरीही भूतकाळ समोर उभा राहतो अन म्हणतो 'दाखवा ओळख.' हे मृत्यो - किती तुझे रंग? किती तुझी रूपे?

- श्रीपाद कोठे

१६ ऑगस्ट २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा