गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

शेतीमालाचे भाव

सध्या कांद्यावरून वाद सुरू आहे. शेतकऱ्यांना क्विंटलसाठी एक रुपयाही मिळत नसताना, ग्राहकांना मात्र २५-३०-४० रुपये किलोने कांदे घ्यावे लागतात. असे का होते? दुसरे - ज्यावेळी ग्राहक याहून दुप्पट भावात कांदे खरेदी करतात तेव्हा शेतकऱ्याला त्यातील किती पैसा मिळतो? दोन्हीची सरासरी काढली तर शेतकऱ्याने समाधानी का असू नये? ग्राहक अधिक भावाने कांदा विकत घेतात तेव्हा जर शेतकऱ्याला योग्य पैसा मिळत नसेल तर तो जातो कुठे? म्हणजेच कांदा चढ्या भावाने विकला गेला तरीही आणि मातीमोल भावाने विकला गेला तरीही शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही वर्गांना फटका बसतो. मग पैसा जातो कुठे? यावर सरकार नावाची यंत्रणा आजवर काहीही का करू शकलेली नाही. अन् एकूणच कांद्यासह सगळ्याच गोष्टींच्या किमतीच्या स्थिरतेचा विचार करावा हे १९४७ पासून २०२३ पर्यंत कोणत्याही सरकारला, कोणत्याही पक्षाला का वाटत नाही? औद्योगिक उत्पादने, सेवा अथवा अन्य निसर्गनिर्मित गोष्टी यांचे भाव अधेमधे एकदम वाढतात. नंतर ओरड झाली की किंचित कमी होतात. उदा. भाव एकदम दहा टक्के वाढतात. मग ओरड होते. मग दोन टक्के कमी होतात. किमतीवर नियंत्रण मिळवलं म्हणून सरकारे पाठ थोपटून घेतात. उरलेल्या आठ टक्के महागाईची लोकांना सवय होते. पुन्हा काही काळाने भाव वाढतात. पुन्हा सगळे तसेच. शेतीमालाच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. खूप पाऊस पडला तरी पाण्याच्या किमती कमी होत नाहीत पण खूप उत्पादन झाले म्हणून शेतमालाच्या किमती गडगडतात. बरे आता शेतकऱ्याला कुठेही आपला माल घेऊन जाण्याची आणि विकण्याची मुभा आहे. तरीही स्थिती सुधारत नाही. देशभर रस्ते, वाहतूक आणि दळणवळण सुधारत असूनही त्याचा शेती आणि शेतकऱ्यांना फायदा नाही. कुठेतरी काहीतरी मूलभूत गडबड आहे. कोणाकडे त्यावर विचार करायला फुरसत आहे का?

- श्रीपाद कोठे

१ मार्च २०२३

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

मराठीसाठी संकल्प

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करता येणारे संकल्प -

- लहान मुलांना शिकवताना हा dog, ही cat; याऐवजी कुत्रा, मांजर किंवा अगदी भू भू म्यांव हे सांगीन.

- फ्लॉवर कसा दिलाऐवजी फुलकोबी कशी दिली/ काय भाव; असे बोलीन.

- मला bore होण्याऐवजी कंटाळा येईल.

- लंच, डिनर वा ब्रेकफास्ट याऐवजी जेवण आणि नाश्ता करीन.

- माझं बुक स्टोर ऐवजी पुस्तकालय असेल.

- मला नेबर नसतील शेजारी असतील.

- मी व्यवस्थित कमवीत असल्यास वर्षाला हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घेईन.

- शुभेच्छा आणि धन्यवाद या शब्दांचा वापर करीन.

- जन्मदिवस वा सणवार वा अन्य प्रसंगी मराठीतून शुभेच्छा देईन.

- मराठी बोलताना, मराठीचा वापर करताना मला ओशाळल्यासारखं वाटणार नाही. त्यात कमीपणा वाटणार नाही.

- चारचौघात असताना मराठीबद्दल बाकीच्यांना काय वाटतं याचं दडपण मी घेणार नाही.

- रोजच्या वापरातल्या वस्तू, रोजचे घरातले वा बाहेरचे संवाद आग्रहाने मराठीत करीन. शब्द अडल्यास तो शोधेन आणि त्याचा वापर करत जाईन.

- मराठीचा वापर ही टिंगलटवाळी करण्याची, हसण्यावारी नेण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही हे स्वतःला कठोरपणे समजावेन.

- मराठीचा आग्रह धरताना टेबलला काय शब्द वापरायचा किंवा रेल्वे हेच वापरणं कसं योग्य इत्यादी प्रकारचे फाटे फोडून आशय भरकटवणार नाही.

- शक्य नसेल त्याचा नंतर विचार करेन आणि शक्य आहे त्याचा व्यवहार लगेच सुरू करेन.

- श्रीपाद कोठे

२७ फेब्रुवारी २०२३

राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रमाण भाषा व बोलीभाषा यांचा वादही होतो आहे. त्यावरील एका धाग्यावर व्यक्त केलेले माझे मत -

बोली भाषेतील अनेक शब्द प्रमाण भाषेत आहेत असे म्हणता आणि त्याचवेळी पुणेरी भाषा प्रमाण भाषा ठरवण्यात आली असा निष्कर्षही काढता. असे कसे? शिवाय सगळ्यांचा समावेश करायचा म्हणजे प्रत्येकातील काही स्वीकारले जाणार आणि काही वगळले जाणार. त्यामुळे न वा ण असा वाद करण्यात अर्थ नाही. शब्द जसा लिहिला जातो तसा उच्चार करावा हे तत्त्व स्वीकारलं जावं. बाकी वादावादी आणि वर्चस्व वगैरेत फारसा अर्थ नाही. आम्ही श्रेष्ठ किंवा आम्ही अन्यायग्रस्त हे दोन्ही टाकून दिलेलेच बरे.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

अक्षयाचे प्रकटणे

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो तर घरकाम करणाऱ्या बाईने वरून आवाज दिला, `हे पाहा इथे काय आहे ते.’ गच्चीवर गेलो आणि पाहिलं तर एक पक्षी निष्प्राण पडला होता. गच्चीत आलेल्या आंब्याच्या फांदीच्या खाली तो छोटासा पक्षी रात्री केव्हा तरी पडला असावा. त्या मोठ्ठ्या आंब्यावर अनेक पाखरं रोजंच रात्री वस्तीला असतात. दिवसभर बागडणारेही अनेक असतात. दिवसा कोण असतात, रात्री कोण असतात वगैरे काही मी पाहिलेलं आणि नोंदवलेलं वगैरे नाही. मी फक्त त्यांचं बागडणं पाहत असतो, त्यांचे खेळ पाहत असतो, त्यांची गाणी- आरडाओरडा ऐकत असतो आणि त्यांचं असणं भोगत असतो. त्यामुळे निष्प्राण पडलेला तो पक्षी कोणता होता हे काही मला सांगता नाही येणार. अंगणातले पेरू, आंबे माझ्यासोबतच खाल्लेला, माझ्यासोबतच श्वास घेणारा तो एक मध्यमवयीन पक्षी रात्री केव्हातरी मरून पडला होता. आपण पक्षी असे पडलेले कधी पाहत नाही. सदा उड्या मारत किंवा पंखात हवा भरून हवेत भरारी मारत असलेले पक्षी पाहण्याची आपल्याला सवय. त्यामुळे तर त्याचं ते दर्शन फारच केविलवाणं वाटत होतं. चैतन्याने रसरसलेले त्याचे दाट पंख चैतन्य गमावून बसले होते. तो पक्षी आधी हे जग सोडून गेला आणि त्यामुळे फांदीवरून पडला की, फांदीवरून पडल्याने त्याने जगाचा निरोप घेतला माहीत नाही. जिवंत पक्षी फांदीवरून असा पडून जाईल असं नाही वाटत. शिवाय पडला असता तर एकदम गतप्राण नसता झाला. कारण फांदी आणि गच्ची यात काही फार अंतर नाही. अंतर फार असतं तर कदाचित तो पडता पडता उडून वर गेला असता. पडून जखमी झाला असता तर जखमांच्या खुणा दिसल्या असत्या. त्याने काही धडपड केली असती. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न केला असता. वेदना झाल्या असत्या तर त्यांचं दर्शन त्याच्या कायेवर झालं असतं. पण तसं काहीही नव्हतं. झोपल्यासारखा वाटत होता असंही म्हणता येत नाही कारण पक्षी झोपलेले कधी पाहिलेले नाहीत. अर्थात पाहिले नसले तरी ते बसल्याबसल्याच झोपत असावेत, आडवे होत नसावेत. हा आडवा होता आणि प्राणहीन. म्हणजे नक्कीच प्रथम त्याने प्राण सोडला आणि मग तो खाली पडला. कसा गेला असेल त्या पक्ष्याचा प्राण? हृदयविकाराने? पक्ष्यांनाही हृदय असतं, त्यामुळे हृदयविकार असू शकतो. पण पक्ष्यांना तर ताणतणाव वगैरे नसतात, मग हृदयविकारही असायला नको. कोणास ठाऊक. रात्रीची वेळ असल्याने पक्ष्यांचं आपसात काही भांडण वगैरे होण्याचीही शक्यता नाही. एक मात्र खरं की काल रात्रीपर्यंत त्या आंब्याच्या फांदीखाली काहीही नव्हतं आणि आज सकाळी तेथे एक पक्षी मरून पडला होता.

त्याला खाली घेऊन गेलो. झाडाखाली थोडंसं खोदलं. त्याची निर्जीव कुडी त्यात ठेवली. वरून माती सारखी केली आणि हात जोडले. तो माणूस नव्हता म्हणून काय झाले? त्याच्यातील आणि माणसातील चैतन्य तर एकच आहे. ज्या शक्तीने माणूस जन्माला घातला त्याच शक्तीने त्या पाखरालाही जन्मास घातले होते. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते पाखरू माणूस नसले तरीही मी माणूस होतो. माझ्यासोबत फळे खाणारं, माझ्यासोबत श्वास घेणारं ते पाखरू हे जग सोडून जात असताना त्याला सद्गती लाभावी अशी प्रार्थना करणं; माझं माणुसपण जिवंत ठेवणारं होतं. सहज विचार आला, याच्या अंत्ययात्रेला आपण दोघेच- मी आणि काम करणाऱ्या बाई. त्यांच्यापैकी कोणी नाही. खरंच कसं असेल पक्षी जातीचं मरण? काय असेल पक्ष्यांसाठी मरणाचा अर्थ आणि आशय? काय प्रतिक्रिया राहत असेल त्यांची? ज्या पंचमहाभूतातून कुडी साकारली त्या पंचमहाभूतात जमेल तसे विरून जाणे... बास... एवढेच आणि इतकेच. अंत्ययात्रा, अंत्यसंस्कार, वृत्तपत्रात बातमी, सुतक, श्राद्ध-पक्ष, जन्ममृत्यूची नोंदणी, दाखला वगैरे काही नाही. नावगाव, मालमत्ता, हिस्सेवाटे, मृत्युपत्र; अगदी काहीही नाही. माणूस करतो त्यातलं काहीही नाही. जन्म आणि मृत्यू मात्र सारखेच. अवयवांची हालचाल म्हणजे जन्म आणि अवयवांची हालचाल थांबणे म्हणजे मृत्यू. कोण होता? कुठून आला होता? कुठे गेला? का आला होता? उत्तरे नसलेले सनातन प्रश्न. जन्मक्षणापासून हाती घेतलेला हात कधीही न सोडणारा अखंड सखा म्हणजे मृत्यू. सदा सोबत करूनही तो फक्त एकदाच साक्षात होतो आणि तेही न सांगता सवरता, अनपेक्षितपणे. कोणी त्याला मृत्यू म्हणतं, कोणी काळ, कोणी यम तर अन्य कोणी यमदूत. प्रत्येकाचा हा काळ वेगळा असतो की एकच? माझ्याही सोबत तो असावा, असतोच, नव्हे आहेच. कधी प्रकट होईल ते मात्र कोणालाच ठाऊक नाही. काल रात्री मात्र मी झोपलो असताना माझ्या डोक्यावर तो साक्षात प्रकट झाला होता. विज्ञान म्हणतं हे सगळं विश्व काळ, अवकाश आणि निमित्त इतकंच आहे. त्यातील अवकाश आणि निमित्त कमीजास्त होताना आपण अनुभवतो. काळ मात्र अक्षय आणि अविनाशी आहे. काल तो माझ्या जवळ येऊन गेला. त्याला पाहायचं मात्र राहूनच गेलं.

- श्रीपाद कोठे

- नागपूर

- बुधवार, २६ फेब्रुवारी २०१४

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

अहो कुमार विश्वास...

अहो डॉ. कुमार विश्वास, जरा भानावर या. तुम्ही उज्जैन नगरीत रामकथा करताहात. तिथे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे काही बरळलात त्याबद्दल म्हणतोय मी. तुमच्यासोबत काम करणाऱ्या कोणा एका कार्यकर्त्याने तुम्हाला विचारलं की, अर्थसंकल्प कसा हवा? अन् त्यावरून महाभारत झालं. आपण किती महान आहोत आणि तू किती तुच्छ आहेस हे दाखवण्याची प्रबळ उर्मी तुमच्यात उसळली. अन् तुम्ही त्याला शहाणपण सांगितलं की, तुम्ही रामराज्य आणलं आहे तेव्हा रामराज्यासारखा अर्थसंकल्प हवा. तुम्ही विद्वान आणि तो कस्पटासमान हे तर आहेच. त्याच न्यायाने त्या सामान्य कार्यकर्त्याने सामान्य प्रतिप्रश्न केला की, रामराज्यात अर्थसंकल्प होता का? आपल्या संस्कृतमध्ये म्हणतात - बालादपी सुभाषितं ग्राह्यम. त्या बिचाऱ्या बालबुद्धी कार्यकर्त्याच्या तोंडून सत्य तेच बाहेर पडलं. परंतु आपल्या राजकीय बुद्धिमत्तेचा आणि चतुराईचा फुगा असा अनपेक्षित फुटल्यावर आपला तिळपापड झाला आणि आपण चक्क संपूर्ण रा. स्व. संघावर घसरलात. अन् अर्थसंकल्प आणि रामायणाची गाडी चक्क वेदांवर नेऊन ठेवली. बरं, गाडी वेदांवर वळवली तर वळवली, पण आपला अपमान झाला ही तुमच्या डोक्यातील तिडीक इतकी मोठी की, तुम्ही संघाच्या लोकांसाठी अडाणी, निरक्षर वगैरे शब्द वापरले. महोदय; तुम्हाला राग येईल पण मला तुम्हाला सांगू द्या; तुमच्या या एका कृतीमुळे तुम्ही; अर्थकारण, रा. स्व. संघ आणि एकूण मानवी जीवन या तिन्ही बाबतीत अडाणी आणि निरक्षर आहात हे दाखवून दिलं.

त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाला सरळ सरळ उत्तर न देता बगल देण्याचा आणि बगल देताना बौद्धिक चमत्कृती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न केविलवाणा आहे. तुम्हाला अर्थकारण समजत नाही आणि अनपेक्षित प्रसंग उद्भवला तर तो कसा हाताळावा हेही समजत नाही हे या निमित्ताने जगाने पाहिलं. राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिक क्षमतेचा. तर डॉ. विश्वास, तुमच्यासारखे अनेक विद्वान निष्प्रभ ठरतील अशी विद्वत्ता संघाकडे भरपूर आहे. तुम्हाला त्याची माहिती नसणे हे तुमचे अज्ञान आहे. वेद वगैरे क्षणभर बाजूला ठेवा पण तुम्हाला वर्तमानाची माहितीही नाही हे खेदजनक आहे. कोणतीही संघटना, संस्था, चळवळ, कार्य; ही एक गुंतागुंतीची आणि व्यामिश्र बाब असते. नेते आणि कार्यकर्ते यांचेही अनेक स्तर असतात. असंख्य कमीअधिक विविधांगी क्षमता असतात. त्यामुळे सरधोपट निष्कर्ष काढणे चूक असते. तुमच्यासारख्या स्वनामधन्य विद्वानाला हे कळत नाही हे या समाजाचं दुर्दैव आहे.

परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा आणि त्या बुद्धीचा वापर करण्याच्या कौशल्याचा उपयोग लाखो आणि करोडो रुपये कमावण्यासाठी करण्याशिवाय अन्य काय केला आहे आपण? तुमच्या गॉगल किंवा बुट किंवा घड्याळाच्या किमतीपेक्षा कमी खर्च आपल्या महिन्याभराच्या जेवणावर करूनही समाजासाठी झिजणारे, समाजासाठी भरीव काही करणारे, समाजाचा विचार करणारे आणि त्या बदल्यात कपर्दिकेची अपेक्षा न बाळगणारे लाखो लोक संघाकडे आहेत. त्यांनी वेद वाचले की नाही हे महत्त्वाचे नाहीच, ते वेद जगतात हे आज जग पाहत आहे. आमच्या निरक्षर तुकोबाने त्यावेळच्या डॉ. विश्वासांना खडसावून सांगितले होते - वेदांचा तो अर्थ, आम्हासीच ठावा. आज तुम्हाला तेच सांगण्याची गरज आहे आणि मी ते सांगतो आहे.

अन् तुम्ही आहात तरी कोण हो? एक कांचनलोभी अभिनेता. दुसरे काय? कधी अत्याधुनिक पोशाख करून सामान्य वकुबाच्या लोकांच्या टाळ्या मिळवणारे कवी किंवा वक्ते, तर कधी धोतर टिळा परिधान करून रामकथा सांगणारे (ढोंगी) कथाकार. कविता किंवा विचार काय अथवा रामकथा काय; तुमच्यासाठी फक्त पैसा मिळवण्याचे साधन. एक लक्षात ठेवा, तुमच्यासाठी रामकथा हे पैसा मिळवण्याचे साधन आहे; तर संघाच्या लाखो लोकांसाठी रामकथा ही जीवननिष्ठा आहे. ते समजण्यालाही तुम्हाला अजून काही जन्म घ्यावे लागतील. तुम्ही आज जो भगव्याचा आव आणता आहात ना, तो तुम्हाला निर्वेधपणे आणता येतो तो तुमच्या मते अडाणी असलेल्या संघाच्या असंख्य लोकांमुळेच हे विसरू नका. आज सकाळीच एका दुकानदाराशी बोलणं झालं. एक काळ होता की, भगवे ध्वज घ्या म्हणून हेच अडाणी कार्यकर्ते घरोघरी जात असत. त्यांनाही फार प्रतिसाद मिळत नसे. कधी कधी तर तो भगवा ध्वज घेऊन सुद्धा घरावर लावत नसत. जनसंघ किंवा विश्व हिंदू परिषदेच्या भगव्या टोप्या कार्यकर्ते सुद्धा खिशात ठेवत असत. मग कोणीतरी हिम्मत करून ती टोपी डोक्यावर चढवी आणि मग दोनचार लोक ती घालत. ज्या भगव्याच्या जीवावर आज तुम्ही नाटके करीत आहात, त्याचं नेपथ्य असंख्य अनाम अडाणी लोकांनी तयार केलं आहे हे, कांचनलोभी डॉ. विश्वास विसरू नका. इतकेही कृतघ्न होऊ नका.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २३ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

चिल्लरपणा नको

काय चाललंय हे? बागेश्वर धाम काय अन् रुद्राक्ष महोत्सव काय... प्रभूसाठी असं नका करू कृपया. अशा गोष्टींचं अकटोविकट समर्थन करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. आपण सामान्य माणसे ते करूच शकतो. आपण ते करायला हवे. धर्म म्हणा, हिंदू धर्म म्हणा, सनातन धर्म म्हणा, ईश्वर म्हणा, अध्यात्म म्हणा... हे खूप सखोल, खूप गंभीर, खूप व्यापक, खूप अर्थपूर्ण आहे. त्याला कृपया कोणी चिल्लर करू नये. अन् धर्म अध्यात्म ही अतिशय महान गोष्ट चिल्लर होऊ नये यासाठी अशा गोष्टी वाढू न देणे, अशा गोष्टींना बळ मिळू न देणे याची मोठी जबाबदारी सामान्य माणसांनी घेतली पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१७ फेब्रुवारी २०२३

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

कागदपत्रांचे जंजाळ

आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी बातमी वाचली. मनात एकच आलं - जगणं नको, पण कागद आवरा. हा कागद, तो कागद, हे कार्ड, ते कार्ड... इतकं सतत सुरू असतं की विचारू नका. विकास किंवा आधुनिकता किंवा सुव्यवस्थित समाज म्हणजे गुंतागुंत, किचकटपणा, कटकट; असाच अर्थ काढावा लागेल. फार नाही, अगदी पन्नासेक वर्षांपूर्वीचा विचार केला तरी; माणसाच्या आयुष्यात कागदपत्रे इतकी वाढली आहेत की विचारता सोय नाही. भूखंड, घर किंवा सदनिका यांचा विचार केला तरी पन्नास वर्षांपूर्वीचे कागदपत्रांचे जंजाळ आणि आताचे जंजाळ यात किती बदल झाला ते लक्षात येईल. आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबा यांची जन्म वा मृत्यू प्रमाणपत्रे सुद्धा नव्हती. त्यापैकी अनेकांना नंतरच्या काळात affidavit इत्यादी करून दाखले तयार करून घ्यावे लागले. हा विषय इतका मोठा आहे की, पंतप्रधान मोदी यांनी थोडासा दिलासा देण्यासाठी self attestation सुरू केले. नियम आणि कायदे कमी करण्याचीही घोषणा त्यांनी केली होती. परंतु हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येते. इतके करूनही सगळ्या व्यवहारातील अनाकलनीयता, फसवणूक, गोंधळ नुसता कायम नसून वाढतो आहे. असे का होते? आणि यावर उपाय काय? यांचा सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. दोन गोष्टी मुख्य आहेत. १) सगळ्या गोष्टी मुठीत घेण्याचा सरकार/ शासन/ प्रशासन/ व्यवस्था यांचा प्रयत्न. या प्रयत्नांच्या मागे लोकांच्या भल्याचा प्रामाणिक हेतूही असू शकतो. परंतु तो हेतू साध्य होणे दूर त्याने सगळ्यांचा त्रासच वाढतो हे समजून घेतले पाहिजे. २) दुसरे कारण म्हणजे - प्रामाणिकपणा, सचोटी, चांगुलपणा, परस्पर विश्वास इत्यादी मानवीय soft power बाजूला सारून समाज उभा करण्याचे, समाज घडवण्याचे प्रयत्न. शिक्षण, वातावरण, विमर्श, संस्कार, साहित्य, मूल्य या सगळ्यातून मानवी soft power ची हकालपट्टी करून त्याजागी; चतुराई, जुगाड, शक्ती, संबंध, diplomacy या गोष्टींची स्थापना करून; यश आणि achievement यांना देण्यात आलेले अवास्तव महत्त्व. काळाने कुस बदलल्याशिवाय यात काही बदल होईल असे वाटत नाही. अन् काळ जेव्हा कुस बदलेल तेव्हा अशी काही किंमत वसूल करेल की, दीर्घ काळ ते पोळत राहील. बाकी मानव शहाणा आहे वगैरे बकवास आहे.

- श्रीपाद कोठे

१५ फेब्रुवारी २०२३

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

चार 'स' मार्ग

माणसाच्या जगण्याचे चार 'स' मार्ग असतात. १) संसाराचा मार्ग, २) सामाजिकतेचा मार्ग, ३) संन्यास मार्ग, ४) सत्य मार्ग. पैकी संसाराचा मार्ग हा बहुसंख्य लोकांचा मार्ग असतो. सामाजिकतेचा मार्ग त्याहून बऱ्याच कमी लोकांचा असतो. संन्यास मार्ग त्याहूनही कमी लोकांचा असतो. तर सत्य मार्ग हा तुरळक लोकांचा मार्ग असतो. या चारही मार्गांवरून चालणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला वाटतं की, आपण हा मार्ग निवडला आहे. त्यानंतर वाटचाल करताना बहुतेक प्रत्येकाला प्रश्न पडतो की, मी हा मार्ग का धरला? अन् कधीतरी कळतं की, मुळात आपला मार्ग आपण निवडतच नाही. मार्ग आपोआप आपल्यासमोर येतो आणि आपण त्यावर चालत राहतो.

प्रत्येक मार्गाची आपापली भाषा असते. प्रत्येक मार्गाच्या आपापल्या खुणा असतात. प्रत्येक मार्गाचे रुप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा अस सगळं वेगवेगळं असतं. यातील पहिले तीन मार्ग एकमेकांशी कुठे कुठे जोडलेले असतात. त्या जोडमार्गांनी या तिन्ही वाटांच्या वाटसरुंना अन्य मार्गाबाबत थोडीबहुत माहिती होत असते. एकमेकांचा आणि एकमेकांच्या मार्गांचा थोडाबहुत परिचय होत असतो. त्यामुळे त्यांच्यात कमीअधिक संवाद होतो, होऊ शकतो. हे तिन्ही मार्ग कुठेतरी जाऊन थांबतात. तो dead end असतो. त्यामुळे वाटसरू पुन्हा पुन्हा मागे पुढे फिरत राहतात. पुन्हा पुन्हा आपला आणि अन्य मार्ग; तसेच आपल्या आणि अन्य मार्गावरील वाटसरू यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. कधी त्यांना त्यात रस वाटतो तर कधी ते कंटाळवाणे होते. त्यांचे चालणे मात्र सुरूच राहते. अखंडपणे.

चौथा सत्य मार्ग मात्र पुष्कळच वेगळा असतो. तो या तीन मार्गांना समांतर असतो पण कुठेही जोडलेला नसतो. त्याचे रूप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा, गरजा, भाषा, खुणा सगळं अन्य मार्गांपेक्षा तर वेगळं असतंच पण त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या या गोष्टीही वेगवेगळ्या असतात. कधी कधी एकमेकींशी या बाबी थोड्याबहुत जुळल्या तर त्यांच्यात देवाणघेवाण होते. पण अनोळखीपण हेच या मार्गाचे वैशिष्ट्य असते. या मार्गाचे वाटसरू एकमेकांना अनोळखी असतात. अन्य तीन मार्गांना हा मार्ग समांतर असल्याने आणि मुळात या मार्गावर तुरळक वाटसरू असल्याने; या मार्गाचे वाटसरू अन्य मार्गांचे आणि त्यावरील वाटसरुंचे निरीक्षण आणि अध्ययन करू शकतात. शिवाय या मार्गाचे बहुतेक वाटसरू पहिल्या तीन मार्गांवरूनच कुठून तरी तिथे उडून आलेले वा फेकले गेलेले असतात. अनोळखी आणि रिकामा असल्याने या मार्गावर मौज अधिक असली तरी, अनामिक अस्वस्थता मात्र भरपूर असते. अनुकरणाला काहीही वाव नसतो. प्रत्येक वाटसरू आपला राजा असतो. हा मार्ग आणि त्यावरचे वाटसरू हे अन्य मार्गांना आणि त्यावरील वाटसरूंना नेहमीच एक कोडे वाटत असते. अन्य मार्गांचे dead end जिथे असतात त्याच्या जवळच या मार्गाचीही समाप्ती असते. परंतु अन्य मार्ग अनुल्लंघ्य भिंतींनी जसे बंद झालेले असतात तसा हा मार्ग बंद झालेला नसतो. त्याच्या समाप्तीला तो एका आनंद सरोवरात पोहोचतो. या मार्गावरील वाटसरू मग त्या आनंद सरोवरात कायम विहार करत राहतात.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

व्याख्या हिंदुत्वाची

लोकमतच्या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे कवित्व बराच काळ सुरू राहणार आहेच. ते चांगलेही आहे. नाही तरी 'हिंदू विचार का हो, सम्यक समूह मंथन' हीच संघाची भूमिका आहे. त्यामुळे तसे होणे वावगे नाहीच. अन मंथन म्हटल्यावर वेगवेगळी मते आलीच. प्रश्न उत्तरे आलीच. असेच काही प्रश्न लोकमतचे मालक श्री. विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित केले होते. त्यातला एक प्रश्न होता - 'हिंदुत्वाची कोणती व्याख्या योग्य? सावरकरांची? संघाची? बाळासाहेब ठाकरे यांची? की राहुल गांधी यांची?'

याबाबत दोन गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे, संघाने हिंदुत्वाची व्याख्याच केलेली नाही. अन दुसरे म्हणजे, व्याख्येचं काही एक महत्व असलं तरीही व्याख्या म्हणजे काही फार मोठी किंवा अत्यावश्यक गोष्ट नाही. 'कविता' या गोष्टीच्या अनेक व्याख्या आहेत. त्याने कवितेला काहीही फरक पडत नाही. एकाच 'कविता' या सत्याचं प्रत्येक जण आपापलं वर्णन करतो. अन कविता करणारे तर त्या व्याख्या वगैरेंच्या फंदात पण पडत नाहीत. 'जीवन' या सत्याचंही असंच आहे. व्याख्या ही गोष्ट त्यासाठी irrelevant आहे. निरर्थक आहे. सध्या वातावरणात प्रेमाचा माहोल आहे. त्याचंही तसंच. अनेक गोष्टी एक तर व्याख्येपलीकडच्या असतात किंवा व्याख्या या गोष्टीला काही महत्व नसतं. हिंदुत्व तसं आहे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२

अनुभव

काही कामानिमित्त आज एका पोलिस ठाण्यात गेलो होतो. मी बसलो होतो त्याच्या शेजारच्या टेबलवर एक शिपाई कोणत्या तरी केसमध्ये एक बयाण नोंदवून घेत होता. पंचविशीतला एक तरुण बयाण देत होता. शिपायाने त्याला विचारले - जात कोणती? तरुण म्हणाला - बुद्ध. शिपाई - ते ठीक आहे पण जात कोणती? तरुण - जात नाही माहीत. समोरच्या अधिकाऱ्याला म्हटलं - थोडं डिस्टर्ब करू का? अधिकारी - बोला. मी - हा मुलगा आत्ता जे म्हणाला की, मला जात माहीत नाही. हे ऐकून मला खूप छान वाटलं. अन् बरंही वाटलं. अधिकारी मनमोकळं हसले. निघताना त्यांना विचारलं - खाली एक पाटी आहे. त्याचा फोटो काढू का? नाही म्हणाले. त्यावर लिहिलं होतं - आपण लोकांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यायला पाहिजे. चुकांची नाही. (महाराष्ट्र पोलीस)

- श्रीपाद कोठे

९ फेब्रुवारी २०२३

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

केविलवाणे, किळसवाणे

तुझं माझं करण्याच्या वृत्तीने आपण समाज म्हणून अतिशय गचाळ स्तरावर आलो आहोत. अशी वृत्ती नसणारे नाहीत असं अजिबातच नाही. पण - एक तर त्यांची संख्या कमी आहे; दुसरे म्हणजे त्यांना फार गांभीर्याने कोणी घेत नाही; अन तिसरे म्हणजे सारासार विचार करणाऱ्यातील अनेक जण selective असतात आणि प्रतिक्रियावादी असतात. त्यांचा सारासार विचार विशिष्ट लोक, विशिष्ट घटना असाच असतो आणि पुष्कळदा प्रतिक्रियेची उबळ इतकी जास्त असते की, सारासार विचारांचा आब राखण्याची त्यांना गरज वाटत नाही.

काल लता दीदींनी या जगाचा निरोप घेतल्यावर याच गचाळ वृत्तीचे बटबटीत दर्शन झाले. त्यांच्यावर गरळ ओकणारे आणि त्यांच्याबद्दल आदर असणारे दोन्ही बाजूंनी हे घडले. कथित दलित वर्गातील काहींचा आक्षेप त्यांनी डॉ. आंबेडकर यांची गाणी म्हटली नाहीत याला होता. तर हिंदुत्व विरोधकांचा आक्षेप त्यांचे सावरकर प्रेम याला होता. अन तेवढ्यावरून लता दीदींवर टीका करण्याची किंवा त्यांचे थोरपण डागाळण्याची संधी संबंधितांनी साधून घेतली. अन या चर्चांची प्रतिक्रिया म्हणून अंत्यसंस्कारानंतर शाहरुख खान थुंकल्याची चर्चा सुरू झाली. हे सगळेच विलक्षण केविलवाणे आणि किळसवाणे आहे.

महापुरुषांचा नीट विचार करण्याची सवयच आपल्याला नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कोणताही महापुरुष हा त्याच्या विशिष्ट कार्याच्या संदर्भात मोठा आणि आदरणीय असतो. त्याची ती थोरवी मान्य असणे वेगळे आणि त्याचे देव्हारे माजवणे वेगळे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महापुरुषाच्या तसबिरी घरात लावणार नाही किंवा त्या तसबिरी लावून मिरवणार नाही. त्या त्या महापुरुषाबद्दलचा आदर व्यक्त करायला त्याचे गुणगान सगळ्यांनी केलेच पाहिजे असेही नाही. असा विचार करणे हाच कोतेपणा आणि अपरिपक्वता आहे.

महापुरुषांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्या विचार आणि व्यवहारातील काही बाबी तात्कालिक असतात, काही धोरणात्मक असतात, काही सहेतुक असतात, काही सत्यान्वेषी असतात, काही कालसापेक्ष असतात, तर काही कालनिरपेक्ष असतात. विशेषतः कालनिरपेक्ष असतो तो त्यांचा भाव. याला कोणताही महापुरुष अपवाद नसतो. प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, चाणक्य, अशोक, शिवाजी महाराज, टिळक, गांधी, सावरकर, हेडगेवार, आंबेडकर, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर... अगदी कोणीही अपवाद नसतात. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या लिखाणाचा, त्यांच्या वक्तव्यांचा, त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या भूमिकांचा, त्यांच्या कृतींचा नीट, साक्षेपाने विचार करणे; तशी मांडणी करणे; त्यातील टिकाऊ आणि टाकाऊ समजून घेणे; ही समाजाच्या परिपक्वतेची कसोटी असते. आपण समाज म्हणून यात खूपच कमी पडतो हे मान्य करण्याला पर्याय नाही.

तसेच प्रतिक्रियावादी लोकांचेही असते. शाहरुख खानने अंत्यदर्शन घेताना त्यांच्या पद्धतीने फुंक मारली. पण ती थुंक होती असा जावईशोध लावून राळ उडवून देणे हे, दीदींवर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा कंडू शमवून घेण्यापेक्षा वेगळे काहीही नाही. सगळ्यांना ती पद्धत माहिती असण्याची गरज नाही, पण एक लोकप्रिय अभिनेता किमान आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एवढीही समज असू नये. बरे असे केल्याने, दीदींबद्दल आक्षेपार्ह लिहिणारे, बोलणारे जे आहेत त्यांच्या त्या कृतीला आक्षेप घेण्याचा स्वाभाविक अधिकारही आपण गमावून बसतो हेही प्रतिक्रियावाद्यांना ध्यानात येऊ नये? तुझं माझं या वृत्तीने आम्ही समाज म्हणून गचाळ स्तराला येऊन पोहोचलो आहे हेच खरे.

- श्रीपाद कोठे

सोमवार, ७ फेब्रुवारी २०२२

काळ बदलतो

'लोकमत'च्या कार्यक्रमात काल रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण झाले. काळ कसा बदलतो हे पाहून मौज वाटली. साधारण ४० वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कॉलनीत संघाचे वातावरण होते, पण आजूबाजूला सगळीकडे संघद्वेषच. आमच्या वस्तीत दुकाने नव्हती. थोडे बाजूला झोपडपट्टी सारख्या वस्तीत एक बऱ्यापैकी किराणा दुकान होते. 'झोपडीचे दुकान', 'मामाजीचे दुकान', 'वाघमारेचे दुकान' म्हणून त्याला ओळखत. महिन्याचा किराणा महाल वा बर्डी वरून येत असला तरी, एखाद्या वेळी या दुकानातही लोक जात असत. आमची वस्ती साधारण 'तरुण भारत'वाली, तर या दुकानात लोकमत येत असे. दुकानात गेलं की समोर ठेवलेला लोकमत सहज चाळला जाई. एकदा असाच या दुकानात गेलो होतो. दसऱ्याच्या दोन तीन दिवस आधीचा दिवस असेल. समोरचा लोकमत चाळला अन उडालोच. पहिल्याच पानावर लीड स्टोरी होती - 'संघ मुख्यालयात सरसंघचालक पदासाठी हाणामारी'. त्यात बाळासाहेब देवरस, आबाजी थत्ते, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, यादवराव जोशी, भाऊराव देवरस; अशी त्या काळातील संघातील दिग्गज नावे होती. या सगळ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची कशी हाणामारी झाली याचं रसभरीत वर्णनही बातमीत होतं. मला प्रश्न पडला होता, कालच मी माझ्या गणातील स्वयंसेवकांचे गणवेशाचे सामान आणायला कार्यालयात गेलो होतो. तिथे काहीच गडबड, गोंधळ नव्हता. बातमीत नाव असलेले अनेक जण नागपुरात सुद्धा नव्हते. भांडार वेळेवर उघडले होते. भांडार प्रमुख रंगनाथजी व्यवस्थित सामान देत होते, हिशेब ठिशेब करत होते. पुष्कळ जण येत जात होते. गप्पागोष्टी होत होत्या. अन आता ही बातमी? असो. काळ बदलत असतो. हो काळ।बदलत असतो. काल होता तो आज नाही. अन आजचा उद्या नसेल.

- श्रीपाद कोठे

७ फेब्रुवारी २०२२

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

साहित्य संमेलन व राजकारणी

साहित्य संमेलनात अध्यक्षांचे भाषण पाचच मिनिटे झाले आणि मुख्यमंत्र्यांचे अर्धा तास. असे व्हायला नको होते अशी पोस्ट मी काल टाकली. त्यावर प्रतिक्रिया आल्या. त्यावर तिथेच उत्तर देता आले असते पण ते अधिक लोकांपर्यंत पोहोचले नसते. म्हणून प्रतिक्रियांमध्ये आलेल्या दोन मुद्यांवर ही स्वतंत्र पोस्ट.


दोन महत्वाचे मुद्दे पुढे आले ते असे : १) सरकारने साहित्य संमेलनाला पैसे देऊ नयेत. २) साहित्यिकांनी आपल्या भरवशावर संमेलने करावीत. या दोन्ही प्रतिक्रिया अपरिपक्व आणि उथळ आहेत. समाजाला भाषिक, भावनिक, बौद्धिक, वैचारिक, माहितीपर, तात्विक, राजकीय, आध्यात्मिक संपन्नता प्रदान करीत असूनही; साहित्य ही टाकावू आणि निरर्थक किंवा किमान पक्षी फारशी महत्त्वाची नसलेली बाब आहे; असे अनेकांचे मत असते. असे मत बाळगणाऱ्या लोकांना गंभीरपणे घेण्याची अजिबातच गरज नाही. मात्र, साहित्याचे महत्व आहे हे मान्य करूनही संमेलनासाठी सरकारी मदत घेऊ नये असे जे म्हणतात त्यांना प्रश्न करावासा वाटतो की, साहित्यासाठी ते काय करतात? सरकारी मदत घेऊ नये किंवा सरकारने मदत देऊ नये, असे म्हणणाऱ्या किती जणांच्या घरी स्वतःचे किमान शंभर पुस्तकांचे ग्रंथालय आहे? साहित्याचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन समाजातील किती लोक साहित्य संमेलनासाठी फूल ना फुलाची पाकळी देतील? छोट्यामोठ्या धार्मिक आयोजनासाठी शेकडो लोकांच्या जेवणाची नि:शुल्क व्यवस्था करणारे किती दाते, साहित्यविषयक आयोजनासाठी आपला हात मोकळा सोडतील?


आणखीन एक मुद्दा : साहित्यिकांना आदर्शवादी व्हायला सांगणारे लोक, राजकीय नेत्यांनी आदर्शवादी व्हावे असे का म्हणू शकत नाहीत? राजकीय नेत्यांनी आदर्शवादी नसणे समजून घेणे अवघड नाही. दिलेल्या पैशाच्या बदल्यात (तो स्वतःच्या खिशातून दिला नसला तरीही) सौदेबाजी करणे समजू शकते. परंतु समाज म्हणून, सामान्य नागरिक म्हणून; राजकारण्यांनी सौदेबाजी बंद करावी हे परखडपणे का बोलू नये? समाजाने शेपूट का घालावे? मुळात आपण समाज म्हणून विचारशून्य आणि सुमार झालो आहोत. आपले विचार, आपले सत्व आपण गुंडाळून ठेवले आहे. सरकारी मदतीशिवाय साहित्य संमेलन घडवून आणण्यासाठी जी मदत लागेल ती द्यायला समाज किती तयार आहे? आणि सरकारने साहित्य संमेलनाला मदत का करू नये? या दोन्ही प्रश्नांवर सल्ले देणाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नाहीत.


वास्तविक राजकारणी लोकांनी अधिक विचारी व्हायला हवे. आम्ही मदत देऊ पण मंचावर बसणार सुद्धा नाही, अशी भूमिका घ्यायला कोणी मना केले आहे का? ज्या ठिकाणी विषय आणि आयोजन यांचा थेट संबंध नसेल तिथे तिथे सार्वजनिक कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये बसू; हा आदर्शवाद राजकीय नेत्यांनी विकसित करायला हवा. अन् समाजानेही त्यासाठी आग्रही राहावे. त्याऐवजी राजकारणापुढे लोटांगण घालणारा समाज हा समाजच म्हणता येणार नाही. सध्या सुसंस्कृत, सभ्य समजल्या जाणाऱ्या पक्षाचे सरकार आहे. आर्थिक विकासाबरोबरच आदर्श राजकीय सामाजिक संस्कृतीचा विकास करण्याकडेही त्या पक्षाने आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्ष द्यावे. राजकारणी नेत्यांना डोक्यावर बसवणाऱ्या समाजाला योग्य ते वळण लावण्यात स्वतःच पुढाकार घ्यावा. त्या पक्षाला हे करता येईल का?

- श्रीपाद कोठे

५ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

ठेकेदार

'गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून' या साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आहेत. यावरून अनेकांचा पोटशूळ उठला आहे. सगळी गंमतच म्हणायची. गांधी विनोबा यांच्यावरचा एकाधिकार संपण्याची भीती हे कारण तर आहेच. पण या हताशेत आपलीच वैचारिक विसंगती कळू नये एवढ्या तळाशी लोक गेले आहेत हे दुर्दैव आहे. विचारांची मांडणी, चिकित्सा वगैरे तर खूपच दूर; पण साधी सोबत, समन्वय, एकत्र येण्याची इच्छा; या प्राथमिक मानवीय गोष्टी सुद्धा आंधळ्या द्वेषापायी आपण सोडून देत आहोत हेही अशा लोकांना लक्षात येऊ नये? अन् तरीही गांधी विनोबांचे आपणच ठेकेदार आहोत हा दंभही सुटू नये? खरंच हे जग मोठं गमतीशीरच आहे.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३

जीवन प्रवाह

सध्या आर्थिक विषयांची चर्चा खूप सुरू आहे. सहज मनात विचार आला की, या सगळ्या अर्थकारणाचं वय किती आहे? रिझर्व्ह बँकेला अजून ९० वर्षेसुद्धा झालेली नाहीत. रिझर्व्ह बँक ही अर्थकारण नियंत्रित करणारी व्यवस्था आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापूर्वी देश, समाज, माणसे, लोक, त्यांचे व्यवहार, उद्योग, व्यापार, उत्पादन, सेवा, कृषी, शिक्षण, आरोग्य... इत्यादी इत्यादी इत्यादी अस्तित्वातच नव्हतं का? तर सगळंच होतं. समाज, माणसे आणि त्यांचे व्यवहार हे सगळंच होतं. उदाहरण म्हणून काही नावेच घ्यायची तर - काँग्रेसची स्थापना; संघाची स्थापना; टिळक, विवेकानंद आदींचे अवतारकार्य; वंगभंग; वृत्तपत्रे; अशा अनेक गोष्टी त्यापूर्वीच्या आहेत. मुद्दा एवढाच की, व्यवस्था येत जात राहतात. उभ्या राहतात वा मोडून पडतात. त्यांचे महत्त्व आणि परिणाम तात्पुरते असतात. समाज जीवनाचा प्रवाह वाहतच राहतो. दुसरा मुद्दा हा की, संघटित सूत्रबद्ध आर्थिक रचना नसतानाही समाज व्यवस्थित राहू शकतो. गुण दोष, फायदे तोटे प्रत्येकच अवस्थेत असतात. त्याने आनंदून वा गडबडून जाण्यात अर्थ नसतो. माणूस, जीवन, जीवनप्रवास आणि जीवनप्रवाह; याकडे लक्ष देत राहिलं की बास.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

हेकेखोर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाशिवाय होऊच द्यायचे नाही असा काही लोकांचा कावा आहे की काय अशी शंका वावगी ठरू नये. यावर्षी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यावरून वादाला संधी न मिळाल्याने; भूमिपूजन, दिंडीतल्या पताका, भाजप नेत्यांच्या हातून सत्कार किंवा पैसा स्वीकारूनही गांधींच्या मारेकऱ्यांचे खुसपट काढणे; असे प्रकार भूषणावह नाहीत. आम्ही म्हणतो त्याच पद्धतीने जग चालायला हवं, असा हेका ही विकृती आहे. ज्या ज्या वेळी, ज्या ज्या ठिकाणी, जे जे लोक असतील; त्यांच्या आवडी, इच्छा, पद्धती, मान्यता, धारणा; यानुसार ते ते प्रसंग होऊ द्यावे. आपल्या हाती सूत्रे असतील तेव्हा आपल्या पद्धतीने करावे. पण विनाकारण वाद घालणे, संघर्ष करणे, बरोबर आणि चूक यांचा निवाडा करणे; हे हास्यास्पद आणि चीड आणणारे असते. हेकेखोरांनी थोडे सहिष्णू व्हावे आणि सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा मान राखावा.

- श्रीपाद कोठे

२ फेब्रुवारी २०२३