मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

केविलवाणे, किळसवाणे

तुझं माझं करण्याच्या वृत्तीने आपण समाज म्हणून अतिशय गचाळ स्तरावर आलो आहोत. अशी वृत्ती नसणारे नाहीत असं अजिबातच नाही. पण - एक तर त्यांची संख्या कमी आहे; दुसरे म्हणजे त्यांना फार गांभीर्याने कोणी घेत नाही; अन तिसरे म्हणजे सारासार विचार करणाऱ्यातील अनेक जण selective असतात आणि प्रतिक्रियावादी असतात. त्यांचा सारासार विचार विशिष्ट लोक, विशिष्ट घटना असाच असतो आणि पुष्कळदा प्रतिक्रियेची उबळ इतकी जास्त असते की, सारासार विचारांचा आब राखण्याची त्यांना गरज वाटत नाही.

काल लता दीदींनी या जगाचा निरोप घेतल्यावर याच गचाळ वृत्तीचे बटबटीत दर्शन झाले. त्यांच्यावर गरळ ओकणारे आणि त्यांच्याबद्दल आदर असणारे दोन्ही बाजूंनी हे घडले. कथित दलित वर्गातील काहींचा आक्षेप त्यांनी डॉ. आंबेडकर यांची गाणी म्हटली नाहीत याला होता. तर हिंदुत्व विरोधकांचा आक्षेप त्यांचे सावरकर प्रेम याला होता. अन तेवढ्यावरून लता दीदींवर टीका करण्याची किंवा त्यांचे थोरपण डागाळण्याची संधी संबंधितांनी साधून घेतली. अन या चर्चांची प्रतिक्रिया म्हणून अंत्यसंस्कारानंतर शाहरुख खान थुंकल्याची चर्चा सुरू झाली. हे सगळेच विलक्षण केविलवाणे आणि किळसवाणे आहे.

महापुरुषांचा नीट विचार करण्याची सवयच आपल्याला नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कोणताही महापुरुष हा त्याच्या विशिष्ट कार्याच्या संदर्भात मोठा आणि आदरणीय असतो. त्याची ती थोरवी मान्य असणे वेगळे आणि त्याचे देव्हारे माजवणे वेगळे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महापुरुषाच्या तसबिरी घरात लावणार नाही किंवा त्या तसबिरी लावून मिरवणार नाही. त्या त्या महापुरुषाबद्दलचा आदर व्यक्त करायला त्याचे गुणगान सगळ्यांनी केलेच पाहिजे असेही नाही. असा विचार करणे हाच कोतेपणा आणि अपरिपक्वता आहे.

महापुरुषांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्या विचार आणि व्यवहारातील काही बाबी तात्कालिक असतात, काही धोरणात्मक असतात, काही सहेतुक असतात, काही सत्यान्वेषी असतात, काही कालसापेक्ष असतात, तर काही कालनिरपेक्ष असतात. विशेषतः कालनिरपेक्ष असतो तो त्यांचा भाव. याला कोणताही महापुरुष अपवाद नसतो. प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, चाणक्य, अशोक, शिवाजी महाराज, टिळक, गांधी, सावरकर, हेडगेवार, आंबेडकर, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर... अगदी कोणीही अपवाद नसतात. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या लिखाणाचा, त्यांच्या वक्तव्यांचा, त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या भूमिकांचा, त्यांच्या कृतींचा नीट, साक्षेपाने विचार करणे; तशी मांडणी करणे; त्यातील टिकाऊ आणि टाकाऊ समजून घेणे; ही समाजाच्या परिपक्वतेची कसोटी असते. आपण समाज म्हणून यात खूपच कमी पडतो हे मान्य करण्याला पर्याय नाही.

तसेच प्रतिक्रियावादी लोकांचेही असते. शाहरुख खानने अंत्यदर्शन घेताना त्यांच्या पद्धतीने फुंक मारली. पण ती थुंक होती असा जावईशोध लावून राळ उडवून देणे हे, दीदींवर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा कंडू शमवून घेण्यापेक्षा वेगळे काहीही नाही. सगळ्यांना ती पद्धत माहिती असण्याची गरज नाही, पण एक लोकप्रिय अभिनेता किमान आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एवढीही समज असू नये. बरे असे केल्याने, दीदींबद्दल आक्षेपार्ह लिहिणारे, बोलणारे जे आहेत त्यांच्या त्या कृतीला आक्षेप घेण्याचा स्वाभाविक अधिकारही आपण गमावून बसतो हेही प्रतिक्रियावाद्यांना ध्यानात येऊ नये? तुझं माझं या वृत्तीने आम्ही समाज म्हणून गचाळ स्तराला येऊन पोहोचलो आहे हेच खरे.

- श्रीपाद कोठे

सोमवार, ७ फेब्रुवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा