गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

अहो कुमार विश्वास...

अहो डॉ. कुमार विश्वास, जरा भानावर या. तुम्ही उज्जैन नगरीत रामकथा करताहात. तिथे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे काही बरळलात त्याबद्दल म्हणतोय मी. तुमच्यासोबत काम करणाऱ्या कोणा एका कार्यकर्त्याने तुम्हाला विचारलं की, अर्थसंकल्प कसा हवा? अन् त्यावरून महाभारत झालं. आपण किती महान आहोत आणि तू किती तुच्छ आहेस हे दाखवण्याची प्रबळ उर्मी तुमच्यात उसळली. अन् तुम्ही त्याला शहाणपण सांगितलं की, तुम्ही रामराज्य आणलं आहे तेव्हा रामराज्यासारखा अर्थसंकल्प हवा. तुम्ही विद्वान आणि तो कस्पटासमान हे तर आहेच. त्याच न्यायाने त्या सामान्य कार्यकर्त्याने सामान्य प्रतिप्रश्न केला की, रामराज्यात अर्थसंकल्प होता का? आपल्या संस्कृतमध्ये म्हणतात - बालादपी सुभाषितं ग्राह्यम. त्या बिचाऱ्या बालबुद्धी कार्यकर्त्याच्या तोंडून सत्य तेच बाहेर पडलं. परंतु आपल्या राजकीय बुद्धिमत्तेचा आणि चतुराईचा फुगा असा अनपेक्षित फुटल्यावर आपला तिळपापड झाला आणि आपण चक्क संपूर्ण रा. स्व. संघावर घसरलात. अन् अर्थसंकल्प आणि रामायणाची गाडी चक्क वेदांवर नेऊन ठेवली. बरं, गाडी वेदांवर वळवली तर वळवली, पण आपला अपमान झाला ही तुमच्या डोक्यातील तिडीक इतकी मोठी की, तुम्ही संघाच्या लोकांसाठी अडाणी, निरक्षर वगैरे शब्द वापरले. महोदय; तुम्हाला राग येईल पण मला तुम्हाला सांगू द्या; तुमच्या या एका कृतीमुळे तुम्ही; अर्थकारण, रा. स्व. संघ आणि एकूण मानवी जीवन या तिन्ही बाबतीत अडाणी आणि निरक्षर आहात हे दाखवून दिलं.

त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाला सरळ सरळ उत्तर न देता बगल देण्याचा आणि बगल देताना बौद्धिक चमत्कृती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न केविलवाणा आहे. तुम्हाला अर्थकारण समजत नाही आणि अनपेक्षित प्रसंग उद्भवला तर तो कसा हाताळावा हेही समजत नाही हे या निमित्ताने जगाने पाहिलं. राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिक क्षमतेचा. तर डॉ. विश्वास, तुमच्यासारखे अनेक विद्वान निष्प्रभ ठरतील अशी विद्वत्ता संघाकडे भरपूर आहे. तुम्हाला त्याची माहिती नसणे हे तुमचे अज्ञान आहे. वेद वगैरे क्षणभर बाजूला ठेवा पण तुम्हाला वर्तमानाची माहितीही नाही हे खेदजनक आहे. कोणतीही संघटना, संस्था, चळवळ, कार्य; ही एक गुंतागुंतीची आणि व्यामिश्र बाब असते. नेते आणि कार्यकर्ते यांचेही अनेक स्तर असतात. असंख्य कमीअधिक विविधांगी क्षमता असतात. त्यामुळे सरधोपट निष्कर्ष काढणे चूक असते. तुमच्यासारख्या स्वनामधन्य विद्वानाला हे कळत नाही हे या समाजाचं दुर्दैव आहे.

परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा आणि त्या बुद्धीचा वापर करण्याच्या कौशल्याचा उपयोग लाखो आणि करोडो रुपये कमावण्यासाठी करण्याशिवाय अन्य काय केला आहे आपण? तुमच्या गॉगल किंवा बुट किंवा घड्याळाच्या किमतीपेक्षा कमी खर्च आपल्या महिन्याभराच्या जेवणावर करूनही समाजासाठी झिजणारे, समाजासाठी भरीव काही करणारे, समाजाचा विचार करणारे आणि त्या बदल्यात कपर्दिकेची अपेक्षा न बाळगणारे लाखो लोक संघाकडे आहेत. त्यांनी वेद वाचले की नाही हे महत्त्वाचे नाहीच, ते वेद जगतात हे आज जग पाहत आहे. आमच्या निरक्षर तुकोबाने त्यावेळच्या डॉ. विश्वासांना खडसावून सांगितले होते - वेदांचा तो अर्थ, आम्हासीच ठावा. आज तुम्हाला तेच सांगण्याची गरज आहे आणि मी ते सांगतो आहे.

अन् तुम्ही आहात तरी कोण हो? एक कांचनलोभी अभिनेता. दुसरे काय? कधी अत्याधुनिक पोशाख करून सामान्य वकुबाच्या लोकांच्या टाळ्या मिळवणारे कवी किंवा वक्ते, तर कधी धोतर टिळा परिधान करून रामकथा सांगणारे (ढोंगी) कथाकार. कविता किंवा विचार काय अथवा रामकथा काय; तुमच्यासाठी फक्त पैसा मिळवण्याचे साधन. एक लक्षात ठेवा, तुमच्यासाठी रामकथा हे पैसा मिळवण्याचे साधन आहे; तर संघाच्या लाखो लोकांसाठी रामकथा ही जीवननिष्ठा आहे. ते समजण्यालाही तुम्हाला अजून काही जन्म घ्यावे लागतील. तुम्ही आज जो भगव्याचा आव आणता आहात ना, तो तुम्हाला निर्वेधपणे आणता येतो तो तुमच्या मते अडाणी असलेल्या संघाच्या असंख्य लोकांमुळेच हे विसरू नका. आज सकाळीच एका दुकानदाराशी बोलणं झालं. एक काळ होता की, भगवे ध्वज घ्या म्हणून हेच अडाणी कार्यकर्ते घरोघरी जात असत. त्यांनाही फार प्रतिसाद मिळत नसे. कधी कधी तर तो भगवा ध्वज घेऊन सुद्धा घरावर लावत नसत. जनसंघ किंवा विश्व हिंदू परिषदेच्या भगव्या टोप्या कार्यकर्ते सुद्धा खिशात ठेवत असत. मग कोणीतरी हिम्मत करून ती टोपी डोक्यावर चढवी आणि मग दोनचार लोक ती घालत. ज्या भगव्याच्या जीवावर आज तुम्ही नाटके करीत आहात, त्याचं नेपथ्य असंख्य अनाम अडाणी लोकांनी तयार केलं आहे हे, कांचनलोभी डॉ. विश्वास विसरू नका. इतकेही कृतघ्न होऊ नका.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २३ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा