रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

अक्षयाचे प्रकटणे

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो तर घरकाम करणाऱ्या बाईने वरून आवाज दिला, `हे पाहा इथे काय आहे ते.’ गच्चीवर गेलो आणि पाहिलं तर एक पक्षी निष्प्राण पडला होता. गच्चीत आलेल्या आंब्याच्या फांदीच्या खाली तो छोटासा पक्षी रात्री केव्हा तरी पडला असावा. त्या मोठ्ठ्या आंब्यावर अनेक पाखरं रोजंच रात्री वस्तीला असतात. दिवसभर बागडणारेही अनेक असतात. दिवसा कोण असतात, रात्री कोण असतात वगैरे काही मी पाहिलेलं आणि नोंदवलेलं वगैरे नाही. मी फक्त त्यांचं बागडणं पाहत असतो, त्यांचे खेळ पाहत असतो, त्यांची गाणी- आरडाओरडा ऐकत असतो आणि त्यांचं असणं भोगत असतो. त्यामुळे निष्प्राण पडलेला तो पक्षी कोणता होता हे काही मला सांगता नाही येणार. अंगणातले पेरू, आंबे माझ्यासोबतच खाल्लेला, माझ्यासोबतच श्वास घेणारा तो एक मध्यमवयीन पक्षी रात्री केव्हातरी मरून पडला होता. आपण पक्षी असे पडलेले कधी पाहत नाही. सदा उड्या मारत किंवा पंखात हवा भरून हवेत भरारी मारत असलेले पक्षी पाहण्याची आपल्याला सवय. त्यामुळे तर त्याचं ते दर्शन फारच केविलवाणं वाटत होतं. चैतन्याने रसरसलेले त्याचे दाट पंख चैतन्य गमावून बसले होते. तो पक्षी आधी हे जग सोडून गेला आणि त्यामुळे फांदीवरून पडला की, फांदीवरून पडल्याने त्याने जगाचा निरोप घेतला माहीत नाही. जिवंत पक्षी फांदीवरून असा पडून जाईल असं नाही वाटत. शिवाय पडला असता तर एकदम गतप्राण नसता झाला. कारण फांदी आणि गच्ची यात काही फार अंतर नाही. अंतर फार असतं तर कदाचित तो पडता पडता उडून वर गेला असता. पडून जखमी झाला असता तर जखमांच्या खुणा दिसल्या असत्या. त्याने काही धडपड केली असती. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न केला असता. वेदना झाल्या असत्या तर त्यांचं दर्शन त्याच्या कायेवर झालं असतं. पण तसं काहीही नव्हतं. झोपल्यासारखा वाटत होता असंही म्हणता येत नाही कारण पक्षी झोपलेले कधी पाहिलेले नाहीत. अर्थात पाहिले नसले तरी ते बसल्याबसल्याच झोपत असावेत, आडवे होत नसावेत. हा आडवा होता आणि प्राणहीन. म्हणजे नक्कीच प्रथम त्याने प्राण सोडला आणि मग तो खाली पडला. कसा गेला असेल त्या पक्ष्याचा प्राण? हृदयविकाराने? पक्ष्यांनाही हृदय असतं, त्यामुळे हृदयविकार असू शकतो. पण पक्ष्यांना तर ताणतणाव वगैरे नसतात, मग हृदयविकारही असायला नको. कोणास ठाऊक. रात्रीची वेळ असल्याने पक्ष्यांचं आपसात काही भांडण वगैरे होण्याचीही शक्यता नाही. एक मात्र खरं की काल रात्रीपर्यंत त्या आंब्याच्या फांदीखाली काहीही नव्हतं आणि आज सकाळी तेथे एक पक्षी मरून पडला होता.

त्याला खाली घेऊन गेलो. झाडाखाली थोडंसं खोदलं. त्याची निर्जीव कुडी त्यात ठेवली. वरून माती सारखी केली आणि हात जोडले. तो माणूस नव्हता म्हणून काय झाले? त्याच्यातील आणि माणसातील चैतन्य तर एकच आहे. ज्या शक्तीने माणूस जन्माला घातला त्याच शक्तीने त्या पाखरालाही जन्मास घातले होते. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते पाखरू माणूस नसले तरीही मी माणूस होतो. माझ्यासोबत फळे खाणारं, माझ्यासोबत श्वास घेणारं ते पाखरू हे जग सोडून जात असताना त्याला सद्गती लाभावी अशी प्रार्थना करणं; माझं माणुसपण जिवंत ठेवणारं होतं. सहज विचार आला, याच्या अंत्ययात्रेला आपण दोघेच- मी आणि काम करणाऱ्या बाई. त्यांच्यापैकी कोणी नाही. खरंच कसं असेल पक्षी जातीचं मरण? काय असेल पक्ष्यांसाठी मरणाचा अर्थ आणि आशय? काय प्रतिक्रिया राहत असेल त्यांची? ज्या पंचमहाभूतातून कुडी साकारली त्या पंचमहाभूतात जमेल तसे विरून जाणे... बास... एवढेच आणि इतकेच. अंत्ययात्रा, अंत्यसंस्कार, वृत्तपत्रात बातमी, सुतक, श्राद्ध-पक्ष, जन्ममृत्यूची नोंदणी, दाखला वगैरे काही नाही. नावगाव, मालमत्ता, हिस्सेवाटे, मृत्युपत्र; अगदी काहीही नाही. माणूस करतो त्यातलं काहीही नाही. जन्म आणि मृत्यू मात्र सारखेच. अवयवांची हालचाल म्हणजे जन्म आणि अवयवांची हालचाल थांबणे म्हणजे मृत्यू. कोण होता? कुठून आला होता? कुठे गेला? का आला होता? उत्तरे नसलेले सनातन प्रश्न. जन्मक्षणापासून हाती घेतलेला हात कधीही न सोडणारा अखंड सखा म्हणजे मृत्यू. सदा सोबत करूनही तो फक्त एकदाच साक्षात होतो आणि तेही न सांगता सवरता, अनपेक्षितपणे. कोणी त्याला मृत्यू म्हणतं, कोणी काळ, कोणी यम तर अन्य कोणी यमदूत. प्रत्येकाचा हा काळ वेगळा असतो की एकच? माझ्याही सोबत तो असावा, असतोच, नव्हे आहेच. कधी प्रकट होईल ते मात्र कोणालाच ठाऊक नाही. काल रात्री मात्र मी झोपलो असताना माझ्या डोक्यावर तो साक्षात प्रकट झाला होता. विज्ञान म्हणतं हे सगळं विश्व काळ, अवकाश आणि निमित्त इतकंच आहे. त्यातील अवकाश आणि निमित्त कमीजास्त होताना आपण अनुभवतो. काळ मात्र अक्षय आणि अविनाशी आहे. काल तो माझ्या जवळ येऊन गेला. त्याला पाहायचं मात्र राहूनच गेलं.

- श्रीपाद कोठे

- नागपूर

- बुधवार, २६ फेब्रुवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा