शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

चार 'स' मार्ग

माणसाच्या जगण्याचे चार 'स' मार्ग असतात. १) संसाराचा मार्ग, २) सामाजिकतेचा मार्ग, ३) संन्यास मार्ग, ४) सत्य मार्ग. पैकी संसाराचा मार्ग हा बहुसंख्य लोकांचा मार्ग असतो. सामाजिकतेचा मार्ग त्याहून बऱ्याच कमी लोकांचा असतो. संन्यास मार्ग त्याहूनही कमी लोकांचा असतो. तर सत्य मार्ग हा तुरळक लोकांचा मार्ग असतो. या चारही मार्गांवरून चालणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला वाटतं की, आपण हा मार्ग निवडला आहे. त्यानंतर वाटचाल करताना बहुतेक प्रत्येकाला प्रश्न पडतो की, मी हा मार्ग का धरला? अन् कधीतरी कळतं की, मुळात आपला मार्ग आपण निवडतच नाही. मार्ग आपोआप आपल्यासमोर येतो आणि आपण त्यावर चालत राहतो.

प्रत्येक मार्गाची आपापली भाषा असते. प्रत्येक मार्गाच्या आपापल्या खुणा असतात. प्रत्येक मार्गाचे रुप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा अस सगळं वेगवेगळं असतं. यातील पहिले तीन मार्ग एकमेकांशी कुठे कुठे जोडलेले असतात. त्या जोडमार्गांनी या तिन्ही वाटांच्या वाटसरुंना अन्य मार्गाबाबत थोडीबहुत माहिती होत असते. एकमेकांचा आणि एकमेकांच्या मार्गांचा थोडाबहुत परिचय होत असतो. त्यामुळे त्यांच्यात कमीअधिक संवाद होतो, होऊ शकतो. हे तिन्ही मार्ग कुठेतरी जाऊन थांबतात. तो dead end असतो. त्यामुळे वाटसरू पुन्हा पुन्हा मागे पुढे फिरत राहतात. पुन्हा पुन्हा आपला आणि अन्य मार्ग; तसेच आपल्या आणि अन्य मार्गावरील वाटसरू यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. कधी त्यांना त्यात रस वाटतो तर कधी ते कंटाळवाणे होते. त्यांचे चालणे मात्र सुरूच राहते. अखंडपणे.

चौथा सत्य मार्ग मात्र पुष्कळच वेगळा असतो. तो या तीन मार्गांना समांतर असतो पण कुठेही जोडलेला नसतो. त्याचे रूप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा, गरजा, भाषा, खुणा सगळं अन्य मार्गांपेक्षा तर वेगळं असतंच पण त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या या गोष्टीही वेगवेगळ्या असतात. कधी कधी एकमेकींशी या बाबी थोड्याबहुत जुळल्या तर त्यांच्यात देवाणघेवाण होते. पण अनोळखीपण हेच या मार्गाचे वैशिष्ट्य असते. या मार्गाचे वाटसरू एकमेकांना अनोळखी असतात. अन्य तीन मार्गांना हा मार्ग समांतर असल्याने आणि मुळात या मार्गावर तुरळक वाटसरू असल्याने; या मार्गाचे वाटसरू अन्य मार्गांचे आणि त्यावरील वाटसरुंचे निरीक्षण आणि अध्ययन करू शकतात. शिवाय या मार्गाचे बहुतेक वाटसरू पहिल्या तीन मार्गांवरूनच कुठून तरी तिथे उडून आलेले वा फेकले गेलेले असतात. अनोळखी आणि रिकामा असल्याने या मार्गावर मौज अधिक असली तरी, अनामिक अस्वस्थता मात्र भरपूर असते. अनुकरणाला काहीही वाव नसतो. प्रत्येक वाटसरू आपला राजा असतो. हा मार्ग आणि त्यावरचे वाटसरू हे अन्य मार्गांना आणि त्यावरील वाटसरूंना नेहमीच एक कोडे वाटत असते. अन्य मार्गांचे dead end जिथे असतात त्याच्या जवळच या मार्गाचीही समाप्ती असते. परंतु अन्य मार्ग अनुल्लंघ्य भिंतींनी जसे बंद झालेले असतात तसा हा मार्ग बंद झालेला नसतो. त्याच्या समाप्तीला तो एका आनंद सरोवरात पोहोचतो. या मार्गावरील वाटसरू मग त्या आनंद सरोवरात कायम विहार करत राहतात.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा