अध्यात्म हा भारताचा प्राण आहे. अध्यात्म वजा केल्यास भारताची शक्ती आणि श्रेष्ठत्व लयाला जाईल. पण तसे होणे कदापि शक्य नाही. कारण भारताची ही अध्यात्म आधारित शक्ती आणि श्रेष्ठत्व हाच जगाचा आधार आहे. कालप्रवाहात ही शक्ती आणि श्रेष्ठत्व कमी अधिक होत असतात. मात्र भारताची विशेषता ही की, वारंवार असंख्य श्रेष्ठ आध्यात्मिक विभूती जन्म घेतात आणि ही शक्ती आणि श्रेष्ठत्व पुन्हा स्थापित करतात. या विभूती आध्यात्मिकतेचा एक सशक्त प्रवाह प्रवाहित करतात आणि या विश्वाला नवसंजीवन प्रदान करतात. १९ व्या शतकात बंगालमध्ये जन्मलेले श्री रामकृष्ण परमहंस हे अशीच एक श्रेष्ठ विभूती होते.
बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरापासून अंदाजे १०० किमी अंतरावर असलेल्या हुगळी जिल्ह्यातील कामारपुकुर या गावी फाल्गुन शुद्ध द्वितीया या तिथीला, १७ फेब्रुवारी १८३६ रोजी ब्राम्ह मुहूर्ती (पहाटेस) रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गदाधर होते. त्यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चटोपाध्याय आणि आईचे नाव चंद्रादेवी होते. क्षुदिराम चटोपाध्याय गया क्षेत्री तीर्थयात्रेला गेले असताना त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले आणि 'मी तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्या घरी येईन' असे त्यांना सांगितले. १८३५ सालच्या या घटनेनंतर १८३६ साली गदाधराचा जन्म झाला. त्यावेळी क्षुदिराम ६१ वर्षांचे आणि चंद्रादेवी ४५ वर्षांच्या होत्या. गदाधराला रामकुमार आणि रामेश्वर असे दोन भाऊ, आणि कात्यायनी व सर्वमंगला अशा दोन बहिणी होत्या.
कामारपुकुरपासून जवळच असलेल्या देरे गावी क्षुदिराम राहत असत. तेथे त्यांची सुमारे ४३ एकर जमीन होती. त्या गावच्या जमीनदाराने एकदा त्यांना आपल्या बाजूने कोर्टात खोटी साक्ष देण्याची गळ घातली. परंतु धर्मनिष्ठ, देवभक्त, सात्विक वृत्तीच्या क्षुदिरामांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. त्याचा सूड म्हणून जमीनदाराने त्यांच्याच विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आणि त्यांचा सगळा जमीनजुमला गिळंकृत केला. अकिंचन आणि अनिकेत झालेले क्षुदिराम पत्नी व दोन मुलांना घेऊन कामारपुकुरला आले होते. कामारपुकुर हे त्यावेळी बऱ्यापैकी सधन आणि उद्योगी गाव होते तरीही रामकृष्णांचा परिवार मात्र ओढगस्तीतच एका सहृदय माणसाने दिलेल्या झोपडीतच राहात होता. क्षुदिराम यांची ईश्वरपरायणता, सात्विकता आणि विरागी वृत्ती मात्र अभंग होती.
लहानपणापासूनच गदाधराची स्मरणशक्ती अद्भुत होती. वडिलांच्या तोंडून ऐकलेली स्तोत्रे, गोष्टी, पूर्वजांची माहिती असे सगळे त्याला एकदा ऐकले की कायम लक्षात राहत असे. कामारपुकुरचे जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावच्या मुलांसाठी स्वखर्चाने सुरू केलेल्या शाळेत वयाच्या पाचव्या वर्षी गदाधराला दाखल करण्यात आले. सकाळी दोन तीन तास शाळेत, मग घरी जाऊन आंघोळ जेवण उरकायचे आणि दुपारी तीन वाजता शाळेत येऊन सूर्यास्तापर्यंत शाळा, असे शाळेचे स्वरूप होते.
ही शाळा एकशिक्षकी होती. सगळ्या मुलांना एकच शिक्षक शिकवीत. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेत, त्यांना मदत करत. लहान मुलांना खेळण्यालाही भरपूर वेळ दिला जाई. सुरुवातीला यदुनाथ सरकार आणि नंतर राजेंद्रनाथ सरकार हे गदाधराचे शिक्षक होते. लहानपणी गदाधर अवखळ होता. म्हणजे शाळेत न जाता सवंगड्यांबरोबर खेळत राहणे, कुठेतरी गावठी नाटक पाहायला जाणे; असेही तो करीत असे. एक मात्र होते की, जे काही असेल ते तो प्रामाणिकपणे सांगत असे. लपवाछपवी अजिबात नव्हती. त्याच्या स्वभावाचा आणखीन एक पैलू म्हणजे, त्याच्या मनाला पटेल अशा रीतीने त्याला एखादी गोष्ट समजावून दिली नाही तर ती गोष्ट तो कधीच ऐकत नसे. प्रत्येक वेळी बालकाची जिज्ञासा पूर्ण करणेही मोठ्यांना कठीण होत असे. काहीच दिवसात गदाधर जुजबी लिहायला वाचायला शिकला. अंकगणित मात्र त्याला अजिबात आवडत नसे. शाळेबाहेरही बालक अनेक गोष्टी शिकू लागला. कुंभाराकडे जाऊन देवादिकांच्या मूर्ती तयार करणे, चित्रं काढणे, नाटक करणे, कथा सांगणे; अशा अनेक गोष्टी गदाधर आत्मसात करू लागला. त्याची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती विलक्षण होती. नकला करणे, थट्टाविनोद करणे, बायांचे पुरुषांचे आवाज हुबेहूब काढणे यात गदाधर तरबेज होता. त्याच्या ठायी देवभक्तीही विशेष रूपाने होती. आपले वागणे, बोलणे, गाणे म्हणणे याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करीत असे.
वयाच्या सातव्या वर्षीच गदाधराला पहिल्यांदा भावावेश झाला होता. एकदा भातशेतांमध्ये भटकता भटकता काळ्या मेघांसमोरून उडत जाणारे शुभ्र बगळे पाहून तो इतका तन्मय झाला की त्याचे बाह्य भान लोपून तो वाटेतच पडून गेला. त्याला उचलून घरी नेण्यात आले. थोड्या वेळाने तो आपोआप पूर्वीसारखा सामान्य होऊन गेला. त्याला कसलाही त्रास झाला नाही. आईवडिलांना मात्र चिंता वाटली आणि ते औषधोपचार आदींचा विचार करू लागले.
याच दरम्यान इ.स. १८४३ च्या शारदीय दुर्गापूजेसाठी क्षुदीरामांना त्यांचा भाचा रामचंद्र बंदोपाध्याय याने आमंत्रित केले. त्यानुसार ते भाच्याच्या गावी गेले. तेथेच विजयादशमीला दुर्गा विसर्जन आटोपल्यावर काही वेळाने क्षुदिराम यांनी देह ठेवला. तेथेच त्यांच्यावर अंत्यक्रिया झाली. गदाधर वडिलांच्या अंत्यसमयी त्यांच्याबरोबर नव्हता. कामारपुकुरला दुसऱ्या दिवशी ही वार्ता कळली. वडिलांच्या वियोगाचा विषाद गदाधराच्या मनाला विचारशील आणि एकांतप्रिय करू लागला. गावातील आमराई, स्मशान अशा निर्जन जागी तो वेळ घालवू लागला. आईजवळ पूर्वीसारखा हट्ट करणे त्याने थांबवले.
जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावात एक धर्मशाळा बांधली होती. कामारपुकुरच्या रस्त्याने जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू, साधूबैरागी या धर्मशाळेत मुक्काम करत असत. गदाधर या धर्मशाळेत जाई. तिथल्या साधूबैराग्यांना लाकडे आणणे, पाणी आणणे अशा कामात मदत करत असे. काम नसले की त्यांचे वागणे, बोलणे, चर्चा, ध्यानधारणा, उपासना पाहत बसे, ऐकत बसे. सकाळ संध्याकाळचे धुनी पेटवणे, जी काही मामुली भिक्षा मिळाली असेल तीच रांधून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि तो प्रसाद ग्रहण करणे, काही शारीरिक कष्ट वा रोग असल्यास ईश्वरावर भार टाकून हसत हसत दु:ख सहन करणे, आपली गरज भागवण्यासाठीही कोणाला त्रास न देणे; असा त्यांचा व्यवहार तो निरखीत असे. त्याच वेळी साधूचा वेष करून लोक स्वार्थ आणि सुखासाठी कसे ढोंगीपणा करतात हेही त्याला पाहायला मिळे. धर्माची, शास्त्रांची, पुराणांची, ईश्वराची, अध्यात्माची, जगाच्या व्यवहाराची, जगाच्या नश्वरतेची माहिती, ज्ञान, तोंडओळख बालकाला या धर्मशाळेत होऊ लागली.
एकदा असाच साधूंचा एक गट धर्मशाळेत मुक्कामाला आला. चालण्याचे श्रम झाले असल्याने त्यांनी पुष्कळ दिवस तिथे मुक्काम केला. गदाधराची त्यांच्याशी छान ओळख झाली. एक दिवस त्यांनी त्याला अंगाला राख फासून, टिळे लावून सजवून घरी पाठवले. बालकाच्या आईला त्यामुळे चिंता वाटली. हे साधू लोक आपल्या मुलाला पळवून घेऊन गेले तर कसे या चिंतेने तिने गदाधराला धर्मशाळेत जायला मना केले. हे सांगायला बालक दुसऱ्या दिवशी तिथे गेला तेव्हा त्याचे ऐकून घेतल्यावर ते साधू त्याच्याबरोबर त्याच्या घरी आले. आपण बालकाला पळवणार नाही, साधूंच्या दृष्टीने तसे करणे पाप आणि भयंकर गुन्हा आहे; असे सांगून त्यांनी चंद्रादेवीची समजूत घातली.