सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (१२)

अद्वैत भावात दीर्घ काळ व्यतीत केल्यानंतर श्री रामकृष्णांच्या मनातील धर्माविषयीचा भाव अधिक घनीभूत आणि सर्वव्यापी झाला होता. एकांगीपणा तसाही नव्हताच, नंतर तर कोणाठायी एकांगीपणा दिसला तरीही त्यांना त्रास होत असे. अद्वैत साधना आणि नंतर त्याच भावात अवस्थित राहण्याच्या काळानंतर काहीच दिवसात एक सुफी फकीर दक्षिणेश्वरला आला. श्री रामकृष्ण त्या फकिराकडे आकृष्ट झाले. त्याच्याशी बोलताना त्यांना वाटले की, हाही तर ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे. कसा असेल हा मार्ग असे कुतूहल वाटून त्यांच्या मनाने घेतले की, आपण या मार्गानेही साधना करावी. मनात विचार येताच तो निश्चयात बदलला आणि त्यांनी आपले मन फकिराजवळ बोलून दाखवले. त्याच्याकडून दीक्षा घेतली आणि साधना सुरू केली.

नंतरच्या काळात याबाबत ते सांगत, 'त्यावेळी अल्ला मंत्राचा जप करीत असे. मुसलमानांप्रमाणे काचा न मारता धोतर नेसत असे. त्रिकाळ नमाज पढत असे. हिंदुभाव मनातून अजिबात लोपून गेल्याने हिंदू देवदेवींना प्रणाम करणे दूर, त्यांचे दर्शन घेण्याची देखील प्रवृत्ती होत नसे. असे तीन दिवस लोटल्यानंतर त्या मताच्या साधनेचे फळ हस्तगत झाले.' या साधनाकाळात त्यांना प्रथम लांब दाढी असलेल्या, गंभीर, ज्योतिर्मय पुरुषाचे दर्शन झाले. नंतर सगुण विराट ब्रम्हाची अनुभूती होऊन निर्गुण तुरीय अवस्थेत मन लीन होऊन गेले. या काळात त्यांना मुस्लिम लोकांप्रमाणेच आहार करण्याची इच्छा होत असे. इस्लाम साधनेच्या काळात ते कालीवाडीच्या आतही गेले नाहीत. व्यवस्थापक मथुरामोहन यांच्या बाहेर असलेल्या कोठीतच ते राहिले.

ज्यांच्याकडून श्री रामकृष्णांनी इस्लाम दीक्षा घेतली ते सय्यद वाजीद अली शाह हे सुफी फकीर होते. त्यांचे मूळ गाव डमडम. ते जन्माने हिंदू होते आणि त्यांचे नाव गोविंद होते. मात्र इस्लाम मताच्या आकर्षणाने त्यांनी त्या पंथाची दीक्षा घेऊन साधना केली होती. सुफी पंथाच्या नक्षबंदिया मुजद्दीदिया उपपंथाचे ते अनुयायी होते. अनेक वर्षे साधना करून ते त्या मार्गावरील गुरू म्हणून सर्वत्र परिचित होते. फारसी व अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वभावाने प्रेमळ असलेला हा फकीर सतत कुराणपठण करीत भावसाधनेत बुडलेला असे. ११ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्री रामकृष्णांच्या या इस्लाम साधनेबद्दल इस्लाम अनुयायांचे मत काय आहे असाही एक प्रश्न निर्माण होतो. Shri Ramakrishna's Sufi Sadhana या लेखात मौलाना मुबारक करीम जवाहर म्हणतात, 'इस्लाममध्ये अवतार मानत नाहीत. त्यामुळे इस्लाम मतानुयायी श्री रामकृष्णांना ईश्वरावतार मानू शकत नाहीत. मात्र श्री रामकृष्णांचे मार्गदर्शन आपल्याला अल्लाकडे घेऊन जाऊ शकते असे ते मानू शकतात. इस्लामचे अनुयायी श्री रामकृष्णांना अवतार न मानता मार्गदर्शक (मुरशीद) मानू शकतात.' मौलाना जवाहर यांचे हे मत प्रातिनिधिक म्हणता येत नसले तरीही महत्त्वाचे नक्कीच म्हणता येईल.

नंतरच्या काळात श्री रामकृष्ण म्हणत असत - 'हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जणू एक पर्वत अडथळ्यासारखा उभा आहे. इतके दिवस एकत्र राहूनही एकमेकांची विचारपद्धती, धार्मिक विश्वास अन धर्मकार्ये एकमेकांना पूर्णपणे दुर्बोधच राहिली आहेत. वेदांत विज्ञानावर विश्वास ठेवल्याने हा पर्वत एक दिवस अंतर्धान पावेल आणि दोघे प्रेमाने एकमेकांना आलिंगन देतील.'

अद्वैत साधनेनंतर श्री रामकृष्णांचे शरीर दुर्बल झाले होते. पावसाळा सुरू झाला की गंगेचे पाणी खारे होईल आणि पुन्हा कदाचित प्रकृतीचा त्रास होईल म्हणून त्यांनी काही काळ जन्मगावी कामारपुकुरला जावे असा सगळ्यांनी विचार केला. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी इ.स. १८६७ च्या ज्येष्ठ महिन्यात ते जन्मगावी कामारपुकुरला गेले. व्यवस्थापक मथुरामोहन यांची पत्नी आणि राणी रासमणीची मुलगी जगदंबा हिने तिथल्या मुक्कामात लागणारे सगळे सामान, धान्य आदी त्यांच्यासोबत दिले. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेतील गुरू भैरवी संन्यासिनी आणि त्यांचा भाचा हृदय हेही त्यांच्यासोबत कामारपुकुरला गेले. त्यांची म्हातारी आई मात्र कालीवाडीतच राहिली. उरलेले आयुष्य गंगातीरीच घालवण्याचा संकल्प त्यांनी मोडला नाही.

जवळपास आठ वर्षांनंतर श्री रामकृष्ण आपल्या जन्मगावी गेले होते. त्या काळात गावातील लोकांच्या कानावर त्यांच्याबद्दल खूप गोष्टी गेल्या होत्या. ते बाईचा वेष घालून हरी हरी करतात, कधी अल्ला अल्ला करीत असतात इत्यादी कथा गावकऱ्यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहण्याची सगळ्या गावालाच उत्सुकता लागली होती. पण श्री रामकृष्ण जसे पूर्वी होते तसेच आहेत हे पाहून गावकऱ्यांना संतोष वाटला. रोजच त्यांना पाहायला, भेटायला, बोलायला लोकांची गर्दी होत असे. त्यांच्या सहवासात एक अपूर्व शांतता गावकरी अनुभवत असत. सांसारिक चिंतांचा त्यांच्या सान्निध्यात विसर पडतो असाही अनुभव लोक घेत असत.

श्री रामकृष्ण गावी राहू लागल्यानंतर काही दिवसांनी घरचे लोक, त्यांच्या पत्नीला 'सारदा'ला तिच्या माहेरहून घेऊन आले. त्यावेळी सारदा देवींना पंधरावे वर्ष सुरू होते. सहा-सात महिने श्री रामकृष्ण कामारपुकुरला राहिले. बालपणीचे मित्र, जुने स्नेही, आप्त अशा सगळ्यांसोबत त्यांचा हा काळ आनंदात गेला. त्यांची प्रकृतीही सुधारली. याच काळात शेवटी शेवटी भैरवी संन्यासिनीचे क्षुल्लक कारणावरून हृदयशी भांडण झाले. त्यानंतर काहीच दिवसात उपरती होऊन, माफी मागून, किल्मिष दूर करून ती काशीला निघून गेली.

सुमारे सात महिने जन्मगावी राहून इ.स. १८६७ च्या अखेरीस श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्याच सुमारास काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांना सहकुटुंब तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. स्वाभाविकच त्यांनी श्री रामकृष्णांनाही आग्रह केला. या आग्रहामुळे श्री रामकृष्ण आपली वृद्ध आई आणि भाचा हृदयराम यांच्यासह मथुरांबरोबर तीर्थयात्रेला गेले. इ.स. १८६८ च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून अंदाजे सहा-सात महिने ही मंडळी तीर्थयात्रेला गेली होती.

या यात्रेसाठी सगळे मिळून शंभरेक महिला पुरुष होते. मथुरांनी यासाठी रेल्वेचा दुसऱ्या वर्गाचा एक व तिसऱ्या वर्गाचे तीन डबे आरक्षित केले होते. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार हे चार डबे वेगळे काढून मुक्काम करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. कोलकात्याहून निघाल्यावर देवघरला बैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी हे लोक थांबले होते. या ठिकाणी गरीब वस्तीतील लोकांना पाहून श्री रामकृष्णांचे मन करुणेने द्रवले होते आणि त्यांनी मथुरांना या लोकांना जेवण आणि वस्त्रे द्यायला सांगितले होते. इथून निघाल्यावर काशीला पोहोचण्याआधी एका ठिकाणी श्री रामकृष्ण व हृदय गाडीतून उतरले होते आणि पुन्हा गाडीत चढण्यापूर्वीच गाडी सुरू होऊन गेली. योगायोगाने रेल्वे कंपनीचे एक अधिकारी राजेंद्रलाल बंदोपाध्याय एका विशेष गाडीने तिथे पोहोचले आणि या दोघांना अडचणीत पाहून आपल्या गाडीने काशीला घेऊन गेले.

काशी मुक्कामी श्री रामकृष्ण केदारनाथ आणि अन्य देवतांच्या मंदिरात नित्य दर्शनासाठी जात असत. त्या ठिकाणीही त्यांना भावावेश होत असे. मणिकर्णीकेच्या घाटावरील श्रेष्ठ परमहंस त्रैलंग स्वामी यांनाही श्री रामकृष्ण भेटले होते. पाच सहा दिवस काशीला राहून ही सगळी मंडळी प्रयागला गेली. त्या ठिकाणी त्यांनी संगमात स्नान आणि त्रिरात्र वास केला होता. तिथून ते परत काशीला आले आणि पंधरा दिवस तिथे राहून वृन्दावनला गेले. काशी येथे भेटलेली तंत्रगुरू भैरवी ही देखील यांच्यासह वृन्दावनला गेली होती. तेथे सुमारे दोन आठवडे राहून मंडळी पुन्हा काशीला आली आणि काही महिने तिथेच राहिली. काशीहून गयेला जाण्याचा मथुरांचा विचार होता. परंतु गयेला गेल्यास आपण या धराधामी राहू शकणार नाही असे श्री रामकृष्णांनी निक्षून सांगितल्याने मथुरांनी तो विचार सोडून दिला. साधारण इ.स. १८६८ च्या मध्यावर ही मंडळी तीर्थयात्रा आटोपून दक्षिणेश्वरला परतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा