सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (९)

जन्मगाव कामारपुकुर येथून १९६१ च्या सुरुवातीला श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे १९ फेब्रुवारी १८६१ रोजी दक्षिणेश्वरच्या काली मंदिराच्या मालकीण राणी रासमणी यांनी इहलोकीचा निरोप घेतला. राणीचे जावई मथुरानाथ विश्वास हेच त्यानंतर काली मंदिराचा सगळा कारभार पाहू लागले. त्यांच्या मनात श्री रामकृष्णांबद्दल अतिशय प्रेम, आस्था, विश्वास आणि श्रद्धा होती. त्यामुळे ते श्री रामकृष्णांची सगळी काळजी घेऊ लागले. त्यांना हवं नको ते पाहू लागले. राणीच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांच्या जीवनातील एक महत्त्वाचे आणि अनोखे पर्व सुरू झाले.

दक्षिणेश्वर येथील गंगेच्या किनाऱ्यावरील बकुळीच्या घाटावर एक दिवस सकाळी; चाळीशीच्या वयाची, भगवी वस्त्रे परिधान केलेली एक संन्यासी महिला नावेतून उतरली. बगिच्यात फुले तोडत असलेल्या श्री रामकृष्णांनी ते पाहिले आणि आपल्या खोलीत येऊन आपला भाचा हृदय याला त्या महिलेला बोलावून आणण्यास सांगितले. अनोळखी महिलेला मामा का बोलावीत आहेत आणि आपण तरी तिला कसे बोलवावे अशा घोटाळ्यात हृदय पडला. परंतु मामाच्या आग्रहाने त्याने तिच्याकडे जाऊन मामाने बोलावल्याचे सांगितले. तीही काही न बोलता त्याच्या मागोमाग श्री रामकृष्णांच्या खोलीत दाखल झाली. खोलीत आल्यावर श्री रामकृष्णांकडे पाहताच ती त्यांना म्हणाली, 'बाबा तू इथं आहेस? तू गंगेच्या काठी आहे हे मला कळले होते. अन मी तुला शोधत फिरत होते.' आपल्याबद्दल कसं कळलं या त्यांच्या प्रश्नावर ती म्हणाली, 'तुम्हा तिघांना भेटावे लागेल हे जगदंबा कृपेने मला कळले होते. दोघांची भेट पूर्व बंगालमध्ये झाली आणि आज तू भेटला.'

यानंतर त्या दोघांनी अगदी जवळचे आप्त असावेत अशा गोष्टी केल्या. श्री रामकृष्णांनी आपली अलौकिक दर्शने, बाह्य संज्ञा लोप पावणे, गात्रदाह, निद्रानाश, शारीरिक बदल असे सगळे तिला सांगितले. अन ते विचारू लागले, 'मी काय खरंच वेडा झालो आहे का?' त्यावर त्यांची समजूत घालत ती संन्यासिनी म्हणाली, 'हे वेडेपण नाही. तुला महाभाव प्राप्त झाला आहे. राधा, चैतन्य महाप्रभू यांची अशी अवस्था झाली होती.' असे सगळे बोलणे झाल्यानंतर श्री रामकृष्णांनी तिला प्रसादाची फळे वगैरे अल्पोपहारासाठी दिली. अल्पोपहार झाल्यावर ती संन्यासिनी स्नान, पूजा, स्वयंपाक इत्यादी कामात गढून गेली

स्वयंपाक आटोपल्यावर आपल्या नित्य पूजेतील रघुवीरासमोर नैवेद्य दाखवून ती ध्यानात बुडून गेली. काही वेळातच अर्धबाह्य अवस्थेत श्री रामकृष्ण तिथे आले आणि तो नैवेद्य खाऊ लागले. काही वेळाने संन्यासिनी भानावर आली तेव्हा तिने पाहिले की, श्री रामकृष्ण भावविष्ट होऊन नैवेद्य खात आहेत. ते पाहून तिला खूप संतोष वाटला. नंतर भानावर आलेल्या श्री रामकृष्णांना ती म्हणाली, 'जे झालं ते योग्यच झालं. तुझ्या आत जो आहे त्यानेच हे केलं. आता मला बाह्य पूजेची गरज उरली नाही.' असे बोलतच, श्री रामकृष्णांच्या ठायी आपल्या देवतेचे दर्शन लाभलेल्या त्या संन्यासिनीने, आपल्या नित्य पूजेची रघुवीरशिला गंगेत विसर्जित करून टाकली.

यानंतर रोजच त्या दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा होऊ लागली. श्री रामकृष्ण आपल्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल सांगून तिला शंका आणि संदेह विचारू लागले. अन संन्यासिनी तंत्रशास्त्र, भक्तीशास्त्र आणि या शास्त्रांचे ग्रंथ यांच्या आधारे त्यांचे संदेह दूर करू लागली. साधारण आठवडाभर तिथे राहून ती जवळच असलेल्या दक्षिणेश्वर खेड्यातील देवमंडलांच्या घाटावर राहायला गेली. तिथून रोज कालीवाडीत येऊन ती श्री रामकृष्णांना भेटत असे आणि शास्त्रचर्चा व अध्यात्मचर्चा करत असे. कधीकधी वात्सल्य भावाने पुत्र समजून त्यांना खाउपिऊ घालीत असे. जसजसे दिवस जाऊ लागले तसे श्री रामकृष्ण केवळ आध्यात्मिक साधकच नव्हेत तर अवतार आहेत अशी तिची खात्री होऊ लागली. तसे ती बोलूनही दाखवीत असे. तिच्या या मताने कालीवाडीत मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. एक दिवस श्री रामकृष्ण आणि व्यवस्थापक मथुरबाबू बोलत बसले असताना श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंना तिचे मत सांगितले. त्यावर मथुरबाबूंनी उत्तर दिले की, 'अवतार तर फक्त दहा आहेत.' तेवढ्यात संन्यासिनी त्यांच्याकडे आली. तेव्हा श्री रामकृष्णांनी तिला मथुरबाबूंचे म्हणणे सांगितले. त्यावर तिने मथुरबाबूंनाही आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. आपण याबाबत कोणाशीही शास्त्रचर्चा करायला तयार असल्याचेही ती म्हणाली. नंतर काही दिवस श्री रामकृष्णांनीही मथुरबाबूंकडे आग्रह धरला की या विषयावर चर्चा व्हावी.

संन्यासिनीचे आव्हान आणि स्वतः श्री रामकृष्णांचा आग्रह यामुळे मथुरानाथ विचारात पडले. परंतु शास्त्रार्थ होऊन श्री रामकृष्णांना काही रोग झाल्याचा निष्कर्ष निघाला की, त्यांचे वेड दूर करणे सोपे होईल. त्यासाठी त्यांचेही सहकार्य मिळू शकेल, असा विचार करून मथुरानाथांनी पंडितांना बोलावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यावेळचे त्या भागातील वैष्णवचरण आणि गौरी पंडित या दोघांना कालीवाडीत बोलावण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीनही काही विद्वान होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत असा निष्कर्ष निघाला की, ज्या १९ प्रकारचे भाव वा अवस्था एकेठायी अनुभवाला येतात आणि ज्याला शास्त्रात 'महाभाव' म्हणतात, तो महाभाव श्री रामकृष्णांच्या ठायी आढळून येतो. ती सर्व लक्षणे त्यांच्या ठिकाणी दिसतात. हे ऐकून मथुरानाथ आणि अन्य लोक स्तंभित झाले. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, 'काहीही असो. रोग नाही हे ऐकून बरे वाटले.'

यानंतर संन्यासिनीने श्री रामकृष्णांकडून समस्त तंत्रसाधना करवून घेण्याचे ठरवले. तोपर्यंत कोणतीही शास्त्रविहित साधना न करता प्रबळ अनुरागाच्या साहाय्याने ईश्वरलाभ करून घेणाऱ्या श्री रामकृष्णांच्या मनातील सारे संदेह फिटावेत आणि त्यानंतरही त्यांना येऊ शकणाऱ्या अनुभवांसाठी त्यांची तयारी व्हावी हाच तिचा उद्देश होता. श्री रामकृष्णही त्यांच्या स्वभावानुसार जगदंबेला याविषयी सांगून आणि तिचा कौल घेऊन तांत्रिक साधनेला तयार झाले. त्यानंतर साधारण तीन चार वर्षे ते तांत्रिक साधना करीत होते. संन्यासिनीने त्यांच्याकडून शास्त्रात सांगितलेल्या सगळ्या ६४ तांत्रिक साधना करवून घेतल्या. त्यासाठीची सामुग्री इत्यादी तीच गोळा करीत असे. अन रात्रीच्या वेळी कालीवाडी परिसरातील पंचवटीत त्यांची साधना चालत असे. कोणतीही किळस आदी न बाळगता, तसेच पाच 'म'कारांचे ग्रहण न करताही, अग्राह्य आणि अशिष्ट समजल्या जाणाऱ्या या सगळ्या साधना त्यांनी केल्या. अन या सगळ्या मार्गांनी तोच एक अद्वय आनंद प्राप्त करून घेतला.

श्री रामकृष्णांची तांत्रिक साधना ही फार महत्त्वाची बाब होती. 'एकं सत, विप्रा: बहुधा वदंती' (सत्य एकच आहे. विद्वान लोक त्याचे वेगवेगळ्या रीतीने वर्णन करतात) असा भारतीय अध्यात्माचा सिद्धांत आहे. 'आकाशात पतितं तोयं' यासारख्या सुभाषितातून किंवा 'त्रयी सांख्यम योग:' यासारख्या शिव स्तोत्रातील श्लोकातून तोच भाव वाहतो. श्री रामकृष्णांच्या द्वारे तोच भाव सगळ्या जगाला देण्याची नियतीची योजना होती. त्यासाठी सगळ्या प्रकारच्या साधना करून ते सत्य सिद्ध करणे आवश्यक होते. शास्त्राचा सिद्धांत हा केवळ शब्द नाहीत. ते जिवंत अनुभूत सत्य आहे हे स्थापित होणे आवश्यक होते. म्हणूनच शिव स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे जगदंबेने सगळ्या सरळ व वक्र मार्गांनी श्री रामकृष्णांकडून साधना करून घेतल्या. त्या त्या मार्गाची साधना आटोपल्यावर पुन्हा कधीही श्री रामकृष्ण त्या मार्गाने गेले नाहीत. तंत्रसाधनेच्या बाबतही असेच घडले.

या तांत्रिक साधनेच्या काळात त्यांना अनेक प्रकारची अद्भुत दर्शने आदी झालीत. एवढेच नाही तर त्यांना अष्टसिद्धीही प्राप्त झाल्या. या सिद्धींचा उपयोग करणे योग्य की अयोग्य याविषयी जगदंबेचे म्हणणे जाणून घेतल्यावर त्यांनी निष्कर्ष काढला की, सिद्धी या तुच्छ आणि त्याज्य आहेत. त्यांचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही. नंतरच्या काळात एकदा स्वामी विवेकानंद यांना आपली सगळी शक्ती प्रदान करताना त्यांनी स्वामीजींना म्हटले होते, 'तुला धर्माचा प्रचार वगैरे बरीच कामे करायची आहेत. तेव्हा या सगळ्या सिद्धी तू स्वीकार.' त्यावर स्वामीजींनी विचारले, 'ईश्वरप्राप्तीसाठी मला यांचा उपयोग होईल का?' त्यावर श्री रामकृष्णांचे उत्तर नकारार्थी होते. तेव्हा स्वामीजींनी त्या सिद्धी स्वीकारण्यास नकार दिला होता.

या सिद्धींशिवाय एक महत्त्वाची बाब या तांत्रिक साधनेने त्यांना प्राप्त झाली होती. ती म्हणजे समत्व बोध. नंतरच्या काळात ते सांगत, 'तुळशीची पाने आणि शेवग्याची पाने सारखीच पवित्र वाटत.' यच्चयावत सगळ्या वस्तू, व्यक्ती इत्यादी आता त्यांना सारखीच प्रतीत होऊ लागली होती. या साधनेमुळे त्यांची अंगकांतीही विलक्षण तेजस्वी झाली होती. ती कांती लोकांच्या आकर्षणाचा विषय झाली होती. तेव्हा ते जगदंबेची काकुळतीने प्रार्थना करत - 'आई हे बाहेरचे रूप मला नको. ते परत घे आणि आतले आध्यात्मिक रूप दे.' त्यांची ही प्रार्थना कालांतराने पूर्ण झाली. यानंतर विविध पद्धतींनी आध्यात्मिक साधना करण्याचा जगाच्या आध्यात्मिक इतिहासातील एक अनोखा प्रवाह श्री रामकृष्णांच्या जीवनात वाहू लागला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा