सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (५)

श्री रामकृष्णांना वडिलांचा सहवास फार लाभला नव्हता. त्यांच्या बालवयातच वडील हे जग सोडून गेले होते. ३१ वर्षांनी मोठे असलेले मोठे भाऊ रामकुमार हेच त्यांना वडिलांच्या जागी होते. त्यामुळे रामकुमार यांनी जगाचा निरोप घेतल्यावर श्री रामकृष्ण आणखीनच अंतर्मुख आणि उदास झाले. जगदंबेकडील त्यांचा ओढा वाढला. पूजा आटोपल्यावर सुद्धा ते मंदिरातच बसून राहत. तिथे भजने आदी गात वेळ घालवत. अन रात्री मंदिराची दारे बंद झाल्यावर लोकांना टाळून, परिसरातील पंचवटीच्या झाडीत जाऊन ध्यान करीत बसत. पक्का व्यवहारी असलेल्या, त्यांच्या सोबत राहणाऱ्या हृदयरामला मात्र त्यांचे असे वागणे आवडत नसे. परंतु तो काही करू शकत नव्हता. काही दिवसांनी मात्र यावर काहीतरी उपाय करायचा असे त्याने ठरवले. त्याप्रमाणे एक दिवस रात्री तो कळू न देता त्यांच्या मागे मागे गेला. रोजच्याप्रमाणे श्री रामकृष्ण पंचवटीच्या झाडीत शिरले आणि खोलगट भागात असलेल्या आवळीच्या झाडाखाली जाऊन ध्यानाला बसले. हृदयरामने त्यांना काही म्हटले नाही. मात्र त्यांना भीती दाखवण्यासाठी तो झाडीत दगडगोटे, मातीची ढेकळे फेकू लागला. परंतु त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही असे पाहून तो आपल्या खोलीत परतला. दुसऱ्या दिवशी मात्र त्याने जोर करून त्यांना विचारलेच, 'झाडीत जाऊन रात्री काय करता?' त्यावर श्री रामकृष्णांनीही आढेवेढे न घेता सरळपणे सांगितले, 'त्या ठिकाणी आवळीचे झाड आहे त्याखाली बसून ध्यान करतो. आवळीच्या झाडाखाली ध्यान केल्याने कामना पूर्ण होते असे शास्त्रात सांगितले आहे.'

यानंतर काही दिवस श्री रामकृष्ण ध्यानाला बसले की आजूबाजूला दगडगोटे येऊ लागले. हे हृदयचेच काम आहे हे माहीत असूनही त्यांनी त्याला काही म्हटले मात्र नाही. अखेर एक दिवस मनाचा हिय्या करून हृदय त्यांच्या मागोमाग पंचवटीच्या झाडीत शिरला. अन पाहतो तर काय? धोतर, जानवे सगळं काढून टाकून श्री रामकृष्ण ध्यानात बुडून गेले आहेत. हे पाहून त्याला वाटले मामा वेडे झाले आहेत. तो त्यांच्याजवळ गेला अन आरडाओरडा करून विचारू लागला, 'हे काय आहे? ध्यान करायचे तर करा पण नागवे होऊन का बसता?' त्यावर ते म्हणाले, 'तुला माहिती नाही. पाशमुक्त होऊन ध्यान करायचे असते. जन्मापासून माणूस घृणा, लज्जा, कुल, शील, भय, मान, जाती आणि अभिमान या आठ पाशांनी बद्ध असतो. जानवंदेखील मी मोठा, मी ब्राम्हण या अभिमानाचं चिन्ह आणि पाश होय. जगदंबेला आळवण्यासाठी हे सगळे पाश फेकून देऊन एकाग्र मनाने आळवायचं असतं.' मामांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू या विचाराने गेलेला हृदय स्वतःच अचंभित होऊन परतला. ही त्यांच्या साधनेची सुरुवात होती.

श्री रामकृष्णांच्या जीवनात नंतरही अशा अनेक घटना पाहायला मिळतात. अष्टपाश तोडून मुक्त झाल्याशिवाय आपलं मन पूर्णपणे ईश्वराकडे लावता येत नाही. कुठल्या ना कुठल्या पाशात किंचित का असेना ते अडकलेलं राहतं. त्यामुळे मनाला कठोरपणे या पाशातून सोडवण्यासाठी प्रत्यक्ष शरीराला, इंद्रियांनाही तसे वळण लावावे लागते. नाही तर मन एकीकडे आणि इंद्रिये दुसरीकडे अशी साधकाची ओढाताण होते. आध्यात्मिक विकासाला ते बाधक ठरते. या धारणेतून त्यांनी आपल्या शरीरालाही वळवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. अभिमानाचा नाश करण्यासाठी अनेकदा ते लोकांनी विष्ठा केलेली जागा स्वतः स्वच्छ करीत असत. तर कधी, माती आणि सोने सारखेच हे बाणवण्यासाठी एका हाती माती आणि एका हाती रुपये घेऊन 'रुपया माती, माती रुपया' म्हणत म्हणत दोन्ही गंगेत फेकून देत असत. सगळ्यांविषयी शिवबोध पक्का करण्यासाठी, कालीवाडीत भिकाऱ्यांचे खाणे झाल्यावर त्यांचे उष्टे, देवतेचा प्रसाद म्हणून खात आणि मस्तकी लावीत. त्यांची उष्टी पाने डोक्यावरून नेऊन गंगेकाठी टाकत. नंतर फडा घेऊन ती जागा धुवून स्वच्छ करीत. मन, जाणीव, व्यवहार, शरीर, इंद्रिये यांच्यात पूर्ण ऐकतानता राहावी यासाठी कठोरपणे प्रयत्न करीत असत.

याचा परिणाम म्हणूनच साधना काळानंतरच्या आयुष्यातही अनेक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळतात. एका घटनेचा उल्लेख येथे करता येईल. स्वामी विवेकानंद दक्षिणेश्वरला येऊ जाऊ लागल्यानंतरची एक घटना. श्री रामकृष्णांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या अंथरुणाखाली काही रुपये लपवून ठेवले. श्री रामकृष्ण अंथरुणावर बसताच त्यांना जणू विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. सगळे अंग पोळले. स्वामीजींनी नंतर ते रुपये काढून घेतले आणि त्यांची क्षमा मागितली. श्री रामकृष्णांचा ईश्वराशी भावबंध इतका शुद्ध होता.

ब्राम्ह समाजाचे त्यावेळचे नेते शिवनाथ शास्त्री यांनी 'modern review' मध्ये १९१० सालच्या नोव्हेंम्बर महिन्यात लिहिलेल्या व्यक्तिगत आठवणींवर आधारित लेखात; श्री रामकृष्णांच्या या प्रयोगांवर थोडी टीकाही केली होती. श्री रामकृष्णांचे हे प्रयोग म्हणजे त्यांचा मन:कल्पित साधनामार्ग असून त्याची काहीही गरज नव्हती. असे उपाय न करताही मनावर, इंद्रियांवर ताबा मिळवता येतो, असे शिवनाथ शास्त्री यांचे प्रतिपादन होते. यासंबंधात दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे केवळ मनाने भोग्य वस्तूंचा त्याग करण्याने स्वतःशी प्रतारणा करण्याची ढोंगी वृत्ती वाढण्याची शक्यताच जास्त असते. अन दुसरे म्हणजे नवीन साधना पद्धतींना शास्त्रांनी आडकाठी केलेली नाही. नवीन साधना सिद्ध झाल्यास त्यातून नवीन शास्त्र निर्माण होईल एवढेच. श्री रामकृष्णांनी नकळत असेच नवीन शास्त्र सिद्ध केलेले आहे.

यानंतर हळूहळू त्यांचा पूजेचा कालावधी वाढत जाऊ लागला. पूजा करताना, कालीमूर्तीचा शृंगार करताना, नैवेद्य अर्पण करताना, भजने गाताना; त्यांना काहीही भान राहत नसे. एखादी गोष्ट करताना जगदंबेच्या चिंतनात इतके रमून जात की ती गोष्ट संपतच नसे. त्यांचा आहार आणि झोप कमी कमी होऊ लागले. व्याकुळता वाढू लागली. रडत रडत ते देवीला विचारीत, 'मी इतके आळवतो तरीही तू दर्शन का देत नाही?' नंतरच्या काळात ते सांगत असत की, कोरडा करण्यासाठी एखादा पंचा पिळावा तसं कोणीतरी हृदय पिळून काढत आहे असं वाटत असे. आई दर्शन देत नाही याचं असह्य दु:ख होत असे. असेच करुण रुदन करताना एक दिवस अभावितपणे मंदिरातल्या तलवारीवर त्यांची दृष्टी पडली. त्यांनी मनात विचार केला, आई दर्शन देत नाही तर या जगण्याला तरी काय अर्थ आहे? करावा या जीवनाचा अंत. अन झेप घालून तलवार उचलण्यासाठी ते पुढे झाले तोच काहीतरी अद्भुत असं दर्शन झालं आणि बाह्य संज्ञाशून्य होऊन ते पडून गेले. तो आणि त्यानंतरचा दिवस कसा उगवला, कसा मावळला हे काहीही त्यांना कळले नाही. या प्रसंगाचे वर्णन करताना नंतर ते सांगत असत, 'घरदार, मंदिर सगळं जणू कुठे लुप्त झालं. कुठेच काहीही नाही. केवळ एक असीम अनंत चेतन ज्योति:समुद्र. दृष्टीला त्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. चोहीकडून त्या समुद्राच्या लाटा महावेगाने माझ्याकडे झेपावत होत्या आणि त्यांनी मला अजिबात बुडवून टाकले. अन धापा टाकीत, गटांगळ्या खात, भान लोपून पडून गेलो.' याच प्रथम अनुभवात त्यांना जगदंबेचे समूर्त दर्शन झाले होते. त्यामुळेच त्यानंतर भानावर येताना त्यांच्या मुखातून 'आई आई' असे आर्त शब्द उमटले होते.

या दर्शनानंतर जगदंबेचे अखंड दर्शन लाभावे यासाठी वेळोवेळी त्यांची वृत्ती व्याकुळ होत असे. आजूबाजूला लोक आहेत, लोक काय म्हणतील असले काहीही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नसे. एकच धून सदा राहत असे 'आई आई आई.' अन व्याकुळता परमावधीची झाली की, जगदंबाही त्यांना दर्शन देऊन त्यांचे सांत्वन करीत असे. त्यांच्याशी बोलत असे, हसत असे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा