तीर्थयात्रेहून परतल्यानंतर काही दिवसांनी श्री रामकृष्णांचा भाचा हृदयराम याची पत्नी मरण पावली. तेव्हा त्याच्या मनात विरक्ती येऊन तो अधिकाधिक साधना करू लागला. एके रात्री मामांना पंचवटीकडे जाताना बघून, त्यांना लागेल म्हणून तो त्यांच्यामागे गडवा व पंचा घेऊन जाऊ लागला. जाता जाता त्याला दिसले की, श्री रामकृष्ण हे रक्तमांसाचा जडदेह धारण करणारे मनुष्य नाहीतच. त्यांच्या देहातून निघालेल्या अपूर्व प्रभेने सगळी पंचवटी उजळून निघाली आहे. चालताना त्यांच्या चरणांचा भूमीला स्पर्श होत नसून ती अधांतरी पडत आहेत. हृदयने पुन्हा पुन्हा डोळे चोळले, आजूबाजूच्या वस्तू पाहिल्या; पण श्री रामकृष्ण मात्र तसेच ज्योतिर्मय दिसत होते. माझ्यात तर काही बदल झाला नाही ना म्हणून त्याने स्वतःकडे पाहिले तर त्याला, तोही त्यांच्या तेजातून निघालेला अंश आहे असे दिसले. हे अद्भुत दृश्य पाहून तो बेभान होऊन ओरडू लागला. त्याला ओरडताना पाहून श्री रामकृष्ण त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या छातीला स्पर्श करून त्यांनी त्याला शांत केले अन म्हणाले, 'आई याला जड करून दे.'
श्री रामकृष्णांच्या या कृतीनंतर हृदय लगेच सामान्य झाला. आपल्या मामांवर रागावून तो म्हणाला, 'का असे केले? अद्भुत दर्शनाचा आनंद मला पुन्हा कसा लाभणार?' त्यावर त्याच्या मामांनी उत्तर दिले, 'अरे एवढ्याशा दर्शनाने केवढा गोंधळ करत होता. मी तर चोवीस तास काय काय पाहत असतो. तुझी वेळ आली की तुलाही दर्शने वगैरे होतील. आता शांत हो.'
मामांच्या सांगण्याने हृदय वरून शांत झाला तरी आत अस्वस्थ होता. त्याला वाटले श्री रामकृष्ण पंचवटीत जिथे साधना करतात तिथे आपण साधना करावी. त्याप्रमाणे तो रात्री पंचवटीत गेला आणि श्री रामकृष्ण जिथे बसून साधना करीत तिथे बसून साधना करू लागला. अन थोड्याच वेळात किंचाळू लागला, 'जळालो, मेलो, वाचवा.' श्री रामकृष्णांनी जाऊन पाहिले अन विचारले तेव्हा तो म्हणाला, 'इथे ध्यान करायला बसताच कोणीतरी जणू घमेलंभर विस्तव माझ्यावर फेकला असं वाटलं आणि मी पोळू लागलो.' श्री रामकृष्ण त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाले, 'जा. तुझा दाह शांत होईल. पण तू असे का करतो. मी सांगितलं आहे नं की असं करत जाऊन नको.'
श्री रामकृष्णांचा पुतण्या अक्षय हादेखील दक्षिणेश्वर मंदिरात पूजक होता. आध्यात्मिक प्रकृतीच्या या पुतण्याचे १८६९ साली दक्षिणेश्वरचे व्यवस्थापक मथुरानाथ यांच्या दिवाणखान्यातच अल्पवयात निधन झाले. श्री रामकृष्णांना त्याच्या निधनाचे अपार दु:ख झाले. या घटनेनंतर ते मथुरानाथांच्या दिवाणखान्यात पुन्हा गेले नाहीत.
या घटनेनंतर काही दिवसांनी मथुरानाथ श्री रामकृष्णांना सोबत घेऊन आपल्या जमीनदारीच्या भागात आणि गुरुगृही घेऊन गेले होते. त्या भागात फिरताना एकदा कलाईघाट येथे गेले असताना खेडयातील बाया माणसांची दुर्दशा आणि दारिद्र्य पाहून श्री रामकृष्ण व्याकुळ झाले आणि त्यांनी मथुरानाथांकडून त्या सगळ्यांना पोटभर जेवण, एकेक वस्त्र आणि डोक्याला लावायला तेल देववीले होते.
इ. स. १८७० साली श्री रामकृष्णांना चैतन्य महाप्रभूंची लीलाभूमी नवद्विपाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली तेव्हा मथुरानाथ त्यांना तिथे घेऊन गेले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८७१ साली आषाढ महिन्यात मथुरानाथांनी या जगाचा निरोप घेतला. त्याआधीची एक घटना त्यांना श्री रामकृष्णांबद्दल किती भक्तिभाव होता ते दाखवणारी आहे. मथुरानाथांच्या कुठल्या तरी सांध्यावर एक फोड झाला होता. तो काही केल्या बरा होत नव्हता. रामकृष्णांनी आपल्याला भेटायला यावे असा लकडा त्यांनी लावला. रामकृष्ण टाळाटाळ करत होते. अखेरीस ते भेटायला गेले. तेव्हा मथुरानाथ त्यांना म्हणाले, 'बाबा तुमची पायधूळ द्या.' त्यावर रामकृष्णांनी विचारले, 'त्याने काय तुझा फोड बरा होईल?' त्यावर मथुरानाथांचे उत्तर विलक्षण होते. ते म्हणाले, 'मी फोड बरा करण्यासाठी पायधूळ मागत नाही. हा भवसागर पार करण्यासाठी मागतो आहे.' असे हे मथुरानाथ अंतिम घटका मोजत होते त्यावेळी रामकृष्ण दक्षिणेश्वरला आपल्या खोलीत प्रगाढ ध्यानात बुडून गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ध्यान संपवून ते भाचा हृदयराम याला म्हणाले, 'मथुर देवीलोकी गेले.' त्यानंतर काही तासांनी रात्री येऊन कालिवाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजता मथुरानाथांनी देह ठेवला. ज्या मथुरानाथांच्या प्रयत्नाने दक्षिणेश्वरचे काली मंदिर उभे राहिले आणि त्या मंदिराच्या आश्रयाने रामकृष्णांच्या साधना आणि लीला होऊन जगाला अध्यात्माचा प्रकाश लाभला; त्या मथुरानाथांशी असलेला रामकृष्णांचा मधुर मानवी संबंध त्यावेळी संपला.
वयाच्या १८ व्या वर्षी इ. स. १८७२ साली श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा माँ या दक्षिणेश्वरला आल्या. त्यांच्या गावी त्यांच्या कानावर रामकृष्णांबद्दल अनेक अफवा पडल्या होत्या. त्या अफवांमध्ये काही तथ्य नसून, आपले पती पूर्वीप्रमाणेच आहेत हे त्यांनी पाहिले आणि त्यांचे मन शांत झाले. रामकृष्णांच्या खोलीजवळील नौबतखान्यात शारदा माँ राहत असत. तिथेच स्वयंपाक वगैरेही करत. दक्षिणेश्वरला आल्यानंतर काहीच दिवसांनी त्या रामकृष्णांच्या खोलीतच झोपू लागल्या होत्या. एक दिवस पतीचे पाय चेपता चेपता त्यांनी पतीला विचारले - 'मी तुम्हाला कोण वाटते?' त्यावर रामकृष्णांनी उत्तर दिले - 'जी आई मंदिरात आहे (जगन्माता), तिनेच या शरीराला जन्म दिला आहे (जन्मदात्री) व ती सध्या नौबतखान्यात राहत आहे आणि तीच आता माझे पाय चेपीत आहे. प्रत्यक्ष आनंदमयीचे एक रूप अशाच तुम्ही मला सर्वदा खरोखरच दिसत असता.'
श्री रामकृष्ण व माँ शारदा यांच्या अलोकसामान्य संबंधांवर लिहिताना श्री रामकृष्ण लीलाप्रसंग या ग्रंथाचे लेखक स्वामी सारदानंद यांनी याच दिवसातला एक प्रसंग नोंदवला आहे. त्यांच्याच शब्दात तो प्रसंग असा - 'एके दिवशी श्री माताजींना स्वतःच्या बाजूला झोपलेल्या बघून ठाकूर आपल्या मनाला संबोधून पुढीलप्रमाणे विवेकविचारास प्रवृत्त झाले होते. ते म्हणाले - मना, याचेच नाव स्त्रीदेह. लोक याला पराकाष्ठेची आस्वाद्य अशी भोगवस्तू समजत असतात आणि त्याचा भोग घेण्यासाठी सदासर्वदा आतुर असतात. परंतु त्याचे ग्रहण केल्याने देहातच आबद्ध राहावे लागते. सच्चिदानंदघन ईश्वराचा लाभ करून घेता येत नाही. मना, स्वतःची इच्छा स्वतःपासून लपवू नकोस. पोटात एक आणि ओठात दुसरे ठेवू नकोस. खरं सांग तू हे ग्रहण करू इच्छितो की तुला ईश्वर हवा आहे? जर तुला हे हवे असेल तर ते तुझ्या समोरच आहे. त्याचे ग्रहण कर. असा विवेकविचार करून ठाकूर श्री माताजींच्या देहास स्पर्श करण्यास उद्यत होताक्षणीच त्यांचे मन कुंठित होऊन एकाएकी समाधीमार्गे असे विलीन होऊन गेले की, त्या रात्री मग ते परत साधारण बोधभूमीवर उतरले नाही. ईश्वराचे नाव ऐकवून दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रयासाने त्यांना भानावर आणावे लागले होते.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा