सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (८)

श्री रामकृष्णांनी कालीमातेच्या पूजकाचे काम सोडून दिले असून त्यांना वायूरोगाने पछाडले आहे अशी चर्चा त्यांच्या जन्मगावी कामारपुकूरला पोहोचली. त्यामुळे त्यांची आई आणि भाऊ चिंतेत पडले. अन त्यांनी श्री रामकृष्णांना इ.स. १८५८ मध्ये कामारपुकूरला परत आणले. तिथे त्यांच्या स्वास्थ्यलाभासाठी औषधपाणी वगैरेसोबत घरच्यांनी धार्मिक आणि तांत्रिक अनुष्ठान आदीही सुरू केले. श्री रामकृष्ण कधी अगदी सामान्य माणसासारखे व्यवहार करीत तर कधी भावावेशात बाह्यसंज्ञारहित होऊन जात. तर कधी मनाच्या व्याकुळतेने 'आई आई' करत. सांसारिक बाबतीत तर नेहमीच उदासीन असत. या सगळ्यामुळे त्यांना भूताने पछाडले असावे अशीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे मांत्रिक बोलावून भूत पळवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण कशाने काही फरक पडला नाही.

कामारपुकूरच्या पश्चिम आणि ईशान्य सीमेवर दोन स्मशाने होती. श्री रामकृष्ण या दोन्ही ठिकाणी जाऊन बसत. तर कधी वाडग्यांमध्ये काही नैवेद्य वगैरे घेऊन जात आणि तिथल्या देवता उपदेवतांना तो अर्पण करत. तो नैवेद्य खायला कोल्हेही येत असत. एके रात्री खूप उशीर झाला म्हणून त्यांचे भाऊ रामेश्वर त्यांना शोधत स्मशानात गेले आणि भावाच्या नावाने आवाज देत शोधू लागले. त्यावेळी श्री रामकृष्ण त्यांना मोठ्याने आवाज देऊन सावध करत म्हणाले, 'आलो रे दादा. पण तू इकडे येऊ नको. हे तुला त्रास देतील.' स्मशानातील पिंपळाच्या झाडाखाली बसून ते खूप वेळ जप ध्यान करीत असत. महिन्यांमागून महिने जाऊ लागले आणि जगदंबेचे वारंवार दर्शन लाभून त्यांची अस्वस्थता कमी होऊ लागली.

याच काळात घरच्यांनी त्यांच्या नकळत त्यांच्या विवाहाचा विचार सुरू केला होता. ही कुजबुज त्यांच्या कानी गेली तेव्हा त्यांनी या प्रयत्नांना काहीही हरकत घेतली नाही. उलट त्यांना आनंद झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये माणसे पाठवून वधूचा शोध सुरू झाला. काही वधू लक्षातही आल्या पण त्यांच्या आईवडिलांनी हुंडा खूप मागितल्याने विवाह काही जमू शकला नाही. असेच दिवस जात असताना एक दिवस स्वतः श्री रामकृष्ण भावावस्थेत घरच्यांना म्हणाले, 'इकडेतिकडे शोध करणे व्यर्थ आहे. जयरामवाटी खेड्यातील रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी लग्नाची वधू आहे. तीच माझी नियोजित वधू आहे.' त्यांच्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही तरीही शोध घ्यावा असा विचार करून माणूस पाठवण्यात आला. तो माणूस माहिती काढून आला की, बाकी काही हरकत नसली तरी वधूचे वय फारच कमी आहे. अवघे पाच वर्षे. पण दुसरी वधू सापडत नसल्याने त्यांच्या आईने या मुलीला होकार दिला आणि इ.स. १८५९ च्या मे महिन्यात वयाच्या २४ व्या वर्षी श्री रामकृष्णांचा विवाह झाला. लग्नात वधू पक्षाला तीनशे रुपये हुंडा देण्यात आला.

व्याह्यांचे मन राखण्यासाठी आणि इभ्रत राहावी म्हणून, वधूच्या अंगावर चंद्रादेवीने काही दागिने घातले होते. हे दागिने कुटुंबाचे स्नेही गावचे जमीनदार लाहाबाबू यांच्याकडून आणले होते. याच दागिन्यांनी वधूला विवाहात सजवले होते. काही दिवसांनी दागिने परत करण्याची वेळ आली. त्यावेळी चंद्रादेवी 'आता कसे करावे?' या विचारात पडली. मात्र श्री रामकृष्णांनी आईला शांत केले आणि नववधू झोपली असताना हळूच ते दागिने काढून घेतले. जागी झाल्यावर मात्र तिने आपल्या सासूला विचारले, 'माझ्या अंगावरचे दागिने कुठे गेले?' त्यावर चंद्रादेवीने तिला मांडीवर घेऊन ओल्या डोळ्यांनी समजावले, 'माझा मुलगा तुला यापेक्षा चांगले दागिने देईल.' प्रकरण इथे संपले मात्र नाही. मुलीचे काका त्याच दिवशी तिला भेटायला आले तेव्हा त्यांना हा प्रकार कळला. अन असंतुष्ट होऊन ते मुलीला माहेरी घेऊन गेले. श्री रामकृष्णांनी दु:खी आईची समजूत घातली. विवाहानंतर एक वर्ष सात महिन्यांचा काळ श्री रामकृष्णांनी कामारपुकूरला घालवला. इ.स. १८६० च्या अखेरीस मुलीला सातवे वर्ष लागल्यावर कुळाच्या प्रथेप्रमाणे काही दिवस सासरी जाऊन ते आपल्या पत्नीला घेऊन कामारपुकूरला परत आले. नंतर त्यांनी कोलकात्याला परतण्याचा निर्णय घेतला आणि कालीवाडीत परतून त्यांनी जगदंबेच्या सेवेचे काम स्वतःकडे घेतले.

दक्षिणेश्वरला कालीवाडीत परतल्यानंतर ते जणू कामारपुकूर, तेथील वास्तव्य, तिथलं जगणं सगळं विसरून गेले. पुन्हा एकदा दिव्योन्माद सुरू झाला. मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांनी पुन्हा वैद्यांचे उपचार सुरू केले. एकदा वैद्याकडे गेले असतानाच तिथे असलेल्या दुसऱ्या एका वैद्याने त्याचे मत नोंदवले की, श्री रामकृष्णांना कोणताही रोग झालेला नसून हा योगजन्य दिव्योन्माद आहे. तिकडे जन्मगावीही ही वार्ता कळली. तेव्हा त्यांची आई चंद्रादेवी यांनी शिवमंदिरात प्रायोपवेशन केले. दोन तीन दिवसातच त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, 'भीतीचे कारण नाही. तुझा मुलगा वेडा झाला नसून ईश्वरी आवेशाने त्याची अशी अवस्था झाली आहे.'

त्या काळातील अवस्थेसंबंधी ते सांगत असत - 'मला झालेल्या ईश्वरी भावाच्या एक चतुर्थांश जरी सामान्य माणसाला झाला तरी त्याचा देहपात होईल. दिवसरात्र आईचे दर्शन होत असे. सहा वर्षे तिळमात्र झोप नव्हती. पापण्यांची उघडझाप बंद झाली होती. प्रयत्न करूनही पापण्या मिटत नसत. शरीराकडे पाहून भीती वाटत असे. वाटत असे वेडा होतो की काय? आरशासमोर उभा राहून डोळ्यात बोट घालत असे. तरीही पापणी लवत नसे. भीतीने रडू लागून आईला म्हणत असे - तुला आळवण्याचं, तुझ्यावर विश्वास टाकण्याचं हेच फळ? शरीरात भयंकर रोग दिलास? पण दुसऱ्याच क्षणी म्हणत असे - ठीक आहे. जे व्हायचं ते होऊ दे. शरीर जायचं असेल तर जावो. पण तू मात्र मला सोडू नकोस. मला दर्शन दे. कृपा कर. तुझ्याशिवाय मला गती नाही. अशा रीतीने रडतारडता अपूर्व उत्साह दाटून येई.'

याच काळात एक दिवस श्री रामकृष्ण एक दिवस पडवीत फिरत असताना व्यवस्थापक मथुरबाबूंना एक विलक्षण दर्शन झाले होते. श्री रामकृष्ण एकीकडे जात असताना त्यांना शिव चालत आहेत असे दिसे, तर वळून परत जाताना दुर्गा चालते आहे असे दिसे. या अद्भुत प्रकारानी मथुरबाबूंना चक्रावून तर टाकलेच होते पण त्यांची श्री रामकृष्णांवरील श्रद्धाही अधिक दृढ झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा