सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (२)

वडील क्षुदिराम चटोपाध्याय यांनी जगाचा निरोप घेतल्याला दोन वर्षे उलटून गेली. तेव्हा परंपरेप्रमाणे ज्येष्ठ बंधू रामकुमार यांनी गदाधराच्या उपनयनाची (मौंजीबंधनाची) तयारी सुरू केली. त्यावेळी गदाधराला नववे वर्ष सुरू होते. मौंजेचा दिवस जवळ आला तेव्हा बालक गदाधराने आपला मनोदय वडील भावाला सांगितला. धनी नावाच्या लोहार जातीच्या एका स्त्रीकडून आपण मौंजविधीतील पहिली भिक्षा घेणार असल्याचे त्याने सांगितले. या धनीनेच गदाधराच्या जन्माच्या वेळी दाई म्हणून चंद्रादेवीची मदत केली होती. तिचा या कुटुंबाशी स्नेहाचा संबंधही होता. एकदा केव्हा तरी तिने गदाधराजवळ आपली ही इच्छा व्यक्त केली होती आणि बालकानेही तिला होकार दिला होता. आता त्याने ते वचन पूर्ण करण्याचा आग्रह धरला. वडील भावासमोर मात्र पेच निर्माण झाला. बालकाच्या या हट्टामुळे कार्यात विघ्न येते की काय अशी स्थिती तयार झाली. गावचे जमीनदार आणि क्षुदिराम चटोपाध्याय यांचे स्नेही धर्मदास लाहा यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली. त्यावेळी रामकुमार यांची समजूत घालत ते म्हणाले, 'तुमच्या कुटुंबात अशी गोष्ट कधी घडली नसेल. पण इतरत्र अनेक ब्राह्मणांच्या घरी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणी बोल लावणार नाही.' अखेर रामकुमार यांची समजूत पटली आणि गदाधराने धनी लोहारणीकडून मौंजेत पहिली भिक्षा घेतली. वचन न पाळल्यास खोटे बोलण्याचे पातक लागते आणि अशा व्यक्तीला ब्राम्हण म्हणवण्याचा आणि यज्ञोपवित (जानवे) धारण करण्याचा अधिकार नाही हा बालकाचा युक्तिवाद जिंकला. या प्रसंगातील तीन बाबी लक्षणीय म्हणता येतील. एक तर बालक गदाधराची दृष्टी आणि विचार, दुसरे म्हणजे जमीनदारांची समन्वय करण्याची भूमिका, तिसरे म्हणजे ब्राम्हण व अन्य जातीतील सलोख्याचे वातावरण. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात कामारपुकुरसारख्या छोट्याशा गावात समाजाची ही स्थिती होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

उपनयन संस्कार झाल्यानंतर गदाधराला कुलदेवता रघुवीर, तसेच शीतलामाता, शिव आदी देवादिकांची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. वडील नसल्याने तसेच मोठे भाऊ रामकुमार प्रापंचिक कामात आणि जीविकोपार्जन करण्यात व्यस्त राहत असल्याने घरच्या देवांच्या पूजेचे काम बालकाकडे आले. धार्मिक वृत्तीचा गदाधर सगळ्या चित्तवृत्ती एकाग्र करून देवपूजा करू लागला. त्याची ही धर्मवृत्ती आणि त्या वृत्तीची एकाग्र तीव्रता एवढी असे की, त्याला अधूनमधून भावसमाधी लागत असे. एका महाशिवरात्रीला तर रात्रीच्या वेळी शिवाचे नाटक करणारा नट न आल्याने गदाधरालाच शिवाचे रूप सजवून उभे करण्यात आले अन बालकाला केवळ तेवढ्यानेच भावसमाधी प्राप्त झाली. समाधी काही केल्या उतरेना त्यामुळे नाटक बंद करावे लागले. तेव्हापासून गावातही बालकाच्या अशा समाधीची चर्चा होऊ लागली.

याच काळात वयाच्या ११ व्या, १२ व्या वर्षीच गदाधराच्या मनात वैराग्याचा उदय होऊ लागला. वैराग्य, ईश्वरभक्ती, सत्यनिष्ठा, सदाचरण, धर्मपरायणता यांच्याऐवजी; पंडित आणि भट्टाचार्य लोकांमध्ये भोगसुखाची आणि धनाची लालसाच असते हे पाहून; त्याच्या मनात शास्त्र इत्यादींच्या विद्येविषयी उदासीनता निर्माण होऊ लागली.

अर्थात त्याचे शाळेत जाणे सुरूच होते. मातृभाषेतील पुस्तके वाचणे, मातृभाषेत लिहिणे बालकाला येऊ लागले होते. गावातील लोकांना गदाधर रामायण, महाभारत वाचून दाखवीत असे. लोकही त्याला कथा, पुराणे वाचण्यासाठी बोलावीत असत. श्री रामकृष्णांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली रामकृष्णायन पोथी, योगाद्येचे गाणे, सुबाहुचे गीत इत्यादी, त्यांचे चरित्रकार स्वामी सारदानंद यांना कामारपुकुरच्या घरी सापडले होते.

गणिताची नावड असूनही पाढे, जुजबी बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार गदाधर करू शकत असे. परंतु याच सुमारास त्यांना अधूनमधून होणारी भावसमाधी पाहून त्यांना वायूरोग झाला असावा या भीतीने शाळेत जाणे, अभ्यास करणे यासाठी कोणीही त्यांना आग्रह करीत नसे. अशीच दोन तीन वर्षे निघून गेली. कुटुंबाचा डोलारा सांभाळणारे मोठे भाऊ रामकुमार यांची कमाई हळूहळू कमी होऊ लागली. त्यांची पत्नीही मुलाला जन्म देऊन देवाघरी निघून गेली. कर्जही होऊ लागले. त्यावेळी, कोलकात्याला जाऊन काही खटपट करावी असा विचार करून रामकुमार कोलकाता नगरीत दाखल झाले. तिथे झामापूकुर भागात एक संस्कृत पाठशाळा उघडून ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले.

गदाधर मात्र गावातच राहून आधीसारखेच जीवन जगत होता. घरची पूजा इत्यादी कामे करणे. आईला कामात मदत करणे. साधूसंतांना भेटणे, त्यांची कामे करणे, त्यांच्याकडून धार्मिक कथा, शास्त्रे यांचं श्रवण करणे, स्वतः कथा सांगणे, धार्मिक नाटके करणे, चित्र व मूर्ती बनवणे; हे सगळे सुरूच होते. गावातील सगळ्या जातीजमातीच्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यात गदाधर अतिशय प्रिय होता. त्याची सरलता, सात्विकता, धार्मिकता, ऋजुता, स्नेह, निष्कपटता यामुळे सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता. गदाधर नाटक वा उत्सव प्रसंगी कोणाकोणाच्या आग्रहाने स्त्री वेष सुद्धा करीत असे. अन हे इतके बेमालूमपणे करीत असे की रोजच्या लोकांनाही तो ओळखू येत नसे. अशी फजिती झाल्याचे किस्सेही घडले होते. अगदी स्त्रियासुद्धा स्त्री वेशातील गदाधराला ओळखू शकत नसत.

मोठे भाऊ रामकुमार यांना मात्र गदाधराच्या सांसारिक उदासीनतेमुळे चिंता वाटू लागली होती. त्यांच्या कोलकात्यातील संस्कृत पाठशाळेचा व्यापही वाढत होता. त्यामुळे त्यांना सोबतीची गरजही वाटत होती. गदाधराबद्दलची काळजी आणि सोबतीची गरज या दोन्ही गोष्टी आई व मधला भाऊ रामेश्वर यांच्याशी बोलून रामकुमारांनी गदाधराला आपल्यासोबत कोलकात्याला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने गदाधर नकळतपणे आपल्या कर्मक्षेत्री दाखल झाला. त्यावेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते.

गदाधराच्या अंगच्या अद्भुत स्मरणशक्ती, विवेचक बुद्धी, दृढनिश्चय, साहस, थट्टाविनोद, प्रेम आणि करुणा; यांचा परिचय त्यांच्या कामारपुकुर येथील बालजीवनात सगळ्यांना झाला. विश्वास, पवित्रता, स्वार्थरहितता, निष्कपटता हे तर त्यांचे स्वभावविशेष होते. कोलकात्याला आल्यावरही त्यात काही बदल झाला नाही. संस्कृत पाठशाळेसोबतच रामकुमार पुष्कळ सधन लोकांच्या घरी देवपूजेचे कामही करीत असत. गदाधर कोलकात्यात आल्यावर त्यांना हाताशी एक जण मिळाला आणि घरोघरीच्या देवपूजेचे काम त्यांनी आपल्या लहान भावावर सोपवले. मुळातच आवडीचे असलेले देवपूजेचे काम गदाधर मनापासून करू लागला. उरलेल्या वेळात त्याने शास्त्रांचा अभ्यासही करावा अशी रामकुमार यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्याबाबतीत मात्र गदाधर उदासीन असे. भावाच्या भावी जीवनाच्या चिंतेपोटी एक दिवस रामकुमारांनी त्यांची याबाबत कानउघाडणी केली. मात्र त्या कानउघाडणीने विचलित न होता गदाधराने मोठ्या भावाला स्पष्ट उत्तर दिले - 'मला केळ्या तांदळाची गाठोडी बांधणारी विद्या शिकायची नाही. मला अशी विद्या शिकायची आहे ज्याने ज्ञानाचा उदय होऊन माणूस कृतार्थ होतो.' आपल्याला सांसारिक विद्या शिकून संसारात पडायचे नाही तर जीवनाचा अर्थ समजून घेऊन कृतार्थ व्हायचे आहे, हे गदाधराने पहिल्यांदा एवढ्या स्पष्टपणे सांगितले. आपल्या जीवनाची ही जाणीव त्यांना त्यावेळी होत होती आणि सर्वप्रथम त्यांनी ती आपल्या वडील भावाजवळ व्यक्त केली. जीवनाची ही कृतार्थता कशी प्राप्त होणार, त्यानंतर आपण काय करणार याबद्दल काहीही संकेत त्यांनी दिले नाहीत पण आपले जीवन सर्वसामान्य लोकांसारखे नसेल एवढे सूतोवाच मात्र त्यांनी त्यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा