सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (७)

इ. स. १८५५ ते १८६७ असा बारा वर्षांचा काळ हा श्री रामकृष्णांच्या दक्षिणेश्वर येथील साधनेचा काळ आहे. त्यातील फक्त पहिली चार वर्षेच त्यांनी कालीमातेचे पुजारी म्हणून काम केले. या बारा वर्षांचे तीन सारखे भाग करता येतात. त्यातील प्रत्येक चार वर्षांचा काळ हा एकूण साधनेचाच एक भाग असला तरीही, त्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. पहिल्या चार वर्षांच्या काळात त्यांनी केलेली साधना ही मनाच्या अभूतपूर्व तीव्र तळमळीने स्वतः केलेली साधना आहे. त्यात कोणीही मार्गदर्शक वा गुरू नव्हते. या पहिल्या चार वर्षांच्या साधनेत शास्त्र वगैरेचा संबंध नव्हता. जी काही होती ती तीव्र तळमळ आणि त्यांचा जगन्मातेशी असलेला सरळ निर्व्याज आंतरिक सशक्त संवाद. केवळ या संवादाच्या भरवशावर त्यांनी ईश्वरलाभ करून घेतला होता.

याच प्रारंभीच्या काळात जगदंबेच्या दर्शनानंतर त्यांना त्यांची कुलदेवता असलेल्या रघुवीराच्या दर्शनाची तळमळ उत्पन्न झाली. हनुमंतासारख्या अनन्य भक्तीने आपल्याला श्री रामचंद्राचे दर्शन होईल असे त्यांना वाटू लागले आणि आपण हनुमंत असल्याचा भाव त्यांनी स्वतःवर आरोपित करून साधना सुरू केली. त्या भावात ते इतके तन्मय झाले की, त्यांचे सगळे वागणे हनुमंतासारखेच होऊ लागले. धोतर शेपटासारखे कंबरेला गुंडाळून घेत. उड्या मारतच चालत. फळांशिवाय दुसरं काहीही खात नसत. फळेही सालीसह खात. दिवसाचा खूप वेळ झाडावरच बसून राहत. अन तोंडाने सतत रघुवीर रघुवीर असा एकसारखा जप करत. त्या काळात त्यांच्या पाठीच्या कण्याचे खालचे टोक जवळजवळ इंचभर वाढले होते. या भावाचा उपशम झाल्यावर कणा पुन्हा सामान्य झाला होता. या साधनेने त्यांना रघुवीराचे दर्शन झाले वा नाही याचा नेमका उल्लेख नाही, पण या साधनाकाळात सीतामाईचे दर्शन झाल्याचे मात्र त्यांनी स्वतःच नंतर सांगितले होते.

सीतामाईच्या दर्शनाची कहाणी श्री रामकृष्णांच्याच शब्दात अशी - 'त्या काळात एक दिवस पंचवटीत बसलो होतो. ध्यानचिंतन काही करीत नव्हतो. नुसताच बसलो होतो. इतक्यात एक अनुपम ज्योतिर्मय स्त्री जवळच आविर्भूत झाली आणि तिने ते स्थळ उजळून टाकले. मला त्यावेळी ती आकृतीच दिसत होती असे नाही. तर पंचवटीतील झाडेझुडपे, गंगा वगैरे सगळे काही दिसत होते. ती मानव स्त्रीच होती पण प्रेम, दु:ख, करुणा, सहिष्णुता यांचा त्या मुखावरच्यासारखा अपूर्व ओजस्वी गंभीर भाव देवीच्या मुखावरदेखील साधारणपणे आढळून येत नसतो. प्रसन्न मुद्रेने ती देवमानव स्त्री माझ्या रोखाने पुढेपुढे येऊ लागली. स्तंभित होऊन 'ही कोण' असा विचार करीतच होतो एवढ्यात एका वानराने हुप्प आवाज करत तिच्या पायाशी लोळण घेतली. अन माझे अंतर्मन उद्गारले 'ही सीता ! उभा जन्म दु:खच दु:ख भोगलेली सीता ! राजा जनकाच्या आनंदाचं निधान असलेली सीता ! जिचं सारं जीवन रामाने भरून टाकलं होतं ती सीता!' अन आई आई म्हणत तिच्या पायांवर पडणार त्या क्षणार्धात ती माझ्या शरीरात प्रविष्ट झाली. आनंदाने, विस्मयाने भारावून जाऊन बाहेरचे भान हरवून पडून गेलो. ध्यानचिंतन वगैरे न करता अशा रीतीने कोणतेही दर्शन यापूर्वी आणखी कधी मला झाले नव्हते.'

दक्षिणेश्वरला कालीवाडी तयार झाल्यानंतर, गंगासागर आणि जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू तिथे मुक्कामाला येऊ लागले. त्यांच्यात पुष्कळ साधक आणि सिद्ध लोक सुद्धा असत. त्यांच्याच कडून प्राणायाम आदी क्रिया शिकून घेऊन श्री रामकृष्ण या प्रारंभीच्या काळात हठयोग साधना करू लागले होते. या हठयोगाच्या साधना काळातच एक दिवस रात्री आठ नऊच्या सुमारास त्यांना टाळूच्या भागात खूप गुदगुल्या होऊ लागल्या आणि त्यांच्या तोंडावाटे रक्त पडू लागले. श्री रामकृष्ण याविषयी सांगत की, 'पडणाऱ्या रक्ताचा रंग घेवड्याच्या पानाच्या रसासारखा काळाशार होता. अन ते खूप घट्ट होते. त्यामुळे थोडे बाहेर पडले अन काही दातांना चिकटून पारंब्यासारखे लोंबु लागले. तोंडात बोळा कोंबून दाबून धरले तरी रक्त थांबत नव्हते.' या घटनेने कालीवाडीत सगळ्यांची धावपळ सुरू झाली. गडबड पाहून देवस्थानात उतरलेला एक साधू तिथे आला. तो प्रकार पाहून त्याने सांगितले, 'घाबरण्याचे कारण नाही. रक्त पडले हे चांगलेच झाले. हठयोगाच्या सर्वोच्च अवस्थेत जडसमाधी लागत असते. तुम्हालाही लागत होती. सुषुम्नाद्वार उघडून रक्त डोक्यात चढत होते. ते डोक्यात न चढता तोंडातून बाहेर निघाले हे चांगले झाले. कारण जडसमाधी लागली असती तर ती कशानेही भंगली नसती. तुमच्या शरीराद्वारे काहीतरी विशेष कार्य व्हावयाचे आहे. त्यासाठीच जगदंबेने तुमचे या प्रकारे रक्षण केले.' त्या साधूच्या या स्पष्टीकरणाने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नंतरच्या काळात त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना, साधकांना, मुमुक्षूंना मात्र श्री रामकृष्ण हठयोग साधना न करण्याचाच उपदेश करत असत. वर्तमान युग, मानवाची आयुर्मयादा, योग्य गुरुची उपलब्धता अशा पुष्कळ कारणांसाठी हठयोग न करता भक्तीचाच उपदेश ते करत. भक्तीमार्गानेही त्याच ठिकाणी पोहोचता येते जिथे हठयोग घेऊन जातो, असा त्यांचा उपदेश राहत असे.

साधनाकाळाच्या प्रारंभीच्या चार वर्षांच्या काळात श्री रामकृष्णांना एका तरुण संन्याशाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असे. हा तरुण संन्यासी कधीही त्यांच्याच शरीरातून बाहेर येई आणि त्यांना नाना सूचना आणि आदेश देत असे. या काळात त्यांची अवस्था विवेक चुडामणीत केलेल्या सिद्ध पुरुषाच्या वर्णनाप्रमाणे झाली होती. कधी बालकासारखे, कधी उन्मत्त व्यक्तीसारखे, तर कधी पिशाच्चवत. त्यामुळे ते वेडे झाले आहेत की काय असा अनेकांचा समज होत असे. पुष्कळ जण तशा चर्चाही करत असत. परंतु श्री रामकृष्णांचा सर्वसाधारण व्यवहार पाहून मात्र कोणालाही मत बनवता येत नव्हते. कोणी सांगितलेले औषध आदी उपाय नीट करणे, कुठे भजन वगैरे असेल तिथे सगळ्यांसारखा सहभाग; इत्यादींमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होई. त्यांना भेटणारे सिद्धसाधक मात्र त्यांच्या आध्यात्मिक अवस्थेची खात्री देत. बाकीच्यांना मात्र काही उमज पडत नसे. एवढेच काय दक्षिणेश्वर मंदिराची मालकीण राणी रासमणी आणि मंदिराचे व्यवस्थापक आणि राणीचे जावई मथुरानाथ यांनाही श्री रामकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. अखंड ब्रम्हचर्य पालनामुळे त्यांच्या डोक्यात विकृती निर्माण झाल्याचा कयास करून या दोघांनी, प्रथम दक्षिणेश्वरी आणि नंतर मेछुयाबाजार भागात त्यांच्याकडे वेश्या पाठवल्या होत्या. मात्र त्या वेश्यांना पाहताच 'आई आई' म्हणत त्यांना जो ईश्वरानुराग होत असे तो पाहून त्या वेश्याच खजील झाल्या होत्या. अन त्याच श्री रामकृष्णांना प्रणाम करून निघून गेल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा