साधारण १८६४ साली केव्हातरी श्रीमत परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले. हे एक नागा संन्यासी होते. बराच काळ त्यांनी नर्मदा तटाकी साधना केली होती. भ्रमण करत करत ते राणी रासमणीच्या कालीवाडीत पोहोचले. एक दिवस नावेतून उतरून ते गंगा किनाऱ्यावरील देवस्थानाच्या ओवरीत येऊन बसले. इकडेतिकडे पाहताना त्यांना श्री रामकृष्ण दृष्टीस पडले. श्री रामकृष्ण अन्यमनस्कपणे, जणू या जगात नाहीतच असे त्याच ओवरीत बसले होते. तोतापुरींना त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटले. ही व्यक्ती अद्वैत वेदांताच्या साधनेला अत्युत्तम आहे असे त्यांच्या मनात आले. तोतापुरी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, 'तुम्ही अद्वैत साधना कराल का?' त्यावर श्री रामकृष्णांनी उत्तर दिले - 'मी काय करणार वा करणार नाही हे काही मला ठाऊक नाही. माझी आई म्हणेल तसे मी करीन.' त्यावर तोतापुरी त्यांना म्हणाले, 'मग जाऊन आईला विचारून या.' त्यावर श्री रामकृष्ण उठले आणि हळूहळू काली मंदिरात गेले. तिथे जाताच त्यांना भगवतीचा आवाज आला, 'तू अद्वैताची साधना कर.' प्रणाम करून श्री रामकृष्ण माघारी वळले. तोतापुरी हे सगळे पाहत होते. त्यांना गंमत वाटली. हा माणूस या देवीमूर्तीला आई मानतो आणि तिलाच सल्ला विचारतो हे पाहून त्यांना थोडी मौजही वाटली. कारण ते स्वतः अद्वैत सिद्धांताचे मोठे अधिकारी पुरुष होते. अन या विश्वाची ती आदिशक्ती दोघांच्याही नकळत अलगदपणे आपले कार्य करत होती.
वेदांत साधना करण्यापूर्वी तुम्हाला जानवे आणि शेंडी यांचा त्याग करून संन्यास घ्यावा लागेल असे तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, गुप्तपणे संन्यास घेता येत असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्यासोबत राहणाऱ्या आणि मोठ्या मुलाच्या निधनाने पोळलेल्या शोकसंतप्त अशा माझ्या आईला माझ्या संन्यास घेण्याने त्रास होईल. तिला अधिक दु:ख होऊ नये म्हणून मी गुप्तपणे संन्यास घेईन. तोतापुरींनी त्याला संमती दिली. त्यानंतर एका शुभ दिवशी तोतापुरी यांनी त्यांच्याकडून प्रथम पितरांचे व नंतर स्वतःचे (श्री रामकृष्णांचे स्वतःचे) श्राद्धही करवून घेतले. कारण संन्यास घेण्यापूर्वी साधक तिन्ही लोकांचा निरोप घेत असतो. श्री रामकृष्णही तोतापुरी सांगतील ते ते अगदी तसेच व्यवस्थित करू लागले. श्राद्ध आदी आटोपल्यावर साधनेच्या सामानाची जुळवाजुळव पण त्यांनी करून ठेवली. नंतर एका ब्राम्ह मुहूर्तावर दोघेही दक्षिणेश्वरच्या पंचवटीतील कुटीरात उपस्थित झाले. पूर्वकर्म झाले. होम पेटवण्यात आला. पवित्र मंत्रांच्या गंभीर आवाजाने पंचवटी निनादली. श्री रामकृष्ण त्रिसुपर्ण मंत्रांच्या मंत्रोच्चारासह होमात आहुती देऊ लागले. त्यानंतर विरजा होम सुरू झाला. 'माझ्या ठायी असणारी पंचमहाभूते शुद्ध होवोत... मी रजोगुणाच्या मलिनतेपासून मुक्त होवो... माझ्या ठायी असणारे प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे सगळे वायू शुद्ध होवोत... माझे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे पंचकोष शुद्ध होवोत... माझ्या ठायी असलेले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे विषयसंस्कार शुद्ध होवोत... माझे मन, वाणी, काया, कर्म शुद्ध होवोत... माझ्या मार्गातील सगळे अडथळे दूर होवोत... माझी सगळी मलिनता दूर होऊन मी ज्योति:स्वरूप होवो...' अशी प्रार्थना करत अनेक आहुती दिल्या गेल्या. नंतर 'सर्व लोकांच्या प्राप्तीची आशा मी त्यागतो' आणि 'सर्व भूतांना अभय देतो' असे म्हणून होमाची समाप्ती झाली. शिखा आणि यज्ञोपवित यांचा त्याग झाला.
गुरूने दिलेली कौपीन, काषाय वस्त्रे परिधान केली. गुरूने दिलेले 'श्री रामकृष्ण' हे नाव ग्रहण केले. अन तोतापुरी यांच्याजवळ ते उपदेश श्रवण करण्यासाठी बसले. तोतापुरींनी वेदांताच्या अद्वैत सिद्धांताचा उपदेश देणे सुरू केले. नंतरच्या काळात याबद्दल सांगताना श्री रामकृष्ण सांगत असत - 'दीक्षा प्रदान करून तोतापुरी अनेक सिद्धांत वाक्यांचा उपदेश करू लागले. मन विकल्परहित करून आत्मध्यानात निमग्न होऊन जाण्यास त्यांनी सांगितले. मी मात्र मनाला विकल्परहित करून नामरूपाच्या अतित नेऊ शकलो नाही. इतर साऱ्या गोष्टीतून क्षणात मन बाहेर पडत असे. मात्र अखेरच्या क्षणी जगदंबेचे उज्वल रूप उदयास येई आणि मन तिथेच थांबे. वारंवार असे झाले तेव्हा डोळे उघडून त्यांना म्हणालो, नाही जमले.' त्यावर तोतापुरी क्षुब्ध झाले आणि निर्भत्सना करून म्हणाले, 'क्यो होगा नहीं?' इतके म्हणून त्यांनी इकडेतिकडे नजर फिरवली. कुटीत फुटक्या काचेचा एक तुकडा त्यांना दिसला. तो उचलून त्याचे तीक्ष्ण टोक माझ्या भुवयांमध्ये जोराने रोवून म्हणाले, 'या बिंदूवर मन केंद्रित करा.' तेव्हा दृढ संकल्प करून ध्यानास बसलो. फिरून अखेरच्या क्षणी जगदंबेची मूर्ती मनात उदय पावली तेव्हा ज्ञान ही तलवार आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीचे दोन तुकडे करून टाकले. मग विकल्प राहिला नाही आणि मन वेगाने नामरूपांचे राज्य ओलांडून समाधीत पोहोचले.'
अशा रीतीने श्री रामकृष्ण समाधीत स्थित झाल्यावर तोतापुरी कुटीच्या बाहेर आले आणि कोणी समाधीभंग करू नये म्हणून कुटीचे दार त्यांनी बाहेरून लावून घेतले. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस असे तीन दिवस सरले. कुटीचे दार उघडण्यासाठी आतून आवाज मात्र आला नाही. आश्चर्य वाटून तोतापुरी आत गेले आणि पाहतात तर काय? ज्या स्थितीत श्री रामकृष्ण बसले होते त्याच स्थितीत होते. शरीराची स्थिती किंचितही बदलली नव्हती. श्वासोच्छ्वास पूर्ण बंद होता. सगळे वायू निरुद्ध झालेले. जिवंतपणाचे काहीही लक्षण नाही. त्यांनी शिष्याच्या शरीराला पुन्हापुन्हा स्पर्श केला तरीही काहीच चेतना नाही, कसली हालचाल नाही, कसली प्रतिक्रिया नाही. निस्पंद... निष्कम्प... हे पाहून तोतापुरी आनंदाने व विस्मयाने ओरडले, 'यह क्या दैवी माया? समाधी... निर्विकल्प समाधी... एकही दिन मे !!'
सतत चाळीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर आपण प्राप्त केलेली अद्वैत अवस्था या अद्भुत शिष्याने एका दिवसात प्राप्त करून घेतली याचे सकौतुक आश्चर्य वाटलेल्या तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना साधारण भावभूमीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन दिवसांपेक्षा जास्त कुठेही न राहणारे तोतापुरी, त्यानंतर कुठल्याशा अगम्य ओढीने अकरा महिने दक्षिणेश्वरच्या पंचवटीत राहिले. या काळात त्या दोन गुरूशिष्यात अद्वैतानंदाची लयलूट होत होती.
अकरा महिने पंचवटीत राहून तोतापुरी आपल्या मार्गाने निघून गेल्यावर आपण सतत याच अद्वैत बोधात राहावे अशी इच्छा श्री रामकृष्णांच्या मनात निर्माण झाली. अन तब्बल सहा महिने श्री रामकृष्ण या समाधी अवस्थेत होते. ज्या अवस्थेत राहिल्यावर साधारण जीव परत फिरू शकत नाही आणि एकवीस दिवसात शरीर सुकलेल्या पानासारखे गळून पडते, त्या अवस्थेत ते सहा महिने होते. त्याविषयी ते सांगत असत - 'दिवस कधी उगवत असे, रात्र कधी येत असे जात असे, हेही कळत नव्हते. मेलेल्या माणसाच्या नाकातोंडात माशा शिरतात तशा शिरत असत. मात्र त्याचे भान नसे. केसात माती जमून जमून जटा झाल्या होत्या. शौचाला वगैरे होऊन जाई तरीही शुद्ध नसे. अशा स्थितीत शरीर काय टिकले असते? पण त्याच वेळी कुठून तरी एक साधू तिथे हजर झाला. त्याच्या हाती एक काठी होती. त्याने माझी अवस्था ओळखली. त्याला कळले की, माझे कार्य अजून व्हायचे आहे. म्हणून खाण्याच्या वेळी तो खायचे आणून मला मारून मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. थोडी शुद्ध येते आहे असे दिसले की जबरदस्तीने खाण्याचे कोंबून द्यायचा. कधीकधी पोटात एव्हढेतेवढे जाई, कधी तेही नाही. असे सहा महिने उलटले. त्यानंतर त्याच अवस्थेत आईची वाणी ऐकू आली - 'भावमुखी राहा. लोकोपदेशासाठी भावमुखी राहा.' त्यानंतर आजारी पडलो. सहा महिने पोटाच्या दुखण्याने बेजार होतो. मग हळूहळू सामान्य अवस्था आली.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा