आपले वडील भाऊ रामकुमार यांच्यासोबत श्री रामकृष्णही दक्षिणेश्वरच्या कालिवाडीत त्यांच्यासह राहू लागले. मंदिराचे व्यवस्थापक आणि राणी रासमणीचे जावई मथुरबाबू यांचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्यांना त्यांच्याबद्दल कसलेसे अनामिक आकर्षणही होते. श्री रामकृष्णांचा स्वभाव, धर्मनिष्ठा, भक्तिभाव यांचे त्यांना कौतुक आणि अप्रूप वाटे. त्यांनाही मंदिराच्या कामात नेमावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु भावाची कर्मनिष्ठा पाहून रामकुमार मात्र त्यासाठी तयार नव्हते. कधीही मथुरबाबूंनी तो विषय काढला तर रामकुमार त्यांचा उत्साह मोडून काढीत असत. कालीमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांचा आतेभाऊ हृदयराम पोटापाण्याच्या शोधात दक्षिणेश्वरला येऊन पोहोचला. श्री रामकृष्ण आणि हृदयराम साधारण समवयस्क होते. दोघांनाही त्यामुळे आनंद झाला आणि त्यांचे दिवस मजेत जाऊ लागले. एक दिवस श्री रामकृष्णांनी मातीची शिवप्रतिमा तयार करून त्या प्रतिमेची पूजाअर्चा केली. हृदयराम ती मूर्ती पाहून अचंबित झाला. त्याने ती मूर्ती मथुरबाबूंना दाखवली. त्यांनाही ती मूर्ती खूपच आवडली आणि ती मूर्ती श्री रामकृष्णांनी तयार केल्याचे ऐकून विस्मय वाटला. त्यांनी ती मूर्ती राणी रासमणीकडे पाठवून दिली. राणीलाही ती अद्भुत मूर्ती अतिशय आवडली आणि ती प्रसन्न झाली. यानंतर मथुरबाबूंच्या मनाने श्री रामकृष्णांना मंदिराच्या कामात नेमण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. एक दिवस मंदिराच्या आवारात श्री रामकृष्णांना पाहून मथुरबाबूंनी त्यांना बोलवायला माणूस पाठवला. श्री रामकृष्ण मात्र त्यांच्याकडे जायला का कू करू लागले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या हृदयरामने त्यांना कारण विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मला नोकरीत वगैरे बांधून घेण्याची अजिबात इच्छा नाही. शिवाय मूर्तीचे दागिने वगैरे सांभाळायचे म्हणजे जबाबदारीचेच काम. ते काही जमणार नाही. तू ही जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी काम स्वीकारीन.' हृदयराम त्यासाठी तयार झाले. नंतर श्री रामकृष्ण मथुरबाबूंना भेटले आणि त्यांनी आपला मनोदय त्यांना सांगितला. मथुरबाबू त्याला तयार झाले आणि त्यांनी दोघांनाही कामावर नेमले. त्याप्रमाणे रामकुमार मुख्य पूजकाचे काम करू लागले, श्री रामकृष्ण जगदंबेच्या शृंगाराचे काम करू लागले आणि हृदयराम त्यांना मदत करू लागले.
काली मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर तीनेक महिन्यात या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतरच्या जन्माष्टमी उत्सवाच्या वेळी एक आगळी घटना घडली. दक्षिणेश्वरच्या याच परिसरात राधागोविंदाचेही एक मंदिर आहे. त्या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात पार पडला. रात्री गोविंदजींची मूर्ती शयनासाठी घेऊन जाताना पुजाऱ्याचा हातून पडली आणि मूर्तीचा एक पाय भंगला. स्वाभाविकच अनेक चर्चांना उत आला. काय करावे याची जिकडेतिकडे विचारणा होऊ लागली. शास्त्रार्थ सुरू झाले. श्री रामकृष्णांनाही याबाबत विचारले त्यावेळी अतिशय सहजपणे त्यांनी विचारले, 'राणीच्या जावयाचा पाय मोडला तर जावई टाकून द्याल का?' अन त्यांनी उपाय सांगितला - गोविंदजींचा पाय जोडून पुन्हा पूजा सुरू करावी. मथुरबाबू चकितच झाले आणि त्यांना हा सल्ला पटलाही. त्यानुसार श्री रामकृष्णांनीच मूर्तीचा पाय जोडून दिला. त्यानंतर राधागोविंदाच्या पुजाऱ्याची हलगर्जीपणासाठी सुट्टी झाली आणि श्री रामकृष्णांकडे राधागोविंदाच्या पूजेचे काम आले.
श्री रामकृष्णांचे पूजा करणे ही पाहण्यासारखी गोष्ट होती. जो त्यांना पूजा करताना पाही तो मुग्ध होऊन जात असे. पूजा करत असताना कोण आले, कोण गेले याकडे त्यांचे लक्ष नसे एवढेच नाही तर त्याचे त्यांना भानही नसे. पूर्ण एकाग्र चित्ताने त्यांची पूजा चाले. पूजेची विशिष्ट पद्धत असते. त्यात अंगन्यास, करन्यास अशा काही क्रिया असतात. श्री रामकृष्ण नंतरच्या काळात सांगत असत की; हे अंगन्यास, करन्यास करताना आपल्या शरीरात त्या त्या ठिकाणी लखलखीत मंत्राक्षरे जडवलेली त्यांना दिसत असत. तसेच सर्पाकार कुंडलिनीशक्ती सुषुम्ना मार्गाने खरोखर सहस्रार चक्रापर्यंत चढत जाताना दिसे. अन एक एक चक्र पार करताना तो तो भाग बंद करून टाकत त्यांना निस्पंद समाधीत घेऊन जात असे. किंवा पूजेपुर्वी आपल्या चहूभोवताल पाणी फिरवून, आपले पूजास्थान अग्नीच्या परकोटाने वेढून सुरक्षित झालेले आहे अशी कल्पना करताना; प्रत्यक्ष अग्नीने आपले पूजास्थान वेढून टाकलेले त्यांना दिसत असे. पूजा करताना श्री रामकृष्ण सतत अशा प्रकारे दिव्य भावात असत. पूजा, प्रतिमेचा शृंगार इत्यादी करताना ते भक्तीविषयक गाणीही म्हणत असत. गाणी म्हणतानाही त्या गाण्याच्या भावात बुडून जाऊन, त्या भावाशी एकरूप होऊन ते गाणी म्हणत. त्यांचा आवाजही कमालीचा गोड होता. ऐकणाऱ्याला बांधून टाकण्याची शक्ती आणि गोडवा त्यांच्या गाण्यात होते. देवस्थानाची मालकीण असलेली राणी रासमणी जेव्हा मंदिरात येई तेव्हा तेव्हा त्यांना बोलावून त्यांचे गाणे ऐकत असे.
लहान भाऊ गदाधर अशा रीतीने कामकाजाला लागल्याने वडील भाऊ रामकुमार देखील निश्चिन्त झाले. गदाधराला निरनिराळ्या पूजा, पूजाविधी ते शिकवू लागले. काहीच महिन्यात त्यांनी मथुरबाबूंशी बोलून, कालीमूर्तीच्या पूजेचे महत्त्वाचे व मोठे काम गदाधराला सोपवले आणि स्वतः राधागोविंदजींच्या पूजेचे काम करू लागले. शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतल्याशिवाय जगदंबेच्या पूजेचे काम करणे योग्य नाही असा विचार करून श्री रामकृष्णांनी कोलकात्याच्या बैठकखाना भागात राहणारे शक्तीसाधक केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतली. दीक्षा घेताच त्यांना भावावेश प्राप्त होऊन समाधी लागली. स्वतः केनाराम भट्टाचार्य सुद्धा यामुळे अचंबित झाले होते.
सगळे काही सुरळीत सुरू झालेले पाहून रामकुमार काही दिवस कामारपुकुरला घरी जाण्याचा विचार करू लागले. गावी जाण्यासाठी जुळवाजुळव करत असतानाच काही कामासाठी ते श्यामनगर भागात काही दिवस राहिले. तिथेच ते एकाएकी मरण पावले. दक्षिणेश्वर येथे काली मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधारण वर्षभरातच रामकुमारांनी या जगाचा निरोप घेतला. जणू काही पुढील लीलेसाठी गदाधराला जगन्मातेच्या हाती सोपवणे हेच त्यांचे जीवितकार्य होते आणि ते पार पाडून ते पुढील प्रवासाला निघून गेले.
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा