सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (३)

श्री रामकृष्णांचे वडील बंधू रामकुमार यांनी १८५० साली कोलकात्याला पाठशाळा उघडली होती. त्यानंतर १८५२-१८५३ मध्ये त्यांनी लहान भाऊ गदाधर याला कोलकाता नगरीत आणले होते. याच सुमारास अचिंत्य शक्ती भविष्यातील आपल्या खेळाची मांडामांड करीत होती. कोलकात्याच्या जानबाजार भागात कोळी जातीची राणी रासमणी राहत होती. वयाच्या ४४ व्या वर्षी पती राजचंद्र दास यांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्या गडगंज संपत्तीची आणि दौलतीची देखभाल करण्याचे काम ओघानेच राणीकडे आले होते. तेजस्वी आणि ईश्वरपरायण राणी यशस्वीपणे हे काम करीत असे. दानधर्म, देणग्या, अन्नदान यासाठी राणीने कधी हात आखडता घेतला नव्हता. काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घेण्याची तिची इच्छा मात्र पतीनिधनामुळे बाजूला सारावी लागली होती. कारभार थोडा स्थिरस्थावर झाल्यावर आणि लहान जावई समर्थपणे कामात साथ देऊ लागल्यावर १८४९ साली पुन्हा राणीने काशीयात्रेची तयारी सुरू केली. मात्र जगन्मातेला तर काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळे यात्रेला निघण्याच्या आदल्या रात्री रासमणीला देवीने दर्शन दिले आणि आदेश दिला की, 'काशीला जाण्याची गरज नाही. येथेच भागीरथी किनाऱ्यावर माझे मंदिर उभारून, माझी मूर्तीस्थापना कर. माझ्या नैवेद्याची व्यवस्था कर. त्या ठिकाणी प्रत्यक्ष आविर्भूत होऊन मी तुझी पूजा स्वीकारीन.' राणीने हा आदेश शिरसावंद्य मानून, यात्रेसाठी काढून ठेवलेले सगळे धन भगवतीच्या मंदिर उभारण्यासाठी लावले.

राणी रासमणीने कोलकात्याला भागीरथीच्या पूर्व तीरावर उभारलेले हे मंदिरच आज दक्षिणेश्वरचे कालीमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या आवारात, भवतारीणी कालीमातेच्या सहवासात आणि आशीर्वादाने श्री रामकृष्णांची साधना आणि जीवनलीला पार पडली. याच मंदिराच्या आवारात नरेंद्रनाथ दत्त यांचे विवेकानंद रुपात परिवर्तन झाले. याच मंदिराच्या आवारात कालीमातेच्या आशीर्वादाने नवीन काळाला साजेशा आध्यात्मिक भावधारेचे सृजन झाले. आयुष्याची साधारण तीन दशके श्री रामकृष्ण याच मंदिराच्या आधारे राहिले.

१८४९ साली सुरू झालेली नऊ कळसांच्या या कालीमंदिराची उभारणी १८५५ सालीही पूर्ण झाली नव्हती. राणीला एक चिंता सतावू लागली की, जीवनाचा काही भरवसा नाही. मंदिर बांधकाम पूर्ण व्हायचे आहे अन आपल्याला देवाघरचे बोलावणे आले तर जगदंबेची स्थापना करण्याचा संकल्प राहून जायचा. त्यामुळे राणीने जगदंबेची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळच्या सामाजिक रुढींमुळे दोन समस्या तिच्यापुढे उभ्या राहिल्या. एक म्हणजे जगदंबेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्याची. ब्राम्हण व्यक्तिशिवाय अन्नाचा नैवेद्य कसा दाखवणार? अन दाखवला तरी नंतर तो ग्रहण कोण करणार? त्यामुळे राणीने यावर तोडगा काय अशी विचारणा अनेक शास्त्री, पंडितांकडे केली. झामापूकुर येथे पाठशाळा चालवणारे श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्याकडेही ही विचारणा झाली. त्यांनी तोडगा सांगितला की, प्रतिष्ठापना करण्यापूर्वी हे मंदिर कुणा ब्राम्हणाला दान केले तर तो अन्न नैवेद्याची व्यवस्था करू शकेल आणि तो नैवेद्य ग्रहण करण्यातही कोणाला अडचण होणार नाही. कोलकात्यातील काही मंडळींनी हे सामाजिक रूढीला धरून नाही अशी कुरकुर केली पण राणीला मात्र आनंद झाला. आपल्या गुरूंच्या कुळातील कोणाच्या तरी नावे मंदिर दान करून प्रतिष्ठापना करण्याचे तिने निश्चित केले. याप्रमाणे एक समस्या सुटली पण या मंदिरात पुजारी म्हणून कोण काम करेल ही दुसरी समस्या मात्र सुटायची होती. गुरुकुलातील लोक शास्त्रादीच्या बाबतीत यथातथा वाटत असल्याने त्यांना पुजारी म्हणून नेमण्याची राणीची इच्छा नव्हती. म्हणून तिने योग्य अधिकारी पुजाऱ्याचा शोध सुरू केला. राणीचा हा शोध पुन्हा श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्यापाशी येऊन थांबला. रामकुमार या कामासाठी तयार नव्हते पण अन्य कोणी चांगला पुजारी मिळेपर्यंत अडचण दूर करावी या राणीच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी प्रतिष्ठापना करण्याचे आणि पूजकाचे काम स्वीकारले. त्यानंतर मंदिराचे काम सुरू असतानाच ३१ मे १८५५ रोजी राणी रासमणीने जगदंबेची प्रतिष्ठापना उरकून घेतली. जगदंबेची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उभारणे यानिमित्ताने राणीने नऊ लाख रुपये खर्च केले होते. शिवाय सव्वादोन लाख रुपयात एक परगणा विकत घेऊन तो या मंदिराच्या व्यवस्थेसाठी दान केला होता.

दक्षिणेश्वर मंदिरातील जगदंबेच्या प्रतिष्ठापनेच्या सोहोळ्यात श्री रामकृष्ण सहभागी झाले होते. दिवसभर ते तिथे होते. त्यावेळच्या रीतीप्रमाणे आणि नैष्ठीक ब्राम्हणाला शोभेशा पद्धतीनेच त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद मात्र ग्रहण केला नव्हता. संध्याकाळी बाजारातून एक पैशाचे मुरमुरे आणि साळीच्या लाह्या घेऊन त्यांनी भूक भागवली होती. रात्री ते झामापूकुरच्या निवासी परत आले होते. मोठे भाऊ रामकुमार मात्र दक्षिणेश्वरीच राहिले होते. दुसऱ्या दिवशी श्री रामकृष्ण पुन्हा दक्षिणेश्वरी आपल्या भावाला भेटायला आले. अन संध्याकाळी परतले. त्यानंतर आठवडाभर ते मंदिराकडे फिरकले नाहीत. अन फिरून भावाची खबरबात घ्यायला कालीमंदिरी दाखल झाले. तोवर पूजकाचे पद कायमस्वरूपी स्वीकारण्याचा रामकुमारांचा निर्णय झाला होता. श्री रामकृष्णांना मात्र तो निर्णय पटला नव्हता. त्यामुळे रामकुमारांनी चिठ्ठ्या टाकून ईश्वराचा कौल घेण्याचे ठरवले. तेव्हा - रामकुमारांनी काहीही चुकीचा निर्णय घेतला नसून, त्यांच्या निर्णयाने सगळ्यांचे मंगलच होईल, असा कौल मिळाला. हा कौल मिळाल्याने श्री रामकृष्ण निश्चिन्त झाले तरी त्यांच्यासमोर दुसरी समस्या उभी राहिली की, आता आपण करायचे काय? पाठशाळा बंद होणार. आपल्याला काम काय? या काळजीतच त्या दिवशी ते तिथेच थांबले. मोठे भाऊ रामकुमार यांनी वारंवार म्हणून आणि समजावून देखील, शास्त्रार्थ सांगून देखील; प्रसाद ग्रहण करण्यास मात्र ते तयार झाले नाहीत. अखेर रामकुमारांनी त्यांच्या मनातील गंगाभक्तीला हात घातला. ते त्यांना म्हणाले, 'गंगेच्या काठच्या सगळ्या गोष्टी पवित्र असतात हे तर तू मानतो नं? मग शिधा घेऊन तू गंगेच्या काठी स्वयंपाक कर आणि जेव.' श्री रामकृष्णांनी ते मान्य केले आणि तट दिवशी स्वहस्ते स्वयंपाक करून ते जेवले. त्यानंतर ते तेथेच राहू लागले आणि स्वहस्ते स्वयंपाक करून उदरभरण करू लागले.

मात्र त्यांचे असे वागणे ही अनुदारता किंवा संकुचितता होती असे म्हणता येत नाही. कारण कामारपुकुर येथेच आपल्या मौंजीच्या वेळी त्यांनी लोहार जातीच्या स्त्रीकडून पहिली भिक्षा स्वीकारली होती. शिवाय काली प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकून ते त्यापासून दूर राहिले होते असेही नाही. त्यामुळे मंदिरातील अन्नप्रसाद ग्रहण न करता स्वहस्ते स्वयंपाक करणे ही त्यांची अनुदारता किंवा संकुचितता ठरत नाही, तर नैष्ठिक व्रतस्थता आणि तत्कालीन सामाजिक रीतिरिवाज एवढेच त्याविषयी म्हणता येते. शिवाय साधकाच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया या अंगानेही ते समजून घ्यावे लागते. पुढील काळात आध्यात्मिक भावाचा जो महान प्रवाह निर्माण होणार होता त्याची अगम्य जडणघडण हाही त्याचा एक पक्ष आहेच. स्वतः श्री रामकृष्णांनी आणि त्यांच्या चरित्रकारांनीही या गोष्टीची मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली आजची मते हाच सार्वकालिक मापदंड मानून सगळ्या गोष्टींकडे पाहता येत नाही. ते चुकीचे ठरते.

ते काहीही असले तरीही ईश्वरी शक्ती या पृथ्वीवरील आपल्या नव्या खेळाची हळूहळू व्यवस्थित मांडामांड करीत होती.

- श्रीपाद कोठे

नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा