चिन्मयी जगदंबेच्या पहिल्या दर्शनानंतर श्री रामकृष्णांना रोजची पूजा इत्यादी करणे कठीण होऊ लागले. त्यांचा भाचा हृदयराम कसेतरी ते सारे उरकून घेऊ लागला. अन मामांना काहीतरी रोग झाला असावा असा विचार करून त्याने त्यांच्यावर वैद्याचे औषधोपचार सुरू केले. ज्या दिवशी बेचैनी थोडी कमी असे त्या दिवशी ते पूजेसाठी पुढे होत. त्यावेळी मंदिरात ध्यानासाठी बसले की, पायापासून वरपर्यंत आतून कोणीतरी सगळे सांधे बंद करीत असल्याचा अनुभव त्यांना येत असे. सांधे बंद केल्याचा कट कट असा आवाजही येत असे. त्यानंतर मात्र पुन्हा ते बंद सांधे कोणीतरी आतून उघडून देईपर्यंत ते अगदी निस्पंद होऊन जात असत. या काळात काजव्यांसारखे प्रकाशकणांचे पुंजके, प्रकाशकणांनी व्यापून गेलेल्या चारही दिशा, चांदीसारख्या प्रकाशाने वेढलेल्या सगळ्या वस्तू; असेही दिसत असे. हे सगळे डोळे मिटलेल्या आणि डोळे उघडलेल्या दोन्ही अवस्थात दिसत असे. अशावेळी ते भवतारीणीला काकुळतीने विनवीत की, 'आई, मला काय होते आहे ते काहीच मला समजत नाही. तूच मला काय ते नीट शिकव. तुझ्याशिवाय मला काहीच गती नाही.'
यानंतर त्यांना हळूहळू देवीच्या एकेका अवयवाचे साक्षात दर्शन होऊ लागले. अन त्याहीपुढे हळूहळू जगदंबेची पूर्ण ज्योतिर्मय आकृती दिसू लागली. ती आकृती त्यांच्याशी बोलत असे, हसत असे, हे कर किंवा हे करू नको असे सांगत असे. पूर्वी नैवेद्य दाखवल्यावर देवीमूर्तीच्या डोळ्यातून तेजाचे किरण येऊन अन्नाला स्पर्श करून जात. नंतर मात्र नैवेद्य दाखवताच प्रत्यक्ष देवी नैवेद्य ग्रहण करीत असल्याचे दिसू लागले. पूर्वी पाषाणाच्या मूर्तीत जिवंतपणा दिसत असे. नंतर मात्र पाषाणमूर्ती दिसतच नसे. दिसत असे फक्त चिन्मयी. नाकपुड्यांजवळ हात नेताच चिन्मयी श्वासोच्छ्वास करीत असल्याचे त्यांना जाणवले, तर दिव्यांच्या प्रकाशात कधीही देवीची सावली पडत नसल्याचाही त्यांना अनुभव येत असे. परत कधी पायात चाळ घालून लहान मुलीसारखी ती वर चढून जात असल्याचे दिसे तर कधी गच्चीवर उभी राहून गंगा आणि कोलकाता यांच्याकडे पाहताना दिसत असे.
या सगळ्या प्रकारामुळे भाचा हृदयराम सतत त्यांच्या सोबत सोबत राहत असे. त्याच्या मनात एक अव्यक्त भीतीही त्यावेळी भरून राहिली होती. कारण दिवसेंदिवस श्री रामकृष्णांच्या पूजेचा ताल वेगळाच होत होता. वैधी भक्ती पूर्णपणे मागे पडून रागाभक्ती किंवा प्रेमभक्तीत ते बुडून गेलेले असत. त्यामुळे देवीला वाहावयाची बेलफुले कधी स्वतःलाच वाहून घेत. कधी मूर्तीशी थट्टाविनोद करीत. कधी ताटातील भाजीभात देवीला भरवीत तर कधी स्वतःच खात. कधी तिच्याजवळ झोपत. सगळाच एक निर्भय उन्मनी भाव. रोजच असे प्रकार होऊ लागल्याने लोकांच्या ते नजरेत आले. काही लोकांनी त्याची व्यवस्थापक मंडळींकडे तक्रार केली. त्यावरून देवस्थानाचे अधिकारी मंदिरात पाहणी करायला आले. त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला पण ते बोलू मात्र काहीही शकले नाहीत. मात्र भट्टाचार्य पुजारी वेडे झाले आहेत किंवा त्यांना भूताने झपाटले आहे यावर मात्र त्यांचे एकमत झाले. सगळ्यांनी मिळून मंदिराचे मालक मथुर बाबू यांना या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा एक दिवस येऊन मथुर बाबूंनी सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आता भट्टाचार्य महाराजांची सुट्टी होणार ही लोकांची खात्री मात्र पूर्ण झाली नाही. घडले भलतेच. अगम्य अशा दैवी लीलेनेच, हा सगळा प्रकार म्हणजे भक्तीची परमावधी असून खऱ्या अर्थाने इथे जगदंबेचा आविर्भाव झाला आहे हे त्यांना मनोमन जाणवले. अन त्यांनी आदेश दिला की, 'भट्टाचार्य महाराज कोणत्याही तऱ्हेने पूजा करोत. त्यांना अडथळा करू नये.'
भक्तीच्या या अफाट आवेगामुळे श्री रामकृष्णांच्या शरीराचा खूप दाह होत असे. साधनाकाळात एकूण तीनदा त्यांना शरीरदाहाचा हा त्रास झाला. पहिल्यांदा त्यांना हा त्रास झाला त्याबद्दल ते सांगत असत, 'संध्या, पूजा करताना ज्यावेळी आतला पापपुरुष दग्ध होऊन गेला असे चिंतन करीत असे त्यावेळी कोणाला माहीत होते की शरीरात खरोखरच पापपुरुष असतो अन त्याला दग्ध व नष्ट करता येते? साधनेच्या सुरुवातीपासून अंगाची आग होणे सुरू झाले. काही तरी रोग झाला असावा असे वाटू लागले. पुष्कळ आयुर्वेदिक तेले चोळली पण काहीच फायदा झाला नाही. एक दिवस पंचवटीत बसलो असताना पाहिले की, एक काळाकभिन्न लाल डोळ्यांचा भेसूर पुरुष अंगातून बाहेर पडून फिरतो आहे. अन त्यापाठोपाठ भगव्या कपड्यातील एक सौम्य पुरुष हाती त्रिशूळ घेऊन बाहेर पडला आहे. त्या त्रिशूळधारी पुरुषाने त्या भेसूर पुरुषावर जबरदस्त हल्ला करून त्याला मारून टाकले. अन सहा महिने सुरू असलेला शरीरदाह त्यानंतर कमी होत थांबला.'
नंतर एकदा वैधी भक्तीची सीमा ओलांडून रागात्मिका भक्तीच्या अवस्थेत असताना त्यांना पुन्हा अंगाची आग आग होण्याचा त्रास झाला होता. त्यावेळी डोक्यावर ओला पंचा ठेवून तीन तीन चार चार तास ते गंगेच्या पाण्यात उभे राहत असत. तरीही फारसा फरक पडत नसे. नंतर त्यांच्या जीवनात आलेल्या आणि त्यांच्याकडून तांत्रिक साधना करवून घेणाऱ्या भैरवी नावाच्या साधिकेने काही उपाय करून त्यांचा हा दाह दूर केला होता.
तिसऱ्यांदा त्यांना मधुरभावाची साधना करतानाही असा शरीरदाह झाला होता. छातीच्या आत वाडगाभर विस्तव ठेवल्यासारखी आग त्यावेळी होत असे. काही वर्षांनी रामकानाई घोषाल या शक्तीसाधकाने त्यांना इष्टदेवतेचा ताईत घालण्यास सांगितले. त्यानंतर इष्टकवच बांधल्यानंतर असा त्रास त्यांना झाला नाही.
श्री रामकृष्णांच्या या असल्या अवस्थेबद्दल मंदिराचे व्यवस्थापक असलेल्या मथुरबाबूंनी आपली सासू आणि मालकीण राणी रासमणी हिला सांगितले. राणीला याचा राग येण्याऐवजी संतोषच वाटला. एक दिवस राणी मंदिरात दर्शनाला आली. अन देवीसमोर बसली असताना तिच्या मनात कुठल्या तरी खटल्याचाच विचार सुरू होता. श्री रामकृष्णांना तिच्या मनातील ही गोष्ट कळली आणि त्यांनी तिला एक थापड मारली अन तिला म्हणाले, 'इथेही तेच विचार?' याही गोष्टीचा राग न येता उलट तिच्या मनात विशुद्ध भक्तीचा भाव जागा होऊन तिच्या मनातील आदर वाढला.
परंतु हळूहळू श्री रामकृष्णांची भावावस्था अशी होऊ लागली की त्यांच्याने पूजाअर्चा नीट होणे कठीण झाले. नेमक्या त्याचवेळी त्यांचे चुलत भाऊ रामतारक चट्टोपाध्याय कामाच्या शोधात संस्थानात आले. तेही साधक होते. व्यवस्थापक मथुरबाबूंनी त्यांना जगदंबेच्या पूजेसाठी नियुक्त केले. अशा रीतीने साधारण तीन ते चार वर्षे कालीमातेच्या पूजकाचे काम केल्यानंतर श्री रामकृष्ण त्या कामातून मोकळे झाले. मथुरबाबूंनी पूजकाचे काम काढून घेतले तरीही त्यांना सोडले मात्र नाही. उलट त्यांना देवस्थानातच ठेवून घेतले. त्यांच्या लहानमोठ्या गरजांची काळजी घेत राहिले आणि त्यांना कोणाचा त्रास होऊ नये याचीही काळजी घेऊ लागले. श्री रामकृष्णांच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची यानंतर सुरुवात होणार होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा