इ. स. १८६१ ते १८६४ या काळात तंत्रशास्त्रातील अनेक तांत्रिक साधना पूर्ण करून श्री रामकृष्ण वैष्णव मार्गाच्या वात्सल्य, मधुर आदी साधनांकडे वळले. त्यांचा जन्मच मुळी वैष्णव कुटुंबात झाला होता. श्रीराम हे त्यांचे कुलदैवत होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना वैष्णव पंथाची ओढ होतीच. १८६४ मध्ये केव्हातरी दक्षिणेश्वरच्या कालीवाडीत एक रामपंथी साधू आला. त्या जटाधारी बाबांजवळ एक रामलालाची छोटी मूर्ती होती. अतिशय भावभक्तीने तो त्या रामलालाची पूजाअर्चा इत्यादी करीत असे. त्या साधुसाठी ती रामलालाची मूर्ती नव्हती तर साक्षात बालक श्रीराम होते. त्याच भावनेने तो त्यांना खाउपिऊ घालत असे, झोपवत असे, रागे भरत असे. तो आल्यापासूनच श्री रामकृष्णांना त्याची आणि त्याच्यासोबत असलेल्या रामलालाची ओढ वाटू लागली. ते तासंतास त्यांच्याजवळ बसून राहू लागले. हळूहळू रामलालाला देखील श्री रामकृष्णांचा लळा लागला. नंतरच्या काळात आपल्या शिष्यांना ते सांगत असत की, 'प्रत्यक्ष रामलाला दिसत असे, खेळत असे, हट्ट करत असे, लाड करवून घेत असे, रुसत असे. अगदी जीवंत. जसे तुम्हा लोकांना पाहतो, तुमच्याशी बोलतो तसे.' रामलालाच्या अनेक लीलांचे वर्णनही ते सांगत असत. एकदा त्याने गंगेत स्नान करण्याचा हट्ट केला तेव्हा, आई जशी हट्टी मुलाची खोड मोडण्यासाठी करते तसे, त्यांनी त्याला प्रवाहात दाबून धरले. त्यामुळे रामलाला कासावीस झाला आणि त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला जवळ घेऊन त्याची समजूत काढली. असे अनेक प्रसंग ते सांगत असत. काही काळाने त्या जटाधारी बाबांना चिरवांच्छित अद्भुत दर्शन लाभले. त्यावेळी श्री रामकृष्णांकडे येऊन ते म्हणाले की, 'आता माझी सगळी तळमळ शांत झाली आहे. या रामलालालाही तुमची ओढ आणि लळा लागला आहे. तेव्हा त्याला इथेच राहू द्या आणि मला जाण्याची परवानगी द्या.' याप्रमाणे ते बाबाजी निघून गेले आणि रामलाला श्री रामकृष्णांजवळ राहिले. अन्यही अनेक रामायत साधू बैरागी कालीवाडीत त्या सुमारास आले होते. त्यांच्याकडून अनेक भजने श्री रामकृष्णांनी शिकून घेतली होती. कालीवाडीत येणाऱ्या विविध पंथ संप्रदायांच्या अनेक साधू बैराग्यांना काय हवे नको ते पाहून त्यांना ते ते देण्याची व्यवस्थाही श्री रामकृष्ण करून देत असत.
यानंतर श्री रामकृष्णांनी मधुर भावाची साधना केली. अन्य साधनांप्रमाणेच याही वेळी ते त्या भावात पूर्ण बुडून गेले होते. इतके की आपण पुरुष आहोत हेही ते जणू विसरून गेले होते. ईश्वर हाच आपला प्रेमास्पद हा भाव त्यांच्यात पूर्ण भिनला होता. त्यांची वेशभूषाही त्या काळात स्त्रियांचीच राहत असे. स्त्रियांसारखेच चालणे, बोलणे, हावभाव इत्यादी पाहायला मिळत. स्त्रियांमध्ये मिसळल्यास ते श्री रामकृष्ण आहेत हे देखील ओळखू येत नसे. काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरबाबू यांच्या घरीही अगदी अंत:पुरापर्यंत त्यांचा वावर होत असे. त्या महिलांनाही त्यांच्याबद्दल संकोच वाटत नसे. कधी कधी सखी भावाने ते त्यांची वेणीफणीही करून देत. त्यांच्या अगदी जवळच्या, रोजच्या लोकांनाही त्या अवतारात ते ओळखू येत नसत. त्या काळात नित्य त्यांच्यासोबत राहणारा, त्यांची सगळी काळजी घेणारा त्यांचा भाचा हृदयराम यालाही त्यांना ओळखता येत नसे. अनेकदा लोकांची फसगत होऊन हास्यविनोदही होई.
सहा महिने श्री रामकृष्ण या भावात निमग्न होते. या काळातील त्यांचे मनोभाव पूर्ण करण्यासाठी मथुरानाथांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांचा एक संच आणि एक कृत्रिम कुरळा केशकलापही तयार करून दिला होता. या मधुर भावाच्या साधनेकडे वळण्याआधी हा भाव किंवा या भावाची गाणी, भजने आपल्याला आवडत नाहीत असे ते अनेकवार सांगत. पण साधना सुरू केल्यावर ते त्या गोपी भावातच बुडून गेले. रात्रंदिवस राधाकृष्णाचाच त्यांना ध्यास लागला. हा ध्यास इतका पराकोटीचा होता की, भक्तीशास्त्रात सांगितलेली महाभावाची सगळी लक्षणे त्यांच्यात दिसू लागली. नंतरच्या काळात ते सांगत; अष्टपाश तोडल्याशिवाय, तसेच लज्जा, भय, संकोच, घृणा आदींचा पूर्ण त्याग केल्याशिवाय ईश्वराचा लाभ होत नाही. नंतर तर श्री राधेशिवाय श्रीकृष्णाची प्राप्ती शक्य नाही या भावनेतून ते स्वतःला राधाराणीच समजू लागले होते. भगवंताच्या सखीभावाचा त्यांचा मनोवेग अकल्पनिय होता. असे म्हणतात की त्या काळात त्यांच्या ओटीपोटाच्या भागातून रजस्वला स्त्रीप्रमाणे महिन्यातील तीन दिवस रक्तबिंदू निघत असत. माणसाच्या शरीराची घडण त्याच्या मनानुसारच होत असते या शास्त्रमताचा जणू प्रत्ययच येत होता. श्री रामकृष्णांच्या या अनुभूती पाहून त्यावेळच्या काही शास्त्री पंडितांचे तर म्हणणे होते की, त्यांच्या अनुभूती वेदपुराणांनाही ओलांडून खूप पुढे गेल्या आहेत. जणू शरीरविज्ञानशास्त्राचीही सीमा त्यांनी ओलांडली होती. परमशक्तीच्या या विश्वात सगळ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत वा सगळ्याच गोष्टींची उकल झालेली आहे असे तरी कसे म्हणायचे?
याच प्रबळ भावाच्या परिणामी अखेर त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि अन्य वेळेप्रमाणेच दर्शन झालेल्या ईश्वरी रूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि ते रूप त्यांच्यात मिसळून गेले. नंतर काही दिवसांनी त्यांच्या या श्रीकृष्ण भावाचा उपशम झाला. याच काळात एकदा विष्णू मंदिरात श्रीमद भागवताचा पाठ ऐकत बसले असताना, त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले. अन त्या मूर्तीच्या पायांपासून लांब दोरीसारखी एक ज्योत निघाली, त्या ज्योतीने भागवताच्या पोथीला स्पर्श केला आणि नंतर श्री रामकृष्णांच्या देहाला स्पर्श केला. काही काळ त्या ज्योतीने श्रीकृष्ण, भागवत आणि श्री रामकृष्ण यांना जोडून ठेवले. या दर्शनाबद्दल सांगून नंतरच्या काळात ते सांगत असत, 'भागवत, भक्त आणि भगवान हे तिन्ही वेगळे दिसत असले तरीही एकाच सदवस्तूचे तीन आविष्कार आहेत. तीही एक, एकी तीन.' या मधुर भावाच्या साधनेनंतर साधारण तीनेक महिन्यांनी परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले आणि त्यांनी श्री रामकृष्णांना अद्वैत साधनेसाठी प्रवृत्त केले. श्री रामकृष्णांची ती अद्वैत साधना आध्यात्मिक इतिहासातील एक अद्भुत अध्याय आहे.
याच काळात श्री रामकृष्णांची म्हातारी आई त्यांच्याजवळ येऊन दक्षिणेश्वरी राहत होती. मंदिराचे विश्वस्त मथुरामोहन यांचीही तार त्यांच्याशी जुळली होती. श्री रामकृष्ण तर आपल्याकडून काहीच घेत नाहीत, आधी एकदा त्यांच्या नावाने जमीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर ते मारायलाच धावले होते; हे सगळे मथुरानाथांच्या मनात होते. त्यामुळे श्री रामकृष्णांना नाही तर त्यांच्या आईला काही द्यावे अशी त्यांना इच्छा झाली. तेव्हा एक दिवस बोलता बोलता ते आईला म्हणाले, 'आजी तुम्हाला काय हवे? तुम्हाला जे काही लागत असेल ते सांगा. मी तुम्हाला देतो.' त्यावर म्हाताऱ्या आईने, 'काही नको. कपडेलत्ते आहेतच. जेवणाखाण्याची सोय आहे. कशाची कमी नाही. त्यामुळे काही नको,' असे त्यांना सांगितले. पण मथुरानाथांनी खूपच आग्रह केला तेव्हा त्या म्हणाल्या, 'दात घासण्यासाठी एक आण्याची तंबाखू आणून दे.' मथुरानाथ हे ऐकून भावविव्हळ झाले. ते उद्गारले, 'अशा आईच्या पोटी बाबा (श्री रामकृष्ण) जन्माला यावे यात आश्चर्य ते काय ' श्री रामकृष्णांची आई साधारण बारा वर्षे त्यांच्यासोबतच दक्षिणेश्वरी राहत होती. तिथेच त्यांनी देह ठेवला. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेचा काही काळ आणि त्यांच्या अद्वैत साधनेच्या काळात त्यांची आई त्यांच्यासोबतच राहत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा