मंगळवार, २८ मार्च, २०२३

क्रांती

क्रांती कधीही यशस्वी होत नाही. असलेल्या व्यवस्थेची तोडफोड, नवीन व्यवस्थेची निर्मिती; इत्यादी गोष्टी क्रांती करते, करू शकते. पण ज्यासाठी क्रांती केली जाते ते त्याने साध्य होत नाही. क्रांती स्वभावत: प्रतिक्रियावादी असते. सृजनशील नसते. क्रांती आपली मुले खाऊन टाकते हे वचन तर प्रसिद्धच आहे.

अमेरिकन राज्यक्रांती स्वातंत्र्य या मूल्याच्या प्रस्थापनेसाठी झाली. त्याने व्यवस्था बदलली पण स्वातंत्र्य किती साध्य झाले? अमेरिकन नागरिक किती प्रमाणात स्वतंत्र आहे? तंत्रज्ञान, जीवनशैली, संकल्पना यांची किती गुलामी तो सहन करतो आहे? शिवाय स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभारणारी अमेरिका जगभरच्या लोकांच्या स्वातंत्र्याचा किती आदर करते? अन आदर करते हे गृहीत धरले तरी करू काय शकते? युक्रेन हे ताजे उदाहरण आहे.

फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी झाली. यातले काय आणि किती साध्य होऊ शकले? कायदे आणि तत्वज्ञाने याला फारसा अर्थ नाही. प्रत्यक्ष जीवनात ती मूल्य दिसली तर तत्वज्ञानाला काही अर्थ. फ्रेंच राज्यक्रांतीची त्रिसूत्री मानवी जीवनात किती रुजली?

रशियन क्रांती तर अधिकृतपणे अयशस्वी झालेली आहे. ना शोषण संपले, ना जगातील कामगार एक झाले, ना प्रतिक्रांती झाली. चीनमधील सांस्कृतिक क्रांती किती सुसंस्कृत ठरली ते कोरोनाने दाखवलेच आहे.

भारतासाहित सगळीकडच्या छोट्या मोठ्या क्रांतीची उदाहरणे देता येतील. पण केवळ मोठ्या क्रांतीची उदाहरणे पुरेशी आहेत. शिवाय भारतातील क्रांत्यांचा नामनिर्देश मुद्दाम टाळतो कारण त्याने चर्चा भरकटण्याची शक्यताच जास्त. छोट्या क्रांतीपैकी फक्त एक नामनिर्देश सु की यांचा. त्यांनी केलेल्या क्रांतीसाठी त्यांना अगदी नोबेल वगैरे मिळाले पण क्रांती यशस्वी झालेली नाही.

क्रांती प्रतिक्रियावादी असते. संक्रांती (संतुलित, सम्यक क्रांती) सृजनशील, रचनात्मक असते. उद्दिष्टाकडे घेऊन जाण्याची शक्यता संक्रांतीमध्ये अधिक असते.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०२२

रविवार, २६ मार्च, २०२३

कसं चालतं तुझं?

एकच प्रश्न शेकडो वेळा विचारला गेला आहे. त्याला नेहमीच शांतपणे उत्तर दिलेलं आहे. पण आता त्याचं irritation व्हायला लागलं आहे. त्रास व्हायला लागला आहे. प्रश्न आहे - 'काहीच करत नाही म्हणतो मग तुझं चालतं कसं?' अरे बाबांनो, चालतं. एक तर तुम्हाला एवढी पंचाईत का? यात दोन प्रकार असतात. १) एक असतात प्रामाणिक चिंता आणि स्नेह असणारे. त्यांना माझ्याकडून काही नको असतं पण कळकळ असते. अन २) दुसरे असतात ज्यांना माझ्याकडून काही अपेक्षा असते. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना वाटतं हा थापा मारतो किंवा बहाणे करतो आपल्याला टाळण्यासाठी. पहिल्या प्रकारचे असतात त्यातही वेगवेगळ्या छटा असणारे असतात. याने आपल्याकडे काहीही मागितलं नाही, मागत नाही; याची थोडी रुखरुखही असणारे. आपली कळकळ सिद्ध करण्याची संधी मिळत नाही याची मनात बोच असणारे. काही असतात जे आपल्या मनातील भीतीचं विरेचन करत असतात. याचं कसं चालतं हे आपल्याला कळायला हवं. कुठे आपल्यालाच तर हा कधी पकडणार नाही ना याची त्यांना खात्री करून घ्यायची असते. काही तर काही विचारण्याच्या वगैरे भानगडीत पडतच नाहीत. ते थेट आरोपच करतात किंवा त्यांचा अगदी पक्का समजच असतो की, याला कुठून तरी काही तरी माल मिळत असणारच. त्यातही अनेकांचा समज असतो, हा संघ संघ करतो म्हणजे संघच याला पोसत असणार. याच्याएवढं हास्यास्पद तर दुसरं काहीच नसावं. बरं तर बरं, काही मठ देवस्थान वगैरेही नाही चालवत किंवा कोणत्या मठाशी देवस्थानाशी काही संबंधही नाही. मग चालतं कसं? या प्रश्नाला शेकडो वेळा दिलेलं उत्तर आहे - 'त्याच्या इच्छेने.' अन हे शंभर टक्के खरं आहे. पण खरं सांगू का, या उत्तरालाही काही अर्थ नाही. कारण, समोरच्या प्रश्नामुळे अनिच्छेने ते द्यावं लागतं. मूळ असं आहे की, मला हा प्रश्नच पडत नाही की, माझं कसं चालतं वा चालेल. हा प्रश्न पडला असता तर काही तरी केलंच असतं. असा प्रश्न पडणारी व्यक्ती शांत राहूच शकत नाही. मला तो प्रश्नच पडत नाही. अर्थात चोवीस तासात अनेकदा हा प्रश्न पडणाऱ्या लोकांचा यावर विश्वास तरी कसा बसावा? चूक त्यांचीही नाहीच. पण ज्याच्या इच्छेने चाललं आहे त्याला एवढंच सांगायचं आहे, बाबा रे, कृपा करून पुन्हा असे प्रश्न माझ्यासमोर नको आणू. शांतपणे आणि आनंदाने जे काही करतो आहे ते करू दे. त्यात दगड टाकून अकारण विक्षेप आणू नको.

- श्रीपाद कोठे

२७ मार्च २०२२

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

विविधता

आपल्या शरीरात प्रत्यक्ष दिसणारे अवयव असतात, हालचाल करणारे हात असतात, पुढे मागे घेऊन जाणारे पाय असतात, फक्त पुढे पाहणारे डोळे असतात; न दिसणारे हृदय, फुफ्फुसे, मेंदू इत्यादी असतात. पचणे, ऐकणे, पाहणे, समजणे अशी अमूर्त कार्ये असतात. यातील काहीही एकसारखं नसतं. तरीही यातील प्रत्येक अवयव वा कार्य महत्त्वाचं अन आवश्यक असतं. पाय मागेपुढे नेतात म्हणून मेंदूपेक्षा महान किंवा हात हालचाल करतात म्हणून हृदयापेक्षा श्रेष्ठ असं वगैरे नसतं. निसर्गात सुद्धा एकाच जागी उभी राहणारी झाडं असतात, सतत वाहणाऱ्या नद्या असतात, हालचाल न करणारे डोंगर असतात, अस्तित्वातच नसलेलं आभासी आकाश असतं. कोणी एकसारख्या सवयीचे नसतात. सगळे एकच कार्य करत नाहीत. तरीही ते महत्त्वाचे असतात. वास्तविक जगासाठी वा जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या असंख्य गोष्टी कोणाही एकाच व्यक्ती वा वस्तुकडून होऊ शकत नाहीत. म्हणूनच वेगवेगळ्या रूपांचे, वेगवेगळ्या सवयीचे, वेगवेगळ्या कार्यांचे अनेक जण; जग चालवणारा तो जगदीश्वर निर्माण करत असतो. पण त्यानेच निर्माण केलेल्या माणसाची गंमत पहा. त्याला हे आकलन जरा कमीच होतं. अन तो आपल्यासारख्या न दिसणाऱ्या, आपल्यासारखा विचार न करणाऱ्या, आपल्यासारखे कार्य न करणाऱ्यांबद्दल मनात दुर्भाव बाळगतो. कमी लेखतो. त्याबद्दल हीन भावना बाळगून विचार करतो. असो. ही देखील त्या निर्मात्याचीच लीला.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, २५ मार्च २०२२

गुरुवार, २३ मार्च, २०२३

अभ्यासक्रमात गीता

शालेय अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण असावं की नसावं ही चर्चा सुरू झाली आहे. भगवद्गीता सक्तीची करावी या सूचनेवरून ही चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांशी मी याबाबतीत सहमत आहे. शाळेत धार्मिक शिक्षण देण्याची काही गरज नाही. सक्ती तर असूच नये. मात्र याचा अर्थ भगवद्गीता शिकवू नये असे नाही. शाळेच्या बाहेर जग एवढं मोठं आहे की त्यात भगवद्गीता शिकवता येते, येईल आणि शिकवावी. अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यासाठी काम करत आहेत. हे प्रमाण आणखी वाढावे. यासाठी तीन कारणे -

१) शाळेत सक्ती केलेल्या विषयांची स्थिती काय आहे अन असते हे नीट पाहिलं, समजून घेतलं तर; भगवद्गीतेची तशी अवस्था होऊ नये.

२) भगवद्गीता ही अधिकारी व्यक्तींनी, साधकांनी, उपासकांनी, व्रतस्थ लोकांनी; किमान त्यासाठी मनाची तळमळ असणाऱ्यांनी शिकवावी.

३) समाजात अनेक शक्तीकेंद्रे असायला हवीत. सगळ्या गोष्टी एकाच दावणीला बांधण्याचा अट्टाहास समाजाला दुर्बल करतो. स्वायत्त, स्वतंत्र अशी शक्तीकेंद्रे; शिक्षणासह सगळ्या क्षेत्रात उभी राहायला हवीत. अमुक गोष्ट शिक्षणक्रमात समाविष्ट झाली की भरून पावलो, हा फॅशनेबल विचार टाकून देऊन, मूलभूत चिंतन करायला हवे.

भगवद्गीता शालेय शिक्षणात समाविष्ट करू नये या मतासोबतच; या निमित्ताने व्यक्त झालेल्या एका प्रश्नावरही विचार करणे गरजेचे आहे. शाळेत भगवद्गीता शिकवायची तर कुराण, बायबल का नको? असा तो प्रश्न. या प्रश्नावर व्यापक समाजमंथन व्हायला हवे. अन तो हिंदूंचा धर्मग्रंथ आहे इत्यादी प्रकारची चर्चा अजिबात होऊ नये. कुराण आणि बायबल यांच्या तुलनेत गीतेचा विचार, गीतेची शिकवण यांचे आवाहन मानवी जीवनासाठी, जगासाठी किती मोलाचे आहे, हे त्यातून पुढे यायला हवे. जगाच्या आजच्या प्रश्नांना सामोरे जाताना गीता व्यावहारिक आणि तात्त्विक दोन्ही अंगांनी किती मार्गदर्शक आहे हे दाखवून द्यायला हवे. अन त्या तुलनेत कुराण आणि बायबलची चिकित्सा व्हायला हवी. विज्ञान, बुद्धिवाद, आधुनिक जीवनमूल्ये, धारणा असे सगळे विषय त्यात यावेत. गीता किती मार्गदर्शक आहे हे सांगण्याऐवजी, ती मार्गदर्शक आहे हे लोकांनी स्वतःहून म्हणावे, अशी मांडणी करता यायला हवी. तू तू मी मी बाजूला सारून, गीतेला एका व्यापक कॅनव्हासवर नेण्यासाठी ही उत्तम संधी आहे; अशाच दृष्टीने याकडे पाहायला हवे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २४ मार्च २०२२

मंगळवार, २१ मार्च, २०२३

आश्चर्य

महाभारताचा एक संवाद प्रसिद्ध आहे. युधिष्ठीराला जेव्हा विचारलं जातं की, 'जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं?' तेव्हा ते उत्तर देतात, 'आपल्या आजूबाजूला होणारे मृत्यू पाहूनही दुसऱ्या क्षणी माणसाला वाटतं की आपण अमर आहोत. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.' पण आता महाभारतापर्यंत मागे जाण्याची गरजच नाही. 'परमाणू युद्धाची शक्यता. युरोप बरबादीच्या उंबरठ्यावर.' या अक्षरांसोबतच 'आम्ही नंबर १ चॅनेल' ही अक्षरेही पडद्यावर दिसतात. आश्चर्य ते आणखी काय असू शकतं?

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०२२

अस्मिता : भारतीय, अभारतीय

अस्मिता व्यक्त होण्यासाठी आणि वर्चस्व गाजवण्यासाठी धडपडत असते. मानवाची अस्मिता काय आहे? या प्रश्नाचं भारतीय आणि अभारतीय उत्तर वेगवेगळं आहे अन त्याचे परिणामही वेगळे होतात. मानवाची अस्मिता सत्ता, संपत्ती, सौंदर्य इत्यादी बाह्य गोष्टीत असल्याचे भारतबाह्य विचार आणि समाज शिकवतात, सांगतात, प्रतिपादन करतात. यातून समस्याच समस्या निर्माण होतात. भारतीय विचार अस्मिता स्वतःत असल्याचे; बाहेर नसल्याचे सांगतात, शिकवतात, प्रतिपादन करतात. भारतबाह्य अस्मितेची कल्पना 'माझे'वर अवलंबून आहे, तर भारतीय अस्मितेची कल्पना 'मी'वर अवलंबून आहे. म्हणूनच भारतबाह्य विचार 'माझे' गोळा करायला, वाढवायला, शोधायला शिकवतो. भारतीय विचार 'मी' गोळा करायला, वाढवायला, शोधायला शिकवतो. थोडं वाईट वाटेल, जरा धक्काही बसेल; पण देशसुद्धा अभारतीय अस्मिता आहे. रशिया, युक्रेन हे त्याचेच उदाहरण आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०२२

सोमवार, २० मार्च, २०२३

ईशावास्य उपनिषदातील कवीगौरव

ईशावास्य उपनिषदाचा आठवा मंत्र आहे-

स पर्यगात शुक्रं अकायं अव्रणं अस्नाविरं शुद्धमपापविद्धम,

कविर्मनीषी परिभू: स्वयंभू: याथातथ्यतो अर्थान् व्यदधात शाश्वतिभ्य: समाभ्य:

`अर्थ- वह स्वयंभू ईश्वर सर्वत्र है. शुद्ध है. कायारहित, दोषरहित, मांसपेशियारहित, पवित्र-पाप रहित, कवि, सर्वज्ञ, सर्वव्यापी है वह. उसने चिरंतन प्रजातियों को अपने अपने काम सौंप दिए है.'

थोडक्यात- सर्वव्यापी ईश्वराला `कवी' हे विशेषण वापरले असून; हा संपूर्ण सृष्टीविलास ही त्याची नितांत रमणीय अशी कविता आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

यावर रामकृष्ण मठाचे पूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद म्हणतात-

`आत्मा का एक और सुंदर विशेषण यहाँ है- कवि, ऋषी, क्रांतदर्शी. वह महान कवि है. संसार उसकी कविता है, जो तुकबंदी और पद्यों में निकल रही है. कवि शब्द का अर्थ कविता बनानेवाला नहीं है; बल्कि कवि वह है जो दूरदर्शी है, क्रान्तिदर्शी है, जिसमे सूक्ष्म दृष्टी है; तथा जो वस्तुओं के आंतरिक महत्व को देख और समझ सकता है. संसार के बड़े कवि आत्मा के साथ इस गुण में भागीदार है. साधारण रसहीन शुष्क मन के लिए जो बात सामान्य और अर्थहीन है; कवि के लिए वह अर्थ और महत्व से भरा हुआ है. जैसे शेक्सपिअर की काव्यमयी सूक्ष्म दृष्टी का चित्रण करनेवाली एक अंग्रेजी कविता में कहा गया है-

जब पडती है कवि की दृष्टी

गली भी अभिनय रूप लेती है

जब शेक्सपिअर पास से गुजरता है...

कवि के लिए प्रत्येक क्रिया, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना, काव्य के सुझाव से भरी है. उसका संवेदनशील मन उन में अर्थ और महत्व देखता है. प्रकृति में कोई वस्तु या घटना नहीं जो विश्व को आत्मा के साथ आत्मसात न करती हो. कवि दिव्य कवि (ईश्वर) के साथ क्षणिक नाता जोड़कर प्रकृति के दिव्य स्पंदन का अनुभव करता है. साधारण व्यक्ति केवल शुष्क, विभिन्न तथ्यों और घटनाओं को देखता है. अंग्रेजी कवि शेली कहता है, कवि संसार के अस्वीकृत विधायक है.'

- कवी म्हणजे काय? कविता म्हणजे काय? अशी चर्चा बरेचदा होते. वरील विवेचनानुसार, ज्याची दृष्टी सूक्ष्म आहे आणि जो व्यक्ती, वस्तू, घटना, अनुभव, विषय यांचा अर्थ, महत्व आणि आत्मा जाणू शकतो. अन कविता म्हणजे या आत्म्याची अभिव्यक्ती.

- श्रीपाद कोठे

२१ मार्च २०२१

रविवार, १९ मार्च, २०२३

बोक्यांचे भांडण

दोन दिवसांपासून पुण्यातल्या कसबा मतदारसंघातील निवडणूक निकालांनी वातावरण तापवले आहे. तसेही राजकारणावर लिहीत नाही. या छोट्याशा गोष्टीवर लिहिण्याचे तर काहीच कारण नव्हते. पण विचार केला की, लिहिले पाहिजे. का? आपल्याला वाटणारा मूलभूत विचार सांगण्यासाठी. आपलं मत वाचून काही बदलणार वगैरे नाही पण ते पोहोचवलं पाहिजे म्हणून हा लेखनप्रपंच.

कसबा निकालानंतर जेवढ्या काही चर्चा आणि वाद सुरू आहेत त्याच्या मुळाशी एक गृहितक आहे. चर्चा करणाऱ्याची वा वाद करणाऱ्याची भूमिका काहीही असली तरीही ते गृहितक सारखेच आहे, एकच आहे. ते म्हणजे - आपलं भलं होण्यासाठी सत्ता आपल्या हाती असायला हवी. बाकी सगळे तर्क, सगळी मांडणी हे गृहितक घट्ट धरुनच होते. खरा प्रश्न हा आहे की, हे गृहितक बरोबर आहे का? मुळातच सत्ता आपल्या हाती असणे म्हणजे आपल्या प्रतिनिधींच्या हाती असणे. या 'आपल्या'चा अर्थ आणि परिघ प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. लहान वा मोठा असतो. एकजीनसी किंवा विविधांगी असतो. परंतु म्हणणे एकच असते - आपल्या भल्यासाठी सत्ता आपल्या हाती हवी.

वास्तविक आपल्या देशात म्हणा वा जगभरात कुठेही म्हणा - हे गृहितक खरे ठरलेले नाही. वर्तमानात तर नाहीच पण भूतकाळात पण हे खरे ठरलेले नाही. अगदी रामराज्यापासून. व्यासांनी कितीही उच्चरवाने म्हटले असो - राजा कालस्य कारणम. तरीही ते खरे नाही. रामराज्य कुठे संपवायचं यासाठी काळानेच खेळी केली आणि लक्ष्मणाला शरायूचा रस्ता धरावा लागला. नंतर क्रमशः रामराज्य गेले. राजाराम काळाचे कारण ठरले नाहीत तर काळ वरचढ ठरला. त्याला हवे तेव्हा त्याने रामराज्य उभे केले आणि त्याला हवे तेव्हा त्याचा विलय केला.

वर्तमानातील देखील अनेक उदाहरणे पाहता येतील. अमेरिका, युरोपीय देश, खुद्द रशिया; सगळीकडे आपापली सरकारे आहेत. अन् सगळीकडे जनता त्राही माम झाली आहे. युद्ध बंद करा म्हणून लोक एकत्र येत आहेत. युद्धामुळे त्यांचे रोजचे जगणे कठीण झाले आहे. पण आपल्याच सरकारांना ते आपल्याच भल्यासाठी बाध्य करू शकत नाहीत.

महाराष्ट्रात इतके दिवस सत्ता मराठ्यांच्या हाती होती. अजूनही मराठ्यांना मोर्चे आणि आंदोलने करावीच लागतात. 'आपली सत्ता' याच नाऱ्यांनी पाकिस्तान निर्माण झाला. झाला का पाकिस्तान सुखी? ब्राम्हण ब्राम्हण करणाऱ्यांनी हेही आठवावं की, शनिवार वाड्यावरचा जरीपटका काढून तिथे युनियन जॅक कोणी फडकवला होता? किंवा दलीत दलीत करणाऱ्यांनी थोडा शांतपणे विचार करावा की आरक्षण मिळून किंवा काही ठिकाणी दलीत मुख्यमंत्री होऊन किंवा दलीत राष्ट्रपती झाल्याने किंवा दलीत व्यक्तीने राज्य घटना लिहिल्याने; दलितांचे कल्याण झाले का? अन् पुरेसे धाडस करता येत असेल तर हा प्रश्नही विचारला पाहिजे की, आपल्या राज्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करून १९४७ साली आपले राज्य मिळाल्यावर आपलं कल्याण झालं का? महिला मुख्यमंत्री, महिला पंतप्रधान, महिला राष्ट्रपती झाल्या; महिला सुखी झाल्या का? महिलांचे प्रमाण ३३ टक्के नसेलही पण जिथे जिथे महिला लोकप्रतिनिधी आहेत, तिथे महिलांच्या समस्या निर्मुल झाल्या का?

वास्तविक, आपलं सरकार वा आपला प्रतिनिधी हे एक मिथक आहे. We are forced to believe this make believe assumption. आमचं इतकं conditioning झालं आहे की, आम्हाला याबाबत प्रश्नच पडत नाहीत. आपले सगळे तर्क हे आपलं गृहितक सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे तर्क असतात. सत्याचा शोध घेणारे तर्क नसतात. त्याची आपल्याला गरजही वाटत नाही. हे बधीरपणाचे लक्षण आहे.

खरं तर व्यक्तीचं, समूहाचं, जातीचं, समाजाचं भलं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती मोठ्या प्रमाणावर socio- economic प्रक्रिया आहे. या socio- economic प्रक्रियेत राज्य facilitator असतं हा देखील मोठा गैरसमज आहे. तसं असतं तर, भाजपच्या राज्यात स्वदेशी जागरण मंच किंवा किसान संघ किंवा मजदूर संघ असमाधानी राहिले नसते. किंवा जेव्हा आणि जिथे कम्युनिस्ट राज्य होतं तिथे कम्युनिस्ट समाजाचे चित्र प्रत्यक्षात आलं असतं. किंवा गांधींच्या तत्वांवर चालणाऱ्या राज्याने गांधीयुग आणले असते. असं होत नाही. होऊ शकत नाही. आज रोजगारापासून लग्न जुळेपर्यंतच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या, राज्य कोणाच्या हाती आहे याने सुटणाऱ्या नाहीत; हे मनावर, बुद्धीवर कोरून घेण्याची गरज आहे. राज्यासाठी आज होणारे वाद हे केवळ आणि केवळ, लोण्याचा गोळा मटकावण्यासाठी होणारे बोक्यांचे भांडण असते. त्याने अमक्याचे किंवा अमुक गटाचे कल्याण वगैरे होत नाही. तसे समजणे हा प्रचंड भाबडेपणा आहे.

आज असणारी जातीजातींची भांडणे याच प्रकारातील आहेत. हे त्या त्या गटांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. पण विश्वास आणि आदर यांची तूट (trust deficit) एवढी मोठी आहे की ती भरून काढणे हेच एक मोठे आव्हान आहे. हेही तेवढेच खरे आहे की, ही तूट भरून काढणे हाच सगळ्या समस्यांवरील आणि वादांवरील उपाय आहे आणि सगळ्यांच्या कल्याणाची ती हमीही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आम्हाला ते हवे आहे का? की आम्हाला बोक्यांचे भांडण हेच जीवनाचे सार्थक वाटते?

- श्रीपाद कोठे

शनिवार, ४ मार्च २०२३

बुधवार, १५ मार्च, २०२३

आंतरिक शक्ती

शक्ती शब्दात नसते. ती असते व्रतस्थ तपश्चर्येत. व्रतस्थता म्हणजे स्वतःला नि:शेष करणे. तपश्चर्या कधीच प्रदर्शनाचा भाग नसतो. रोज वाहणाऱ्या निरर्थक शब्दांच्या नद्या पाहिल्या तरी प्रामाणिक माणसाला हे पटल्याशिवाय राहणार नाही. अन व्रतस्थ तपश्चर्येच्या या शक्तीपुढे लाखो राज्यसत्तांची किंवा तथाकथित प्रतिनिधीशाहीची शक्ती केवळ फिकीच नाही तर कुचकामी असते. राज्यसत्तेची वा प्रतिनिधीशाहीची शक्ती नसते असं नाही. त्याचंही एक स्थान आणि प्रयोजन असते. मात्र व्रतस्थ तपश्चर्येची मृण्मयालाही चिन्मय करण्याची शक्ती त्यात नसते अन येऊही शकत नाही. कोट्यवधी वर्षांच्या मानवी जीवनात कोणती बाह्य शक्ती टिकून राहिली आहे? स्थायी, सृजनशील जर काही असेल तर ती आंतरिक शक्तीच असते. शब्दांच्या बाह्य आवरणालाही ही आंतरिकताच शक्ती पुरवते. ती असेल तर शब्दांना अर्थ असतो. ती नसेल तर सगळं निरर्थ. आंतरिक शक्ती, व्रतस्थतेची शक्ती, तपश्चर्येची शक्ती; पहाटेच्या दवबिंदूंप्रमाणे आवाज न करता, नकळत पाकळ्या उघडून देत असते. हां, ती अर्जित करणं तर कठीण आहेच; पण ती आकलन होणंही फार कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

१६ मार्च २०२२

मंगळवार, १४ मार्च, २०२३

तीन आठवणी

आज पुस्तकं वरखाली करताना तीन गोष्टी हाती आल्या. १) १९७९ साली संघ शिक्षा वर्गाचं प्रथम वर्ष केलं होतं, त्याची वही. २) १४ नोव्हेंबर १९८८ रोजी नागपूर आकाशवाणीवर पंडित नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त युवावाणी कार्यक्रमात केलेल्या भाषणाची स्क्रिप्ट. ३) वयाच्या २५ व्या वर्षी एका व्यक्तीने हाताचा ठसा घेऊन सांगितलेलं आयुष्य. ही एक वहीच आहे. ज्यात ठसा आणि त्याचे विश्लेषण आहे. वेळ छान गेला. तिन्ही गोष्टींशी जुळलेल्या आठवणींची उजळणी झाली.

संघ शिक्षा वर्गाची वही पाहून; आमचे गण शिक्षक प्रा. गुलाब वंजारी, रेशिमबागेतील महानगरपालिका शाळेतील एक महिन्याचे वास्तव्य, दोन्ही वेळच्या संघस्थानासाठी आणि दोन्ही वेळच्या जेवणासाठी रेशीमबागच्या संघ परिसरात चालत जाणेयेणे, तट्याच्या मांडवात रोज सकाळ दुपार रात्र बिना पंख्याने होणारे बौद्धिक कार्यक्रम, ऊन लागल्याने दोन दिवस रुग्ण विभागात राहणे, रोज सकाळच्या संघस्थानानंतर आमचे नगर कार्यवाह भय्याजी पारधी यांचा पाठीवरील धपका; असं सगळं आठवलं.

पंडित नेहरू त्यांच्यावरील भाषणाची आठवण तर जन्मभर लक्षात राहणारी अन जपून ठेवावी अशीच. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनिमित्त संघाच्या आजी माजी प्रचारकांचे अखिल भारतीय शिबिर होते. आठवडाभरापासून प्रबंधक म्हणून रेशीमबागेतच मुक्काम होता. शिबिर संपण्याच्या एक दिवस आधी घरून एक लिफाफा आला. ते होते आकाशवाणीचे पत्र. शिबिर व्यवस्थेतून हलणे शक्य नव्हते. मग तयारी कधी अन कशी करायची? दिवसभर विचार करत होतो. काही सुचत नव्हते. अन अचानक मनात काहीतरी आले. संध्याकाळी जेवणाच्या वेळी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांना भेटलो. त्यांना अडचण सांगितली. ते म्हणाले, उद्या समारोप आहे. दिवसभर धावपळ, भेटीगाठी राहतील. तू उद्या संध्याकाळी भेट. त्याप्रमाणे गेलो. म्हणाले, 'चल संध्याकाळची शतपावली करू.' आणि नंतरचा तासभर स्मृती मंदिराच्या कुंपणापासून स्मृती भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मारुती मंदिरापर्यंत; खांद्यावर हात ठेवून पायाने फेऱ्या आणि त्यांच्या मुखाने अन माझ्या कानाने पंडित नेहरू, एवढंच सुरू होतं. एक फेरी उजवा हात खांद्यावर आणि मागे वळलं की डावा हात खांद्यावर, एवढाच बदल होत होता. 'येत्या सहस्रकात लाल रंगाच्या सगळ्या छटा भगव्या ध्वजात विलीन होऊन जातील' हे अतिशय आत्मविश्वासाने सगळ्या प्रचारकांना आदल्या दिवशी सांगणारे दत्तोपंत कसलाही चिटोरा हातात, खिशात न घेता, मला तपशीलवार आणि ससंदर्भ पंडित नेहरू सांगत होते. शेवटी म्हणाले, 'हे पंडितजींचं एक दर्शन आहे. त्यांचं जीवन, विचार, धोरणं यावरील टीका, आक्षेप, विश्लेषण हा वेगळा विषय आहे. आकाशवाणीवर ते चालणार नाही. तो तुझ्या भाषणाचाही विषय नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी वय आणि अधिकारही हवा.' काय वर्णन करणार या अनुभवाचं? तो फक्त जपून ठेवावा. घरी आलो तर वडिलांनीही नेहरूंचे एक संक्षिप्त चरित्र आणून ठेवले होते. दोन्ही मिळून तयार केलेले हे भाषण.

हाताचा ठसा आणि आयुष्य हा तर प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. बरंच काही आहे त्यात, पण तीन महत्त्वाच्या गोष्टी. १) जीवन सन्मानजनक राहील. अपमानास्पद राहणार नाही. २) विवाहानंतर भरभराट आणि उत्कर्ष. ३) ६७ ते ७० वर्षांचं आयुष्य. यातील पहिला मुद्दा खराच आहे. दुसराही खरा असेलच. कारण भरभराट काही झाली नाही. 😃😃 तिसरा खरा ठरतो का हे कळेलच. तिसऱ्या मुद्याबाबत मला मात्र थोडं वेगळं वाटतं. मी दीर्घायू आहे आणि भारतीय गणराज्याची शताब्दी पाहून, म्हणजे २०५० साली महाशिवरात्रीला बहुधा मी जगाचा निरोप घेईन. अर्थात असं मला वाटतं. काय होतं माहिती नाही. काहीही झालं, कोणीही खरा ठरला तरी आनंदच आहे.

- श्रीपाद कोठे

१५ मार्च २०२२

सोमवार, १३ मार्च, २०२३

संघप्रार्थना चित्रपटगृहात

एका चित्रपटगृहात सगळे लोक रा. स्व. संघाची प्रार्थना, तेही संघाच्या प्रणामाच्या स्थितीत म्हणतानाचा व्हिडीओ पाहण्यात आला. माझ्या मते हे अयोग्य आहे. हे अगदी स्पष्ट आहे की, सध्या गाजत असलेल्या 'काश्मीर फाईल्स' याच चित्रपटाच्या संदर्भात हे घडले असेल. उपस्थित सगळे लोक प्रार्थना म्हणतात याचा अर्थ ते सगळे संघाचे स्वयंसेवक वा हितचिंतक असणार. याचा वेगळा अर्थ काढून जर कोणी म्हटले की, हा चित्रपट संघाचा प्रपोगंडा आहे, तर ते चूक कसे म्हणता येईल? दुसरे म्हणजे या चित्रपटातील विषय हे संघाचे पेटंट होऊ शकत नाही. तो आज नसला तरीही संपूर्ण समाजाचा विषय व्हायला हवा. तो तसा होण्यासाठी तो modest पणेच समाजात प्रसृत व्हायला हवा. दादागिरीच्या स्वरूपात नाही. आक्रस्ताळेपणाच्या किंवा अभिनिवेशाच्या स्वरूपात नाही. संघाची प्रार्थना समाजात दोन तट निर्माण करण्यासाठी नाही. अन सगळेच्या सगळे एखादी गोष्ट मान्य करतील, स्वीकारतील; तेही आज आणि आत्ता; असे कधीच होणार नाही. अशा प्रकारे प्रार्थना करणे म्हणजे प्रार्थनेचा आयुध म्हणून वापर करणे होईल. जे अयोग्य आहे. संघाने अनेक गोष्टींचा जो संयम इतकी वर्षे ठेवला, ज्या संतुलित आणि सभ्य पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळल्या त्यात संघाच्या आणि संघ विचारांच्या यशाचे आणि स्वीकार्यतेचे गमक आहे. अनुकूलतेच्या जल्लोषात तपश्चर्या बिघडून जायला नका एवढेच.

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२२

शुक्रवार, १० मार्च, २०२३

मोठी गोष्ट आणि हिंदुत्व

- मोठा उद्योग/ व्यवसाय, विश्वव्यापी उद्योग/ व्यवसाय : भांडवलशाही.

- मोठी, शक्तिमान सत्ता, विश्वव्यापी सत्ता : साम्यवाद, समाजवाद.

- मोठे उपभोग, वैश्विक उपभोग : भोगवाद.

- मोठा माणूस, वैश्विक माणूस : हिंदुत्व.

रोज फक्त दहा पाने

नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद देशमुख यांनी स्व. मा. गो. उपाख्य बाबुरावजी वैद्य यांच्यावर एक छोटासा लेख आज लिहिला आहे. स्व. बाबुरावजींचे वाचन असा विषय आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी सुद्धा ते कसे वाचत तेही त्या लेखात आहे. एक मनात आलं - प्रत्येकाने रोज किमान दहा पानं तरी वाचावीत. प्रत्येकाच्या वाचण्याच्या गतीनुसार कमीजास्त वेळ लागेल. पण कितीही सावकाश वाचणारा असला तरी फार जास्त वेळ नाही लागणार दहा पानांसाठी. म्हणजे वर्षभरात तीन साडेतीन हजार पाने वाचून होतील. वर्षभरात दहा, बारा पुस्तके. त्याचा स्वतःला आणि समाजालाही फायदा होणारच नं. अन वाचण्यासाठी महिन्याला एक पुस्तक विकत घेण्याचं ठरवलं तर प्रकाशन व्यवसायाचं पण भलं होईल. ग्रंथालयाचा वापर करून वाचत राहिलं तर ग्रंथालयेही बाळसं धरतील. रोज फक्त दहा पाने.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ११ मार्च २०२२

गुरुवार, ९ मार्च, २०२३

अरे संसार संसार...

भाजी चांगली आहे, भाजी स्वस्त आहे; ही काय भाजी घेण्याचा आग्रह करण्याची कारणं असू शकतात का? बरं, भाजी घेतल्यावर मिरच्या, कोथिंबीर घ्यायलाच पाहिजे; हा नियम कसा होऊ शकतो? मी एकटाच राहतो. त्यामुळे मुळात माझी गरज कमी असते. भाजी वाया जाण्याचीही (सुकली, सडली इत्यादी) शक्यता असतेच. पुन्हा त्यात घालवायला माझ्याकडे फारसा वेळही नसतो. सगळं साग्रसंगीत करण्याची हौसही फार नाही. स्त्री आणि पुरुष यांच्या विचार करण्यात, कामं करण्यात सुद्धा फरक असतो. हे सगळं भाजीविक्यांना कसं समजवायचं अन ते कायम त्यांच्या डोक्यात राहील यासाठी किती वेळा समजवायचं? संसार नसणाऱ्यांचा संसारही कटकटीचाच असतो राजेहो.

- श्रीपाद कोठे

१० मार्च २०२३

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

वेगळा अनुभव

काल दिवसभर, अगदी पहाटेपासून रात्री १२-१ वाजेपर्यंत, एक बोका अंगणात ठाण मांडून होता. कधी मागच्या अंगणात, कधी समोरच्या अंगणात, कधी बाजूच्या अंगणात. अन अधूनमधून ओरडायचा. मांजरी वा बोके पळापळ करतात तसे बिलकुल नाही. पळत नव्हता. घाबरत नव्हता. घरात आला नाही. कशाला तोंड लावणे नाही. काही लागलेलं दिसत नव्हतं. लंगडत नव्हता. जखम नव्हती. चालत व्यवस्थित होता. काय शोधत होता? काय सांगत होता? काय विचारत होता? माहीत नाही. आज मात्र आलाही नाही. एक वेगळाच अनुभव.

- श्रीपाद कोठे

४ मार्च २०२२

गुरुवार, २ मार्च, २०२३

गांधींच्या आडून

युक्रेन - रशिया युद्धामुळे स्वाभाविकच गांधींची चर्चा होते. हिंसा अहिंसा यांचा चोथा होतो. परंतु या वा त्या बाजूला विचारीपण नसल्याचंच दिसतं. अहिंसेने प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान गांधीविरोधक देताना दिसतात. तर, मानवजातीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अहिंसाच हवी हे गांधी समर्थक सांगतात. अहिंसेची टर उडवणाऱ्यांना त्याने होणारं जगाचं (त्यात आपलंही नुकसान अंतर्भूत) नुकसान दिसत नसेल का? अन वारंवार नुकसान आणि तडाखे सोसूनही अहिंसेचा जप हे अरण्यरुदनच ठरते, हे गांधी समर्थकांना कळत नसेल का? पण दोन्ही बाजूंना विचार करायचाच नाही बहुतेक. जगण्याचा आणि जीवन व्यवहाराचा आधार अहिंसा हाच असू शकतो; हिंसा नाही. मात्र गांधींनी त्याचा सशक्त पुनरुच्चार केल्यामुळे गांधी विरोधकांना, नुकसान कितीही झालं तरी अहिंसा नको. अन गांधी समर्थकांची पंचाईत वेगळीच आहे. त्यासाठी काही गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील. अहिंसेच्या मुळाशी जाताना गांधी म्हणतात, आधुनिक सभ्यता राक्षसी आहे. ही राक्षसी सभ्यता सोडून दिल्याशिवाय अहिंसेला अर्थच उरत नाही. पण हे गांधींच्या समर्थकांना पटत नाही. का? कारण इहवाद, विज्ञानवाद, व्यक्तिवाद, बुद्धिवाद, स्पर्धा, आर्थिक जीवनमूल्ये, संघर्ष, विस्तारवाद, भोगवाद, वर्चस्ववाद; या पुरोगामी होण्यासाठी आवश्यक असलेल्या श्रद्धा सोडणे गांधींच्या समर्थकांना झेपणारे नसते. शिवाय या राक्षसी सभ्यतेला मात द्यायची असेल तर 'ईशावास्यम इदं सर्वम' हे मूळ प्राणतत्त्व स्वीकारावे लागते. ते स्वीकारण्यात दोन अडचणी असतात. एक म्हणजे मानवी दांभिकता सोडावी लागते आणि दुसरे म्हणजे भारत नाकारणे सोडावे लागते. भारताचा स्वीकार लागतो. या दोन्ही गोष्टी सोडण्यासाठी लागणारी हिंमत गांधी समर्थकात नाही. गांधी विरोधकांना 'सबै भूमी गोपालकी' हे बौद्धिक स्तरावर अमान्य नसेल पण वेगवेगळ्या कारणांनी त्याचा सशक्त उच्चार करण्याची हिंमत आणि नैतिकता त्यांच्यात नाही. अन्यथा भारतीय धार्मिक वा आध्यात्मिक विश्वाला, 'सबै भूमी गोपालकी' हे उच्चरवात सांगायला कुणी मनाई केली आहे? प्रश्न हिंसा की अहिंसा हा नाहीच. हिंसेने सगळ्यांचेच नुकसान होते. (बाकीच्यांसोबत रशियाचेही सर्व प्रकारचे नुकसान होतेच आहे.) जीवनाचा आधार अहिंसा हाच असू शकतो. पण ती केवळ जप करून साध्य होत नाही. त्यासाठी आधुनिक राक्षसी सभ्यतेला तिलांजली द्यावी लागेल. गांधींच्या आडून लढाई खेळणाऱ्या समर्थक आणि विरोधक दोघांनाही, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी हे नको आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३ मार्च २०२२