मंगळवार, २८ मार्च, २०२३

क्रांती

क्रांती कधीही यशस्वी होत नाही. असलेल्या व्यवस्थेची तोडफोड, नवीन व्यवस्थेची निर्मिती; इत्यादी गोष्टी क्रांती करते, करू शकते. पण ज्यासाठी क्रांती केली जाते ते त्याने साध्य होत नाही. क्रांती स्वभावत: प्रतिक्रियावादी असते. सृजनशील नसते. क्रांती आपली मुले खाऊन टाकते हे वचन तर प्रसिद्धच आहे.

अमेरिकन राज्यक्रांती स्वातंत्र्य या मूल्याच्या प्रस्थापनेसाठी झाली. त्याने व्यवस्था बदलली पण स्वातंत्र्य किती साध्य झाले? अमेरिकन नागरिक किती प्रमाणात स्वतंत्र आहे? तंत्रज्ञान, जीवनशैली, संकल्पना यांची किती गुलामी तो सहन करतो आहे? शिवाय स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभारणारी अमेरिका जगभरच्या लोकांच्या स्वातंत्र्याचा किती आदर करते? अन आदर करते हे गृहीत धरले तरी करू काय शकते? युक्रेन हे ताजे उदाहरण आहे.

फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी झाली. यातले काय आणि किती साध्य होऊ शकले? कायदे आणि तत्वज्ञाने याला फारसा अर्थ नाही. प्रत्यक्ष जीवनात ती मूल्य दिसली तर तत्वज्ञानाला काही अर्थ. फ्रेंच राज्यक्रांतीची त्रिसूत्री मानवी जीवनात किती रुजली?

रशियन क्रांती तर अधिकृतपणे अयशस्वी झालेली आहे. ना शोषण संपले, ना जगातील कामगार एक झाले, ना प्रतिक्रांती झाली. चीनमधील सांस्कृतिक क्रांती किती सुसंस्कृत ठरली ते कोरोनाने दाखवलेच आहे.

भारतासाहित सगळीकडच्या छोट्या मोठ्या क्रांतीची उदाहरणे देता येतील. पण केवळ मोठ्या क्रांतीची उदाहरणे पुरेशी आहेत. शिवाय भारतातील क्रांत्यांचा नामनिर्देश मुद्दाम टाळतो कारण त्याने चर्चा भरकटण्याची शक्यताच जास्त. छोट्या क्रांतीपैकी फक्त एक नामनिर्देश सु की यांचा. त्यांनी केलेल्या क्रांतीसाठी त्यांना अगदी नोबेल वगैरे मिळाले पण क्रांती यशस्वी झालेली नाही.

क्रांती प्रतिक्रियावादी असते. संक्रांती (संतुलित, सम्यक क्रांती) सृजनशील, रचनात्मक असते. उद्दिष्टाकडे घेऊन जाण्याची शक्यता संक्रांतीमध्ये अधिक असते.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा