रविवार, १९ मार्च, २०२३

बोक्यांचे भांडण

दोन दिवसांपासून पुण्यातल्या कसबा मतदारसंघातील निवडणूक निकालांनी वातावरण तापवले आहे. तसेही राजकारणावर लिहीत नाही. या छोट्याशा गोष्टीवर लिहिण्याचे तर काहीच कारण नव्हते. पण विचार केला की, लिहिले पाहिजे. का? आपल्याला वाटणारा मूलभूत विचार सांगण्यासाठी. आपलं मत वाचून काही बदलणार वगैरे नाही पण ते पोहोचवलं पाहिजे म्हणून हा लेखनप्रपंच.

कसबा निकालानंतर जेवढ्या काही चर्चा आणि वाद सुरू आहेत त्याच्या मुळाशी एक गृहितक आहे. चर्चा करणाऱ्याची वा वाद करणाऱ्याची भूमिका काहीही असली तरीही ते गृहितक सारखेच आहे, एकच आहे. ते म्हणजे - आपलं भलं होण्यासाठी सत्ता आपल्या हाती असायला हवी. बाकी सगळे तर्क, सगळी मांडणी हे गृहितक घट्ट धरुनच होते. खरा प्रश्न हा आहे की, हे गृहितक बरोबर आहे का? मुळातच सत्ता आपल्या हाती असणे म्हणजे आपल्या प्रतिनिधींच्या हाती असणे. या 'आपल्या'चा अर्थ आणि परिघ प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. लहान वा मोठा असतो. एकजीनसी किंवा विविधांगी असतो. परंतु म्हणणे एकच असते - आपल्या भल्यासाठी सत्ता आपल्या हाती हवी.

वास्तविक आपल्या देशात म्हणा वा जगभरात कुठेही म्हणा - हे गृहितक खरे ठरलेले नाही. वर्तमानात तर नाहीच पण भूतकाळात पण हे खरे ठरलेले नाही. अगदी रामराज्यापासून. व्यासांनी कितीही उच्चरवाने म्हटले असो - राजा कालस्य कारणम. तरीही ते खरे नाही. रामराज्य कुठे संपवायचं यासाठी काळानेच खेळी केली आणि लक्ष्मणाला शरायूचा रस्ता धरावा लागला. नंतर क्रमशः रामराज्य गेले. राजाराम काळाचे कारण ठरले नाहीत तर काळ वरचढ ठरला. त्याला हवे तेव्हा त्याने रामराज्य उभे केले आणि त्याला हवे तेव्हा त्याचा विलय केला.

वर्तमानातील देखील अनेक उदाहरणे पाहता येतील. अमेरिका, युरोपीय देश, खुद्द रशिया; सगळीकडे आपापली सरकारे आहेत. अन् सगळीकडे जनता त्राही माम झाली आहे. युद्ध बंद करा म्हणून लोक एकत्र येत आहेत. युद्धामुळे त्यांचे रोजचे जगणे कठीण झाले आहे. पण आपल्याच सरकारांना ते आपल्याच भल्यासाठी बाध्य करू शकत नाहीत.

महाराष्ट्रात इतके दिवस सत्ता मराठ्यांच्या हाती होती. अजूनही मराठ्यांना मोर्चे आणि आंदोलने करावीच लागतात. 'आपली सत्ता' याच नाऱ्यांनी पाकिस्तान निर्माण झाला. झाला का पाकिस्तान सुखी? ब्राम्हण ब्राम्हण करणाऱ्यांनी हेही आठवावं की, शनिवार वाड्यावरचा जरीपटका काढून तिथे युनियन जॅक कोणी फडकवला होता? किंवा दलीत दलीत करणाऱ्यांनी थोडा शांतपणे विचार करावा की आरक्षण मिळून किंवा काही ठिकाणी दलीत मुख्यमंत्री होऊन किंवा दलीत राष्ट्रपती झाल्याने किंवा दलीत व्यक्तीने राज्य घटना लिहिल्याने; दलितांचे कल्याण झाले का? अन् पुरेसे धाडस करता येत असेल तर हा प्रश्नही विचारला पाहिजे की, आपल्या राज्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करून १९४७ साली आपले राज्य मिळाल्यावर आपलं कल्याण झालं का? महिला मुख्यमंत्री, महिला पंतप्रधान, महिला राष्ट्रपती झाल्या; महिला सुखी झाल्या का? महिलांचे प्रमाण ३३ टक्के नसेलही पण जिथे जिथे महिला लोकप्रतिनिधी आहेत, तिथे महिलांच्या समस्या निर्मुल झाल्या का?

वास्तविक, आपलं सरकार वा आपला प्रतिनिधी हे एक मिथक आहे. We are forced to believe this make believe assumption. आमचं इतकं conditioning झालं आहे की, आम्हाला याबाबत प्रश्नच पडत नाहीत. आपले सगळे तर्क हे आपलं गृहितक सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे तर्क असतात. सत्याचा शोध घेणारे तर्क नसतात. त्याची आपल्याला गरजही वाटत नाही. हे बधीरपणाचे लक्षण आहे.

खरं तर व्यक्तीचं, समूहाचं, जातीचं, समाजाचं भलं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती मोठ्या प्रमाणावर socio- economic प्रक्रिया आहे. या socio- economic प्रक्रियेत राज्य facilitator असतं हा देखील मोठा गैरसमज आहे. तसं असतं तर, भाजपच्या राज्यात स्वदेशी जागरण मंच किंवा किसान संघ किंवा मजदूर संघ असमाधानी राहिले नसते. किंवा जेव्हा आणि जिथे कम्युनिस्ट राज्य होतं तिथे कम्युनिस्ट समाजाचे चित्र प्रत्यक्षात आलं असतं. किंवा गांधींच्या तत्वांवर चालणाऱ्या राज्याने गांधीयुग आणले असते. असं होत नाही. होऊ शकत नाही. आज रोजगारापासून लग्न जुळेपर्यंतच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या, राज्य कोणाच्या हाती आहे याने सुटणाऱ्या नाहीत; हे मनावर, बुद्धीवर कोरून घेण्याची गरज आहे. राज्यासाठी आज होणारे वाद हे केवळ आणि केवळ, लोण्याचा गोळा मटकावण्यासाठी होणारे बोक्यांचे भांडण असते. त्याने अमक्याचे किंवा अमुक गटाचे कल्याण वगैरे होत नाही. तसे समजणे हा प्रचंड भाबडेपणा आहे.

आज असणारी जातीजातींची भांडणे याच प्रकारातील आहेत. हे त्या त्या गटांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. पण विश्वास आणि आदर यांची तूट (trust deficit) एवढी मोठी आहे की ती भरून काढणे हेच एक मोठे आव्हान आहे. हेही तेवढेच खरे आहे की, ही तूट भरून काढणे हाच सगळ्या समस्यांवरील आणि वादांवरील उपाय आहे आणि सगळ्यांच्या कल्याणाची ती हमीही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आम्हाला ते हवे आहे का? की आम्हाला बोक्यांचे भांडण हेच जीवनाचे सार्थक वाटते?

- श्रीपाद कोठे

शनिवार, ४ मार्च २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा