आज पुस्तकं वरखाली करताना तीन गोष्टी हाती आल्या. १) १९७९ साली संघ शिक्षा वर्गाचं प्रथम वर्ष केलं होतं, त्याची वही. २) १४ नोव्हेंबर १९८८ रोजी नागपूर आकाशवाणीवर पंडित नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त युवावाणी कार्यक्रमात केलेल्या भाषणाची स्क्रिप्ट. ३) वयाच्या २५ व्या वर्षी एका व्यक्तीने हाताचा ठसा घेऊन सांगितलेलं आयुष्य. ही एक वहीच आहे. ज्यात ठसा आणि त्याचे विश्लेषण आहे. वेळ छान गेला. तिन्ही गोष्टींशी जुळलेल्या आठवणींची उजळणी झाली.
संघ शिक्षा वर्गाची वही पाहून; आमचे गण शिक्षक प्रा. गुलाब वंजारी, रेशिमबागेतील महानगरपालिका शाळेतील एक महिन्याचे वास्तव्य, दोन्ही वेळच्या संघस्थानासाठी आणि दोन्ही वेळच्या जेवणासाठी रेशीमबागच्या संघ परिसरात चालत जाणेयेणे, तट्याच्या मांडवात रोज सकाळ दुपार रात्र बिना पंख्याने होणारे बौद्धिक कार्यक्रम, ऊन लागल्याने दोन दिवस रुग्ण विभागात राहणे, रोज सकाळच्या संघस्थानानंतर आमचे नगर कार्यवाह भय्याजी पारधी यांचा पाठीवरील धपका; असं सगळं आठवलं.
पंडित नेहरू त्यांच्यावरील भाषणाची आठवण तर जन्मभर लक्षात राहणारी अन जपून ठेवावी अशीच. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनिमित्त संघाच्या आजी माजी प्रचारकांचे अखिल भारतीय शिबिर होते. आठवडाभरापासून प्रबंधक म्हणून रेशीमबागेतच मुक्काम होता. शिबिर संपण्याच्या एक दिवस आधी घरून एक लिफाफा आला. ते होते आकाशवाणीचे पत्र. शिबिर व्यवस्थेतून हलणे शक्य नव्हते. मग तयारी कधी अन कशी करायची? दिवसभर विचार करत होतो. काही सुचत नव्हते. अन अचानक मनात काहीतरी आले. संध्याकाळी जेवणाच्या वेळी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांना भेटलो. त्यांना अडचण सांगितली. ते म्हणाले, उद्या समारोप आहे. दिवसभर धावपळ, भेटीगाठी राहतील. तू उद्या संध्याकाळी भेट. त्याप्रमाणे गेलो. म्हणाले, 'चल संध्याकाळची शतपावली करू.' आणि नंतरचा तासभर स्मृती मंदिराच्या कुंपणापासून स्मृती भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मारुती मंदिरापर्यंत; खांद्यावर हात ठेवून पायाने फेऱ्या आणि त्यांच्या मुखाने अन माझ्या कानाने पंडित नेहरू, एवढंच सुरू होतं. एक फेरी उजवा हात खांद्यावर आणि मागे वळलं की डावा हात खांद्यावर, एवढाच बदल होत होता. 'येत्या सहस्रकात लाल रंगाच्या सगळ्या छटा भगव्या ध्वजात विलीन होऊन जातील' हे अतिशय आत्मविश्वासाने सगळ्या प्रचारकांना आदल्या दिवशी सांगणारे दत्तोपंत कसलाही चिटोरा हातात, खिशात न घेता, मला तपशीलवार आणि ससंदर्भ पंडित नेहरू सांगत होते. शेवटी म्हणाले, 'हे पंडितजींचं एक दर्शन आहे. त्यांचं जीवन, विचार, धोरणं यावरील टीका, आक्षेप, विश्लेषण हा वेगळा विषय आहे. आकाशवाणीवर ते चालणार नाही. तो तुझ्या भाषणाचाही विषय नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी वय आणि अधिकारही हवा.' काय वर्णन करणार या अनुभवाचं? तो फक्त जपून ठेवावा. घरी आलो तर वडिलांनीही नेहरूंचे एक संक्षिप्त चरित्र आणून ठेवले होते. दोन्ही मिळून तयार केलेले हे भाषण.
हाताचा ठसा आणि आयुष्य हा तर प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. बरंच काही आहे त्यात, पण तीन महत्त्वाच्या गोष्टी. १) जीवन सन्मानजनक राहील. अपमानास्पद राहणार नाही. २) विवाहानंतर भरभराट आणि उत्कर्ष. ३) ६७ ते ७० वर्षांचं आयुष्य. यातील पहिला मुद्दा खराच आहे. दुसराही खरा असेलच. कारण भरभराट काही झाली नाही. 😃😃 तिसरा खरा ठरतो का हे कळेलच. तिसऱ्या मुद्याबाबत मला मात्र थोडं वेगळं वाटतं. मी दीर्घायू आहे आणि भारतीय गणराज्याची शताब्दी पाहून, म्हणजे २०५० साली महाशिवरात्रीला बहुधा मी जगाचा निरोप घेईन. अर्थात असं मला वाटतं. काय होतं माहिती नाही. काहीही झालं, कोणीही खरा ठरला तरी आनंदच आहे.
- श्रीपाद कोठे
१५ मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा