एका संघगीतातील एक ओळ आहे - 'हिंदुत्वाच्या असीम कक्षा, संघशक्तीने तेज लुटावे'. आज ही ओळ आठवण्याचे कारण आहे - गहू निर्यातबंदीचा विषय. सध्या जगभरातच अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवतो आहे. त्यात गहू देखील आहे. पोटाशी संबंधित आणि रोज लागणारी गोष्ट. त्यामुळे त्याची चर्चा होणारच. जगाची गरज लक्षात घेऊन भारताने गहू निर्यात मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण स्वीकारले. पण त्याचा परिणाम होऊन भारतात भाव भडकले. मग सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. पूर्वी नोंदणी केलेल्यांना सूट देऊन. त्यामुळे निर्यातदार नाराज झाले. स्वाभाविकच आहे. निर्यातदारांना पैसा हवा. कोणी उपाशी राहू नये, सगळ्यांना भाव परवडावे हे त्यांना का वाटावे? अन आठवला कृष्ण. गोकुळातल्या बालकांच्या तोंडचे दूध बाहेर जाऊ न देणारा. त्यासाठी संघर्ष करणारा. मडकी फोडणारा. पैशासाठी स्वजनांना उपाशी ठेवणं हे हिंदुत्व असू शकत नाही. त्यासाठी नाराजी पत्करावी लागली तरी चालेल. हां, एक गोष्ट मात्र आहे - कृष्णाला कसलीही अपेक्षा नव्हती. धनपिसाट व्यापाऱ्यांकडून त्याला काहीही नको होते. हिंदुत्वाच्या असीम कक्षेतील ही पण एक कक्षा आहे.
************
आर्थिक क्षेत्रातील आणखीन एक विषय सध्या चर्चेत आहे. श्रीलंकेतील परिस्थिती. त्यात घराणेशाही आणि सवलती हे दोन घटक असतात. भोळेभाबडे लोक फारसा विचार न करता मेसेज फिरवत राहतात. दोन घटकातील घराणेशाही हा राजकीय विषय आहे. तूर्त त्यावर काही म्हणायचे नाही. पण सवलती या विषयावर मात्र बोलले पाहिजे.
- जगातल्या कोणत्या देशात, कोणत्या अर्थव्यवस्थेत सवलती नाहीत?
- आर्थिक सवलती खरंच बंद करता येऊ शकतात का? बंद कराव्यात का?
- आर्थिक सवलती बंद करणे माणुसकी, न्याय आणि नीतिमत्ता यांना धरून होईल का?
- किमतीचे नियंत्रण इत्यादी कामे सरकारची नाहीत असे म्हणून सगळी अर्थव्यवस्था बाजाराधीन करताना, जनतेच्या कल्याणाची चिंता हे सरकारचे काम आहे याचा विसर का पडावा?
- अर्थव्यवस्था बाजाराने नियंत्रित केली तरीही, ती समाजाचे एकूण जगणे कठीण करत असेल तर सरकारने त्यात हस्तक्षेप करायला हवा की नको?
- सवलती बंद कराव्यात असे म्हणताना, एकूण समाजाच्या उत्पन्नाच्या parity चा विचार करायचा की नाही?
- पैसा कसा निर्माण होतो आणि मुख्य म्हणजे कसा फिरतो हे ध्यानात न घेता सवलती बंद करा म्हणणे किती शहाणपणाचे म्हणता येईल?
१) डोमेक्स घ्या किंवा घडी घ्या म्हणणाऱ्याला कोट्यवधी रुपये मिळतात अन राबराब राबणाऱ्याला दोन वेळची जुळवाजुळव करताना ओढाताण होते.
२) शिक्षण ही गोष्ट पैसा निर्माण करू शकते वा नाही याचा विचार न करता, शिक्षण क्षेत्र विना अनुदानित केले जाते. त्यातून शिकवणारे पालक कंगाल किंवा भ्रष्ट होतात आणि शिक्षण सम्राट गब्बर होतात.
३) अंगावरचे कपडे उतरवले की लाखो रुपये मिळतात अन दिवसभर पाट्या टाकल्या की कोरडी भाकर मिळते.
४) कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेमके काय काम करतात हे कळत नसले तरीही त्यांचे बंगले आणि गाड्या कशा असतात? या प्रश्नाला काय उत्तर.
५) तेच तेच खेळणाऱ्या खेळाडूंच्या लाखोंच्या आणि कोटींच्या बोली लागतात. त्यांना cheer up करण्यासाठी श्रम किंवा अक्कल काहीही न वापरणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात. शेतात मजुरी करणाऱ्याचे काय?
६) तीच तीच गाणी गल्लीबोळातून गणपती, दिवाळी, स्वातंत्र्यदिन यांना गाऊन हजारो, लाखो रुपये मिळतात. कवी वा लेखक तेच तेच लिहू शकतात का? अन त्यातून पैसा मिळतो का?
पैशाचं चलनवलन कसं होतं याची अक्षरशः हजारो उदाहरणे देता येतील. हे लक्षात न घेता, सवलतीच्या नावाने खापर फोडणे हे निर्बुद्धपणा शिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. सर्वसामान्य माणसाचे विचारशून्यत्व आणि झुंडीत रमण्याची वृत्ती कमी होईल तो सुदिन.
- श्रीपाद कोठे
१८ मे २०२२