रविवार, ३० एप्रिल, २०२३

तीन चांगल्या गोष्टी

आज तीन चांगल्या गोष्टी वाचल्या.

१) विद्यापीठाच्या जागेत आठ हजार वृक्ष लावणार. हवेचा दर्जा चांगला करण्यासाठी महापालिकेला उपलब्ध झालेल्या निधीतून हे होणार आहे. अशीच छोटी छोटी पुष्कळ वनं तयार करावीत. अन सोबत छोटे छोटे अनेक पाणवठेही. पण यासोबत हवेचा दर्जा कमी करणाऱ्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्नही व्हावा. नाही तर हवेचा दर्जा आणखी आणखी खालावणार अन त्यावरचे उपाय निरर्थक होणार. असे होऊ नये.

२) कपडे खरेदी टाळा, प्रदूषण टाळा; हा लेख. लेख एका महिलेनेच लिहिला आहे हे विशेष. कारण खरेदी अन त्यातही कपडे खरेदी यासाठी महिलांचा विशेष पुढाकार असतो. हा विषय नवीन नसला तरीही नव्याने पुढे आला आहे. वास्तविक कपडेच नव्हे तर एकूणच खरेदीचा जो रोग माणसाला लागला आहे त्याचा विविध अंगांनी विचार आवश्यक झालेला आहेच.

३) प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव निर्माण करण्याच्या केंद्राच्या योजनेशी संबंधित बातमी. ही योजना चांगली आहे यात वादच नाही. ती यशस्वी होईल यावरही शंका घेण्याचे कारण नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या तलावांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा व्यवसाय होऊ नये. व्यवसाय झाल्याने कदाचित gdp वाढेल पण त्याचा मोह टाळून; नैतिकता आणि कोणीही (यात पशु पक्षी वृक्ष वेली झाडे हेही आले) तहानलेलं राहणार नाही हे समाधान यांना महत्व द्यावं. 'आमचा gdp कदाचित थोडा कमी असेल, पण आमच्या येथे कोणीही तहानलेलं नाही अन आमची नैसर्गिक प्राणवायू निर्मिती तुमच्यापेक्षा जास्त आहे' हे जगाला ठणकावून सांगण्याची तयारीही केली पाहिजे. शिवाय आज नद्यांचे पाणी अडवून जलसाठे केले जातात. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या जलसाठ्यांमुळे आता, या तलावांमधून नद्या उगम पावाव्यात.

- श्रीपाद कोठे

१ मे २०२२

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

तुकडोजी महाराज आणि संघ

आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा रा. स्व. संघाशीही संबंध आला होता. १९४० च्या नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात एक दिवस रात्री त्यांच्या खंजिरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. निल सीटी शाळेत झालेल्या या भजनाला संघ संस्थापक डॉ. हेडगेवार उपस्थित होते. गोळवलकर गुरुजी या वर्गाचे सर्वाधिकारी होते.

३० डिसेंबर १९४३ च्या ब्रिटिश सरकारच्या गुप्तचर अहवालातही तुकडोजी महाराज व  संघ यांच्या संबंधांचा उल्लेख आहे. संघ आपल्या कार्यवाढीसाठी तुकडोजी महाराजांची मदत घेत असल्याचे त्यात म्हटले होते.

१९४८ च्या गांधीजींच्या हत्येनंतर मात्र संघ व तुकडोजी महाराज यांच्या संबंधांबाबत बरेच समज गैरसमज दोन्ही बाजूंना झाले होते.

परंतु १९६४ साली गोळवलकर गुरुजींच्या पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्यावेळी त्यात त्यांचा सहभाग होता. मुंबईतील पवईच्या चिन्मय आश्रमात झालेल्या विहिंप स्थापना बैठकीला ते उपस्थित होते.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२२

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

आवाहन

काल संभाजी भिडे यांना अपघात झाल्याची माहिती फेसबुकवर पाहिली. एका वृत्तपत्राच्या साईटवर पण ती होती. त्या पोस्टवर शेकड्याने कमेंट होत्या. त्यात खूप कमेंट्स वाह्यात प्रकारच्या होत्या. यात नवीन काही नाही. काहीच नाही. सगळ्यांना आता ते सवयीचे झाल्यासारखे आहे. आपल्याला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या व्यक्तींबद्दल, समूहांबद्दल, संघटना वा संस्थांबद्दल, विचारांबद्दल, पक्षांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरून बोलणे, लिहिणे खूप वाढले आहे. हे योग्य नाही, चांगले नाही असे सगळ्यांनाच वाटते. तरीही हे वाढत्या प्रमाणात सुरू आहे. क्रिया, प्रतिक्रिया सुरू असतात. परंतु हे थांबायला हवे असे ज्यांना, ज्यांना मनापासून वाटते; विश्वास, सौहार्द वाढावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक विनंतीवजा आवाहन - 'मी हिणकस भाषा वा भावना यापासून दूर राहीन. मी अशा भाषेचा अजिबात वापर करणार नाही. अशा भाषेला अन भावनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुजोरा देणार नाही. त्यांना लाईक्स देणार नाही. सोबतच मी ज्यांना सांगू शकेन, म्हणू शकेन त्यांना हेच आवाहन करेन. याबाबत माझे-तुझे विचार मी करणार नाही.'

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०२२

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

उपक्रम

थोड्या वेळापूर्वी डोंबिवलीहून फोन होता. 'तुमचा योगी अरविंद यांच्यावरील लेख वाचला. मला उत्तरापारा भाषणासंबंधी पुस्तक हवं आहे. कुठे, कसं मिळेल?' त्यावर बोलणं झाल्यावर थोडं अवांतर बोलले. गृहस्थ निवृत्त आहेत अन मूळ कोकणातले आहेत. गेल्या वर्षी विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद आणि अन्य सतसाहित्याची २०० पुस्तके त्यांनी खरेदी केली आणि कोकणातल्या आपल्या गावी जाऊन तेथील शाळेत दिली. मुलांनी वाचावी म्हणून. शाळेतल्या शिक्षिकांनाही आनंद झाला. किती माणसे अनामपणे काय काय करत राहतात नाही. जग चालतं ते अशा माणसांमुळेच. २००५ साली आम्ही एक उपक्रम संस्कार भारती अंतर्गत घेतला होता. संत मीराबाईंच्या जन्माला ५०० वर्षे झाल्यानिमित्त. नागपुरातल्या ३२ शाळांमध्ये मीराबाईंचे चरित्र कथाकथन रुपात सांगण्याचा. शाळांना तो कार्यक्रम इतका आवडला होता की, असा उपक्रम सतत चालवा. आम्ही वेळ देत जाऊ, असे त्यांचे म्हणणे होते. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. पण शाळांमध्ये खूप काही करता येतं. अनेक जण करतातही. पण प्रमाण खूप वाढायला हवे.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०२२

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

संघटना आणि समर्पण

काल एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया -

संघटना हे एक यंत्र असतं अन समर्पण हा भाव असतो. यंत्राला भाव समजत नाही. संघटन वाढवणे आणि कार्यकर्त्यांची मानसिकता घडवणे यासाठी भाव असतो. पण जीवनाचा व्यवहार हा एक तिसरा घटक असतो. हा लक्षात घेऊन सगळा विचार करावा लागतो. पण जीवन दुर्लक्षित करून भाव पक्ष गृहीत धरला जातो तेव्हा संघटनही उरत नाही, भावही नासतो आणि पांथिकतेकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीप्रमाणेच संघटनेच्या वाढीचेही टप्पे असतात. त्या त्या टप्प्यांवर अनेक गोष्टींची पुन्हा पुन्हा मांडणी करावी लागते. जुन्या घराची दुरुस्तीच म्हणा ना. त्याऐवजी भंपक आदर्शवाद सांगत राहिलं तर काहीही साध्य होऊ शकत नाही. पुण्याई पण लयास जाते.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२२

दैव आणि प्रयत्न

इंग्रजीत असं म्हणतात की, 99% perspiration and 1% inspiration. हे खरंच आहे. पण गंमत ही आहे की, निर्णायक घटक असतो तो एक टक्काच. तो एक टक्का असेल तर ९९% पैकी फक्त ९% असेल तरी चालून जातं. कधी कधी तर त्याहूनही कमी सुद्धा चालतं. अन तो एक टक्का नसेल तर अगदी तुडुंब ९९% टक्के असेल तरी काहीही उपयोग नसतो.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२२

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

हिंदुत्व

साम्यवाद, समाजवादी, इस्लाम, ख्रिश्चनीती इत्यादी वाईट वा जगाला भारभूत का आहेत? त्यांची ती नावे आहेत म्हणून का? याचं नि:संदिग्ध उत्तर आहे नाही. त्यांची ती नावे आहेत म्हणून ते भारभूत नाहीत. तर त्यांनी शिकवलेल्या, पुरस्कारलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे ते भारभूत झाले आहेत. द्वेष, सूड, प्रतिशोध, बदला, अद्दल घडवणे, वर्चस्व गाजवणे, सत्ताकांक्षा, धनाकांक्षा, आकंठ उपभोग, इच्छा- वासना- मनोभाव- यांना अवाजवी महत्व, संकुचितता, अपुरे विचार आणि त्याला मिळालेली करुणेची जोड यामुळे जन्माला घातलेली भ्रामक शब्दावली; या आणि यासारख्या बाबींमुळे हे सगळे विचार, त्यांच्या विचारधारा, त्यावर आधारित व्यवस्था आणि रचना; जगाला भारभूत झाले आहेत.

हिंदुत्व जगासाठी कल्याणदायी आहे तेही त्याचे नाव हिंदुत्व आहे म्हणून नाही. तर त्याने शिकवलेल्या, पुरस्कारिलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे. सगळ्यांचा आदर, विसरा आणि क्षमा करा वृत्ती, सहकार्याची भावना, धन आणि सत्ता हे आकांक्षेचे विषय नाहीत ही शिकवण, संयमित उपभोग, इच्छा, वासना, मनोभाव यांना मर्यादित महत्व, विशालता, पूर्ण विचार आणि त्याला करुणेची जोड यातून विकसित झालेली भ्रम उत्पन्न न करणारी शब्दावली, या आणि यासारख्या बाबींमुळे हिंदुत्व हा जगाला आधार वाटतो, भार नाही.

कोणत्याही कारणाने हिंदुत्वाचं हे कॅरॅक्टर बदललं तर ते हिंदुत्व राहणार नाही आणि जगाला आधारही देणार नाही. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूगर्भातील कणांची फक्त संख्या जरी किंचित बदलली तरी ते मूलद्रव्य काही तरी वेगळं होऊन जातं. ते ते राहत नाही. हिंदुत्वाच्या अणूगर्भातील कणांचाही गंभीर साक्षेप हवा.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२२

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

संस्कृती म्हणजे...

संस्कृती म्हणजे काय? खूप ऐकायला मिळतं, आमची संस्कृती तुमची संस्कृती. लोकसंस्कृती, पाश्चात्य संस्कृती, ब्राह्मणी संस्कृती, वैदिक संस्कृती, इस्लामी संस्कृती, हिंदू संस्कृती, देशी संस्कृती, गंगाजमुनी संस्कृती, मिलिजुली संस्कृती, काश्मिरी संस्कृती, बंगाली संस्कृती, मराठी संस्कृती, ऐतिहासिक संस्कृती, प्रागैतिहासिक संस्कृती, खाद्यसंस्कृती; इत्यादी इत्यादी इत्यादी. अन सुरू होतात वाद. कारण संस्कृती या शब्दाचा अर्थ समजून न घेताच आपण तो वापरतो. संस्कृती म्हणजे तो घटक जो माणसाला सुसंस्कृत बनवतो. संस्कृती म्हणजे सवयी, परंपरा, विशिष्ट कृती, विशिष्ट प्रतिके, विशिष्ट शब्द, विशिष्ट पोशाख, विशिष्ट पदार्थ, विशिष्ट कलाप्रकार; इत्यादी नाही. या सगळ्या गोष्टीतून माणसाला सुसंस्कृतपणाकडे घेऊन जाणारे तत्त्व म्हणजे संस्कृती. त्यामुळेच अमुक संस्कृती, तमुक संस्कृती हे एक प्रकारे misnomer आहे. वर नमूद केलेल्या सगळ्या बाबी स्थळ, काळ, परिस्थिती, गरजा, आवश्यकता यानुसार असतात, त्यानुसार बदलतात किंवा स्थिर राहतात. पण त्यातील कोणतीही गोष्ट संस्कृतीसाठी अपरिहार्य नाही. या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक आहेत की नाहीत हे मात्र सतत पाहणे मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते. हे पाहण्याचा मापदंड एकच आहे, तो म्हणजे; ती ती गोष्ट माणसाला सुसंस्कृत बनवते अथवा नाही. बाकीचा फक्त गोंधळ.

- श्रीपाद कोठे

१९ एप्रिल २०२२

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

समस्या आणि उपाय

- असभ्यपणाची समस्या सभ्य होण्याने संपू शकते, अन्य कशानेही नाही.

- असमंजसपणाची समस्या समंजस होऊन संपू शकते, अन्य कशानेही नाही.

- अविचाराची समस्या विचारी होऊन संपू शकते, अन्य कशानेही नाही.

- असंस्कृतपणाची समस्या सुसंस्कृत होऊन संपू शकते, अन्य कशानेही नाही.

या किंवा अशा समस्या अन्य कशाने तरी सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. व्यक्तिगत, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक; अशा वेगवेगळ्या संदर्भात हे लावून पाहणं आणि पडताळा घेणं; मनोरंजक आणि बोधप्रद होऊ शकतं.

- श्रीपाद कोठे

१८ एप्रिल २०२२

भूताच घर

काल संध्याकाळची गोष्ट. बाहेरून घरी येत होतो. गल्लीत सायकल वळवली तर माझ्या मागोमाग तीन छोटी (५-७ वर्षांची) मुलं आली. दोघं त्यांच्या सायकलवर होती. एक त्यांच्यासोबत धावत होता. घरासमोर थांबलो. फाटक उघडत होतो तर तिघांपैकी एकाने विचारले - 'काका इथे तुम्ही राहता का?' हा असं का विचारतो हे न कळल्याने त्याच्याकडे गोंधळून पाहत मी म्हटलं, 'हो.' त्यावर ते चिरकुट म्हणालं, 'आम्हाला वाटलं इथे भूत राहतं.' आपल्या सोबत्याकडे हात करून म्हणाला, 'यांनी मला सांगितलं इथे भूत राहतं.' मी त्याच्याकडे पाहून मनमोकळं हसलो. त्यांना आता वाटत राहील - भूतांना घाबरायचं नसतं. भूतं छान हसतात वगैरे पण. आत येऊन फाटक बंद करताना मनात आलं, 'त्या मुलाने सांगितलं ते खोटं पण तर नाही नं. आपण काय भूतापेक्षा कमी आहोत का?'

- श्रीपाद कोठे

१८ एप्रिल २०२२

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

नराचा नारायण

स्वामी विवेकानंदांचे एक शिष्य शरच्चंद्र चक्रवर्ती यांनी १८९८ सालची एक घटना नमूद केली आहे. त्यावर्षीचा श्रीरामकृष्ण जन्मोत्सव बेलूरला भाड्याने घेतलेली जी जागा होती तेथील मठात झाला. बेलूरला आज असलेल्या मठाच्या जवळच ही जागा होती. स्वामीजींनी शरच्चंद्र चक्रवर्ती यांना त्या दिवशी खूप जानवी आणून ठेवण्यास सांगितली होती. त्यांनी त्यानुसार जानवी आणली आणि स्वामीजींना विचारले ही कशासाठी? त्यावर स्वामीजी म्हणाले- `आज पूजेसाठी जे लोक येतील, त्यांना गंगास्नानानंतर ही जानवी द्यायची आहेत. ब्राम्हणेतर भक्तांनाही गायत्री मंत्र द्यायचा आहे. हळूहळू देशातील साऱ्याच लोकांना ब्राम्हण पदवीला घेऊन जावयास हवे. ठाकुरांच्या भक्तांबद्दल तर बोलावयासच नको. सारेच हिंदू एकमेकांचे बंधू होत. शिवू नका, शिवू नका असे म्हणून म्हणून आपणच त्यांना हीन करून टाकले आहे. याचमुळे तर सारा देश हीनता, भीरुता, मूर्खपणा आणि वीर्यहीनता यांच्या अगदी चरम सीमेला जाऊन पोहोचला आहे. त्या साऱ्यांना सांगावयास हवे- तुम्हीही आमच्यासारखीच माणसे आहात. तुम्हालाही आमच्यासारखेच अधिकार आहेत. आले ना लक्षात मी काय म्हणतो ते?' हा प्रसंग अतिशय लक्षणीय आहे. तो आजपासून शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात घेतल्यास त्याचे महत्व अधिकच जाणवते. ज्यांना धर्म, आध्यात्म यांच्याशी घेणेदेणे नाही त्यांना काही वाटणार नाही. मात्र ज्यांची त्यावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. एक तर सगळ्यांना यज्ञोपवीत देऊन स्वामीजींनी धार्मिक एकत्वाच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांच्या समतेचे जे उद्गार त्यांनी काढले आणि अस्पृश्यतेवर प्रहार केला तो सामाजिक परिवर्तनाचा आशयही अत्यंत मोलाचा म्हटला पाहिजे. अन हे करीत असतानाच- भाषा, खाणे पिणे, व्यवहार, स्पर्श, सामाजिक किंवा धार्मिक दर्जा; एवढ्याचपुरती मर्यादित दृष्टी न ठेवता; सगळ्यांना ब्राम्हण पदाला नेण्याचे जे ध्येय प्रतिपादन केले ते सगळ्यात महत्वाचे. बोली भाषेत म्हणायचे तर `नराचा नारायण' होणे, हे ते ध्येय. या प्रसंगानंतरच्या प्रदीर्घ कालावधीत आपण जो अनुभव घेतला त्यातून हे सिद्ध होते की; केवळ सामाजिक उपक्रम, आंदोलने, घोषणा, प्रबोधन, कायदे, आर्थिक, सामाजिक विकास, इत्यादी गोष्टींनी खूप काही साध्य होत नाही. हे सारे कितीही केले तरीही माणूस आतून उन्नत होणे याला पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येकापुढे जीवनाचा सर्वोच्च आदर्श ठेवायला हवा. त्या बळावर प्रत्येक जण पुढे जाईल तेव्हाच हे आंतरिक परिवर्तन येईल. हिंदू परंपरेने यालाच ब्रम्हज्ञ होणे म्हटले. लोकपरंपरा यालाच नराचा नारायण होणे म्हणते. स्वामीजींनी त्याचाच उच्चार केला आणि सगळ्यांपुढे एक उच्च आदर्श ठेवला.

- श्रीपाद कोठे

१६ एप्रिल २०१५

सोमवार, १० एप्रिल, २०२३

नास्तिक संमेलन

पुण्यातील रद्द झालेले नास्तिक संमेलन, हिंदुत्व, रामनवमी, कालच्या घटना; असे सगळे बिंदू जोडताना गांधीजींचं एक वाक्य आठवलं - 'हिंदुत्व हे सत्याच्या अखंड शोधाचं दुसरं नाव आहे.' हिंदुत्वाचं हे फार सुंदर आणि नेमकं वर्णन आहे. या अर्थाने सगळ्यांनीच हिंदुत्वाचा स्वीकार करायला हवा. आपापल्या भूमिका निश्चित करून, त्या यावच्चंद्रदिवाकरौ अपरिवर्तनीय आहेत आणि असायला हव्यात, असा हट्ट न करता; सतत सत्याचा शोध घेत राहावे. अन एक निश्चित की, सत्य गवसल्यानंतर तेच आपल्याला या सगळ्या असत्याकडे (सापेक्ष सत्याकडे) कसं पाहावं, या सापेक्ष सत्यामध्ये वावरताना काय करावे हे समजून देईल. या दृष्टीने, नास्तिक मेळावा रद्द करायला नको होता असं वाटतं. आधीही नास्तिक मेळावे झालेले आहेत. त्याने काही फरक पडत नाही. पण मेळाव्याने सुद्धा नास्तिकता हेच सत्य असं करू नये. त्या ऐवजी नास्तिकतेच्या भूमिकेच्या साहाय्याने सत्य काय याचा शोध घ्यावा. काल रामनवमी होती. त्यामुळे पोलिसांना अशांततेची भीती वाटली. पण त्यांनाही ही भीती वाटू नये अन तशी भीती वाटू नये यासाठी रामभक्तांनीही रामाच्या साहाय्याने सत्याचा शोध घ्यावा. खरे तर नास्तिक परिषदेवर बंदी घालून पोलिसांनी एक प्रकारे हिंदूंचा अपमानच केला आहे. हिंदू समाज अथवा रामभक्त दुसरी भूमिका सहन करू शकत नाहीत असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. जो चुकीचा आहे. हां, असेच भय श्रीराम वा हिंदू न मानणारे आहेत त्यांचेही वाटू शकते. आपले भय वाटणार नाही याची खबरदारी घेणे हे नास्तिक वा हिंदू विरोधकांचे काम आहे. हेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि बंगाल वा गुजरातमध्ये झालेल्या घटनांबाबत म्हणता येईल. या वा त्या बाजूने स्वतःला सत्य सिद्ध करण्याची धडपड न करता, सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हावा. तसा झाला तर कोणालाही कोणावर आक्षेप राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

११ एप्रिल २०२२

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

महागाई

महागाई हा माणसांच्या जगण्याचा विषय आहे. दुर्दैवाने आज तो तसा राहिलेला नाही. हां, एक मात्र मान्य केले पाहिजे की, महागाई हा एक गंभीर विषय आहे हे आता भाजप समर्थकांनाही जाणवले असावे. कारण, 'महागाई कमी करण्यासाठी काही आम्ही मोदीजींना निवडून दिले नाही' असे मेसेज आलेले नाहीत. असो.

तर... महागाई हा माणसांच्या जगण्याचा विषय राहिलेला नाही. या विषयावर बोलणारे दोन गटात मोडतात. १) देश चालवण्याची जबाबदारी सरकारची असल्याने महागाईसाठी सरकारच जबाबदार आहे. अन सरकार महागाई कमी करत नाही म्हणजे ते कुचकामी, बेजबाबदार आणि निरर्थक आहे. २) महागाईसाठी जागतिक परिस्थिती जबाबदार आहे. त्यासाठी सरकारला दोष देणे चुकीचे आहे. जगात सर्वत्र महागाईची समस्या मोठी आहे. तरी त्यामानाने आपल्या इथे परिस्थिती नियंत्रणात आहे.

एक गट महागाईचे विश्लेषण करतो तर दुसरा गट महागाईची जबाबदारी निश्चित करतो. 'महागाई कमी व्हायला हवी की नको?' या प्रश्नावर मात्र दोन्ही गटातील बहुसंख्य मंडळी स्पष्ट उत्तर देणार नाहीत. कारण, एका गटातील मंडळींना सरकारची जबाबदारी स्वीकारणे कठीण जाईल तर दुसऱ्या गटाकडे महागाई कमी करण्याचे काहीही उपाय नाहीत. अन सामान्य माणूस तर काय... नेहमीच अगतिक असतो. आपापले हितसंबंध, नफ्यातोट्याचे हिशेब दूर ठेवून यावर बोलणारे मात्र कोणी दिसत नाहीत. तसे बोलणारे ही समाजाची गरज आहे हे मात्र निश्चित.

इंधन हा एक मुद्दा घेऊ. महागाई ही मूलतः त्यामुळेच आहे. पण इंधनावर आपले नियंत्रण नाही. इंधन, त्यावर आपले नियंत्रण नसणे अन परिणामी महागाई; या गोष्टी काही आजच्या नाहीत. खूप जुन्या आहेत. पण आपल्या हाती सत्ता असली की ही समस्या चुटकीसरशी सोडवू, याहून अधिक सखोल विचार दोन्ही बाजूंकडे नाही. इंधन ही गोष्ट जर आपल्या हाती नाही तर त्याला पर्याय दिला पाहिजे याची पुरेशी जाणीव कोणाकडेच नाही. पर्याय याचा अर्थ केवळ पर्यायी इंधन असा होत नाही. अर्थात त्या पर्यायावरही खूप उशिरा विचार सुरू झाला. पण केवळ पर्यायी इंधन उपलब्ध केल्याने महागाईची समस्या सुटेल का? त्या पर्यायी इंधनाचे जागतिकीकरण होणारच, त्यात भांडवली नफेखोरी येणारच. म्हणजे समस्या जिथल्या तिथेच राहणार. मग उपाय काय? उपाय आहे १) अल्प इंधनभक्षी जीवन. २) एकमेकांत गुंतलेली अर्थव्यवस्था मोकळी करून स्वतंत्र प्रादेशिक अर्थव्यवस्थांचा विकास आणि या प्रादेशिक अर्थव्यवस्थांचे सहकार्य. ३) मानसिक परिवर्तन.

मानसिक परिवर्तन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. कारण त्यात सवयी, कल्पना, समज अशा पुष्कळ गोष्टींची नव्याने व्याख्या आणि मांडणी करावी लागेल. जसे - मानवी आणि पशुऊर्जेचा वापर, या पर्यायासाठी माणसाला स्वतःशीच मोठा संघर्ष करावा लागेल. मानवी व पशु ऊर्जेचा वापर करण्यासारख्या व्यवस्था आणि रचना विकसित कराव्या लागतील. त्यातील समस्यांचा क्षमता, सन्मान अशा अनेक अंगांनी विचार करावा लागेल. थोडक्यात म्हणजे, आज डोळ्यासमोर नसलेला पर्याय विकसित करावा लागेल. हा पर्याय विकसित केल्याने देश आणि देशवासी अधिक संख्येत आणि अधिक चांगल्या प्रकारे सुखी होऊ शकतील, पण जगाच्या दृष्टीने कदाचित अमुक बिलिअन अर्थव्यवस्था वगैरे होऊ शकणार नाही. ही किंमत देखील चुकवावी लागेल. इतका सखोल विचार करण्याची आणि किंमत चुकवण्याची तयारी असेल तर महागाईवर बोलणे इष्ट ठरेल. अन त्यासाठी महागाई कमी होणे आवश्यक आहे हे स्वतःला पटवावे लागेल. त्यासाठी महागाई हा जगण्याचा प्रश्न आहे हे आतून जाणवावे लागेल. नाही तर विश्लेषणे आणि जबाबदारीच्या निरर्थक चर्चा होतच राहतील. अन अगतिक माणूसही तसाच राहील.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ९ एप्रिल २०२२

Jayant Joshi हो. पण संघटित कामगारांना ज्या प्रमाणात वाढ मिळते त्या प्रमाणात ती आहे का? दुसरे असे की या भाव वाढीने रुपयाचे मूल्य सतत कमी होत राहते. संपत्ती याचा अर्थ केवळ चलन नाही. अशा खूप गोष्टी आहेत. माझी विनंती राहील की, सखोल आणि गांभीर्याने अर्थविषयक चिंतन करावे. सतत भाव वाढत राहणे हे सगळ्याच अर्थाने घातक असते. मुख्य म्हणजे विचार करताना १५० कोटी चेहरे समोर ठेवावेत.

Surendra Deshpande Gaulkar शास्त्र म्हणतं म्हणून तेच योग्य असतं असं नाही. जगभरच्या सगळ्या माणसांना किमान सन्मानाचं जीवन विद्यमान अर्थशास्त्र का देऊ शकत नाही? हां, माझं जीवन व्यवस्थित आहे एवढं ज्यांना पुरेसं वाटतं त्यांचा प्रश्नच वेगळा.

Surendra Deshpande Gaulkar हास्यास्पद. अजीर्ण होणारे भोग आणि साधनसंपत्तीची उधळपट्टी हे आपल्याला दिसत नाही. फक्त लोकसंख्या दिसते. मानव कितीही पशू झाला तरी चालेल पण आम्ही याच मार्गाने जाणार असाच हट्ट असेल तर मला काही बोलायचे नाही. अजब आहे एकूण.

Surendra Deshpande Gaulkar practical असायला हरकत नाही. जीवनाशी फारकत घेऊ नये. जीवनाशी फारकत घेत असेल तर ते जाळून टाकावं. राहिला प्रश्न माझा. तर मला कशातलंही काही कळत नाही हे मला ठाऊक आहे.

rohini kale dani पोळी, भाजी, फळं, गॅस, औषधे, चपला, कपडे हे कसे शेअर करणार? प्रश्न नुसता जाण्यायेण्याच्या पेट्रोलचा नाही. अर्थकारणाच्या समग्रतेचा आहे.


कोरोनोत्तर चित्र

कोरोनोत्तर चित्र कसं असेल याची चर्चा होते आहे. त्या अनुषंगाने काही कल्पना -

- जागतिक स्तर, जागतिक मापदंड, जागतिक कल्पना, जागतिक दर्जा इत्यादीतून बाहेर पडलं पाहिजे. मानसिकता, व्यवस्था, योजना अशा सगळ्या गोष्टींना हे लागू करावं लागेल.

- आपण आपलं मॉडेल उभं करावं. बाकी जगाकडे दुर्लक्ष न करता, त्यांच्या अपेक्षांचं ओझं न बाळगता आणि त्यांच्या दबावात न येता.

- देशात ५०० राजधान्या विकसित कराव्या. या सगळ्या ठिकाणी infrastructure, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, अन्न, वीज, स्वच्छता, दळणवळण, सुरक्षा; अशा सगळ्या गोष्टी समान दर्जाच्या असाव्या.

- पैसा, निर्णय प्रक्रिया, नियोजन, r & d; अशा अधिकाधिक गोष्टी या ५०० ठिकाणी व्हाव्या.

- विकेंद्रीकरण. पण ते म्हणजे केंद्रीय सत्तेने केलेले वाटप असे स्वरूप नसावे. सगळ्या जीवनाचं केंद्रच या ५०० ठिकाणी असावं.

- केंद्रीय सत्ता समन्वय, निरीक्षण, साहाय्य, मार्गदर्शक अशी असावी.

- राज्य हे एकक रद्द करून; केंद्र आणि जिल्हा हीच पद्धत आणावी. दैनंदिन जीवनासाठी महापालिका आणि बाकी गोष्टींसाठी सरकार अशी व्यवस्था सगळ्या ५०० ठिकाणी असावी.

- ५०० ठिकाणांच्या सरकार प्रमुखांना मुख्यमंत्री म्हणावे.

- हे करताना महानगरीय vested interest विरोध करतील, कुरकुर करतील; त्यासाठीचे mechanism तयार करावे.

- यामुळे होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलांचा विस्तृत, तपशीलवार आढावा वेळोवेळी घेण्यासाठी; बदलणाऱ्या माणसांची कायम व्यवस्था उभी करावी.

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०२१

संरक्षण

संरक्षण करायचं असतं ते सद्गुणांचं, सद्भावांचं. तोच क्षात्रधर्म.

स्वार्थ, भोगलालसा, अहंकार, दुष्टता यांच्या संरक्षणाला काय म्हणायचं?

आज जगभरातच; व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत जोपासना स्वार्थ, भोगलालसा, अहंकार, दुष्टता (चापलुसी इत्यादी) यांची चलती आहे अन त्याच्या संरक्षणाचा आटापिटा. काही चांगल्याची अपेक्षा कशी करायची?

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०२२

असेच काही युद्धाविषयी

- अणुबॉम्बचा वापर क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिटलरने केला नाही.

- स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभारणाऱ्या अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला.

- ज्या विमानातून हिरोशिमा शहरावर 'लिटिल बॉय' टाकण्यात आला, त्या विमानाला त्याच्या पायलटने आपल्या आईचे नाव दिले होते.

- आईवर प्रेम करणाऱ्या त्या पायलटने लाखो आयांना यमसदनी पाठवले आणि लाखो आयांना अनाथ केले.

- एका क्षणात लाखो माणसे मारून टाकणाऱ्या अमेरिकेला कोणीही नावे ठेवीत नाही.

- अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या आईन्स्टाईनने अणुबॉम्ब वापरू नये यासाठी प्रयत्न केले होते. पण विज्ञानात अभूतपूर्व क्रांती घडवणारे आईन्स्टाईन माणसांच्या (राज्यकर्ते, सेना) मनात किंचितही बदल घडवू शकले नाही.

- 'मानवी सभ्यता' अणुबॉम्बचे अधिक घातक आणि अधिक अचूक अवतार तयार करू शकली आणि करते आहे.

- आपल्याचसारखी माणसे मारू नये एवढी संवेदना मात्र 'मानवी सभ्यता' निर्माण करू शकली नाही.

- बळी हा बोकडाचाच दिला जातो, वाघाचा नाही. देवही दुर्बलांचा घात करतात. पण हा जंगलाचा आणि मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेतील न्याय आहे. जी काही मानवी सभ्यता विकसित झाली ती या न्यायाच्या विरोधात जाऊनच विकसित झाली आहे.

- जंगलाचा न्याय मान्य करूनच साम्यवाद विकसित झाला आणि त्याने 'आहे रे, नाही रे' यांचा संघर्ष उचलून धरला.

- भांडवलशाहीने जंगलाचा न्याय मान्य केला आणि 'बळी तो कान पिळी' हे तत्त्व उचलून धरले.

- दोन हजार वर्षांपूर्वीच्या सिकंदराच्या विश्व जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने जन्माला घातलेल्या ख्रिश्चन, इस्लाम, लोकशाही इत्यादींनी; जंगलाच्या न्यायावरच आपापले तत्त्वज्ञान विकसित केले.

- जंगलाच्या न्यायाविरुद्ध जाणाऱ्या भारतीय समाजावर पुन्हा जंगलाचा न्याय लादण्यात आला.

- लादलेल्या स्थितीचा सामना करत, जंगलाच्या न्यायाच्या जागी त्याला विरोधी तत्त्व जगात प्रतिष्ठित करणे, हे भारतापुढील आव्हान.

- अन्यथा जंगल उजाड होईल.

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०२२

(पॉल टीबतस हे पायलटचे नाव। तो टाकणार असलेला बॉम्ब हा अणुबाँब असल्याचे त्यालाही माहीत नव्हते। नेहमीपेक्षा मोठा आहे, काळजीपूर्वक टाक, एव्हढेच त्याला सांगितले गेले। नंतर झालेला विध्वंस पाहून तो ठार वेडा झाला। - राजेश एकनाथ जोशी)

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

मोकळा वेळ

आज एक चार ओळींची बातमी वाचण्यात आली. मनात आलेला पहिला विचार म्हणजे, ही बातमी एखाद्या तरी वृत्तपत्राची पहिली ठळक बातमी का होऊ नये. अर्थात तसे होणे नाही हेही खरेच. बातमी होती- स्पेनमध्ये कामाच्या अवधीत दोन तास कपात करणार असल्याची. हा निर्णय घेण्यासाठी त्या देशाने तीन वर्षं विचार केला. मनुष्याला जीवन जगता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या कोलाहलात कोणी फारसे लक्ष देणार नाही असा हा विषय आहे. वास्तविक हा विषय नवीन नाही. एवढेच नाही तर, महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय या द्रष्ट्या महापुरुषांनी आर्थिक विचार मांडताना माणसाला आवश्यक असलेल्या मोकळ्या वेळेचीही चर्चा केली आहे. आज मात्र हा विषय दुर्लक्ष करण्याचा, चेष्टेचा, हीन भावनेने पाहण्याचा समजला जातो. `मरायलाही फुरसत नाही', `त्याला बिलकुल वेळ नसतो', `आजकाल सगळे खूप व्यस्त झाले आहेत' अशी वाक्ये खूप अभिमानाने बोलली जातात. लहान, संथ शहर म्हणजे `पेन्शनरांचे गाव' अशी हेटाळणी केली जाते. सतत व्यस्त वा गुंतलेले असणे हा फार मोठा पुरुषार्थ समजला जातो. अन तोच काळप्रवाह असल्याने त्यापेक्षा वेगळे बोलायला, वागायला कोणी धजावत नाही. खोट्या गोष्टी मोठ्या करायच्या अन त्यातच रममाण व्हायचे हा तर आजचा खाक्याच आहे. सुदैवाने स्पेनसारख्या देशाला ही बाब जाणवली आणि त्याने वर्तमान धारणांना छेद दिला. खरे तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, वैचारिक, भावनिक, बाह्य व आंतरिक, आध्यात्मिक; अशा सर्व प्रकारच्या विकासासाठी काही मोकळा वेळ आवश्यक असतो. तोही नियमित आणि सुविचारीत हवा. आजकालच्या `पाच दिवसांचा आठवडा' किंवा भविष्यात येऊ घातलेला `चार दिवसांचा आठवडा' आणि `enjoy the weekend' अशा स्वरूपाचा तो नको. माणूस हा पैसे कमावण्याचे यंत्र नाही, तसेच काम करण्याचेही यंत्र नाही. किंवा चार घटका मौजमजा, दंगामस्ती, आरडाओरडा करणे हाही जीवनाचा आशय नाही. ज्याला जीवन म्हणून म्हटले जाते त्याच्या असंख्य पैलूंचे उलगडत जाणे आणि या उलगडण्यातून येत जाणारे पूर्णत्व; यासाठी विशिष्ट प्रमाणात कामही हवे अन विशिष्ट प्रमाणात मोकळा वेळही हवा. माणसाची मानसिकता, आजच्या व्यवस्था, शहर नियोजन, आर्थिक- सामाजिक- राजकीय- रचना, जीवनविषयक दृष्टीकोन, संकल्पशक्ती; अशा अनेक गोष्टी त्यासाठी हव्यात.

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०१६

भ्रांती

एक फोन : 'तू ठीक आहे नं?'

माझं उत्तर : 'हो. का रे?'

फोन : 'काही नाही सहजच.'

उत्तर : 'मी फारसा अस्वस्थ वगैरे होत नाही रे.'

फोन : 'का? कसं?'

उत्तर : 'दुर्गा सप्तशतीत शेवटी म्हटलं आहे - या देवी सर्वभूतेषु भ्रांतीरुपेण संस्थिता... माझ्या बाबतीत ही भ्रांती समूळ नि:शेष करून; या जगाबद्दलची ओढ, आकर्षण पूर्ण निपटून काढून; जगाबद्दलचा भ्रम कणभरही राहू न देऊन; कैवल्य बहाल करण्याचा प्रभूचा प्रयत्न आहे. त्यामुळे अनुकूल किंवा प्रतिकूल दोन्ही गोष्टी माझी या जगाबद्दलची भ्रांती दूर करण्यासाठीच असतात. मी तरी त्याकडे तसंच पाहतो. त्यामुळे काही वाटण्याचा प्रश्न खूप कमी होतो. त्यामुळेच फारसा अस्वस्थ होत नाही.'

फोन : कठीण आहे बाबा तुझं.

उत्तर : 😀😀

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०२२

रविवार, २ एप्रिल, २०२३

लष्कर आणि सुरक्षा

आमचे जावई लष्करात अधिकारी आहेत. सध्या उत्तराखंडात आहेत. कुठे ते मुद्दाम सांगत नाही. लष्कराचं ते कॅम्पस जंगलातच आहे. बिबट्या जात येत असतात. माकडं, लांडगे, कोल्हे वगैरे वगैरे आहेतच. तिथल्या बहुतेक इमारती ब्रिटिशकालीन आहेत. माकडं घरात येणं वगैरे सामान्य बाब. घरात पोरंबाळं असतात, महिला असतात. त्यामुळे दारं, खिडक्या चोवीस तास बंद ठेवावे लागतात. मी विचारलं तेव्हा कळलं की, खिडक्यांना गज, ग्रील इत्यादी नाही. जुन्या काळातल्यासारखे फक्त पल्ले. गंमत वाटली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. आपण उत्सव साजरा करतो आहोत, पण देशाची सुरक्षा करणाऱ्यांच्या घरांच्या सुरक्षेचा विचार आपण करू शकलो नाही. (नेहरू - मोदी करणाऱ्यांनी कृपया इथे व्यक्त होऊ नये.)

- श्रीपाद कोठे

३ एप्रिल २०२२