काल संध्याकाळची गोष्ट. बाहेरून घरी येत होतो. गल्लीत सायकल वळवली तर माझ्या मागोमाग तीन छोटी (५-७ वर्षांची) मुलं आली. दोघं त्यांच्या सायकलवर होती. एक त्यांच्यासोबत धावत होता. घरासमोर थांबलो. फाटक उघडत होतो तर तिघांपैकी एकाने विचारले - 'काका इथे तुम्ही राहता का?' हा असं का विचारतो हे न कळल्याने त्याच्याकडे गोंधळून पाहत मी म्हटलं, 'हो.' त्यावर ते चिरकुट म्हणालं, 'आम्हाला वाटलं इथे भूत राहतं.' आपल्या सोबत्याकडे हात करून म्हणाला, 'यांनी मला सांगितलं इथे भूत राहतं.' मी त्याच्याकडे पाहून मनमोकळं हसलो. त्यांना आता वाटत राहील - भूतांना घाबरायचं नसतं. भूतं छान हसतात वगैरे पण. आत येऊन फाटक बंद करताना मनात आलं, 'त्या मुलाने सांगितलं ते खोटं पण तर नाही नं. आपण काय भूतापेक्षा कमी आहोत का?'
- श्रीपाद कोठे
१८ एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा